मुलांमध्ये बालवयातच उद्योजकता रुजवण्याचे आठ मार्ग

आपल्या पुढच्या पिढीला आपल्या प्रमाणेच उद्योगात आणून यशस्वी करणे, सोपे नसते. शिवाय उद्योजक हा स्वतः अती व्यस्त असतो, तर तो यासाठी वेगळे प्रयत्न कसे करणार? यासाठी मुलांनाच योग्य वयात आपल्या व्यवसायात प्रत्यक्ष सहभागी करून घेऊन ही दरी कमी करू शकतो.

यामुळे आपल्याला आपल्या मुलांना वेळ तर देत येईलच, शिवाय यामुळे त्यांना जीवनात यशस्वी होण्यास मदतही होईल. उद्योजकतेचे हे शिक्षण म्हणून या काळात मुलांना जीवनावश्यक कौशल्ये जसे संवाद कौशल्य, नेटवर्किंग हे शिकण्यास मदत होते.

ही कौशल्ये त्यांना आपण कशात चांगले आहोत हे दाखवून देतात. त्यांना कोणत्या गोष्टी करायला आवडतात, हे शोधायला मदत करतात आणि एकूणच स्वयंप्रेरित राहण्यास सक्षम बनवतात.

१. मुलांना ध्येय निश्चित करायला शिकवा :

ध्येय हा व्यवसायाचा आत्मा असतो. त्यामुळे परिणामकारक ध्येयनिश्चितीचा उद्योजकाला बऱ्यापैकी अनुभव असतो. याच अनुभवाचा उपयोग करून मुलांना स्वतःचे योग्य टार्गेट ठरवण्यात मदत करता येईल, जेणेकरून त्यांच्यात काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होईल.

शिवाय मुलांमध्ये आपल्या कृतीची जबाबदारी घेण्याची भावना आणि “मी करू हे शकतो”, अशी वृत्ती तयार होते. अगदी सोप्या गोष्टींतून मुलांना हे शिकवता येऊ शकते.

 • मुलांना सहज आणि सोपे प्रश्न विचारून त्यांचे मोठे ध्येय ठरवायला लावू शकता.
 • त्या ध्येयामागील हेतू यावर चर्चा करू शकता. (उदा. अभ्यासात चांगले असण्याचे काय फायदे असतात?)
 • या मोठ्या ध्येयाला छोट्या-छोट्या पायऱ्यांमध्ये विभागायला सांगू शकता. (यालाच व्यवसायात strategy म्हटलं जाते.)
 • संभाव्य अडथळे आणि त्यावरील उपाय याबद्दल सखोल चर्चा करू शकता, ज्यामुळे मुलांना परिणामकारक नियोजनाची सवय लागेल.

२. मुलांना अर्थसाक्षर बनवा :

उद्योजक म्हणून अर्थसाक्षरतेचे महत्त्व आपल्याला माहीतच असते. अर्थसाक्षरतेमुळे मुलांना आपण कमावलेल्या पैशांचे व्यवस्थापन आणि गुंतवणूक यांचे महत्त्व बालवयातच कळेल.

मुलांना असे धडे देण्यासाठी काही अर्थविषयक मूलभूत माहिती पुरेशी असते. मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील.

