भारताचं उद्योग वैभव : टाटा कुटुंब


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


अगदी लहानपणापासून ‘टाटा’ हे नाव आपल्या तोंडात बसले आहे. विशेषत: आपल्या प्रिय व्यक्तींपासून दूर जाताना, आपण भारावलेल्या स्वरात ‘टाटा’ हा शब्द उच्चारतो, पुन्हा त्या प्रिय व्यक्तीला लवकरात लवकर भेटण्याच्या अध्याहृत आशेने!

मात्र, जसजसे आपण वयाने मोठे होऊ लागतो, तसतसे ‘टाटा’ या नावाचे वजन आपल्याला जाणवू लागते. मग आपल्या लक्षात येऊ लागते की, आपल्या जीवनाशी निगडित बहुतेक सर्व गोष्टींमध्ये ‘टाटा’ या नावाचे अस्तित्व आहे, नव्हे तर आपल्या अस्तित्वालाच ‘टाटा’ या नावाचा हळुवार स्पर्श आहे आणि ‘टाटा’ या नावामागे एक नितांत विश्वास आहे, पाठीराख्याचा!

आजच्या जमान्यातील, आपल्या पाचवीला पुजलेल्या, अखंड सुरू असणार्‍या दूरदर्शन, झी, स्टार, ए.बी.पी., टाइम्स नाऊ व इतर सर्व चित्रवाहिन्यांवर दाखवली जाणारी, पण आपल्या सर्वांच्या आवर्जून लक्षात राहणारी एक छान जाहिरात ‘टाटा’ उद्योगाचीच आहे. या जाहिरातीमध्ये मंत्री/संत्री, दादा/भाई यांना घाबरण्याच्या आजच्या काळात चहा पिणारी एक साधी स्वागतिका चक्क एका खादी गणवेशधार्‍याशीच पंगा घेते, कारण ती ‘टाटा’ चहा पित असते आणि या जाहिरातीच्या माध्यमातून सामाजिक जाणीव करून देते. आपल्यासारख्या सर्व प्रेक्षकांना ही जाहिरात मनापासून भावते.

जमशेटजी टाटा

हिंदुस्तानात आजही ‘टाटा’ हे नाव व्यावसायिक/धंदेवाईक शुचितेशी पूर्णत: निगडित आहे.

कोणतेही उत्पादन ‘टाटा’ उत्पादित असेल, तर गिर्‍हाईक ते उत्पादन डोळे मिटून विकत घेतात. देशातील समभाग बाजारात आज ‘टाटा’ हे बिरुद धारण करणार्‍या किंवा ‘टाटा’ उद्योगसमूहाशी निगडित असणार्‍या उद्योगधंद्यांचे समभाग वरच्या थरावर फिरताना आढळतात.

आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापरल्या जाणार्‍या बहुतेक गोष्टी ‘टाटा’ उत्पादित असतात. खाल्ल्या मिठाला जागण्याचा प्रघात जरी आता कालबाह्य झाला असला, तरी समाजातील सर्व थरांतील घराघरांमध्ये स्वयंपाकात ‘टाटा’ मीठ वापरले जाते.

बृहन्मुंबईतील कानाकोपर्‍यात जिथे लोकल्स पोचू शकत नाहीत, तिथे स्थानिक परिवहनाच्या, म्हणजे ‘बेस्ट’च्या बसेस पोहोचतात. बेस्टच्या एकंदर बस ताफ्यातील निम्म्यापेक्षा जास्त बसेस ‘टाटा’ उत्पादित आहेत.

‘बेस्ट’ म्हणजे B.E.S.T.चे पूर्ण रूपांतर Brihan Mumbai Electric Supply & Transport असे आहे. आजही बृहन्मुंबईतील मूळ मुंबईमध्ये (पश्‍चिम व पूर्व उपनगरे वगळता) विद्युतपुरवठा ‘बेस्ट’च्या मार्फत ‘टाटा’तर्फेच केला जातो. उपनगरांमध्ये केल्या जाणार्‍या विद्युतपुरवठ्यापेक्षा ‘बेस्ट’तर्फे कमी किमतीत हा पुरवठा केला जातो. मूळ मुंबईमध्ये वारंवार विद्युतपुरवठा खंडित होणे, हा प्रकार अभावानेच घडतो, कारण हा विद्युतपुरवठा ‘टाटा’ इलेक्ट्रिकतर्फे केला जातो.

