व्हर्च्युअल ऑफिस : नवोद्योजकांसाठी नवे दालन


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


नवोद्योजकांना उमेदीच्या काळात गरज असते ती खर्च कमी करणे आणि आपली विक्री वाढवणे. प्रत्येक नवोद्योजकाला त्याच्या क्षेत्रात स्वत:च्या उद्योगाला भक्कमपणे उभे करण्यासाठी सुरुवातीचा काळ हा कठीण काळ असतो. व्यवस्थापनाच्या अनेक गोष्टींच्या जबाबदारीतून आपल्याला मोकळीक मिळाली, तर उद्योगवाढीच्या दृष्टीने लक्ष केंद्रित करायला पुरेसा वेळ मिळतो.

अशा वेळी हा पर्याय खूपच मदत करणारा आहे. आपल्या शहरापासून दूर दुसर्‍या शहरात आपला व्यवसाय विस्तारणार्‍यांसाठी प्रवासी उद्योजक, प्रोजेक्ट्स अशांसाठी ही चांगली संधी आहे. भारतासारख्या विकसनशील देशात आज ‘व्हर्च्युअल ऑफिस’ ही नवी संकल्पना उदयाला येत आहे.

आज आपल्या देशात अनेक नवोद्योजक मोठ्या दमाने उदयाला येत आहेत, परंतु सुरुवातीला लागणारे भागभांडवल आणि कार्यालयावर होणारा खर्च त्यांच्यासाठी खूप जास्त असतो त्यामुळे ‘व्हर्च्युअल ऑफिस’ ही संकल्पना भारतातही प्रत्येकाला आकर्षित करतेय.

म्हणावा तसा त्याचा प्रसार अथवा माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही, त्यामुळे अनेक जण यापासून वंचित आहेत. शासनाची पूरक धोरणे आणि उद्योजकीय पोषक वातावरण यामुळे नवोउद्योजक आणि उद्योजकता यांच्यासाठी खूप मोठ्या संधी भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होत आहेत.

पारंपरिक पद्धतीने उद्योग करताना सर्वात महत्त्वाची गरज असते ती म्हणजे उद्योग उभारण्यासाठी आवश्यक जागा, स्वतंत्र कार्यालय; परंतु यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक लागते. कार्यालय ही प्रत्येक उद्योगाची गरज असते. उद्योग उभारणीसाठी स्वतंत्र कार्यालय, टेलिफोन, इंटरनेट, रिसेप्शनिस्ट, ई-मेल, पत्रव्यवहारासाठी पत्ता इ. गोष्टी लागतात.

व्हर्च्युअल ऑफिस म्हणजे काय?

व्हर्च्युअल ऑफिस म्हणजे नेमकं काय? तर मराठी भाषेत शब्दश: याचा अर्थ होतो ‘आभासी कार्यालय’. आभासी म्हणजे आपले स्वत:चे कार्यालय असल्याचा समोरच्या ग्राहकाला आभास निर्माण करणारा. प्रत्येक उद्योजकासाठी महत्त्वाचा असतो तो त्याचा ग्राहक.

ग्राहकाचे ‘first impression is last impression’ त्यामुळे उद्योग वाढवण्याच्या दृष्टीने ग्राहकावर आपली छाप पडणे ही प्रत्येक छोट्या आणि उद्योन्मुख उद्योजकाची ती गरज असते.

हे सगळं करण्यासाठी सूक्ष्म आणि लघू उद्योजकांना जागा, कर्मचारी, त्यांचं प्रशिक्षण आणि व्यवस्थापन यावर खूप जास्त खर्च करावा लागतो; परंतु त्यांना प्रत्येकाला व्हर्च्युअल ऑफिस हा सुवर्णमध्य म्हणता येईल. म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसाय या खर्चाशिवाय, पूर्ण वेळ कार्यालय आणि पगारी कर्मचारी टाळूनही अत्यंत प्रोफेशनल सेवा आपल्या ग्राहकाला देऊ शकता.

‘व्हर्च्युअल ऑफिस’ची उपलब्धता

‘व्हर्च्युअल ऑफिस’ उपलब्ध करून देणार्‍या कंपन्या आपल्या उद्योगाच्या गरजेनुसार आपल्याला पॅकेजेस उपलब्ध करून देतात. या संकल्पनेनुसार आपल्या उद्योगाच्या उभारणीसाठी अथवा वाढीसाठी उद्योजकाला प्रत्यक्षात कार्यालयीन जागेची आवश्यकता नसते.

मुंबई, पुणे, नाशिक, बंगळुरू, दिल्ली, कोलकाता अशा अनेक शहरांमध्ये ‘व्हर्च्युअल ऑफिस’ उपलब्ध करून देणार्‍या कंपन्या कार्यरत आहेत. गुगल किंवा जस्ट डायल वा इतर बी-टू-बी वेबसाइट्सवर शोधलत का अशा अनेक कंपन्या आपल्याला मिळू शकतील.

या आपल्या उद्योगवाढीच्या दृष्टीने आवश्यक तांत्रिक आणि भौतिक सेवांची वेगवेगळी पॅकेजेस उपलब्ध करून देतात. अशा सेवा देणार्‍या कंपन्या आपल्याला आवश्यक, कार्यालयीन पत्ता म्हणून त्यांचा पत्ता वापरू देतात, ज्याचा वापर करून आपण आपल्या बिझनेस कार्ड, लेटरहेड यावरही छापू शकतो, पत्रव्यवहारासाठी याचा वापर करू शकतो.

या कंपन्यांची पूर्ण वेळेसाठी एक रिसेप्शनिस्ट म्हणजेच स्वागतिका असते. आपल्या ग्राहकांच्या फोन कॉल्सना उत्तर देण्यासाठी ती पूर्णवेळ उपलब्ध  असते. व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक बोर्ड रूम, मीटिंग रूम, आवश्यक ऑडियो-व्हिडियो साधने, व्हिडियो कॉन्फरन्सची सेवा, जलद इंटरनेट सेवाही या कंपन्या आपल्याला उपलब्ध करून देतात.

थोडक्यात, आपल्या व्यवसायासाठी आवश्यक सेवासुविधा व प्रोफेशनल वातावरण आपले स्वत:चे कार्यालय न थाटता अगदी वाजवी दरात आपल्याला उपलब्ध करून देतात. नवोद्योजकांना उमेदीच्या काळात गरज असते ती खर्च कमी करणे आणि आपली विक्री वाढवणे. प्रत्येक नवोद्योजकाला त्याच्या क्षेत्रात स्वत:च्या उद्योगाला भक्कमपणे उभे करण्यासाठी सुरुवातीचा काळ हा कठीण काळ असतो.

व्यवस्थापनाच्या अनेक गोष्टींच्या जबाबदारीतून आपल्याला मोकळीक मिळाली, तर उद्योगवाढीच्या दृष्टीने लक्ष केंद्रित करायला पुरेसा वेळ मिळतो. अशा वेळी हा पर्याय खूपच मदत करणारा आहे. आपल्या शहरापासून दूर दुसर्‍या शहरात आपला व्यवसाय विस्तारणार्‍यांसाठी प्रवासी उद्योजक, प्रोजेक्ट्स अशांसाठी ही चांगली संधी आहे.

– प्रतिभा राजपूत

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?