एक स्टार्टअप म्हणून आपल्या उद्योगाचे प्रमोशन करणे अनिवार्य आहे. कारण जर लोकांना आपल्याबद्दल माहीतच नसेल तर ते आपल्याकडून आपली उत्पादने विकत कसे घेतील?
एखादे उत्पादन लोकांसमोर आणण्याचे जाहिरात करण्याचे असंख्य प्रकार आहेत. पण ह्यात महत्त्वाचे हे आहे की आपण आपल्या उत्पादनाला योग्य असा पर्याय निवडतो का?
जसे, आपण जर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करत असाल तर फोनवरून त्याचे प्रमोशन करण्यापेक्षा खाद्यपदार्थांचे सँपल्स लोकांमध्ये वाटलेत तर त्याचा जास्त फायदा होऊ शकेल.
आपला व्यवसाय लोकांसमोर आणण्यासाठी रोज नवनवीन मार्ग शोधायला हवेत आणि त्याचसोबत इतरांनी वापरलेल्या मार्गांचासुद्धा अभ्यास करत राहिले पाहिजे. तर आता आपण प्रमोशनच्या अश्या काही पद्धती बघूया ज्या आतापर्यंत बऱ्याच जणांनी वापरून पहिल्या आहेत आणि त्यात त्यांना साधारणपणे फायदाच झालाय.
१. व्हिडिओ
आपण असे म्हणतो की एक फोटो हा शंभर शब्दांइतका व्यक्त होतो त्याचप्रमाणे एक व्हिडिओ हा शंभर फोटोंइतका व्यक्त होतो. कारण आपण जे वाचतो त्यापेक्षा आपण जे समोर पाहतो ते आपल्या जास्त चांगलं लक्षात राहतं.
जसे आपण जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायला जातो, तेव्हा आपल्याला त्या वस्तूची पेपरातील जाहिरात आठवेलच असे नाही पण आपल्याला त्या वस्तूची टीव्ही ऍड नक्कीच आठवते.
आपण आपल्या उत्पादन बनवण्याच्या प्रक्रियेचे, आपल्या दैनंदिन कामांचे, आपल्या कर्मचाऱ्यांचे किंवा आपल्या उत्पादनाच्या गुणवैशिष्ट्यांचे व्हिडिओज बनवलेत आणि ते योग्य लोकांपर्यंत पोचवलेत तर आपल्याला विक्री वाढवण्यात ह्याचा नक्कीच लाभ होईल.
२. शंभर लोकांपर्यंत एकावेळी पोचणे चांगले आहे, परंतु वीस योग्य लोकांपर्यंत पोहोचणे उत्तम आहे.
असे म्हटले जाते की आपल्या ग्राहकांपैकी वीस टक्के ग्राहक आपल्याला ऐशी टक्के नफा मिळवून देतात. त्यामुळे एका वेळी अनेक लोकांपर्यंत केलेले प्रमोशन (मास मार्केटिंग) चांगलेच आहे, परंतु त्याहून उत्तम म्हणजे जे व्यक्ती खरोखरच आपल्याकडून खरेदी करतील त्यांपर्यंत पोहोचणे. कारण थोड्या पण योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचले तर आपला कन्व्हर्जन रेट (त्या व्यक्तींपैकी किती जण आपल्याकडून खरेदी करतील) जास्त असेल.
याच्याच उलट जर आपण अनेक लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचता यावे असे प्रयत्न करत असू तर आपला कन्व्हर्जन रेट हा कमी असेल. आपला व्यवसाय ओळखून ह्या दोन्हीपैकी आपल्याला काय उपयुक्त आहे हे प्रत्येक उद्योजकाने ठरवायला हवे.
३. आपली ऑनलाईन प्रसिद्धी
या टेक्नॉलॉजिच्या युगात एखादा व्यवसाय जर आपले ऑनलाईन अस्तित्व निर्माण करू शकला नाही तर तो हळू हळू काळाच्या पडद्याआड जाऊ लागेल. आज जवळपास सर्वच व्यवसाय ऑनलाईन येऊ लागले आहेत.