 • त्यांना गरज आणि हौस यांमधील फरक दाखवून द्या. शालेय वयात हे समजावणं खूप सोपं असतं.
 • पैसा मर्यादित असतो, याची मुलांना जाणीव करून द्या. उदा. एकदा एक खेळणं खरेदी केलं की, लगेचच त्यांना दुसरं खरेदी करता येणार नाही.
 • या सगळ्यामध्ये महत्त्वाचं आहे की, चुका करण्याचं स्वातंत्र्य त्यांना द्या. यामुळे त्यांच्यामध्ये सुरक्षितपणाची भावना निर्माण होईल.
 • मुलांना अल्पसंतुष्ट होण्यापासून वाचवा, म्हणजेच त्यांच्यामध्ये काहीतरी महागडे मिळवण्याची इच्छा निर्माण करा. यातही तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरी अशा गोष्टींच्या किमतीतील अर्धी रक्कम मुलांना स्वतःच्या बचतीमधून भरायला लावा. यामुळे मुलांमध्ये कर्जाचे महत्त्व आणि मूल्य याबद्दल जागरूकता निर्माण होईल.
 • मुलांवरील प्रेम असे जास्तीचे पैसे भरून व्यक्त करण्यासापेक्षा त्यांना शिस्त लावून व्यक्त करणं मुलांच्याच हिताचं असेल. यासोबतच व्याज आकारणे आणि त्याची मुलांना जाणीव करून देणं जास्त सहाय्यक होईल.
 • पैशाच्या कालसापेक्ष किमतीची समज मुलांना करून देण्यावर भर द्यावा. याकरता त्यांना वेगवेगळी कामे करायला लावून मोबदल्यात त्यांना हवी असलेली वस्तू खरेदी करून द्यावी. घर किंवा व्यवसाय चालवताना लागणाऱ्या पैशाचा वास्तवदर्शी आकडामुलांसमोर मांडा.
 • तुमची मिळकत साध्या आणि सोप्या भाषेत मुलांसमोर मांडा, जसे की तुम्ही प्रत्यक्ष कामासाठी देत असलेल्या वेळेपैकी तासांमध्ये तुमचा पगार विभागून सांगा. एखाद्या खर्चासाठी इतके तास काम करावे लागते अशा स्वरूपात समजावून सांगा.

३. त्यांचे प्रश्न त्यांनाच सोडवू द्या :

आपल्या पाल्याच्या प्रत्येक अडचणीवर आपणच उपाय शोधून देण्याच्या इच्छेला आवर घाला. सोपे नसलं तरी स्वतःचे प्रश्न स्वतःच सोडवण्याचे कौशल्य हे उद्योजकीय जीवनात आवश्यक असते, जे फक्त अनुभवातूनच शिकता येते. याचा अर्थ पाल्याला वाऱ्यावर सोडणे असा होत नाही, तर वेगवेगळी उदाहरणे देऊन त्यांचे मार्गदर्शन करत रहा.

एखाद्या शास्त्रीय पद्धतीची ओळख करून देऊन मुलांमध्ये सर्जनशीलता, उत्सुकता आणि आत्मविश्वास विकसित केला जाऊ शकतो.

४. सर्जनशीलता जोपासा :

सर्जनशीलता हे प्रमुख उद्योजकीय वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता वाढीस लागू शकते, ज्यायोगे मुलांमध्ये जास्तीत जास्त लवचिकता आणि उपाय शोधण्याची क्षमता विकसित होते. शिवाय विज्ञान, गणित आणि लेखन सारख्या विषयांमध्ये मुलांसाठी सर्जनशीलता खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यासाठी खालील कल्पनांचा वापर करता येईल.

 • जिथे मुलांना वेगवेगळ्या कल्पनांवर मंथन करता येतील, चुका करता येतील आणि अपयशी होता येईल असे सृजनात्मक वातावरण निर्माण आणि जतन करा.
 • मुलांना वेगवेगळ्या कल्पना शोधण्याचे स्वातंत्र्य द्या.
 • वाचन आणि कलेमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहन द्या.
 • एकापेक्षा जास्त उपाय शोधायला प्रोत्साहन देऊन मुलांना वेगळ्या प्रकारचा विचार व्यक्त करू द्या.
 • मुलांनी काय मिळवलं, यापेक्षा कसं मिळवलं यावर लक्ष द्या.

५. प्रतिकूल परिस्थितीतून धडे घ्यायला शिकवा :

शालेय वयात अपयश कसे वाईट असते, ते कसे टाळावे हेच शिकवले जाते. पण उद्योजकासाठी हा विचार घातक ठरू शकतो, कारण उद्योजकतेमध्ये अपयशसुद्धा लाभदायी ठरू शकते.