प्रात:काळचे अभ्यंगस्नान भले पूर्वी हळद, उटणे व डाळीच्या पिठाने होत असले तरी आजच्या काळात चाळीतल्या दोन खोल्यांतील मोरीमध्ये किंवा मध्यमवर्गीयांच्या ‘बाथरूम’मध्ये किंवा अगदी कफ परेड, नेपीयन सी रोड वा पेडर रोड स्थित टोलेजंग इमारतींमधील आलिशान अपार्टमेंट्समधील बादशाही स्नानगृहांमध्ये सचैल स्नानासाठी साबण मात्र ‘टाटा’ उत्पादितच असतो. पुरुष काय, स्त्रिया काय वापरतात विविध सौंदर्यप्रसाधने, तीसुद्धा ‘टाटा’ उत्पादित असतात.

कार्यालयात टापटिपीने निघालेल्या स्त्री व पुरुष चाकरमान्यांना वक्तशीरपणा शिकवायला त्यांच्या मनगटांवर घड्याळेपण असतात, ती ‘टाटा’ उत्पादित टायटन्स किंवा टायमेक्स! कार्यालयात जाताना तहान लागली किंवा जेवताना पाणी प्यावेसे वाटले की, ‘टाटा’ उत्पादित हिमालयन नावाचे निर्जंतुक पाणी आहेच!

कसे जोडले गेलो आपण ‘टाटा’ या नावाशी?

थोडक्यात सांगायचे म्हणजे आपले दैनंदिन जीवन कुठे ना कुठे तरी ‘टाटा’ या नावाशी जोडलेले असतेच. असे हे विश्वासाने परिपूर्ण नाव कमावणार्‍या ‘टाटा’ उद्योगसमूहाचा इतिहास आहे. तब्बल १४७ वर्षांचा! इसवी सन १८६८ पासून आजवर २०१५ पर्यंतचा. या पूर्ण इतिहासाचा आढावा घेणे खूपच जिकिरीचे ठरेल. तरी इथे आपण ‘टाटा’ या सुविख्यात उद्योगसमूहाच्या इतिहासाचा स्थूलमानाने, पण सर्वंकष आढावा घेऊ या.

हा आढावा घ्यायच्या आधी एका महत्त्वाच्या बाबीचा इथे उल्लेख होणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ही बाब प्रामुख्याने ‘टाटा’ उद्योगसमूहाच्या आजवरच्या यशस्वितेचा पाया आहे.

१८६८ साली स्थापन झालेल्या या उद्योगसमूहाने केवळ नफा-तोट्याचा विचार न करता व केवळ नफा कमावण्यासाठी भल्याबुर्‍या अनैतिक मार्गांचा अवलंब न करता, आरंभीच्या काळापासून अगदी आजवर सामाजिक भान जोपासले. ‘टाटा’ उद्योगसमूहातील सर्व उद्योगांनी त्यांच्याकडे काम करणार्‍या कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वास्थ्याला प्राधान्य दिले.

त्यांना कुटुंबाचे घटक मानून त्यांची सुयोग्य काळजी घेतली. रोजगारनिर्मितीबरोबर आरोग्य व शिक्षण या गोष्टींकडे लक्ष पुरवले. ‘टाटा’ उद्योगसमूहाने त्यांच्या विविध धर्मादाय आस्थापनांच्या मार्फत देशभर विशिष्ट व्याधिग्रस्त रुग्णांसाठी रुग्णालये बांधली, तसेच गरीब रुग्णांसाठी आर्थिक मदत उपलब्ध केली.

सर्व क्षेत्रांमधील मूलभूत संशोधनासाठी ‘टाटा मूलभूत संशोधन संस्था’ व समाजातील विविध घटकांचा तौलनिक अभ्यास करून त्या घटकांच्या समस्यांचा अभ्यास करून, त्यांचे निराकरण करण्यासाठी ‘टाटा’ समाज विज्ञान संस्था अशा संस्थांची ‘टाटा’ उद्योग समूहाने स्थापना केली. आजमितीला ‘टाटा’ उद्योगसमूह सुमारे शंभर देशांमध्ये कार्यरत आहे.

२०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये या उद्योगसमूहाची आर्थिक उलाढाल सुमारे १०८.७८ बिलियन डॉलर्स म्हणजे ७,१९४.८८ अब्ज रुपये इतकी झाली आहे. या उद्योगसमूहामध्ये एकंदर ८५ उद्योगसंस्था असून, हिंदुस्तानात व जगभरात असे ६ लाख कर्मचारी या उद्योगसंस्थांमध्ये काम करीत आहेत.