ऑनलाइन म्हणजे सोशल मीडिया असोत, वेबसाईट्स असोत किंवा ई-मेल असो. आपला व्यवसाय जर बहुतांश लोकांपर्यंत आपल्याला न्यायचा असेल तर आपल्याला आपल्या व्यवसायाचे ऑनलाईन अस्तित्व निर्माण केलेच पाहिजे.
आता एखादी व्यक्ती फेसबुकवर प्रमोशन करते म्हणून मीसुद्धा तिथेच करायला हवे असे नाही. तर आपल्या व्यवसायाला साजेशा अशा ठिकाणी आपण लोकांना आपला व्यवसाय काय आहे हे दाखवले पाहिजे. ज्याने आपल्या उत्पादनांची माहिती लोकांना मिळेल आणि आपल्या विक्रीत वाढ होईल. आपल्या व्यवसायाचे ऑनलाईन स्टोअर निर्माण करणे हासुद्धा एक उत्तम पर्याय आहे.
आपल्या व्यवसायाचे ऑनलाईन अस्तित्व निर्माण करण्यासाठी हे काही सोपे पर्याय आहेत :
१. वेबसाइट
२. ऑनलाइन शॉप (ई-कॉमर्स पोर्टल)
३. ई-मेल
४. ब्लॉग्स
५. फेसबुक
६. लिंकडीन
७. ट्विटर
८. इंस्टाग्राम
९. इतर सोशल मीडिया
४. ऑफलाईन मार्केटिंग बंद करू नका
ऑनलाईन मार्केटिंगचे खूप फायदे असले तर ऑफलाईन मार्केटिंगला स्वतःचे वेगळे अस्तित्व आहे. लोकांना प्रत्यक्ष जाऊन भेटणे, वेगवेगळ्या नेटवर्किंग फॉरम्सशी जोडले असणे तसेच वृत्तपत्रांत किंवा मासिकांत जाहिरात देणे, पत्रके वाटणे, पोस्टाने पत्रे पाठविणे, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणे हे ऑफलाईन मार्केटिंगचे काही सोपे प्रकार आहेत. ह्याचसोबत टेलीकॉलिंग हे सुद्धा फायद्याचे ठरू शकते.
त्यामुळे आपले ग्राहक होतील असे लोक जिथे जिथे भेटणे शक्य आहे, तिथे त्यांना भेटा. आजच्या धावत्या जगात ही मार्केटींगची पद्धत आपल्याला कंटाळवाणी वाटेल, परंतु आपला उद्योग जर वाढवायचा असेल तर याला पर्याय नाही.
५. माहितीयुक्त मार्केटिंग
आपण आपल्या व्यवसायानुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन मधील अगदी योग्य पर्याय निवडलेत आणि फक्त आमचे हे उत्पादन विकत घ्या आमची ती सर्व्हिस विकत घ्या हेच लोकांना सांगितलेत तर काही काळानंतर लोक आपल्या व्यवसायाला कंटाळतील.
त्यामुळे लोकांना उपयोगी असलेल्या गोष्टीसुद्धा त्यांना द्या. म्हणजेच जर आपले कपड्यांचे दुकान असेल तर कपडे व्यवस्थित कसे ठेवावेत, कोणत्या ऋतूत कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत अशाप्रकारच्या टिप्स आपण लोकांना देऊ शकता. यामुळे लोक आपल्या व्यवसायात गुंततील. आपल्या व्यवसायप्रमाणे अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण लोकांना देऊ शकता.
आपले उत्पादन लोकांसमोर आणण्याचे असे असंख्य प्रकार आहेत. त्यातील हे सध्याचे सर्वोत्तम पाच मार्ग आपण आता पाहिले. ‘लोकांचे विचार, लोकांची गरज आणि लोकांची मागणी ह्याचे उत्तर म्हणजे आपले उत्पादन आहे.’ हे जर आपण लोकांना सांगू शकलात तर नक्कीच आपला व्यवसाय वाढत जाईल.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.