विक्री वाढवण्याच्या ९ सोप्या टिप्स

आपले बजेट छोटे असो वा मोठे, आपल्या उत्पादनांची विक्री वाढवण्याचे कोणते ना कोणते मार्ग नेहमी उघडे असतात; परंतु कमीत कमी बजेट असताना विक्री वाढवता येणे हे एक कसबच आहे. या वेळी करता येतील असे काही पर्याय आपण पाहू.

१. आपल्या सध्याच्या ग्राहकांशी बोलणे

आपले आताचे ग्राहक हे आपल्या व्यवसायाशी आणि आपल्या उत्पादनांशी परिचित असतात. त्यामुळे एक तर आपण एखाद्या उत्पादनाची पुन्हा विक्री करू शकता किंवा आपल्या ग्राहकांकडून आपल्या उत्पादनांबद्दल त्यांचे मत घेऊन आपल्या उत्पादनात सुधारणा करू शकता. यामुळे आपली विक्री तर वाढेलच शिवाय आपल्या ग्राहकांशी चांगलं नातंसुद्धा निर्माण होईल.

२. आपल्या ग्राहकांकडून रेफरन्स घेणे

जर आपले ग्राहक आपल्या सेवेवर खूश असतील आणि त्यांच्या मागण्या जर आपण उत्तमरीत्या पूर्ण केल्या असतील तर त्यांना रेफरन्स शीट भरून द्यायला सांगा. म्हणजे त्यांच्या मित्रपरिवारातील अशा लोकांची नावे आणि संपर्क क्रमांक जे आपले उत्पादन विकत घेण्यास इच्छुक असतील.

समजा एखाद्या ग्राहकाने दहा रेफरन्स दिले तर त्यांच्याशी संपर्क केल्यावर त्यातील निदान एखादी व्यक्ती तरी आपली ग्राहक होईल. असेच शंभर लोकांकडून रेफरन्स घेतलेत तर त्यातून शंभर नवीन ग्राहकसुद्धा आपल्याला मिळू शकतील; परंतु यात आपले आणि आपल्या ग्राहकांचे नाते कसे आहे याचा आधी विचार करणे अनिवार्य आहे.

३. शिफारस आणि रिव्ह्यू

आपल्या सध्याच्या ग्राहकांना आपल्या सेवेबद्दल त्यांची मते विचारा आणि ती आपल्या वेबसाइट/ सोशल मीडिया अकाऊंटसवरून प्रसिद्ध करा. आपण करत असलेल्या जाहिरातींपेक्षा यांचा आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. याचप्रमाणे आपले जर जस्ट डायलवर अकाऊंट असेल किंवा आपण अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्ट- सारख्या माध्यमांतून विक्री करत असाल तर त्यावरसुद्धा आपल्याला रिव्ह्यू देण्यास आपल्या ग्राहकांना सांगणे उत्तम ठरेल.

४. उत्पादने एकत्र विकणे

जर आपल्या एखाद्या उत्पादनाला उत्तम मागणी मिळत असेल आणि त्यामानाने जर दुसरे उत्पादन फार चालत नसेल तर आपण त्या दोन्ही उत्पादनांना एकत्र करून तिसरे उत्पादन तयार करू शकतो. जसे व्हॅनिला आइस्क्रीम आणि चॉकलेट आइस्क्रीम वेगवेगळे घेतले तर ३० रुपये प्रति पुडा होईल. तेच जर एकत्र घेतले तर ६० ऐवजी ५० मध्ये मिळेल.

त्यामुळे जे उत्पादन चालते त्याची मागणी आणखी वाढेल, शिवाय न चालणारे किंवा कमी चालणारे उत्पादनही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल. यात ग्राहकांना तसे पाहायला गेलो तर केवळ दहा रुपयांचा नफा मिळतो, परंतु या छोट्या नफ्याकडे पाहून किती तरी लोक आपली उत्पादने विकत घेण्यास प्राधान्य देतील. यात आपल्याला नफा (प्रॉफिट मार्जिन) कमी मिळेल, परंतु एकंदर विक्री वाढल्यामुळे आपला शिल्लक माल कमी होऊन पुढील योजना आखण्यासाठी आपल्या व्यवसायात पैसे येतील.

५. फ्लॅश सेल

ठरावीक वस्तूंवर ठरावीक काळासाठी परंतु जास्त फायद्याचा वाटेल असा सेल ठेवणे म्हणजे फ्लॅश सेल. जसे एखाद्या दिवशी जाहीर करणे, की केवळ उद्याचा दिवस सर्व उत्पादनांवर ६० टक्के सूट! यात आपण तोट्यात जात नाही आहोत ना हे सर्वात महत्त्वाचे.

