इंटरनेटच्या युगात कृषिमालाचे मार्केटिंग


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे सर्वच देशांत कृषिमालाचे बर्‍याच प्रमाणात नुकसान होताना दिसते या समस्येवर शेतीमालावर प्रक्रिया केली जाते. भारतात शेतीमालाची मुबलक उपलब्धता आहे, मात्र योग्य व्यवस्थापन व कौशल्याअभावी प्रक्रिया होत नाही.

योग्य व्यवस्थापनाला ज्ञानाची जोड दिली तर भाजीपाला निर्जलीकरण, दुग्धप्रक्रिया आदी उद्योग शेतकरी उभारू शकतात. शेतीवरील उत्पादनाला योग्य किंमत हवी असेल तर शेतकर्‍यांनी शेतीमाल प्रक्रियेकडे वळावे. किमान गृहपातळीवर तरी असे लघुउद्योग उभारणे जरुरीचे ठरेल.

२१व्या शतकातील इंटरनेटची झेप पाहता एका क्‍लिकवर सगळे काही उपलब्ध आणि त्याच वेगाने २१ व्या शतकातील माणूसही धावतो आहे. त्याला सर्व काही तयार आणि कमी वेळेत हवे आहे आणि त्यासाठी उत्तम पर्याय ऑनलाईन मार्केट याचे जाळे सर्वदूर पसरलेले आहे आणि ते तितकेच मजबूतही आहे

यात विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, खेळणी, कपडे व इतर गृहोपयोगी वस्तू आकर्षक पॅकेजिंगमध्ये ग्राहकांना घरपोच मिळतात. त्याचे पैसे चुकते करण्यासाठी आपण डेबिट/ क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकींग, मोबाइल वॉलेट किंवा वस्तू मिळाल्यावर पैसे (कॅश ऑन डिलिव्हरी) इत्यादी पद्धतींचा अगदी सुलभपणे वापर करू शकता. याच संकल्पनेवर आधारित शेतकरी आपला भाजीपाला व इतर शेती आधारित शेतमाल उत्पादन का विकू शकत नाही?

विकू शकतो, गरज आहे भविष्यातील आव्हाने ओळखून शेतकर्‍यांनी वैयक्तिक किंवा गटपातळीवर या क्षेत्रात उतरण्याची व शेतमाल प्रक्रियेतून मूल्यवर्धन करण्याची, यातून काहीशा प्रमाणात अपेक्षित दर मिळवणे तसेच शेतीमालाचे नुकसान टाळणे शक्य होईल.

आज योग्य बाजारपेठेअभावी किंवा प्रक्रिया न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान होते. विशेषत: भाजीपाला पिकाचे जास्त नुकसान होताना दिसते. यावर प्रक्रिया त्यात भाजीपाला निर्जलीकरण हा एक उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर आपण आपली इतर उत्पादिते यात तृणधान्य, कडधान्य तसेच कृषीपूरक उद्योगातील उत्पादने (दूध, अंडी, प्रक्रियायुक्त फळे व भाजीपाला उत्पादित इ.) विपणन करू शकता.

या संकल्पनेतून शेतकरी आपला सर्व शेतमाल विकू शकतो. विशेषत: आजची बाजाराची स्थिती पाहिली तर बाजार समिती आवारातील लिलाव पद्धती मध्यस्थ, त्यांचे कमिशन व उच्चांकी आवक यामुळे दर पडणे, शेवटी शेतकरी कमी भावाने व ग्राहक चढ्या भावाने भरडला जातो. या समस्येवर थेट घरपोच भाजीपाला पुरवठा ही संकल्पना काहीशा प्रमाणात नियंत्रण आणू शकते.

या संकल्पनेसाठी शेतकर्‍यांनी खालील गोष्टींकडे लक्ष देणे जरुरीचे ठरेल.

१. उत्तम दर्जाचे कृषिमाल उत्पादन

शेतमालाची गुणवत्ता (आकार, वजन, पोषण द्रव्यांचे प्रमाण) उत्तम असेल तर तो ग्राहकांच्या पसंतीस खरा उतरेल.

२. अत्याधुनिकता (लागवड ते कृषिमाल विपणन)

पिकांची लागवड करताना सुधारित बियाण्यांचा वापर तसेच पीक लागवड व्यवस्थापनात शास्त्रीय पद्धतीचा अवलंब म्हणजे बाजारपेठेचा अभ्यास करून लागवड नियोजन, यात लागवड पद्धती आणि लागवडीचे अंतर, पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन व त्याबरोबर पाण्यात विरघळणारी शक्यतो सेंद्रिय खते (फर्टिगेशन)चा वापर, पिकाच्या वाढीनुसार विशिष्ट कृषी पद्धतीचा अवलंब, काढणीपश्‍चात तंत्रज्ञानामध्ये काढणीनंतर साठवणूक, प्रतवारी इ. अभ्यास, शेतकर्‍यांनी यासाठी तज्ज्ञांच्या सल्ला घ्यावा (आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र व कृषी संशोधन केंद्र) यांच्याशी संपर्क करून आधुनिक लागवड पद्धतीचा अभ्यास करावा.

३. ग्राहक वर्गाच्या पसंतीचा अभ्यास

ग्राहकास कोणता शेतमाल कशा स्वरूपात हवा आहे यासाठी शेतकर्‍यांनी याचा अभ्यास करण्यासाठी शहरांच्या जवळील आठवडी बाजारात ग्राहकांची कृषिमालासाठी पसंती पाहणे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत विशिष्ट मालाची स्थिती (आवक आणि विक्री) याची पाहणी व अभ्यास.

