कथा उद्योजकांच्या

Main stream मीडिया नसूनही १० लाख followers 😳, ओमकार दाभाडकरने हे करून दाखवलं!

Advertisement

नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू झालेल्या ‘मराठी पिझ्झा डॉट कॉम’ने आज केवळ पाच वर्षात ‘इनमराठी’च्या रुपात कमालीची प्रगती केली आहे. पहिल्या दिवशी १०० फॉलोवर्स असणाऱ्या ‘इनमराठी’ने आज १० लाख फेसबुक फॉलोवर्सचा पल्ला गाठला आहे. या यशामागे एकच कारण आहे,

चांगल्या पगाराची नोकरी सोडून उद्योजक होण्याचे धाडस दाखवलेले ओमकार दाभाडकर.
ओमकार दाभाडकर

जालन्यातल्या सर्वसामान्य घरी ओमकारचा जन्म झाला. यवतमाळला इंजिनिअरिंगची पदवी घेऊन तो मुंबईत एम.बी.ए. करण्यासाठी आला. एम.बी.ए. पूर्ण झाल्यावर मार्केटिंग क्षेत्रात चांगली नोकरी सुद्धा मिळाली. लग्न झालं आणि आपण म्हणतो तसा वेल सेटल्ड संसार सुरू झाला.


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://rzp.io/l/smartudyojak


ओमकारला लेखनाची आवड होती. ऑर्कुटच्या काळापासून आपली मतं, विचार तो सोशल मीडियावर मांडत होता. तेव्हा त्याला लक्षात आलं की तो मित्रांसोबत ज्या गप्पा मारतो किंवा सर्वसामान्य मराठी माणसांना ज्या विषयात रस आहे, जसं वेगवेगळ्या मालिका, ब्रेक्झिटसारख्या जगभरात घडणाऱ्या घटना, क्रिकेटवर चर्चा वगैरे वगैरे… हे इंटरनेटवर मराठी भाषेत कुठेच नाहीये. मराठीत आहे ते फक्त पाककला, गडकिल्ल्यांची माहिती किंवा असे इतर पारंपरिक विषय.

ही संधी साधून केवळ आवड म्हणून ‘मराठी पिझ्झा’ नावाने त्याने वेबसाइट सुरू केली.

वेगवेगळ्या विषयांवर लेख, बातम्या असं बरंच काही त्या वेबसाइटवर तो प्रसिद्ध करू लागला. त्यावेळी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असा विचारही केला नव्हता. फेसबुक पेज सुरू केलं तेव्हा एकाच दिवसात १०० फॉलोवर्स झाले. पुढे दिवसेंदिवस लोकांचा प्रतिसाद वाढू लागला. या सर्वामुळे ओमकारला आत्मविश्वास वाटू लागला आणि त्याने नोकरी सोडून पूर्णवेळ व्यवसाय करायचा निर्णय घेतला.

व्यवसाय यशस्वी होईल की नाही, हा तर प्रश्न होताच शिवाय दर महिन्याला हातात येणाऱ्या पगाराचीही सवय होती. घरात तीन महिन्यांचा मुलगा होता. पण घरातल्यांशी चर्चा करून, खर्चाचं गणित मांडून नोकरी सोडली! त्यावेळी व्यवसायाचा जसा प्लॅन केला होता त्याचप्रमाणे व्यवसाय यशस्वी होत नाही असं वाटलं तर काय करायचं यासाठी प्लॅन-बीसुद्धा तयार होता.

सुरुवातीला स्वतःवर विश्वास होता. स्कूपव्हूप, बझफीड अशा इतर उद्योगांच्या यशोगाथा अभ्यासल्या होत्या. मार्केटिंगमध्ये शिक्षण आणि नोकरी केली असल्याने तेही पक्कं होतं.

कमीत कमी खर्चात व्यवसायाचा श्रीगणेशा केला.

छोटंसं ऑफिस होतं, एसी नाही का इतर सोयी नाहीत. खुर्च्यासुद्धा घरातल्याच उचलून आणलेल्या. सगळं काम स्वतःहून सुरू केलं. पूर्णवेळ पगारी कर्मचारी न ठेवता काही काम आऊटसोर्स करणं सुरू केलं.

या सर्वांच्या आधारावर गुंतवणूक मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. पण मराठी व्यवसाय असल्याने कोणतेच मोठे गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यात तयार नव्हते. त्यामुळे ५-६ महिने पुन्हा नोकरी केली. कोणत्या प्रकारे व्यवसायात पैसे येतील, त्यावर तुम्हाला परतावा कसा मिळेल, ठरलेल्या प्लॅननुसार व्यवसाय चालला नाही तरी तुमचे पैसे कसे बुडणार नाहीत हे सगळं सांगितल्यावर अखेर परिवारातीलच दोघांनी व्यवसायात गुंतवणूक केली. गुंतवणूकदार आयटीशी संबंधित क्षेत्रातलेच असल्यामुळे त्यांना समजावणे सोपे गेले.

यानंतर प्रगतीला जी गती मिळाळी ती आजपर्यंत वाढतच आहे…

‘मराठी पिझ्झा’ हे नाव खूप हलकं वाटत होतं. शिवाय खाण्यासंदर्भात काहीतरी असावं असाही या नावाने समज होऊ शकत होता. यामुळे २०१७ मधे हे नाव बदलून ‘इनमराठी’ हे नाव ठेवलं. सुरुवातीचाच काळ असल्यामुळे याचा फार फरक पडला नाही.

लहान लहान टार्गेट्स घेऊन जोमाने काम सुरू ठेवले. अलेक्सा रँक कशी वाढवता येईल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत लेख कसा पोहचेल, ठरलेले लेख दररोज कसे प्रसिद्ध होतील अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत करत ‘इनमराठी’ मोठे झाले. इतके मोठे की आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातील एका तरी व्यक्तीने ‘इनमराठी’ला वेबसाइटला भेट दिली आहे. ‘प्रत्येक गावातल्या एका व्यक्तीनेच नाही तर प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीने ‘इनमराठी’ला भेट देत राहावे’, असं ओमकार यांना वाटतं.

आज लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. पण…

अशा काळातही ‘इनमराठी’ने प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा नवीन पल्ला गाठला आहे. तो म्हणजे १० लाखहून अधिक फेसबुक फॉलोवर्सचा. मराठी प्रसारमाध्यमांमध्ये बातम्यांची चॅनेल्स वगळता ‘इनमराठी’ आज सर्वात मोठे प्रसारमाध्यम झाले आहे.

इन मराठी वेबसाईट
ओमकार म्हणतात,

“प्रत्येक क्षेत्राचे काही नियम असतात. एखादं काम अनुभवी व्यक्तीनेच करावं असा समज असतो. पण आज सोशल मीडियाच्या आधारे हे सर्व नियम आणि समज मोडले गेले आहेत. लेखनाचे किंवा पत्रकारितेचे शिक्षण नसूनही मला हे करता आलं, कारण मी प्रत्येक गोष्ट नियमांनुसार नाही तर नावीन्याने करत आहे. कोणत्याही प्रकारचा माईंडसेट आधीपासूनच ठेवलेला नाही.”

उद्योजकीय प्रवासात चांगली माणसं जोडल्याचा आणि एका फोनवर मदतीला धावून येणारे मित्र असल्याचा खूप फायदा झाला, असेही ओमकार म्हणतात.

नवउद्योजकांना उत्तमोत्तम प्रगती करता यावी यासाठी ओमकार सांगतात, मी एक सूत्र पहिल्या दिवसापासूनच माझ्या डोक्यात पक्कं केलं आहे. ते म्हणजे..

Understand what is under your control and what is not under your control.

अर्थात, कोणत्या गोष्टी तुमच्या हातात आहेत आणि कोणत्या नाही हे नीट समजून घ्या. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्या जोमाने आणि चिकाटीने करा. पण ज्या गोष्टी तुमच्या हातातच नाहीत, त्यांबद्दल विचार करत बसू नका.

– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!