डर्माटोग्लायफिक्स : विज्ञानाधारित व्यवसाचा नवा पर्याय


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


एकदा माणसाने जंगलात परीक्षा घेण्याचे ठरवले. परीक्षार्थी होते अर्थातच प्राणी – माकड, हत्ती, मासा, घोडा आणि गाय. परीक्षा होती नारळाच्या झाडावर जाऊन नारळ काढणे. हत्ती, घोडा, गाय हे प्राणी झाडावर चढूच शकले नाहीत आणि मासा तर पाण्याच्या बाहेर येणारच कसा? म्हणून त्यांना ‘नापास’ ठरविले गेले.

पण याचा अर्थ नापास झालेले प्राणी पूर्णपणे निरुपयोगी आहेत का? प्रत्येक प्राण्याच्या गुणांचा जो उपयोग करता येणे शक्य आहे तो आपण व्यवहारात करतोच, नव्हे करावाच लागतो. घोडीचे दूध पिण्यासाठी वापरतो का? गायीवर बसून गावोगावी इकडेतिकडे फिरण्याची कल्पना करू शकतो का?

गाढवाला राखणदार म्हणून घराच्या अंगणात बांधाल का? कितीही मोठा व तगडा कुत्रा असेल तरी त्याला घोड्यांच्या रेसमध्ये पळवाल का? मग माझ्या मुलाने इतर मुलांसारखे ते शिकतात तेच शिकणे व तोच व्यवसाय करावा असा अट्टहास का?

एखाद्या शेतात मर्सिडीज गाडी कामासाठी घेऊन जाणारी माणसं बघितली आहेत का? त्यांना शहाणे म्हणाल का? मुंबई-पुणे हायवेवर एखाद्या माणसाने ट्रॅक्टरने अडीच-तीन तास जाण्याची केविलवाणी धडपड करणे योग्य आहे का? केवळ स्वतःची स्कॉर्पिओ किंवा फॉर्च्युनरसारखी शक्तिशाली गाडी आहे म्हणून त्याला नांगर जोडून शेतीची कामे कराल का?

जर या गोष्टी तद्दन मूर्खपणाच्या समजत असू तर प्रत्येक पालकाचा आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनीअर, सीए व्हावं असा आग्रह का? आपल्या मुलांमध्ये ट्रॅक्टरसारखे शक्तीचे गुण आहेत की मर्सिडीज गाडीसारख्या वेगाची क्षमता आहे हे ओळखणे गरजेचे वाटते का?

केतन, कविता, महेश बालवाडीपासून एकत्रच वाढले. केतन अत्यंत हुशार होता. अंगाने थोराड असल्यामुळे उठून दिसायचा! गाणी, गोष्टी, गप्पा, खेळ यांमध्ये नेहमी पुढे असायचा, त्यामुळे हुशार मुलांमध्ये त्याची गणना व्हायची. त्याच्या प्रगती पुस्तकावर उत्तम शेरा असायचा. कविता मात्र अधूनमधून भाग घ्यायची आणि महेश तर फक्त टकामका बघत बसायचा.

चौथी-पाचवीत गेल्यापासून केतन जरासा बुजू लागला व अभ्यासात मागे पडला. कविता कान देऊन ऐकायची आणि पटापट उत्तरे द्यायची. महेशला एकदा बघून सगळं लक्षात राहायचं आणि 80% मार्क सहज मिळायचे. सातवी-आठवीत गेल्यावर मात्र केतनऐवजी कविता आणि महेश हुशार मुलांच्या पंक्तीत जाऊन बसले. केतनचं अभ्यासातलं लक्ष कमी झालं आणि तो 60-70% पर्यंत खाली आला. अभ्यासाव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींमध्ये तो तितकाच रमायचा.

दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये त्याला 70-75% मिळाले, तर कविता आणि महेशला 90% मार्क मिळाले. तिघांनाही जर सारखंच शिकवलं जात होतं तर असं का व्हावं? अपयशाचं खापर शाळा, शिक्षक आणि शिक्षण पद्धतीवर फोडून आपण मोकळे होतो; पण ज्या-ज्या वेळेला मुलगा-मुलगी चांगले मार्क मिळवतात तेव्हा त्याचं क्रेडिट पालक स्वतःला किंवा क्‍लासला देतात.

प्रत्येकाची ऐकण्याची, बघण्याची क्षमता वेगळी, विचार करण्याची पद्धत वेगळी आणि स्वभावही वेगळाच! त्यांच्या सोयीनुरूप पन्नास मुलांना वेगवेगळे शिकवणे एका शिक्षकाला शक्य आहे का? नसल्यास आपल्या मुलांना, ‘आपण काय केलं’ की नीट शिकता येईल, शिकलेलं समजेल, समजलेलं लक्षात राहील आणि लक्षात राहिलेलं समजावता येईल किंवा परीक्षेत लिहिता येईल हे शोधणं गरजेचं नाही का?

काही मुलं ऐकून लवकर शिकतात, काही बघून लवकर शिकतात, तर काही जण सर्व गोष्टी स्वतःच्या हातांनी करूनच शिकू शकतात.

एखादी गोष्ट बघून-पाहून-करून शिकल्यावर जेवढी पक्की लक्षात राहते तेवढी कशानेही राहत नाही. म्हणून आजच्या पुढारलेल्या युगात अनुभवजन्य (experimental learning) शिक्षणाला व्यवस्थापनातसुद्धा (management) अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.

काही मुले ‘स्लो’ लर्नर असतात. इतर लोकांच्या तुलनेने अपेक्षेपेक्षा त्यांना शिकायला फार वेळ लागतो. जगात ‘ढ’ असे कोणीच नसते, फक्त त्या ‘मुलांच्यातील गुणवत्ता’ आपल्याला ओळखता येत नाही. ‘तारे जमीन पर’ चित्रपट आठवतोय का? त्यात ईशान अवस्थीला Dyslexic (स्लो लर्नर) ठरवतात. त्याच्या बाबांना तर तो आगाऊच वाटतो, पण निकुंभसर (आमीर खान) ईशानचे गुण व कला ओळखतात आणि त्यानुसार त्याला मार्गदर्शन करतात.

ईशानची अंगभूत कला जर कोणालाच ओळखता आली नसती तर त्याचे आयुष्य किती खडतर झाले असते याची कल्पनाच न केलेली बरी! म्हणूनच मुलांच्या अंगी असलेले गुण योग्य वेळी ओळखणे किती महत्त्वाचे आहे याचा अंदाज येतो.

आपल्यापैकी प्रत्येक जण काही ना काही शिकत असतो, अगदी आयुष्यभर शिकत असतो. आपण प्रत्येक वेळेला मुलांना हे करू नको, ते करू नको, असे सांगतो; पण काय करा हे सांगत नाही. काय करावे, काय शिकावे हे सांगण्यात जर थोडी सुधारणा केली तर जास्त फायदा होईल.

आहे तेवढ्याच वेळात ‘योग्य पद्धतीने’ अभ्यास करून जास्त परिणामकारक करण्यासाठी काय करता येईल? अभ्यास करण्याच्या पद्धतीत योग्य बदल करून जास्त लवकर कसं शिकता येईल? जीवनात आमूलाग्र बदल कसा होईल? हे कळण्याची सोय आहे का?

आजच्या वैज्ञानिक प्रगतीनुसार मेंदूचे विविध भाग व त्यांची कामे, कार्यक्षेत्रे माहीत झाली आहेत. यांपैकी कोणता भाग जास्त कार्यशील आहे व कोणता भाग जास्त वेळ क्रियाशील राहू शकतो याबद्दल आपण आवश्यक ती माहिती घेतली तर त्याआधारे योग्य करीयर निवडू शकतो.

आपल्या आवडीचे करीयर असल्यामुळे किंवा निवडल्यामुळे कमीत कमी श्रमात प्रावीण्य मिळवून जास्तीत जास्त यश संपादन करता येईल व एन्जॉय करून आनंदी राहता येईल.

मुलांचे पाय पाळण्यात दिसतात, असं आपण फक्त म्हणतो; पण खरोखरीच बघायचा प्रयत्न करतो का?

मुले दहावीत जाईपर्यंत आपण त्याच्या करियरचा विचार व नियोजन करतो का? आजच्या विज्ञानात मूल वर्षाचे झाल्यापासूनसुद्धा हे कळण्याची सोय आहे. यासाठी ‘डर्माटोग्लायफिक्स’ (Dermatoglyphics) ही एक विद्याशाखा विकसित झाली आहे. या विद्याशाखेत दिलेल्या चाचण्यांनुसार हाताच्या बोटांच्या ठशांवरून मुलाच्या बुद्धीचा कल, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्यातील कमतरता ओळखता येतात.