४. कीटकनाशकांचा कमीत कमी वापर

कीटकनाशकांच्या अवाजवी वापरामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे, त्यामुळे अनेक दुर्धर आजार निर्माण होत आहेत आणि हे सर्वांच्या निदर्शनास आले आहे. यासाठी जैविक कीटकनाशके हा उत्तम पर्याय आहे. याचा वापर करावा. नुकसानीची पातळी पाहून फवारणी करावी. शक्यतो रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा.

५. सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचा अवलंब

रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे मातीची उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे, म्हणूनच आज शास्त्रज्ञ सेंद्रिय शेतीचा अभ्यास करत आहेत आणि शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा प्रयत्न करत आहेत, दिवसेंदिवस उत्पादकता कमी होत आहे, मातीचे आरोग्य धोक्यात येत आहे यासाठी निसर्गाबरोबर राहून सर्वांचा समतोल राखत सेंद्रिय शेतीची कास धरणे जरुरीचे ठरेल. आजची स्थिती पाहता हे अवघड आहे; परंतु पर्यावरणाचे संतुलन ठेवायचे असेल तर सेंद्रिय तथा नैसर्गिक शेतीच करावी लागेल आणि यातून मिळणार्‍या उत्पादनासाठी चांगली मागणी आहे.

६. दर्जात्मक मालाची निवड

मालाची निवड करताना मालाचा (आकार, वजन, चव, डोळ्यांच्या चवीसाठी दिखाऊपणा) इ. निकष लक्षात घ्यावे.

७. आकर्षक पॅकेजिंग

पर्यावरणाचा विचार करून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी प्लास्टिकचा कमीत कमी वापर यासाठी पेपर पॅकिंगचा अवलंब तसेच इतर पर्यावरणपूरक पॅकिंग साहित्य वापरावे.

८. दैनंदिन वेळेत भाजीपाला पुरवठा

ग्राहकांना आपण घरपोच भाजीपाला देण्याच्या संकल्पनेसाठी दैनंदिन किंवा साप्ताहिक वारानुसार भाजी देत असाल तर तो वेळेतच मिळावा यासाठी उत्तम यंत्रणा असावी याची विषेश दखल घ्यावी.

९. साप्ताहिक अथवा मासिक ग्राहक अभिप्राय

आपण शेतमाल (भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य व कृषीपूरक उद्योगातून मिळणारी उत्पादने, त्यात अंडी, दूध, प्रक्रियायुक्त पदार्थ) इ. ग्राहकांना पोहोचवत असाल तर आपल्या व्यवसायाच्या नावीन्यासाठी, आपल्या सेवेविषयी अभिप्राय घेणे जरुरीचे ठरेल, यातून भविष्यात काय बदल हवे आहेत हे समजण्यास मदत होईल व नावीन्याच्या दृष्टीने वाटचाल करणे सोपे जाईल.

१०. मोबाइल व सोशल नेटवर्किंग साइट्सचा प्रभावी वापर

इंटरनेटच्या युगात मोबाइल, संगणकाच्या माध्यमातून सोशल साइट्सचा (व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक) अशी इंटरनेटवर अनेक साधने आहेत, त्याचा उत्तम वापर आपण कृषिमाल विपणनासाठी करू शकतो.

११. काढणीपश्‍चात तंत्रज्ञानात महिला बचत गटांचा समोवश

शेतीतील प्रमुख समस्या मजुरटंचाई यासाठी महिला बचतगटाचे साहाय्य घेत काढणीपश्‍चात प्रक्रियेत निवड, प्रतवारी, पॅकिंग इ.साठी महिला उत्तम काम करतील, त्यात बचत गटास हमखास रोजगार मिळेल, त्यातून त्यांची आर्थिक व सामाजिक पातळी उंचाविण्यास मदत होईल.

यासाठी पुणे, मुंबई व आपल्या जवळची छोटी-मोठी शहरे शेतकरी वर्गाला खुणावत आहेत. या शहरातील ग्राहक वर्ग शेतमालाची चव डोळ्याने चाखतो. ही मोठी संधी ओळखून यात उतरले पाहिजे. तसेच तुम्ही नंबर फिरवा आणि भाजी मिळवा हा उपक्रमसुद्धा राबवू शकता. यात आपण भाजीपालाव्यतिरिक्त इतरही कृषिमाल उदा. धान्य, डाळी, फळे विकू शकतो आणि चांगले अर्थार्जन करू शकतो.

आजची पीक उत्पादकतेची परिस्थिती पाहता अजूनही शेतकरी उच्चांकी उत्पादन घेत आहेत; परंतु विपणनाची परिस्थिती समाधानकारक दिसत नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना कुणाच्या कुबड्यांची वाट न पाहता आपला पर्याय शोधावाच लागेल. काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे सर्वच देशात कृषिमालाचे बर्‍याच प्रमाणात नुकसान होताना दिसते.

या समस्येवर कृषिमाल प्रक्रिया हा एक उत्तम पर्याय आहे. इस्राईल तथा स्वित्झलँडमध्ये ५०% शेतीमालावर प्रक्रिया केली जाते. भारतात शेतीमालाची मुबलक उपलब्धता आहे, मात्र योग्य व्यवस्थापन व कौशल्याअभावी प्रक्रिया होत नाही.

योग्य व्यवस्थापनाला ज्ञानाची जोड दिली तर भाजीपाला निर्जलीकरण, दुग्धप्रक्रिया आदी उद्योग शेतकरी उभारू शकतात. शेतीवरील उत्पादनाला योग्य किंमत हवी असेल तर शेतकर्‍यांनी शेतीमाल प्रक्रियेकडे वळावे. किमान गृहपातळीवर तरी असे लघुउद्योग उभारणे जरुरीचे ठरेल.

– बिभीषण बागल
(लेखक कृषी तज्ज्ञ असून ‘इस्राएलमधील शेती’ हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?