त्यामुळेच ‘थिंक अँड ग्रो रिच’ या पुस्तकाचे लेखक नेपोलियन हिल म्हणतात की, प्रत्येक अपयशामध्ये तितकेच किंवा त्याहून अधिक लाभ दडलेले असतात.

मुलांना अपयशी होऊ दिल्याने आपल्या चुकांतून शिकण्यास आणि ध्येय गाठायच्या विविध मार्गांचा विचार करायला त्यांना प्रोत्साहन मिळते. परिणामी, ती अधिक आत्मविश्वासू आणि लवचिक बनतात. यासाठी, चूक झाली, तर मुलांना शिक्षा करण्याऐवजी त्यांच्याशी अपयश येण्यामागील कारणांबद्दल चर्चा करावी.

यापुढे जाऊन भविष्यात असे पुन्हा घडू नये, यासाठी करायच्या उपाययोजनांवर मंथन करावे. एकदा आपण यातून काय शिकलो हे मुलांनी सांगितले की कितीही अपयश आले तर त्यांनी कधीही माघार घेऊ नये यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या.

६. मुलांना प्रोग्रामिंग शिकण्यास प्रवृत्त करा :

सध्या माहिती-तंत्रज्ञानाचे युग चालू आहे. त्यामुळे आज प्रोग्रामिंग येणं, ही खूप मोठी जमेची बाजू ठरते. शिवाय प्रोग्रॅमिंग शिकल्यामुळे गणितासारख्या विषयांत शैक्षणिक प्रगती साधली जाऊ शकते, संवाद कौशल्य आणि संस्थात्मक कौशल्य विकसित होऊ शकते, ज्यामुळे आपल्या पाल्यात सक्षम असल्याची भावना निर्माण होऊ शकते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुले तंत्रज्ञानातील संधीसाठी किंवा किमान नवनवीन शोधांसाठी तयार होऊ शकतात. याकरता इंटरनेटवर बरेच रिसोर्सेस उपलब्ध आहेत.

७. उद्योगसंधींबद्दल विचारविमर्श करा :

आज प्रत्येक पाल्याला दरमहा काही ना काही पैसे पॉकेटमनी म्हणून मिळतातच, फक्त त्याच्या मोबदल्यात त्यांना घरातील कोणतीही कामे करण्यासवय लावली, तर यातून दोन गोष्टी साध्य होऊ शकतात :

 • मुलांना या जगात काहीच मोफत नसते, याची समज बालवयातच येईल.
 • त्यामुळे आपोआपच मुलेही स्वतः पैसे कमवण्यासाठी काय करता येईल याबद्दल विचार करू लागतील आणि त्यांच्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात होईल.

या विचारांचा फायदा घेऊन त्यांच्या वेगवेगळ्या व्यावसायिक कल्पनांबद्दल चर्चा करावी. यातून त्यांचा कल, त्यांची कौशल्ये, त्यांचे गुण-अवगुण, सर्जनशीलता जाणून घेतले जाऊ शकतात आणि मुलांनाही बालवायतच त्यांची बिजनेस आयडिया विकसित करायला मदत होईल.

८. मुलांचे आदर्श व्हा :

लहान मुले बऱ्याच गोष्टी आपल्या पालकांकडून शिकतात. त्यामुळे पालक म्हणून उद्योजकाचे आपल्या कामाबद्दल मुलांसमोर व्यक्त केले विचार, ते व्यक्त करण्याची पद्धत या गोष्टी ते आत्मसात करत असलेल्या कार्यपद्धती आणि सवयींवर खोल प्रभाव पाडतात.

त्यामुळे उद्योजकाने आपल्या वागण्यातून मुलांवर योग्य परिणाम होऊन त्यांच्या विचारांना योग्य दिशा आणि आकार मिळेल याची काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच “करत असलेल्या कामावर प्रेम करा” असे म्हटले जाते. कारण यामुळे काम काम वाटतच नाही आणि आपण ते सकारात्मकपणे मांडतो.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?