Advertisement
उद्योगसंधी

कमी गुंतवणुकीत करता येतील असे बारा व्यवसाय

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

रिक्रूटमेंट फर्म : मुंबई ही अशी एक महानगरी आहे, ज्यात बरेच लोक एक तर नवीन नोकरी शोधणे किंवा आहे त्याहून अधिक चांगली नोकरी मिळवणे याच विचारात असतात. नोकरी मिळवणे आणि असलेली नोकरी बदलणे हे अनेकांचे उद्योग असतात. त्यामुळे अशांना नोकरी मिळवून देणार्‍या रिक्रूटमेंट कंपन्यांसाठी या महानगरीत बरीच संधी आहे. हा व्यवसाय सुरू करण्यात गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट कमी असली तरी कष्ट मात्र भरपूर आहेत.

रिअल इस्टेट सल्लागार : वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबई शहरात घरांची आणि त्या अनुषंगाने रिअल इस्टेट सल्लागारांची मागणीसुद्धा वाढू लागली आहे. अत्यल्प गुंतवणुकीत रिअल इस्टेट सल्लागार हा व्यवसाय सुरू करणे हा एक उत्तम विचार आहे. चांगले संवाद कौशल्य आणि पारदर्शक व्यवहार हे दोन गुण अंगी असल्यास या व्यवसायात चांगले भविष्य आहे. मुंबईत नुसती घरखरेदीच नाही, तर भाड्यांच्या घरांचेही व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. रिअल इस्टेट सल्लागार बिल्डर किंवा घरमालक व ग्राहक यांच्यामधील दुवा म्हणून काम करतो आणि त्याचा मोबदला त्याला दोन्हीकडून मिळणार्‍या दलालीच्या रूपाने मिळतो.

किराणा माल घरपोच पोहोचवणे : एखाद्या पॉश क्षेत्रात किराणा माल लोकांच्या दारात थोडे पैसे जास्त घेऊन नेऊन देण्याचा व्यवसाय करणे, ही एक उत्तम कल्पना आहे. एकट्याच्या बळावरसुद्धा हा लघुउद्योग छान चालू शकेल. तुमचे स्वतःचे दुकान असेल तर जास्तीचा नफा यातून तुम्हाला मिळेल. मुंबईत अनेक घरांमधून एकटे दुकटे लोक राहत असतात. अनेकदा त्यांच्याकडे घरसामान भरायलाही वेळ नसतो. अशी सगळी मंडळी तुमची नक्की ग्राहक होऊ शकतात.

घरपोच ताजी भाजी पोहोचवणे : लोकांना घरात रोज ताज्या भाज्या लागतात, पण दररोज बाजारातून आणायला मुंबईकरांकडे तेवढा वेळ नसतो. अशा वेळी एखाद्याने घाऊक बाजारातून भाजी आणली आणि ती पाव किलो, अर्धा किलो, एक किलो अशा प्रकारे पिशव्यांमध्ये भरून घरपोच पोहोचवली, तर लोकांना ही सोय हवीच आहे. यामध्ये भाजी निवडून, सोलून दिली तर उत्तमच. लोक वेळप्रसंगी अशा सेवेला दुप्पट किंमत द्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत.


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त २० रुपयांत.


पाळणाघर चालवणे : मुंबईमध्ये विभक्त कुटुंबपद्धतीच प्रामुख्याने आढळते. अशा वेळी नवरा-बायको दोघेही नोकरीवर जात असल्यास मुलांना सांभाळणं ही त्यांच्यासाठी मोठी समस्या असते. त्यामुळे अगदी घरातून सुरू केलेल्या पाळणाघरालासुद्धा या शहरात खूप चांगला प्रतिसाद मिळतो.

जुन्या पुस्तकांची बँक : जुन्या पुस्तकांचे दुकान उघडणे हे खरोखर खूप फायद्याचे ठरेल, कारण साधारणतः सर्वच विद्यार्थी पुस्तकांवर पैसे कसे वाचवता येतील याचा विचार करत असतात. शिवाय एका वर्षी वापरलेली पुस्तके पुढच्या वर्षी त्या विद्यार्थ्यांना फारशी उपयोगी नसतात.

Subscribe ‘Smart Udyojak’ Magazine

इव्हेंट मॅनेजमेंट : इव्हेंट मॅनेजमेंट हा पसरत जाणारा व्यवसाय आहे. प्रामुख्याने मुंबईसारख्या शहरात धकाधकीच्या जीवनामुळे छोट्या-मोठ्या कार्यक्रमांची (जसे लग्न, वाढदिवस, कॉर्पोरेट प्रोग्रॅम, इ.) व्यवस्था एखाद्या तल्लख टीमच्या हाती देण्यावर भर दिला जातो. जर तुमचे नेटवर्किंग उत्तम असेल आणि गोष्टी हलवणे तुम्ही सहज करू शकत असाल तर हा लघुव्यवसाय तुमच्यासाठी नफा मिळवून देणारा आहे.

तुमच्यातील कौशल्य शिकवणारे व्हा : ज्या व्यक्ती एखाद्या विषयात तल्लख आहेत त्यांच्यासाठी हा लघुउद्योग सर्वोत्तम आहे. जर तुम्ही सुगरण असाल तर छोटे-मोठे कुकिंग वर्ग चालू करा. जर तुम्ही चित्रकार, छायाचित्रकार, कलाकार, फिटनेस एक्स्पर्ट किंवा इतर कोणतेही कलाकार असाल तर तुमची कला विकून पैसे मिळवा.

वापरलेले फर्निचर/सेकंड हँड फर्निचर : दररोज हजारो लोक नवीन फर्निचर विकत घेऊन जुने काढून टाकतात. ही संधी साधून ते फर्निचर विकत घेऊन त्याला बेसिक टच तुम्ही दिलात तर कमी पैशात फर्निचर खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांकडून तुम्हाला भरपूर फायदा होईल.

रोपे विकणे : एखादे नवीन रोप उगवणे हे काही मोठे खर्चीक काम नाही. जर तुमच्याकडे काही उत्तम प्रतीची रोपे असतील तर ती मोठ्या किमतीत विकता येऊ शकतात. हा व्यवसाय निसर्गप्रेमींसाठी सर्वोत्तम आहे.

होम पेंटर : प्रत्येक व्यक्ती साधारणतः दरवर्षी घराला नवीन रंग काढून घेतो ज्यासाठी त्याला एखाद्या रंगकाम करणार्‍या व्यक्तीची गरज असते. एक घर रंगवून तुमच्या महिन्याचा खर्च भागू शकतो. त्यातून आणखी मोठ्या घरांकडे तुम्ही वाटचाल करू शकता.

सेकंड हँड गाड्यांची खरेदी-विक्री : मुंबईसारख्या शहरात हा बिझनेस करणं खूप फायद्याचं ठरतं, कारण इथे मध्यमवर्गीय कुटुंबांची संख्या जास्त असते जे नवीन गाड्या विकत घेऊ शकत नाहीत. तुम्ही वापरलेल्या गाड्या विकत घेऊन त्यावर काही नफा जोडून त्या गाड्या पुन्हा विकू शकता. तुम्हाला प्रत्यक्ष गाड्या विकत घेऊन पोहोचवायच्या नसतील तर तुम्ही विक्रेता आणि ग्राहक यांची भेट घडवून देऊन तुमचे कमिशन चार्ज करू शकता.

– शैवाली बर्वे

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: