अपयशाला घाबरू नका!


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


माणसं मृत्यूनंतर कुणाला जर घाबरत असतील, तर ती अपयशाला. त्यामुळेच नवीन काही करायला धजावत नाहीत, कारण अपयशाची भीती वाटते. अशाने ते आयुष्यात तिथेच राहतात जिथून त्यांची सुरुवात झाली होती. मी माझ्या ‘ट्रेनिंग आणि बिझनेस कोचिंग’ या प्रोफेशनमध्ये अनेक उद्योजकांना भेटतो, त्यात त्यांना प्रामुख्याने अपयशाची भीती सतावत असते. मग त्यात नवीन उद्योग, नवीन प्रॉडक्ट, नवीन प्रदेश, नवीन जागा अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो.

याचं कारण म्हणजे आपले संस्कार, आपल्या मान्यता, चादर बघून पाय पसरायचे संस्कार, उधारीच्या पैशावर धंदा वाढवण्यास मान्यता नाही, अशा अनेक गोष्टींच्या आडोशाला आपण आपल्या अपयशाच्या भीतीला लपवत असतो. माझी अपयशाची व्याख्या मात्र इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे.

जर यश म्हणजे शंभर टक्के असेल, तर अपयश म्हणजे शंभर टक्क्यांपेक्षा कमी, म्हणजेच कदाचित ९९ किंवा त्यापेक्षा कमी टक्के यश. दुसर्‍या शब्दांत सांगायचं झालं तर, अपयश म्हणजे कमी यश. तर आजपासून तुमच्या अपयशाला – अपयश न समजता कमी यश मिळालं म्हणून संबोधा. त्याला शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतःला तयार करा.

सॉईचीरो होंडा

जगातल्या प्रचंड यश मिळवलेल्या माणसांनी अपयशाविषयी मनात कधी भीती बाळगली नाही. उलट भीतीचा नेटाने सामना केला. तुम्ही नवीन काही करत नसाल, तर अपयशाची भीती बाळगायची गरजच नाही.

तुम्ही तेच करत राहता, ज्यात तुम्हाला सहज यश येईल, जे करायला सोपे असेल आणि इथेच तुम्ही स्वतःला फसवण्याचा प्रयत्न करता. हेच खरं तुमचं अपयश, कारण तुम्ही स्वतःला कधीच फसवू शकत नाही.

मित्रांनो, इथे आपण सॉईचीरो होंडा (Soichiro Honda) यांचं उदा. पाहू. ते ‘होंडा मोटर्स’ या जगविख्यात कंपनीचे संस्थापक आहेत. स्वतः इंजिनीयर असलेल्या होंडांनी जेव्हा अमेरिकेच्या टोयोटा या कंपनीला ‘पिस्टन रिंग’ (Piston Ring) हा त्यांच्या मोटारीत लागणारा पार्ट सप्लाय केला, तेव्हा त्यांनी पाठवलेल्या पहिल्या ३००० (पार्ट्स) नगांपैकी केवळ तीनच ‘पिस्टन रिंग’ टोयोटाच्या गुणवत्तेत (Quality Testing) खरे उतरल्याने स्वीकारले.

१९४५ च्या युद्धात अमेरिकेने केलेल्या बॉम्बहल्ल्यात त्यांची जपानमधील ‘हमामास्तू’ या शहरातील फॅक्ट्री जळून खाक झाली. अशा वेळी त्यांनी हार मानली नाही, की मनातून खचून गेले नाहीत. त्यातूनही त्यांनी प्रवास पुढे चालूच ठेवला. आज तर तुम्ही होंडा या मोटार कंपनीचा जगाच्या मार्केटमधला दबदबा बघता आहातच.

सुरुवातीला सायकलवर इंजिन बसवून त्या काळातील आधुनिक मोटारसायकल त्यांनी बनवली व आजच्या यशस्वी मोटार कंपनीची मुळं रुजवली; परंतु आयुष्यात आलेल्या अपयशाला, अनपेक्षित धक्क्यांना घाबरून जर त्यांनी माघार घेतली असती, तर आजची जगविख्यात होंडा कंपनी आणि त्यांची गुणवत्तापूर्ण उत्पादनं आपल्याला दिसली नसती.

हारा वही जिसने प्रयास नही किया।

हे होऊ शकतं!

  • यशामुळे माणसं पुढचं शिकणं बंद करतात; परंतु तुमचं कमी यश तुम्हाला सतत पुढे शिकण्याची प्रेरणा देत राहतं.
  • कमी यश तुमचा वाटाड्या आहे, तो तुम्हाला तुमच्या यशाचा मार्ग दाखवत असतो.
  • अपयशाला (कमी यशाला) तुमच्या वरचढ होऊ देऊ नका, तर तुम्हीच त्याच्या मानगुटीवर बसा.
  • कमी यश हे तुम्हाला यशासाठी आवश्यक असणार्‍या आणि तुम्ही केलेल्या प्रयत्नातील फरक दाखवत असतं.
  • प्रत्येक कमी यश हे तुमच्या ज्ञानात भर घालत असतं.
  • प्रत्येक प्रयत्न तुम्हाला तुमच्या यशाच्या जवळ घेऊन जात असतो.
  • कमी यश आणि यश यातील फरक बर्‍याचदा फक्त पाच ते दहा टक्क्यांचाच किंवा त्यापेक्षाही कमी असतो. कमी यश तुम्हाला नेहमी जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करत असतं.
  • कमी यश तुमच्या डोळ्यांत तेल घालून प्रयत्नांची पराकाष्ठा करायला भाग पाडू शकतं.
  • ‘अपयश’ हे तुम्हाला काय करू नये याचं फक्त मार्गदर्शन करत असतं.

हे करून तर बघा!

  • अपयशाला घाबरू नका, त्याचा आनंद घ्या.
  • अपयश म्हणजे कमी यश. कमी यश म्हणजे अनुभव व अनुभव म्हणजे गुरू म्हणजेच कमी यश म्हणजे थोडक्यात तुमचा गुरू.
  • हे कमी यश तुम्हाला तुमच्या उद्यासाठी तयार करत असतं, त्याला घाबरून डावलण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हीच फसाल.
  • कमी यश म्हणजे तुमचा यशाच्या मार्गाचा ‘गाईड’ आहे. त्याचा योग्य उपयोग करून घ्या.
  • कमी यशाला जो घाबरला, तो संपला.
  • जगात दोनच प्रकारचे परिणाम असतात. एक – होय व दुसरं – नाही, फैसला या दोघांतच.
  • नाही म्हणजेच पुढचा प्रयत्न करणे (Next Opportunity) होय.
  • कमी यश तुम्हाला सांगत असतं की, अजून प्रयत्न कर. रस्ता बदल, गती बदल, पद्धत बदल, असंच काही तरी कर. बस्स! यश पुढच्या टप्प्यात आहे.

– विश्वास वाडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?