बेडेकर मसाले यांचा शंभर वर्षांचा मसालेदार प्रवास


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


‘उद्योगाचे घरी रिद्धिसिद्धी पाणी भरी’

ही म्हण सर्वश्रुत आहे. माणसाने उद्योग केला, व्यवसाय केला की समृद्धीही पाठोपाठ येते, असा अर्थ या म्हणीतून ध्वनित होतो. उद्योग आणि समृद्धी यांचा संबंध ‘उद्योगिनं पुरुषसिंहम् उपैति लक्ष्मी:’ या सुभाषितातही अधोरेखित करण्यात आला आहे. काही उद्योग-व्यवसाय हे पिढीजात चालत आलेले आहेत. पुढील पिढ्यांना आपल्या कर्तृत्वाने त्यात भर घालण्याचे काम करावे लागते.

नुकतीच आपल्या व्यवसायाची शताब्दी साजरी करणार्‍या सुप्रसिद्ध बेडेकर मसाल्यांचे उत्पादन करणार्‍या उद्योगसमूहाच्या पूर्वसुरींना मात्र धंद्यासाठी आवश्यक असलेली कोणतीच पार्श्वभूमी नव्हती. सुमारे सात-आठ पिढ्यांपूर्वी कोकणातील राजापूर तालुक्यातील गोवळी गावी बेडेकर घराणे उत्तम प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध होते.

एक प्रकारे त्या घराण्यात भक्तिमार्गाच्या निवृत्तीपर विचारांचे महत्त्व होते, परंतु इच्छा असली की प्रगतीच्या नवनवीन वाटा सापडतात. सागरी मार्गाने भाताच्या-तांदूळाचा व्यापार सुरू करण्याची कल्पना सुचली व ती वसंतराव बेडेकरांच्या खापरपणजोबांनी अमलात आणली.

कीर्तनकार बेडेकर उद्योजक झाले. पुढे मुंबईत मसाले तयार करून विकण्याचा व्यवसाय वासुदेव बेडेकरांनी सन १९१० पासून सुरू केला. ‘व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स’ या कंपनीचा पूर्वेतिहास होतकरू उद्योजकांसाठी स्फूर्तिदायक आहे, प्रेरणादायी आहे. कारण उद्योग सुरू केल्यावर अनेक तरुण उद्योजकांना गरुडभरारी घ्यावीशी वाटते, परंतु त्यासाठी पंखात पुरेसे बळ निर्माण करण्यात ते काही वेळा कमी पडतात.

या कंपनीच्या इतिहासावरून आपल्याला एक लक्षात येते की, प्रगतीसाठी उद्योगाचे स्वरूप महत्त्वाचे नसते, तर उद्योग लहान असला तरी त्यातून स्वप्रयत्नाने, कल्पकतेने मोठी झेप घेता येते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठही काबीज करता येते…

अर्थात त्यासाठी टीकाकारांकडे दुर्लक्ष करून आपल्या उद्योगावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. हा अनुभव अण्णासाहेब बेडेकरांना आरंभीच्या काळात आला. मसाला कुटणे, लोणची घालणे हा काय धंदा आहे, अशी अनेकांनी हेटाळणी केली होती, परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले व आपल्या उद्योगाकडे लक्ष केंद्रित केले.

आज या उद्योगाचा विस्तार पाहिल्यावर, तसेच याच क्षेत्रात नव्याने सुरू झालेल्या मसाला उद्योगांचे यश पाहिल्यावर आपल्या धंद्यातील बेडेकरांचा विश्वास किती सार्थ होता, हे लक्षात येते.

व्यवसाय लहान म्हटला, तरी विशेषत: लोणची, मसाले, किराणा माल अशा वस्तूंच्या व्यवसायात काही वेळा ग्राहकांची उधारी ठेवावी लागते, नंतर ती वसूल करण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात. ही एक कसोटीच असते. अण्णासाहेब बेडेकरांनी धाडसाने उधारी बंद करून वसुलीचा त्रास नाहीसा केला.

बेडेकरांनी पहिल्यापासून मालाच्या दर्जाला महत्त्व दिले. मसाले, पापड, लोणची विकायला सुरुवात केल्यावर इतर किराणा वस्तूही चोख व साफ करून विकल्यामुळे खप वाढला. नफ्याचे प्रमाणही वाढले. बाजारातून मालही रोखीने आणल्यामुळे विश्वासार्हता वाढली.

एखाद्या पदार्थाच्या निर्यातीसाठी कठोर नियम पाळावे लागतात. सर्व कसोट्यांना उतरल्यावरच निर्यात करता येते. हे सर्व नियम या कंपनीने डोळ्यात तेल घालून पाळले, त्यामुळे माल सदोष आहे म्हणून परदेशातून परत येण्याची, पर्यायाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गमावण्याची नामुष्की या कंपनीवर कधी आली नाही.

आज अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या आरोग्यविषयक दक्ष असणार्‍या चोखंदळ देशांतही बेडेकरांची उत्पादने गुणवत्तेच्या कसोटीवर उतरल्यामुळे लोकप्रिय आहेत. भारत सरकार दर वर्षी भारतातील निरनिराळ्या शहरांत अखिल भारतीय फलोत्पादन प्रदर्शन आयोजित करीत असते. बेडेकरांच्या लोणच्यांनी दिल्‍ली, इंदूर, मुंबई, कोलकाता व इतर प्रदर्शनांतून १९५९ सालापासून पहिल्या व दुसर्‍या क्रमांकाने गौरवण्यात येत आहे.

या सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेडेकरांनी ग्राहकांचा विश्वास मिळवला. हे ऋण कधीच विसरू शकत नाही, असे वसंतराव बेडेकर म्हणतात.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?