‘टाटा’ या सन्माननीय बिरुदामुळे व या उद्योगसमूहाने प्रारंभीच्या काळापासून अनुसरलेल्या सामाजिक भानामुळे, यातील बहुतांश उद्योगसंस्थांमध्ये कामगारांचे संप तसेच व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये तंटेबखेडे अपवादकत्मकरीत्या आढळून येतात.

पूर्वी सरकारी नोकरी मिळणे म्हणजे आयुष्यात स्थैर्य मिळणे, असे मानले जात असे. हल्ली ‘टाटा’च्या उद्योगसंस्थेमध्ये नोकरी मिळणे म्हणजे आयुष्यात स्थैर्य मिळणे, असे मानले जाते.

इसवी सन १८६८ मध्ये जमशेटजी नसेरवानजी टाटा यांनी ‘टाटा’ या नावाने खासगी व्यापारउदीम करणारी संस्था सुरू केली. या संस्थेचा जम बसताच १८७४ मध्ये त्यांनी मध्य हिंदुस्तानात कापड गिरणी सुरू केली. १८८७ सालात त्यांनी, त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र दोराबजी टाटा व त्यांचेच कुटुंबीय रतनजी दादाभाई टाटा यांना बरोबर घेऊन ‘टाटा अ‍ॅण्ड सन्स’ या भागीदारी संस्थेची स्थापना केली. पुढे १८९६ मध्ये त्यांचे कनिष्ठ चिरंजीव रतन टाटा या भागीदारी संस्थेत दाखल झाले. ‘टाटा अ‍ॅण्ड सन्स’ ही संपूर्ण ‘टाटा’ उद्योगसमूहाची मूळ संस्था आहे.

१९०२ मध्ये पूर्ण हिंदुस्तानातील पहिली आलिशान निवासी हॉटेल्स बांधणारी ‘इंडियन हॉटेल्स कंपनी’ ‘टाटा’ उद्योगसमूहाने सुरू केली. आज मुंबईत अपोलो बंदर येथे उभे असलेले हॉटेल ताज महाल पॅलेस अ‍ॅण्ड टॉवर १९०३ साली कार्यान्वित झाले. अर्थात यातील टॉवरची बांधणी १९६७-६८ साली झाली. आज हिंदुस्तानातील सर्व महानगरांमध्ये, तसेच ऐतिहासिक शहरांमध्ये व अनेक देशांमध्ये ‘टाटा’ उद्योग समूहाने हॉटेल्स बांधली आहेत.

जहांगीर रतनजी दादाभाई उपाख्य जे.आर.डी. टाटा

१९०३ मध्ये ‘टाटा’ उद्योगसमूहाने आणखी एक पाऊल उचलले. ‘टाटा आयर्न अ‍ॅण्ड स्टील’ या उद्योगसंस्थेची स्थापना केली. (या उद्योगसंस्थेचे आजचे नाव ‘टाटा स्टील्स लिमिटेड’ असे आहे.) याच उद्योगसंस्थेने हिंदुस्तानातील पहिला लोहनिर्मितीचा कारखाना सुरू केला. १९१२ च्या सुमाराला या कारखान्याने लोहनिर्मितीस प्रारंभ केला.

‘सरशी तिथे पारशी’ हा वाक्प्रचार बहुधा ‘टाटा’ उद्योग समूहावरूनच पडला असावा; कारण ‘टाटा’ या पारशी घराण्याने संस्थापित उद्योगसमूहाने ज्या ज्या क्षेत्रात प्रवेश केला, त्या त्या क्षेत्रात यश मिळवले. कालांतराने व्यापक हित लक्षात घेऊन काही उद्योगंसस्था बंद करून नवीन क्षेत्रात पदार्पण केले.

‘टाटा’ उद्योगसमूहाने आपली घोडदौड सुरूच ठेवली. १९१० साली या समूहाने विद्युतनिर्मिती क्षेत्रात पाय टाकून ‘टाटा हायड्रो-इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी’ची स्थापना केली. (या उद्योगसंस्थेला आज ‘टाटा पॉवर’ असे म्हणतात.) हीच संस्था आजही विद्युतनिर्मितीमध्ये कार्यरत असून मूळ मुंबईला विद्युतपुरवठा करते.

