उद्योगसंधी

खाद्यपदार्थ व पेयांचे स्टॉल्स

मुंबईकरांना हे नवीन नाही. मात्र तुमच्याकडे फारसा पैसा नसेल व या धंद्याचा विशेष अनुभव नसेल तर तुम्ही थेट ह्या धंद्यात पडू नका, कारण या धंद्याला तसा बर्‍यापैकी पैसा ओतावा लागतो व हप्तेही द्यावे लागतात. तेव्हा तुम्ही ज्यांचा ह्याच्यात जम बसलेला असेल अशांना तयार पदार्थ पुरवायचे. यासाठी तुम्ही आई, ताई, माई, आत्या, आजी आदी स्त्रियांचाही सल्ला घ्या. आई वा आजीसारखे चवदार पदार्थ जगात कोणी बनवत नाही. त्यातून तुमच्या घरचं काही खास वैशिष्ट्य असेलच. ते थालीपीठ, पोहे, झुणकाभाकर, वालाची उसळ काहीही असेल.

तुम्हाला तीन नवीन अफलातून आयडिया देतो. एक म्हणजे नॉनव्हेज पिझ्झा, दुसरे व्हेज पिझ्झा व तिसरे म्हणजे ताक. पिझ्झा हा एक मूळ इटालियन खाद्यपदार्थ आहे. तो आता सबंध जगभर लोकप्रिय झाला आहे. पिझ्झा म्हणजे दोन बाजूला दोन भाकर्‍या (इटालियन अर्थात) आणि मध्ये दगडधोंडेमाती (इटालियन अर्थात) झालं! अर्थात ह्याने भूक संपूर्ण भागते. परदेशात असताना कडकीच्या वेळी मी याच्यावरच दिवस काढले. त्याच्याऐवजी आपण दोन बाजूस दोन भाकरी घ्यायच्या व मध्ये सोलून, साफ करून, मस्त काटेविरहित तळलेली मासळी पसरवायची. मग ती कोलंबी, पापलेट, मांदेली, बोंबिल, बांगडा, बोय, गोळ, सुरमई, रावस, हलवा, काही असू शकेल. त्याचप्रमाणे व्हेज पिझ्झामध्ये भेंडी, गवारी, फरसबी, फ्लॉवर, टोमॅटो, बटाटे, वांगी, ओले वाटाणे, वाल – वेगवेगळे वा ह्यांच्यातील  काहींचे मिश्रण असू शकेल. शेवटी चवदार असलं म्हणजे झालं. बरोबर लिंबू, कांदा, टोमॅटो, कोशिंबीर, सॅलड पद्धतशीर मांडून शो करावा. म्हणजे एकच चित्रपट. उदा.- ‘न्यूयॉर्क’ प्लाझाला बघितला व मेट्रोला बघितला तर मेट्रोला तो दुप्पट चांगला वाटतो तसाच तुमचा पिझ्झा लोकांना सुबक मांडणी केली तर अधिक आवडेल. ह्यात सुमारे ५० टक्के नफा आहे.

आता ताकाकडे वळू या. कारण ताकास जाऊन भांडे लपवण्यात अर्थ नाही. आता ताकच का? लिंबू सरबत, कोकम सरबत वगैरे का नाही? सांगतो. तुम्ही चार मित्रमैत्रिणी हॉटेलात जाऊन नुसतं एखादं शीतपेय (कोका कोला, लिमका, थम्स अप वगैरे) घ्यायचं म्हटलं तर शंभर रुपये खर्च होतात. हे गरिबांना परवडणारं आहे? शिवाय आवश्यक आहे? ताकात मुख्यत: तीन घटक आहेत: दही (दूध), मीठ आणि पाणी. पाणी फुकट मिळतं. मिठाची किंमत नगण्य असते व दुधाच्या भावात एकदम भरमसाट वाढ होत नाही. एक ग्लास ताकाच्या निर्मितीची किंमत सुमारे दोन रुपये. म्हणजेच शंभर रुपयांत तुम्ही पन्नास ग्लास ताक करू शकाल. ताकाच्या ग्लासची विक्रीची किंमत रु. दहा धरा. म्हणजेच शंभर रुपयाला चारशे रुपये फायदा. एकदम चारशे टक्के.

सुरुवातीला छोट्या प्रमाणावर घराच्या जवळच जिथे बर्‍यापैेकी वर्दळ आहे तिथे हा धंदा सुरू करावा. शक्यतो वडापाव वा इतर खाद्यपदार्थ विकणार्‍या गाडीच्या वा टपरीच्या शेजारी. ताक करताना आंबट होणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे दोन दिवस राहिलं तरी ते घुसळून लोकांना देता येईल. धंदा खूप वाढला तर हॉटेल्सना मोठ्या प्रमाणात पुरवठा करायचा. त्याकरिता ‘रेडी टू ड्रिंक’ पॅकिंग करून ते विकता येईल.

जमल्यास ताकाचे ब्रँडिंग करा व प्रचंड धंदा करा. अर्थात ह्या पुढच्या गोष्टी आहेत. कडक थंडी वा मुसळधार पावसाचे दिवस सोडले तर एरवी ताक बारा महिने खपू शकते, कारण तसे मुंबईत दोनच ॠतू असतात- एक उन्हाळा आणि दुसरा कडक उन्हाळा! जाहिरातीसाठी हवं असल्यास सोपानदेव चौधरींची ‘मी ताक पितो मी ताक पिणार’ ही कविता किंवा आयुर्वेदातील ताकाचे गुणधर्म एका पोस्टरवर लिहून ठेवावेत. केवळ ताक विकून मेहनती माणसास मुंबईत महिन्याला पाच ते दहा हजार रुपये कमवायला हरकत नाही आणि जोपर्यंत दुधाची तहान ताकावर भागवणारी कोट्यवधी जनता या देशात आहे तोपर्यंत या धंद्याला मरण नाही. आता ताक कसं बनवायचं हे मला विचारू नका. तुम्हाला ताक बनवता येत नसेल तर हिमालयात जा आणि तिथे ‘ताक धीना धीन’ करत बसा.

– हरीश परळकर


Smart Udyojak Subscription

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: