‘अटल टिंकरिंग’ अंतर्गत देशात ५,४४१; तर महाराष्ट्रात ३८७ शाळांमध्ये उद्योजकतेच्या प्रयोगशाळा

‘नीती आयोगा’च्या ‘अटल इनोव्हेशन मिशन’ अंतर्गत ‘अटल टिंकरिंग प्रयोगशाळा’ निर्माण करण्यासाठी आणखी ३००० शाळांची निवड करण्यात आली आहे. यामुळे अटल टिंकरिंग प्रयोगशाळा असणाऱ्या एकूण शाळांची संख्या ५,४४१ होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १९६ शाळांचा समावेश आहे. पहिल्या दोन टप्प्यात राज्यातील १९१ शाळांची निवड झाली असून राज्यात उभारण्यात येणाऱ्या एकूण लॅबची संख्या ३८७ पर्यंत पोहोचली आहे.

देशभरातल्या माध्यमिक शाळांतल्या विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता आणि उद्योजकतेची जोपासना व्हावी हा या प्रयोगशाळांमागचा उद्देश आहे. लवकरच देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात अटल टिंकरिंग प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. यामुळे कल्पकता, नवनवे शोध यासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन तंत्रविषयक कल्पकतेमध्ये परिवर्तन घडणे सुलभ होणार आहे.

आणखी ३००० शाळांपर्यंत अटल टिंकरिंग प्रयोगशाळांचा विस्तार करण्यात येणार असल्यामुळे भारताच्या युवावर्गाला थ्रीडी प्रिंटींग, रोबोटिक्स, मायक्रोप्रोसेसर यासारख्या तंत्रज्ञानाचा परिचय सुलभ होईल असे अटल इनोव्हेशन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथन रामानन यांनी सांगितले. दैनंदिन जीवनातल्या स्थानिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठीचे केंद्र म्हणून या अटल टिंकरिंग प्रयोगशाळा काम करणार आहेत.

‘अटल टिंकरिंग लॅब’साठी निवड झालेल्या प्रत्येक शाळेला टिंकरिंग लॅब तयार करण्यासाठी पाच वर्षांच्या कालावधीत २० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. यानुसार पुढील पाच वर्षात महाराष्ट्रातील एकूण ३८७ शाळांना ७७ कोटी ४० लाख रूपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात जास्त ६६ शाळांची निवड पुणे जिल्ह्यातील २८ शाळांचा समावेश

महाराष्ट्रातील निवड झालेल्या शाळांमध्ये सर्वात जास्त ६६ शाळा या पश्चिम महाराष्ट्रातील असून पुणे जिल्ह्यातील २८ शाळांचा यात समावेश आहे. या विभागात कोल्हापूर (१७), सोलापूर (१०), सांगली (६) आणि सातारा जिल्ह्यातील ५ शाळांची निवड झाली आहे.

विदर्भातील ४३ शाळांचा समावेश

‘अटल टिंकरिंग लॅब’ साठी विदर्भातील ४३ शाळांची निवड झाली आहे. या विभागात निवड झालेल्या शाळांची जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे. नागपूर (११), अमरावती (६), गोंदिया (५), वाशिम (४), चंद्रपूर (४), गडचिरोली (३), वर्धा (३), यवतमाळ (३), अकोला (२), भंडारा (१) व बुलढाणा (१).

खान्देशातील ३१ शाळांमध्ये लॅब उभारण्यात येणार

खान्देश विभागातील ५ जिल्ह्यांमधील ३१ शाळांमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅब’ योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात लॅब उभारण्यात येणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात जास्त १६ शाळांची निवड झाली आहे. यासोबतच धुळे (६), नाशिक (६), नंदुरबार (२) आणि जळगाव जिल्ह्यातील एका शाळेचा निवड यादीत समावेश आहे आहे.

‘स्मार्ट उद्योजक’चे सर्व अंक (एकूण ३४ अंक) फक्त डाउनलोड करा फक्त रु. ३०० मध्ये : http://imojo.in/ei26fd

कोकण विभागातील २९ तर मराठवाड्यातील २७ शाळांची निवड

कोकण विभागातील ६ जिल्ह्यांमधून एकूण २९ शाळांची निवड झाली आहे. या विभागात सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यातील १४ शाळांची निवड झाली आहे. याशिवाय मुंबई उपनगर (५), रायगड (४), मुंबई शहर (३), रत्नागिरी (२) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका शाळेची निवड झाली आहे.

‘अटल टिंकरिंग लॅब’ साठी मराठवाडा विभागातील २७ शाळांची निवड झाली असून नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी या जिल्ह्यांतील प्रत्येकी ५ शाळांचा यात समावेश आहे. बीड, लातूर आणि जालना जिल्ह्यातील प्रत्येकी ३ तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील २ आणि हिंगोली जिल्ह्यातील एका शाळेची निवड करण्यात आली आहे.

यापूर्वी ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ७५ शाळांची निवड झाली तर दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ११६ शाळांची निवड झाली आहे.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?