स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


मन अदृश्य असूनही जीवनाच्या सर्व अंगांवर त्याचा कसा परिणाम होत आहे, ते आपण जाणतोच. यशस्वी व्यक्ती आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांची जबाबदारी स्वत:च घेतात, त्यामुळे आपलं मनच आपला वैश्विक अनुभव आपल्या भोवती तयार करत असतं, असा आपला ठाम विश्वास असला पाहिजे.

उद्योजकांना मनाचा वापर करून कशा तऱ्हेने स्वत:ची प्रगती करता येईल, या विषयांशी संबंधित अनेक मुद्द्यांचा आपण अभ्यास केला. मनाचे कार्य कसे चालते, ध्येय कसे ठरवावे, त्याचा आराखडा कसा तयार करावा असे अनेक मुद्दे आपण विचारात घेतले.

आता आपण आपल्या व इतरांच्या स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी विचार करूया. आपले जे ध्येय आहे, ते आपण एकट्याने साध्य करू शकत नाही. तर, त्यात आपल्याला आपले कुटुंबीय, मित्र, कर्मचारी, ग्राहक, सरकारी खात्यातील कर्मचारी, पुरवठादार, तंत्रज्ञ, सल्लागार, सेवा पुरवणारे अशा असंख्य लोकांबरोबर सहभाग करून करावे लागते. त्यामुळे या सर्वांशी जुळवून घेऊन काम करणे अत्यंत गरजेचे असते. स्वभावाला औषध नसते असे म्हणतात.

प्रत्येक माणसाचा विश्वास, श्रद्धा, स्वभाव व व्यक्तिमत्व, त्याची जडणघडण आयुष्यभर होतच असते. त्यात अनुवंशिकता, बालपणीचे संस्कार, शिक्षण, परिस्थिती, अनुभव या गोष्टींचा प्रभाव असतो. यामुळे सर्वात आधी आपण स्वत:ला ओळखणे गरजेचे असते.

व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येक जण वेगळा आहे व तो तसा का आहे, याच्या खोलात जाणे, हे आपले काम नाही. शिवाय, इच्छा असूनही आपण आपल्या स्वत:च्या सवयी व स्वभाव बदलू शकत नाही, तर दुसऱ्याने आपण सांगू तसे वागावे व बदलावे, हे शक्यच नाही व ते आपले कामही नाही.

आपल्या भूतकाळात काय घटना घडल्या, त्या आपण बदलू शकत नाही व त्याबाबत तक्रार करून त्याला दोषही देत राहून चालणार नाही. त्यात विनाकारण वेळ व मानसिक शक्ती व्यर्थ खर्ची पडते. तर, आता ठेवलेल्या ध्येयानुसार, आता आहोत तिथून पुढे कसं जायचं, त्याचाच विचार करून आवश्यक कृती करायला हवी.

‘SWOT’ Analyisis मध्ये आपण पाहिलं की, जसं उद्योगाला आवश्यक अशी सर्व ज्ञान व माहिती आपल्या स्वत:कडे असेलच असे नाही, जसं की अर्थविषयक, उत्पादन, मानव संसाधन, विक्री कला, संशोधन वगैरे. तर, असे ‘SWOT’ Analysis करून, आवश्यक व्यक्तींना ते काम सोपवावे असे आपण सुचवले. या आपण आधी विचार केलेल्या पद्धतीप्रमाणे, आज मनाचं ‘SWOT’ Analysis करूया.

तुमच्या मनाची बलस्थाने काय आहेत? तुम्ही कोणते विचार चांगले करू शकता? तुम्ही भूतकाळातील घटनांचा किती विचार करता? भविष्यात काही वाईट घडेल म्हणून तुम्ही चिंता करत बसता का? तुम्ही नियमानुसार काम करू शकता का? तुम्ही एकाग्रतेने किती वेळ काम करू शकता?

तुम्हाला राग येतो का? किती वेळ त्यामुळे तुम्ही कामात लक्ष देऊ शकत नाही? तुम्ही उत्साही, बोलके, नेतृत्व गुण असलेले आहात का? तुम्ही सकारात्मक विचार करता की नकारात्मक? सर्व गोष्टी काटेकोरपणे व कुशलतेने करण्याकडे तुमचा कल आहे का? तुम्ही सदा आळसावलेले, कंटाळलेले असता का?

तुम्हाला बसून मान खाली घालून गुंतागुंतीचे काम करायला आवडेल, की लोकांशी बोलायला, त्यांना समजवायला आवडेल, की समस्या सोडवण्याकडे तुमचा कल आहे? तुम्हाला ठरलेले एकच काम नेहमी करायला आवडते की नवीन गोष्टी शिकायला, करायला, प्रयोग करून बघायला आवडते? तुम्ही जोखीम पत्करू शकता का? तुम्ही स्वत:ला बदलायला तयार आहात का? तुम्ही स्वत:चेच म्हणणे खरे करणारे आहात का?

असे अनेक प्रश्न स्वत:ला विचारून आधी आपण कसे आहोत, आपली मानसिकता व मनाची अवस्था काय आहे, त्यात काही बदल करायला हवेत का, करणे शक्य आहे का, याचा विचार करावा. आपले ध्येय साध्य करण्यासाठी, आपल्याला कोणती कामे करण्यासाठी लोक हवेत, याचा विचार तर केलाच, पण आता त्या लोकांच्या अशा तऱ्हेच्या स्वभाव, सवयी व व्यक्तिमत्वांचाही अभ्यास करून, त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी कसे वागावे, काय बोलावे, याचा विचार करता येईल.

दुसऱ्याला बदलायचं काम आपलं नाही. ते नेहमी शक्यही होणार नाही. म्हणून त्याच्या कलाने घ्या. वाद, चर्चा, भांडणे, वितुष्ट, मतभेद, शत्रुत्व, राग, आरडाओरड अशा गोष्टी टाळून, सर्वांना बरोबर घेऊन, ध्येयाकडे प्रवास चालू ठेवणे हे गरजेचे आहे.

स्वत:चा स्वभाव, सवयी व व्यक्तिमत्व याचा अभ्यास केल्याने, आपणास दुसऱ्याला समजून घेणे व त्यास आहे तसा स्वीकारणे शक्य होते. त्यामुळे आपण आपल्या ध्येयाची जबाबदारी घेतल्याने, दुसऱ्याच्या स्वभाव व सवयीविषयी आपण वेळ व मेहनत खर्च करत नाही व त्याला दोषही देत नाही. अशा तऱ्हेच्या सबबी सांगणेही आपण टाळायला हवे.

आपले सर्व अनुभव हे भावभावनांशी निगडीत आहेत. एकमेकांच्या बरोबर होणाऱ्या संबंध, संवाद, संभाषण, व्यवहार यांतून भावनांचे कल्लोळ मनात तयार होतात व आपण ते आपल्या मनात दर दिवशी होणाऱ्या ५० हजार विचारांतून खर्च करतो. जेवढे हे मानसिक संघर्ष आपण कमी करू, तेवढे आपले जास्तीत जास्त विचार व लक्ष, आपल्या ध्येयावर केंद्रित करू शकू. यासाठी, आपल्या व इतरांच्या, स्वभाव व सवयींचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

असा प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास म्हणजे काही मोठं काम नाही. स्वत:ला बरोबर ओळखणं हेच मोठं काम आहे. इतरांशी सहज बोलताना, वागताना, काम करताना आपल्याला त्यांची ओळख होत जाते व ती ओळख वाढतही जाते. प्रत्येक माणसाबरोबर काम करताना, सर्व प्रकारचे बरेवाईट अनुभव एकत्र घेताना, संकटे, सुखद घटना, आणीबाणीचे प्रसंग, आजारपणे अशा विविध वेळी, आपल्याला एकमेकांच्या मनाच्या अवस्थेची ओळख होत असते.

काही वेळा स्पष्ट बोलून व विचारूनही माणसाविषयी जाणून घेता येते. उदा. पाच-दहा वर्षे संसार केलेल्या पती-पत्नी किंवा कंपनीतील सहकाऱ्यांना एकमेकांची, स्वभाव, सवयी व व्यक्तिमत्वांची, एवढी ओळख होते की कोणत्या बाबतीत दुसरा कसा वागेल, याचा बरोबर अंदाज एकमेकांना येतो व तसा प्रतिसाद अपेक्षित ठेवूनच व्यवहार व वागणे-बोलणे केले जाते.

अशा वेळी समजूतीने, समजूतदारपणे, सभ्यपणे, सामावून घेऊन आपण वागतो व संघर्ष टाळतो व एकोप्याने राहून पुढे जातो. तसंच, उद्योगात इतरांशी कसं वागायचं, निरनिराळ्या व्यक्तिंशी कसा संबंध ठेवायचा, दोघांच्याही फायद्या.चं होईल असं काम कसं काढून घ्यायचं, ते शिकायला हवं व तसा सतत सराव करायला हवा.

प्रत्येक व्यक्ती त्याचं असं विशिष्ट असं जीवनकार्य घेऊन आला आहे, त्याचा आपल्या कामाशी संबंधित पैलू आपण पाहायचा व वापरायचा आहे, त्या माणसाला बदलून आपल्याला हवा तसा आपण करू शकणार नाही, आपल्याला ते जमणार नाही व तो आपला अधिकारही नाही.

अशा तऱ्हेनेच आपला व इतरांचा अभ्यास व ओळख पटल्यावर कोणाशी कसे बोलावे, वागावे, त्याला काय, कसे व कोणत्या शब्दात व सुरात सांगावे, हे कळायला लागते. आपल्या जीवनात येणाऱ्या व्यक्तींकडून तुम्ही त्यांच्या प्रकृती-प्रवृत्तीनुसार योग्य अपेक्षाच ठेवाल.

उदा. तुम्ही गरम तव्यावर आईसस्क्रीम करणार नाही, चहात मिरची घालणार नाही, हातोडीने स्क्रू ठोकणार नाही, पकडीने फळ कापणार नाही, पंखा चालू करण्यासाठी दिव्याचे बटण दाबणार नाही, गोलंदाजाकडून शतकाची अपेक्षा करणार नाही, अबोल व्यक्तीकडून भाषणाची अपेक्षा ठेवणार नाही.

तुमच्या अपेक्षा जगावर न लादता, दुसऱ्याला बदलण्याची आशा, अपेक्षा, खात्री न ठेवता, एका तऱ्हेने तुम्ही तुमच्या स्वत:च्या विचारात व वागण्यात बदल कराल, कारण ध्येय तुमचं आहे. तुम्हाला साध्य करायचं आहे. दुसरा माणूस का म्हणून तुमच्यासाठी बदलेल?

जगात अनेक स्वभाव, सवयी व व्यक्तिमत्वाची माणसं आहेत. तरी, त्यात काही साधारण प्रकार किंवा गट पडतात. तशा प्रकारांच्या लोकांशी, त्यांना ओळखण्याची व त्यांच्याशी वागण्याची, तुमची अशी एक पद्धत ठरू शकते. मग ती पद्धत त्या-त्या व्यक्तीबरोबर वागण्याची म्हणून तुमच्या अंगवळणी पडू शकते.

त्यामुळे, प्रत्येक (किंवा जास्तीत जास्त) लोकांशी समजून घेऊन तुम्ही जुळवून घेतल्याने, त्या व्यक्ती तुम्हाला प्रेमाने सहकार्य करतात व तुमची तुमच्या ध्येयाच्या दिशेने वेगाने वाटचाल होते. ही एक कटकटीची व त्रासाची प्रक्रिया नसून, यशस्वी होण्यासाठी केलेली योग्य गुंतवणूक आहे.

नुसते बोलणारे, काटेकोर विचार करणारे, काम करणारे व करून घेणारे व थंड प्रकृतीचे समाधानी, असे काही महत्वाचे मुख्य स्वभाव असतात. बहुतेक माणसं यातील एक किंवा अनेक स्वभाव असलेली असतात. एकाच प्रसंगात त्या प्रत्येकाची वागण्याची व विचार करण्याची पद्धत व तीव्रता वेगवेगळी असते. ती व्यक्ती अमुक प्रसंगी कशी वागते हे कळल्यामुळे, तुम्ही तिला कसं हाताळायचं व दोघांच्याही हिताचं काम कसं करायचं, हे ठरवू शकता.

मग, चला तर समजून घेऊया कसं बोलायचं, वागायचं, काय काम द्यायचं साधारण प्रत्येक स्वभावाच्या व्यक्तिला.

  • नेतृत्वगुण असणाऱ्या लोकांना ध्येय नीट समजावून द्या. कंपनीच्या ध्येयातील एक मोठा भाग त्यांना साध्य करण्यास सांगा. या व्यक्ती स्वत: जबाबदारी घेणाऱ्या असतात, त्यांच्यावर फक्त विश्वास टाकून त्यांना अधिकार द्यावेत. कोणाकडून कोणते काम किती वेळात करायचे आहे, ते समजवा. त्यांच्या गुणांचे कौतुक करा. ध्येयातील टप्पे गाठल्यावर शाबासकी व बक्षीस द्या. कंपनीच्या महत्त्वाच्या गोष्टीही त्याला सांगा व त्याचा विचार घ्या. यांच्यावर कधीही संशय घेऊ नका.
  • उत्साही, बोलक्या स्वभावाच्या माणसाला प्रसार, प्रचाराचे, विक्रीचे काम द्या. त्याचा उत्साह वाढेल असे ध्येय त्याला द्या. जनसंपर्क, सभा, चर्चा यात भाग घेण्यास त्यांना सुचवा.
  • जो दुसऱ्याला समजवू शकतो त्याला इतर सहकाऱ्यांचे प्रशिक्षण करण्यास सांगा. त्यांना भरपूर वाचन व वक्तृत्व वाढवण्यास प्रोत्साहन द्या. त्यांची कामे करण्यास वरील प्रकारच्या व्यक्तींबरोबर त्यांना राहू द्या.
  • काटेकोर, नियमाप्रमाणे काम करणाऱ्यांस कार्यालयीन किंवा उत्पादनाचे काम द्या. त्याला काळ-काम-वेगाचे सूत्र समजवा व तोच ते कसे बरोबर करतो ते सांगा. कामाची आखणी, माल-माणसे-यंत्रे वगैरेची माहिती त्याला जमवायला व ठेवायला शिकवा. संशोधन, किचकट कामे, हिशोब, आकडेमोडीची पडताळणी अशी कामे या व्यक्तींकडे सोपवा. दुसऱ्याने काम बरोबर न केल्यास अशी व्यक्ती नाराज होते तेव्हा तिचे सांत्वन करा.
  • आळशी व कंटाळलेल्या माणसास कामाचा पाठपुरावा करण्यासाठी दरवेळी आठवण करून द्या. त्यासाठी वरील काटेकोर माणसाला नेमा. आठवड्यातून काही करमणूकीचा कार्यक्रम आयोजित करा. बैठे काम चांगले करणाऱ्यास लिखापढीचे काम द्या. आढावा, अहवाल तयार करणे, आकडेमोड अशी कामे सोपवा. थोड्या कामानंतरही अशा व्यक्तींना शाबासकी व बक्षीस द्या व त्यांची क्षमता याहून खूप काम करण्याची आहे, असे सांगा.
  • चांगल्या कल्पना करणाऱ्या व्यक्तीस उत्पादनाची आखणी, आराखडा, प्रकल्प, समस्यांची उकल अशी कामे द्या. त्यांना उद्योगामधील पुढच्या योजना सांगून, त्यावर प्रकल्प बनवण्यास सांगा. सर्व कल्पना लिहून काढून त्या सादर करण्यास सांगा. अशी व्यक्ती कल्पना कृतीत आणणारी असेलच, असे नाही, त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीचे काम वरील १ व २ ला द्या.
  • चुका काढणे, टीका करणे, तक्रारी करणे अशा स्वभावाच्या माणसास वस्तूंचा दर्जाची तपासणी, पैशाची वसूली, कोर्ट खटले चालवणे,असे काम द्या. ते कंपनीसाठी किती महत्त्वाचे आहे, ते सांगा. अशा व्यक्तीला दिसणार्या सर्व चुका व तक्रारी लिहावयास सांगून, त्यावर उपाय सुचवण्यास सांगा. चांगल्या सूचनांना बक्षीस द्या व प्रसिद्धी द्या.

नुसते सांगकामे लोक : यांना फक्त सांगितले तर, तेवढे व तसे कामच करता येते. त्यामुळे यांना स्पष्ट सांगून लिहून देऊन, तारीख-वेळ ठरवून काम दिल्यास, ते तेवढेच करून देतात. त्यात कल्पकता, सुंदरता, आनंद, समस्या सोडवणे, वेळ वाचवणे, कार्यक्षमता असे कोणतेही चाकोरीबाहेचे काम किंवा विचार ते करू शकत नाहीत.

अधिक वेळ काम, अधिक पैसा, प्रगती, विकास, भावना याविषयी ते उदासीन असतात. वेळच्या वेळी पैशाचा मोबदला दिला की हे खूश असतात. बक्षिसाचे महत्त्व यांना वाटत नाही. वरील प्रत्येक प्रकारच्या माणसास, तू आहेस तो बरोबर व चांगला आहेस, असा विश्वास देणे महत्त्वाचे आहे. कारण, कोणीही माणूस त्याचं चुकतं असं कधीही मान्य करत नाही किंवा त्याला त्याचं आहे तेच बरोबर, असं वाटत राहतं.

प्रत्येक जण स्वत:वर प्रेमच करतो. आपण क्वचित काही सुधारणेच्या सूचना करू शकतो, पण सुधारणा किंवा बदलाचा, आग्रह किंवा हट्ट करू शकत नाही. त्यामुळे आपल्यालाच निराशा, राग वा दु:ख होऊ शकते. तर, वास्तविकपणे, तो आहे त्या अवस्थेत राहणार असेच गृहित धरून त्याच्याशी बोलण्याची व वागण्याची पद्धत तयार करायला हवी.

नाही तर, आपल्याला प्रत्येक माणसाशी वागताना संघर्ष व मन:स्ताप होईल, त्यातून आपल्या ध्येयासाठी काहीही निष्पन्न होणार नाही. शिवाय, त्या त्या व्यक्तीचं बलस्थान ओळखून, त्याला त्या विषयात प्रोत्साहन व प्रशिक्षण द्यावे, त्यामुळे तो अंगभूत गुण व कला विकसित होऊन, त्यामुळे त्या व्यक्तीने उत्साहाने काम केल्याने, कंपनीचा विकास होईल.

सर्व गोष्टी आधी मनात तयार होतात व नंतर त्या बाहेर प्रकटण्याची सुरुवात होते. त्यामुळे आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांची मने कशी काम करतात, ते कसा विचार करतात, यावर वर सांगितल्याप्रमाणे थोडा अभ्यास व विचार करून, त्याप्रमाणे माणसे व कामे यांचे नियोजन केल्यास, ध्येय गाठण्यात फायदाच होईल.

– सतीश रानडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?