ह्या विषयावर मी साधारण आठ ते दहा दिवसांपासून लिहू का नको असा विचार करत होतो.
ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावर संबोधन केलं, त्या दिवसापासून हा विचार सुरू होता. त्यानंतर पाच पत्रकार परिषदा झाल्या (ज्याची संपूर्ण प्रेझेन्टेशन्स पीडीएफ फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहेत) त्या विस्तृतपणे वाचल्यावर मला बऱ्याच शंका आल्या. यातली सगळ्यात मोठी शंका होती की हे सगळं प्रत्यक्षात कस येणार, या योजना कार्यान्वित कधी आणि कशा होणार आणि याचा अर्थकारणावर कसा परिणाम होणार?
अर्थात सरकारने यावर काहीतरी विचार करून ठेवला असेल, ज्याला रोडमॅप म्हणता येईल.
मी बऱ्याच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसोबत काम करतो. त्यामुळे पहिल्या दिवसाची घोषणा झाल्यावर या क्षेत्रातील उद्योजकांच्या (आणि अर्थात समर्थक-विरोधकांच्या) चर्चांना उधाण आलं आणि त्याला मुख्य कारण होतं तीन लाख करोड रुपयांच्या विनातारण कर्जाची घोषणा.
पुढे जाण्याआधी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, मी एक साधा उद्योजक आहे. त्यामुळे मी कोणत्याही पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात ही लेखमाला लिहित नाही आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे हे सगळं प्रत्यक्ष कसं घडणार ह्याविषयी अजूनही काहीही स्पष्ट नाही. किंबहुना तीन लाख करोड विनातारण कर्जाच्या अटी शर्ती अजून जाहीर झालेल्या नाहीत. पण पाचही दिवसाच्या पत्रकार परिषदा पाहिल्यावर आणि त्याचे प्रेझेंटेशन वाचल्यावर मला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे बऱ्याच उद्योजकांनी तीन लाख करोडच्या पलीकडे काहीही पाहिलं नाही.
या योजनेवर बऱ्याच तज्ञ मंडळींनी आपली बरीच मतं मांडली आहेत आणि सर्व मंडळी अर्थतज्ञ आहेत.
माझ्या या लेखमालेचा उद्देश योजना किती चांगली आहे किंवा वाईट आहे, याविषयी भाष्य करणे हा नाही. सरकार ज्या विविध योजनांवर खर्च करायचा विचार करत आहे, या योजनांमध्ये अनेक संधी दडलेल्या आहेत. बरेचसे उद्योजक (बहुदा) अजूनही त्या संधी पाहू शकले नाहीत, याची मला थोडीशी खंत वाटली.
चार किंवा पाच भागात लेखमाला पूर्ण होईल आणि यामध्ये कोणत्या क्षेत्राला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतील ह्याविषयी माझं वैयक्तिक विश्लेषण मांडलेलं असेल. कदाचित ते तस घडेल किंवा घडणारसुद्धा नाही, परंतु आज ज्या संधी मला दिसत आहेत, त्या तुमच्या समोर मांडणे हे माझं कर्तव्य आहे. यामुळे एका जरी उद्योजकाला थोडासा जरी उपयोग झाला किंवा फायदा झाला तर माझ्या या लिखाणाचे व्रत सुफळ संपूर्ण झालं, असं मी मानेन.
आता पुर्ण लेखमालेमध्ये सरकारने जाहीर केलेले आकडे वापरले जातील.
त्यामुळेच या आकड्यांचे स्पष्टिकरण माझ्याकडे कृपया मागू नये. मी ते आकडे मांडताना त्याच्या मागे असलेल्या संधीविषयी बोलणार आहे. त्यामुळे माझा मूळ उद्देश हा उद्योजकांनी कर्जाच्या पलीकडे असलेले फायदे आणि भविष्यात येणाऱ्या संधी याकडे बघावे हा आहे.
सीए तेजस पाध्ये यांनी नुकत्याच घोषित झालेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ या केंद्र सरकारच्या अभियानाचा विस्तृत अभ्यास करून याचा सामान्य उद्योजकाच्या दृष्टिकोनातून कसा लाभ घेता येईल याचे या लेखमालेच्या माध्यमातून विवेचन केले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्ज आणि अनुदान याच्यापलीकडे उद्योजकांसाठी या अभियानात बऱ्याच लाभकारक गोष्टी सामावलेल्या आहेत. या दृष्टीने प्रत्येक उद्योजकाने ही लेखमाला संपूर्ण वाचावी आणि आपल्या भविष्याच्या दृष्टीने योजना आखाव्यात.
संपूर्ण लेखमाला वाचण्यासाठी : https://udyojak.org/tag/atmanirbhar-bharat-series/
आजपर्यंत मी जे काही शिकलो, वाचन केलं किंवा अनेक तज्ञांचे व्हिडिओ पहिले/ऐकले, त्याच्या आधारावर हे सर्व अंदाज मी मांडणार आहे. त्यामुळे एखाद्या योजनेविषयी मी चांगलं मत मांडलं तर ते सरकारचं समर्थन आहे असं बिलकुल नसेल, हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो.
हा लेख म्हणजे नमनाला घडाभर तेल झालेला आहे. उद्यापासून प्रत्यक्ष लेखमालेला सुरुवात करुया. मी यात मांडलेल्या संधींव्यतिरिक्त अनेक संधी असतील; ज्या माझ्या मर्यादित आकलनशक्तीच्या पलीकडे असतील. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश एवढाच की जेव्हा तुम्ही निवांत असाल तेव्हा या असलेल्या संधींविषयी निश्चित विचार करू शकाल आणि ज्या संधी मी पाहू शकलो नाही त्या संधी तुम्ही उद्योजक म्हणून विचार करून शोधू शकाल.
लॉकडाउन संपल्यावर आपल्या सगळ्यांना जोमाने कामाला लागायचं आहे.
त्यावेळेस अशा दिसणार्या संधी आपल्याला निश्चितच नवीन इच्छाशक्ती देतील, एवढाच या लेखमालेचा उद्देश आहे.
रोज झालेल्या घोषणेनुसार ही लेखमाला नसेल. ह्या सर्व माहितीचे मी एक्सेल शीटमध्ये एकत्रीकरण केलं आहे आणि त्याची (मला समजलेल्या) क्षेत्रानुसार मांडणी केली आहे. हे सर्व लेख त्या माहितीला अनुसरून असतील.
– सीए तेजस पाध्ये
(लेखक चार्टर्ड अकाउंटंट असून MSME क्षेत्रांसाठी असलेल्या योजनांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे.)
संपर्क : 98202 00964
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.