विक्रीची गती खूपच कमी झाली असेल तर काही वेळा ‘नो प्रॉफिट नो लॉस’ तत्त्व डोळ्यासमोर ठेवणेही कधी तरी नफ्याचे ठरू शकते. त्यामुळे आपल्याला हा सेल निव्वळ विक्रीला चालना देण्यासाठी ठेवायचा आहे का प्रत्यक्ष नफा कमवायचा आहे, हे आधीच ठरवावे.

६. ऐकणे आणि समजून घेणे

हा सर्वात सोपा, सर्वात गुणकारी व सर्वात दुर्लक्षित प्रयोग आहे. बर्‍याचदा आपण आपली आवड लोकांवर लादत असतो. याला पुश स्ट्रॅटेजी असे म्हणतात. यामुळे लोकांना काय अपेक्षित आहे यापेक्षा आपण काय करू शकतो याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विक्री कमी झाली असेल तर ग्राहकांच्या वागण्याचे, मागण्यांचे वगैरे नीट निरीक्षण करावे.

त्यातून त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे किंवा कोणत्या गोष्टींची आवड आहे हे आपल्याला समजेल. त्यानुसार पुढील कृती आपण सहज ठरवू शकतो. या दुसर्‍या पर्यायाला पुल स्ट्रॅटेजी असे म्हणतात, कारण यात आपण ग्राहकांवर काही लादत नाही, तर ग्राहकांना हव्या असलेल्या गोष्टीच बनवितो, ज्याने आपोआप मागणी निर्माण होते.

७. किंमत वाढवा

विक्रीत घसरण होत असताना किंमत वाढवणे आपल्याला मूर्खपणाचे वाटेल. तरीही काही वेळा याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. लहान किमतीची १० उत्पादने विकण्याऐवजी किंमत वाढवून ८ उत्पादने विकणे कधी कधी नफ्याचे ठरते. किमती वाढवताना त्या गुपचूप वाढवण्याऐवजी आधीपासूनच जाहीर करा. आपल्या सध्याच्या ग्राहकांना कमी दरात खरेदी करण्यासाठी वेळ द्या. यामुळे विक्री तर वाढेलच, शिवाय प्रत्यक्ष नफासुद्धा वाढेल.

८. सोशल मीडियाचा वापर

सोशल मीडिया हे असे एक साधन आहे ज्याद्वारे आपण कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आपल्यातील बर्‍याच जणांना आता असे वाटत असेल की, सोशल मीडिया केवळ जाहिराती पोस्ट करण्यासाठी वापरला जातो; तर ते साफ चूक आहे. आज सोशल मीडिया इतका प्रगत झाला आहे की, आपण त्यावरून लोकांच्या सवयी, खरेदी करण्याच्या पद्धती, आवडीनिवडी अशा असंख्य गोष्टी जाणून घेऊ शकतो.

याशिवाय कमीत कमी खर्चात आपले ग्राहक होऊ शकतील अशा लोकांपर्यंतही सोशल मीडिया आपल्याला घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियाचा अभ्यास करून आपल्याला उपयुक्त सोशल मीडियावरून केवळ प्रमोशन नाही तर योग्य मार्केटिंग केले असता नक्कीच फायदा होईल.

९. ऑनलाइन जाहिराती

सोशल मीडियाप्रमाणेच ऑनलाइन जाहिरातीसुद्धा कमीत कमी किमतीत करता येतात. आपल्या उत्पादनाशी संबंधित वेबसाइटवर जाहिरात करणे किंवा गुगलसारख्या माध्यमांतून ऑनलाइन जाहिराती करणे हासुद्धा एक उत्तम मार्ग ठरू शकतो. यामुळे आपला व्यवसाय नवीन लोकांपर्यंत पोचतो.

वरील सर्व पर्याय जरी आर्थिक रूपात कमी खर्चीक वाटले तरी यात अपरंपार कष्ट आहेत. नीट विचार आणि अभ्यास करून निर्णय घेणे कधीही फायद्याचे ठरेल. ज्याप्रमाणे योग्य निर्णय कमीत कमी खर्चात विक्री वाढवू शकतात त्याचप्रमाणे घाईघाईत किंवा विचार न करता घेतलेले निर्णय आपल्याला आणखी बुडवू शकतात.

आपल्या आताच्या ग्राहकांसोबत उत्तमोत्तम नाती निर्माण करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यासोबत इतर एक वा अनेक पर्यायांचा एकत्रित वापर करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त विक्री करणे नक्कीच शक्य आहे.

– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?