पहिले महायुद्ध संपण्याच्या काळात, १९१७ मध्ये ‘टाटा ऑइल मिल्स कंपनी’ स्थापन झाली. या उद्योगसंस्थेतर्फे आंघोळीचा साबण, कपडे धुण्याचा साबण तसेच विविध खाद्यतेले यांचे उत्पादन सुरू झाले. आजही आपल्या अंतरंगाची नसेल, परंतु आपल्या बाह्यांगाची व आपल्या पेहरावांची शुचिता ‘टाटा’तर्फे केली जाते.

‘टाटा’ उद्योगसमूहाच्या यशाचा वारू अष्टदिशा पादाक्रांत करून थांबायला तयार नव्हता. या वारूला गगनही ठेंगणे वाटू लागले होते. १९३२ साली ‘टाटा’ उद्योगसमूहाने हवाई वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला. त्यासाठी ‘टाटा एअरलाइन्स’ची स्थापना झाली. ‘टाटा’ घराण्याचे तरणेबांड सुपुत्र (व नंतर या उद्योगसमूहाचे अध्यक्ष होणारे) जे.आर.डी. (जहांगीर) टाटा यांनी या उद्योगात शिरण्यासाठी १९२९ मध्ये व्यावसायिक वैमानिक होण्याचा परवाना मिळवला. तत्कालीन हिंदुस्तानात मिळालेला पहिला वैमानिक परवाना! त्यांनी कराची-मुंबई-मद्रास अशी टपालसेवा विमानमार्गे सुरू केली.

याच ‘टाटा’ एअरलाइन्सचे नामकरण पुढे ‘एअर इंडिया’ झाले. झोकात मुजरा करणारा महाराजा हे ‘एअर इंडिया’चे बोधचिन्ह जगभर प्रसिद्ध झाले.

एके काळी भरपूर नफा कमावणारी, अगत्यशील सेवेसाठी प्रसिद्ध असणारी ही विमान संस्था खुळचट समाजवादी विचारांच्या आहारी जाऊन काहीही रास्त कारण नसताना हिंदुस्तान सरकारने ताब्यात घेतली. आज हीच एअर इंडिया आपल्या सरकारला पोसायला जड झालेला पांढरा हत्ती बनली आहे व सातत्याने आर्थिक नुकसानीस सामोरे जात आहे. असो. वाईट याचे वाटते की, आपल्यासारख्या करदात्यांच्या खिशातून हा पांढरा हत्ती कित्येक वर्षे पोसला जातो आहे.

दुसर्‍या महायुद्धाच्या सुमारास १९३९ मध्ये स्थापन झालेली ‘टाटा केमिकल्स’ ही उद्योगसंस्था आज संपूर्ण हिंदुस्तानात सोडा-अ‍ॅशचे उत्पादन करण्यात अग्रगण्य बनली आहे. दुसरे महायुद्ध संपता संपता आणि हिंदुस्तानास स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वसंध्येवर ‘टाटा’ उद्योगसमूहामध्ये ‘टाटा इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड लोकोमोटिव्ह’ या उद्योगसंस्थेची भर पडली. रेल्वेच्या विद्युत इंजिनांना लागणारे यंत्रभाग व इतर अभियांत्रिकी सुटे भाग यांच्या निर्मितीचे कार्य हिंदुस्तानात प्रथमच सुरू झाले.

या उद्योगसंस्थेचे पुनर्नामकरण ‘टाटा मोटर्स’ असे २००३ मध्ये झाले. ‘टाटा मोटर्स’ ही उद्योगसंस्था नाव बदलण्याच्या आधीपासूनच ‘टाटा’ या बिरुदाखाली प्रवासी वाहतुकीसाठी बसेस, मालवाहतुकीसाठी विविध आकारांचे ट्रक्स यांचे उत्पादन करत होती. जरी बसेस व ट्रक्स यांच्या उत्पादनात प्रचंड यश मिळत असले तरी मोटरकार्सच्या उत्पादनात अपयशच पदरी पडत होते.

१९९१ च्या सुमारास स्टेशन वॅगनच्या प्रकाराखाली ‘टाटा सिएरा’ व ‘टाटा इस्टेट’ या नावाच्या प्रवासी गाड्यांचे उत्पादन सुरू झाले. तरी म्हणण्यासारखे यश मिळतच नव्हते. शेवटी १९९८ साली ‘टाटा इंडिका’ कार बाजारात आली. त्यानंतर ‘टाटा मोटर्स’ या उद्योगसंस्थेने मागे वळून पाहिले नाही.

‘टाटा इंडिका’बरोबरच ‘टाटा सुमो’ व ‘टाटा सफारी’ या जीप्सनीदेखील ‘टाटा मोटर्स’ला मोठा हात दिला. २०१५ मध्ये ‘टाटा’ या बिरुदाच्या व्हिस्टा, इंडिगो, मॅन्झा, विंगर, झेनन एक्सटी, अरिआ, व्हेन्चर, आयरिस, झेस्ट आणि बोल्ट या मोटरकार्स व ‘टाटा सुमो’, सुमो ग्रांदे, मोव्हुस सफारी व सफारी स्टॉर्म या जीप्स हिंदुस्थानातील रस्त्यांवर दिमाखात फिरत आहेत.

रतन टाटा

‘टाटा नॅनो’ एक क्रांतिकारक पाऊल मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडेल अशी व देशातील रहदारीग्रस्त शहरी रस्त्यांवर सुलभतेने चालू शकेल, अशी छोटी मोटरकारबनवण्याचे ‘टाटा’ उद्योगसमूहाचे मोठे स्वप्न होते.

जगात झालेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे व हिंदुस्तानमध्ये शिक्षित बुद्धिजीवींनी माहिती तंत्रज्ञानामध्ये उत्तम प्रवीणता मिळवण्यामध्ये प्रचंड यश मिळवल्यामुळे, हिंदुस्थानातील या क्षेत्रात काम करणार्‍या मध्यमवर्गीयांची लोकसंख्या खूपच वाढली. त्यामुळे देशातील बाजाराची क्रयशक्ती वाढली.

या मध्यमवर्गीयांच्या इच्छाआकांक्षा वाढल्या. चांगले घर असावे, उत्तम राहणीमान असावे व घरी चारचाकी वाहन असावे; असे मध्यमवर्गीयांना वाटू लागले. या प्रचंड वाढलेल्या मध्यमवर्गीयांच्या लोकसंख्येचा फायदा घेण्यासाठी ‘टाटा मोटर्स’ने छोट्या गाड्यांच्या उत्पादनास प्रारंभ केला. ‘टाटा नॅनो’ गाडीची प्रारंभीची किंमत अवघी १ लाख रुपये ठेवण्यात आली होती.

चार माणसे बसतील अशी ही छोटी गाडी हिंदुस्थानातील प्रमुख शहरांमध्ये वापरायला अत्यंत सुटसुटीत आहे. ही गाडी इंधनाची बचत मोठ्या प्रमाणावर करते, पण अजूनही ‘नॅनो’ गाडीला सुयोग्य न्याय मिळाला नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या समाजातील भंपकपणा, कारण जितकी गाडी मोठी तितकी सामाजिक प्रतिष्ठा मोठी, ही आपली घाणेरडी संकुचित वृत्ती.

शहरांची लोकसंख्या वाढत असताना व त्या प्रमाणात रस्ते वाढत नसल्याने, हिंदुस्थानातील सर्वच शहरांमध्ये वाहतूक कोंडी प्रचंड वाढली आहे. वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषणही वाढले आहे, पण ही साधी सारासार बुद्धी वापरायला वेळ कोणाला आहे?

हिंदुस्तानाची पत आंतरराष्ट्रीय बाजारात वाढवण्यासाठी ‘टाटा मोटर्स’ने २००८ साली एक प्रचंड यश प्राप्त केले.

आपल्या स्पर्धकांपेक्षा जास्त बोली लावून ‘फोर्ड’ मोटर कंपनीकडून जॅग्वार व बी.एम.डब्ल्यू.कडून लँडरोव्हर व रेंजरोव्हर गाड्यांच्या उत्पादनाचे कारखाने विकत घेतले. व्हिटली कॉव्हेंट्री येथे हे कारखाने स्थित आहेत. जॅग्वार व रोव्हर या अत्यंत आलिशान गाड्या आहेत. ‘टाटा’ उद्योगसमूहाचेच नव्हे, तर हिंदुस्तानचे मानाचे पान असणारी उद्योगसंस्था म्हणजे ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड’. माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था १९६८ साली स्थापन झाली.

