या ५ सोप्या कृतींनी गाठा आर्थिक स्वातंत्र्य

If you don’t find a way to make money while you sleep, you will work until you die.

प्रख्यात गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचे हे वाक्य आपण बर्‍याचदा ऐकले असेल. याचा सोपा अर्थ म्हणजे तुमच्याकडे अशा इन्व्हेस्टमेंट, असेट्स (संपत्ती) हव्यात ज्यापासून तुम्हाला नियमित उत्पन्न मिळेल आणि तुम्ही तुमचे पूर्ण आयुष्य समाधानाने जगू शकाल. अन्यथा तुम्हाला शेवटपर्यंत पैसे मिळवण्यासाठी काम करावे लागेल.

ज्या दिवशी तुमच्याकडे इतकी संपत्ती गोळा होईल की तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय करावा लागणार नाही तेव्हा तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आहे, असे मानता येईल. बर्‍याच जणांना आर्थिक स्वातंत्र्याचे हे लक्ष्य महाकाय आणि अशक्यप्राय वाटत असते.

जर आपण वेळीच आणि योग्य नियोजन केले तर हे ध्येय सहज गाठू शकतो. तर नक्की काय केले म्हणजे तुम्ही हे ध्येय गाठू शकाल किंवा त्या ध्येयाच्या जवळपास पोहचाल ते आपण पाहूया.

१. अनावश्यक खर्च टाळा : बर्‍याचदा आपणाकडून अनावश्यक खर्च होत असतात आणि अधिकतर ‘लाईफस्टाईल’ खर्च हे केवळ इतरांना इम्प्रेस करण्यासाठी केले जातात. अशा खर्चांना कात्री लावून आपण आपले मासिक बजेट आखून घ्यावे. जसे जसे उत्पन्न वाढत जाते. त्याप्रमाणे खर्च न वाढवता बचतीचे प्रमाण वाढवावे.

२. इन्शुरन्स : आपल्याकडे इन्शुरन्स म्हणजे गुंतवणूक आणि केवळ टॅक्स वाचवण्याचे एक साधन आहे असे समजले जाते, जे सर्वथा चुकीचे आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये खालील ५ प्रकारचे इन्शुरन्स असायला हवेत. जर तुम्ही पूर्णपणे insured नसाल तर तुम्हाला किंवा कुटुंबियांना आकस्मिक संकटांमध्ये बचतीच्या पैशाना वापरावे लागते आणि तेही नसतील तर कर्ज काढावे लागते.

  • टर्म इन्शुरन्स
  • हेलथ इन्शुरन्स आणि टॉप अप हेलथ इन्शुरन्स
  • पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी
  • क्रिटिकल इलनेस पॉलिसी
  • होम इन्शुरन्स

वर उल्लेख केलेले सर्व इन्शुरन्स असणे ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या वाटचालीमध्ये एक महत्त्वपूर्ण पायरी आहे.

३) कर्जमुक्तता : जर तुम्ही कर्ज मुक्त झालात तर आर्थिक स्वातंत्र्याचे निम्मे उद्दिष्ट गाठले असे समजण्यास हरकत नाही. गृहकर्जासारखे मोठे कर्ज चुकवायला वेळ लागू शकतो, पण सर्वात आधी जास्त व्याजाची कर्जे परत करणे असो किंवा लाईफस्टाईल खर्चांसाठी कर्जे टाळणे असो, अशा कृतींमधूनदेखील आपण आर्थिक स्वातंत्र्याच्या जवळ जाऊ शकतो. प्रत्येकाने ‘आधी बचत नंतर खर्च’ ही सवय अंगिकारायला हवी.

तसेच अचानक सॅलरी किंवा बिझनेस इनकम बंद झाल्यास किमान ९ ते १२ महिन्याच्या खर्चाला लागतील इतके पैसे ‘इमर्जन्सी फंड’ म्हणून फिक्स्ड डिपॉजिट आणि लिक्विड फंडात ठेवावेत जेणेकरून कर्ज काढण्याची वेळ येणार नाही.

४) गुंतवणुकीची उद्दिष्टे निर्धारित करा : आपण जी गुंतवणूक करतो ती काही उद्दिष्ठे ठरवून करावी. मुलांचे उच्च शिक्षण, त्यांचे लग्न किंवा आपली स्वतःची रिटायरमेंट या सर्वांसाठी आतापासूनच गुंतवणूक करायला सुरुवात करावी. जितकी लवकर आणि शक्य होईल तितकी जास्त गुंतवणूक करायला सुरुवात कराल तर आर्थिक स्वातंत्र्याचे ध्येय लवकर गाठता येईल.

५) आर्थिक सल्लागाराची मदत घ्या : कुरुक्षेत्रात युद्ध जिंकण्यासाठी श्रीकृष्णाने पांडवांना जसे मार्गदर्शन केले तसेच आर्थिक स्वातंत्र्य मिळवणाच्या वाटचालीत तुम्ही एखाद्या आर्थिक सल्लागार किंवा ‘सर्टिफाइड फायनान्शियल प्लानर’ची (CFP) मदत घ्यायला हवी.

एक प्रामाणिक सल्लागार नेहमी नि:पक्षपाती किंवा तटस्थ राहून तुमच्या संपूर्ण इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओचे नियोजन आणि व्यवस्थापन करतो. माध्यमांमधून सतत चालू असलेला माहितीचा मारा आणि बातम्या यामुळे बर्‍याचदा आपण चुकीचे निर्णय घेतो, परंतु सल्लागार असेल तर तो नेहमी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून अशा चुका टाळायला मदत करतो.

बोनस टिप्स :

१) Health is wealth: तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवले पण आरोग्य चांगले नसेल तर या संपत्तीचा तुम्हाला चांगल्या प्रकारे उपभोग घेता येणार नाही. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे हे हि तितकेच महत्त्वाचे आहे.

२) Identify your passion: समजा तुम्ही वयाच्या पन्नासाव्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आणि निवृत्ती घेतली पण पुढे काय करायचे याचे नियोजन नसेल तर जमवलेला सर्व पैसा विनाकारण आणि नियोजनशून्य गोष्टींसाठी काही वर्षातच संपून जाईल. हे टाळण्यासाठी आपण आपल्या आवडीचे कार्यक्षेत्र निवडून त्यामध्ये पुढची काही वर्षे काम करावे आणि ते करत असताना अर्थार्जन झाले तर उत्तमच.

– योगेश पिंगळे
संपर्क : 9588415845
(लेखक हे सर्टिफाइड फायनान्शियल प्लानर (CFP) आहेत.)

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?