ही चाचणी करून घेतल्यावर पालकांना नववी-दहावीची वाट न पाहता पहिल्या-दुसर्‍या वर्षातच कळू शकतं की, ‘त्याला कशात गती येईल? कुठल्या गोष्टी तो पटकन शिकेल?’ तर फायद्याचं आहे का? यामुळे मुलांच्या जन्मापासून त्यांच्या सोयीच्या करियरसाठी लागणारी सुविधा व खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी दहावी-बारावीपर्यंत पालकांना पंधरा-सोळा वर्षांचा कालावधी मिळू शकतो.

सचिन तेंडुलकर लहान वयात क्रिकेट खेळू लागला. म्हणून चाळीशीत अनेक विश्‍वविक्रम करून निवृत्त होऊ शकला. तेच जर दहावी-बारावी पास झाल्यानंतर क्रिकेट खेळायला सुरुवात केली असती तर? लता मंगेशकर तर जन्मापासूनच गाण्याचे संस्कार घेत वाढल्या. थॉमस अल्वा एडिसन लहानपणापासूनच वेगवेगळे प्रयोग करत असे.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जन्मजात कला-गुणांविषयी आपण जागरूक होण्याची हीच वेळ आहे.

डर्माटोग्लायफिक्स ही अत्यंत विज्ञानाधारित ज्ञानशाखा असून त्यात माणसाच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो आणि त्यावरून माणसाच्या जन्मजात गुणांविषयी, त्याच्या मूळ स्वभावाविषयी अचूक माहिती मिळते.

दहावी-बारावी मुलांबरोबर इतरांनासुद्धा करीयर मार्गदर्शन करण्याकरिता या शास्त्राचा उत्तम उपयोग होऊ शकतो. मानसोपचारतज्ज्ञदेखील या शास्त्राद्वारे रुग्णाच्या मनाचा अचूक वेध घेऊ शकतात.

पालक-पाल्य, पती-पत्नी, व्यावसायिक भागीदार यांमधील नातेसंबंध सुधारायला हातभार लागू शकतो. लघु व मध्यम क्षेत्रातील उद्योगांना मनुष्यबळ योग्य रीतीने कसे वापरावे याबद्दल मार्गदर्शन मिळू शकते. मोदी सरकारच्या ‘मल्टी स्किल डेव्हल्पमेंट’ या धोरणाच्या अंमलबजावणीसाठीदेखील या शास्त्राचा उपयोग होऊ शकतो.

डर्माटोग्लायफिक्स या ज्ञानशाखेत सुशिक्षित बेरोजगार वा अर्धवेळ व्यवसाय करण्याची ईच्छा असलेल्यांसाठी व्यवसायाच्या अनेक संधीही उपलब्ध आहेत. ज्यांना लोकसंपर्क वाढवण्याची आवड आहे त्या व्यक्तींसाठी हा व्यवसाय म्हणजे पर्वणीच आहे, कारण हे विज्ञान आत्मसात केल्यावर आजूबाजूच्या माणसांची नवी ओळख होण्यास मदत होते, त्यांच्या भावभावना समजून घेण्यास मदत होते.

या व्यवसायासाठी लागणारे ज्ञान, प्रशिक्षण ग्रामीण भागांत जाऊन देणे शक्य आहे, किंबहुना ग्रामीण भागातच त्याची जास्त गरज आहे. याचा फायदा घेऊन मुले शहरी भागातील मुलांशी बरोबरी करू शकतील. एका माणसाच्या बोटांचे ठसे घेऊन त्याचे विश्‍लेषण करून मार्गदर्शन करणे यासाठी साधारण दोन ते तीन तासांचा अवधी लागतो.

पूर्णवेळ वा अर्धवेळ व्यवसाय म्हणून या शास्त्राचा विचार आपण करू शकतो. हा जोड-व्यवसाय म्हणूनदेखील करणे सहज शक्य आहे. उदा. शिक्षक; दुपारच्या वेळी बंद असलेल्या संस्था, बँक, ऑफिस, दुकाने यांमधील कर्मचारी. एखादी गृहिणीदेखील हा व्यवसाय करून घराच्या उत्पन्नात हातभार लावू शकते.

हा व्यवसाय करण्याची ईच्छा असलेल्यांना मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा.

– प्रणव नाफडे
naphade.pranav@gmail.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?