‘उद्योजक’ ही काळाची गरज


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आपल्या जीवनात सातत्याने घडत असणारी गोष्ट म्हणजे ‘बदल’ आणि या बदलानुसार जे स्वतःमध्ये बदल घडवतात तेच यशस्वी होतात हा ‘निसर्गाचा नियम’. ज्यांनी काळाप्रमाणे स्वतःला बदलले नाही ते संपुष्टात आले, हा इतिहास. साक्षरता एवढी वाढली आहे की, पदवी घेऊन बाहेर पडणार्‍यांची संख्या वाढत आहे व आपल्याकडे असलेल्या शासकीय आणि खासगी नोकर्‍यांची संख्या कमी होत आहे.

आपली व्यवस्था इतक्या सर्वांना नोकर्‍या देऊ शकत नाही म्हणून सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी आपण वर्तमानपत्रातून वाचले असेलच की, सरकारी नोकर्‍या कमी होणार आहेत, खासगी कंपन्या यांत्रिकीकरण व ऑटोमेशनवर भर देत आहेत, त्यामुळे नोकर्‍यांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा आता नोकरी देणारे बनण्याची गरज आहे. वरील सर्व प्रश्‍नांवर एकच उपाय आहे, तो म्हणजे ‘उद्योजक’ बनणे.

तरुणांना उद्योजक बना, असे सांगितले की, त्यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, उद्योजक बनणे एवढे सोपे आहे का?

त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहते मोठ्या कंपनीचे चित्र, मोठी जागा, शेड, धुराडे, भोंगा व भरगच्च कामगार. दुसरा विचार सुरू होतो त्यासाठी लागणारी गुंतवणूक, भांडवल, अनुभवी तज्ज्ञ मनुष्यबळ उभे करायचे कुठून? तिसरा विचार असतो माझा उद्योग यशस्वी होईल का? जर अपयश आले तर लोक काय म्हणतील? ‘क्या कहेंगे लोग ये सबसे बडा रोग’ यापासून स्वतःला दूर ठेवा व आत्मविश्वासाने सामोरे जा.

उद्योजक बनण्यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज असते. ती म्हणजे उद्योजकीय मानसिकता, उद्योजकीय वैचारिकता व अर्थपूर्ण जोखीम. हे जर आपल्यामध्ये नसेल तर उद्योजक बनणे व तो यशस्वी करणे कठीण आहे. तुमच्यासमोर उभे राहिलेले सर्व प्रश्न दुय्यम आहेत, जर तुमच्यामध्ये उद्योजकीय मानसिकता असेल तर. एक लक्षात ठेवा, उद्योजक बनायला कोणतीही अट नसते, ना वयाची, ना शिक्षणाची.

कोणत्याही वयात स्वत:चा उद्योग सुरू करू शकता. उद्योजक होण्यासाठी कोणतीही औपचारिक पात्रता लागत नाही. बर्‍याच तरुणांना आजकाल व्यवसायात यायची इच्छा असते; पण उद्योजकीय मानसिकता काय असते व नवीन उद्योजक होताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, हे याची कल्पना नसते.

जीवनात माणूस हा दोन गोष्टींना घाबरतो. एक असते अपयश व दुसरा मृत्यू. मृत्यू ही आपल्या हातात नसलेली गोष्ट आहे; पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते व तुम्ही यशाच्या अगदी जवळ पोहोचलेला असता. आता ध्येय तुमच्या जवळपास असते हे लक्षात ठेवा.

अपयश आले तर स्वतःला सांगा, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही व ते पचवून पुढे जाण्याची तयारी ठेवा. जसे आपल्याला औषधाची कडू गोळी लगेच गिळून टाकली तर गुण येतो व बरे वाटू लागते. ती चघळत बसले तर तोंड कडू होईल. तसेच अपयशाचे आहे. जर ते लगेच पचवून पुढील मार्ग ठरवला तर नक्कीच यश तुमच्या पायाशी लोटांगण घेते.

लोक काय म्हणतील, याकडे लक्ष न देता उद्योजकाने आपली वाटचाल सुरू ठेवली पाहिजे. मानवजातीचा कोणत्याही एका अडचणीवर तुम्ही समाधान शोधले की यातूनच नव्या कल्पनेचा जन्म होतो व ती कल्पना तुमच्यातील उद्योजक जागा करते. उद्योजक बनण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय कल्पना सुचल्या आहेत त्या लिहून काढा.

एक लक्षात ठेवा, त्या कल्पनेचा तुम्ही उद्योजकीय मानसिकतेतून विचार केला तर नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल. बर्‍याचदा नवउद्योजकांनी सेवा क्षेत्रात येऊन आपला उद्योग सुरू करावा व त्यातून मोठ्या उद्योगाची स्वप्ने पाहावीत म्हणजे वर सांगितलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळालेली असतील.

उद्योग सुरू करणे आजच्या युगात फारसे कठीण नाही. सेवा क्षेत्रामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाचीदेखील आवश्यकता नसते. त्यामुळे असंख्य पहिल्या पिढीचे उद्योजक स्वतःचा उद्योग सुरू करतात. सुरू केल्यानंतर प्रत्येक व्यवसाय हा यशस्वी होतोच असे नाही, त्यामागे मला जाणवणारे प्रमुख कारण म्हणजे, व्यवसाय यशस्वी करण्यासाठी ‘उद्योजकीय मानसिकता’ फार कमी उद्योजकांनी आत्मसात केलेली असते.

माझ्या अनुभवावरून मी सांगू शकतो की, प्रत्येक उद्योजक हा कागदावर उद्योजक जरी असला तरी मानसिकतेने तो उद्योजक असतोच असे नाही. उद्योजक होण्यासाठी कोणत्याही प्रकारची औपचारिक पात्रता जरी लागत नसली, तरी यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रत्येक उद्योजकाने ‘वैचारिक पात्रता’ नक्कीच आत्मसात केली पाहिजे.

उद्योजकीय मानसिकता आत्मसात करण्यासाठी उद्योजकाने काही महत्त्वाचे गुणधर्म आत्मसात केले पाहिजेत. हेच व्यवसायाच्या प्रगतीसाठी निर्णायक ठरू शकतात. सर्वप्रथम हे महत्त्वाचे टप्पे पार करा.

आपण ज्या व्यवसायात उतरणार आहोत त्याचे पूर्ण ज्ञान घ्या, त्या व्यवसायाबद्दल माहिती घ्या, आपले ग्राहक कोण असतील, आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत याची माहिती घ्या, कृती आराखडा तयार करा आणि तयारीला लागा. तसेच ध्येयासाठी योजना आखा, प्राधान्यक्रम ठरवा, महत्त्वाच्या व्यक्ती ओळखा आणि त्यांची मदत घ्या

‘If you can dream it… Then you can achieve it…..!’

ही साधी गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. आपले ध्येय आपल्या अंतर्मनात रुजल्यानंतर आपण ध्येय साध्य करण्यासाठी झपाटून जातो.

ध्येय साध्य करण्यासाठी जे जे करावे लागेल ते ते करत असतो; परंतु जे ध्येय आपल्याला साध्य करायचे आहे ते आधी कधीच साध्य न केल्यामुळे आपल्याला त्याबद्दल धाकधूक लागलेली असते. आधी कधी न मिळवलेले यश मिळविण्याची जिद्द जरी असली, तरी ते साध्य करण्यासाठी आवश्यक गुण आपल्याला स्वतःमध्ये आत्मसात करावे लागतात.

जोपर्यंत आपले ध्येय साध्य करण्यासाठी लागणारी परिपक्वता आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण ते कसे साध्य करणार? ही परिपक्वता जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत, ध्येयाबाबत सुनिश्चितता येत नाही व त्यामुळे विश्वास निर्माण होत नाही. मी आपल्याला सांगेन

‘आकाशी झेप घे रे पाखरा। तोडी सोन्याचा पिंजरा॥

आपल्यामध्ये अहंकार येऊ देऊ नका ‘डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर’ हा नियम पाळा तरच तुमचा व्यवसाय हा प्रगती करू शकतो. एक लक्षात ठेवा, महात्मा गांधीजींनी शांततेच्या मार्गाने जग जिंकले, म्हणून व्यवसायाचा एक सहज समजणारा नियम सांगेन. व्यवसाय करते वेळी तुम्ही गांधीजींचे अनुकरण केले तर तुमच्या खिशात गांधीजी असलेले चलन येईल, नाही तर ते कठीण आहे.

आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करणार्‍या प्रत्येक उद्योजकाची वेगळी कहाणी असते; परंतु असे असले तरी, इतरांपासून ते वेगळे आहेत हे अधोरेखित करणार्‍या काही गोष्टी त्यांच्यामध्ये असतात.

  • तुमच्याकडे सर्वप्रथम स्वतःवरती पूर्ण विश्वास असला पाहिजे.
  • तुम्ही दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी नेहमी तत्पर असला पाहिजेत.
  • काय करायचे आहे हे तुम्हाला नक्की ठाऊक असले पाहिजे. आपले अज्ञान न लपवता तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या
  • तुम्ही इतिहासाचा संदर्भ घेऊन, भविष्याचा वेध घेत, वर्तमान काळात वाटचाल केली पाहिजे.
  • कठीण परिश्रम घेण्यास तुम्ही नेहमी तयार असले पाहिजे. सुरुवातीच्या काळात तुम्हाला हे करावेच लागेल.
  • अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टे असली पाहिजेत.
  • तुम्ही मल्टिटास्किंग असला पाहिजेत.
  • पैशाचे महत्त्व समजून घेता आले पाहिजे.
  • उत्कृष्ट विक्री कौशल्य आत्मसात करा.
  • संभाषण कला खूप महत्त्वाची आहे.
  • आपण नेहमी विनम्र व अहंकारविरहित असले पाहिजे.
  • आपल्यामध्ये जोखीम उचलण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे.
  • चांगले उत्पादन किंवा सेवा आणि चांगले ग्राहक बनवण्यासाठी प्रयत्नशील राहा.
  • उद्योग यशस्वी झाला की, तुमच्या कामामध्ये इतरांना सामावून घ्या. त्याला डेलिगेशन असे म्हणतात.
  • तीन वर्षांनंतर तुमचा वेळ नवीन कल्पना, गुणवत्ता वाढवणे व मार्केट मिळवणे यात घालवा.

या सर्व गोष्टी तुमच्यामध्ये आल्या म्हणजे जोखीम पत्करू शकाल. जोखीम घेण्यासाठी उद्योजकाने पुरेसा अभ्यास करणे गरजेचे आहे. व्यावसायिक संधीचे सोने करण्यासाठी उद्योजकाने कार्यक्षमता, संस्था व यंत्रणा, मनुष्यबळ, आर्थिक भांडवल व वेळ या सर्व गोष्टी योग्य त्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

– मनोज कदम
९८८१०७४०५१
(लेखक राष्ट्रीय उद्योजकता पुरस्काराने सन्मानित उद्योजक आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?