जगभरात ५० देशांत ही संस्था कार्यरत आहे. या उद्योगसंस्थेची गेल्या वर्षी नोंदवली गेलेली आर्थिक उलाढाल ८० बिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे ५५०० अब्ज रुपये इतकी आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारी हिंदुस्तानातील ही सर्वात मोठी उद्योगसंस्था असून यंदा २०१५ साली या उद्योगसंस्थेने सर्वात जास्त नफा कमावणारी संस्था या नामांकनापासून ‘रिलायन्स इंडस्ट्री’ला मागे टाकले आहे.

मुंबई स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये या संस्थेची नोंदणी झालेली असून, या संस्थेच्या समभागांचे खाली-वर होणे, याचा संपूर्ण समभाग बाजारावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. याच उद्योगसंस्थेमुळे माहिती तंत्रज्ञानाच्या निर्यातीमुळे आपल्या सरकारला खूप मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होते. २०१५ मध्येच ‘टाटा’ उद्योगसमूहाने ‘सिंगापूर एअरलाइन्स’बरोबर भागीदारी करून ‘विस्तार’ या नावाने हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात पुन्हा पाऊल पुढे टाकले आहे.

‘टाटा’ उद्योगसमूहावर जितके लिहिले जाईल तितके कमीच आहे. इथे ‘टाटा’ समूहातील इतर उद्योगसंस्थांना जागेअभावी स्थान देता आले नाही. मात्र लेखाच्या अखेरीस ‘टाटा’ उद्योगसमूहाच्या अत्यंत महत्त्वाच्या तीन धर्मादाय संस्थांचा उल्लेख होणे आवश्यक आहे.

  1. सर दोराबजी टाटा ट्रस्ट : १९३२ साली स्थापन झालेली ही धर्मादाय संस्था गरीब विद्यार्थी व गरीब रुग्णांना आर्थिक साहाय्य देते. तसेच ‘टाटा’ उद्योगसमूहातील संशोधन संस्थांना साहाय्य करते.
  2. सर रतन टाटा व नवाजबाई रतन टाटा ट्रस्ट : १९१९ मध्ये स्थापन झालेली ही धर्मादाय संस्था हिंदुस्तानातील अविकसित भागांमधील व ग्रामीण भागातील विकास प्रकल्पांना आर्थिक मदत करते.
  3. जे. एन. टाटा ट्रस्ट : १८९२ साली स्थापित ही धर्मादाय संस्था स्वत: जमशेटजी टाटा यांनी सुरू केली असून विविध विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते.
‘टाटा’ उद्योग समूहास १८६८ साली स्थापनेपासून आजपर्यंत पुढील कार्यक्षम अध्यक्ष मिळाले आहेत.
  • १८६८ – १९०४ : संस्थापक अध्यक्ष-जमशेटजी नसेरवान टाटा
  • १९०४ – १९३२ : दोराब टाटा
  • १९३२ – १९३८ : नवरोजी सक्‍लाटवाला
  • १९३८ – १९९१ : जहांगीर रतनजी दादाभाई टाटा
  • १९९१ – २०१२ : रतन टाटा
  • २०१२ – २०१६ : सायसर पालनजी मिस्त्री
  • २०१६ – २०१७ : रतन टाटा
  • २०१७ – आतापर्यंत : नटराजन चंद्रशेखरन

‘टाटा’ उद्योगसमूहाचे सर्वात जास्त कालावधी लाभलेले अध्यक्ष व ज्यांनी आपल्या अथक प्रयत्नांनी ‘टाटा’ उद्योगसमूहाचे साम्राज्य हिंदुस्थानातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवले, ते साहसी वृत्तीचे, हिंदुस्तानातील प्रथम व्यावसायिक वैमानिक जे.आर.डी. टाटा यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला स्वत:ला लाभले आहे. यांच्याच कारकीर्दीत इंडियन हॉटेल्स कंपनी ऊर्जितावस्थेत आली.

हिंदुस्थानातील पर्यटन वाढवण्यात यांचा भरीव वाटा होताच, पण आपणही पंचतारांकित हॉटेल्स परदेशात बांधू शकतो, हा आत्मविश्‍वास त्यांनी हिंदुस्तानातील सरकारमध्ये व नागरिकांमध्ये निर्माण केला. आता या लेखाची परिसीमा, मी समस्त वाचकांना टाटा म्हणून करतो.

– संजय भिडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?