Advertisement
अगरबत्ती उद्योग : गृहोद्योग किंवा जोडव्यवसाय म्हणून करावयास चांगला पर्याय
उद्योगसंधी

अगरबत्ती उद्योग : गृहोद्योग किंवा जोडव्यवसाय म्हणून करावयास चांगला पर्याय

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


‘अगरबत्ती’ ही सर्वसामान्यपणे सर्वच घरांचा अविभाज्य भाग, त्यामुळे अगरबत्तीचा व्यवसाय करणार्‍यांसाठी बाजारपेठ खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. भारतात विविध जातीधर्मांचे लोक राहतात, परंतु जवळपास प्रत्येक धर्मातील लोक अगरबत्ती वापरतात. धार्मिक कार्यात याचा विशेष वापर होतो.

प्रत्येकाची आवड वेगळी. गंध, सुवास, आकार अशा सर्वच पातळ्यांवर विविध प्रकारच्या अगरबत्ती तयार करता येऊ शकतात. अगरबत्तीचा व्यवसाय घरच्या घरी सुरू करता येणारा व्यवसाय आहे. कोणत्याही प्रकारच्या यंत्रसामग्रीची आवश्यकता नाही. त्यामुळे व्यवसायासाठी लागणारा जागेचा प्रश्‍न येथे निर्माण होत नाही.

Advertisement

अगरबत्ती व्यवसायासाठी जुजबी ज्ञानाची आवश्यकता असते, ते म्हणजे अगरबत्ती बनवण्यासाठी आवश्यक साहित्य आणि त्याचे योग्य ते प्रमाण याचे. हा व्यवसाय अत्यंत कमी भांडवलात करता येणारा व्यवसाय आहे.

जर आपण सोबत कामासाठी हाताखाली माणूस ठेवायचा म्हटला तरी त्याला मजुरीही कमी पडते, त्यामुळे कमीत कमी खर्च होऊ शकतो. सुरुवातीला उत्पादन विक्रीसाठी आपल्याला माहितीतल्या, नातेवाईक, शेजारी यांच्यापासून सुरुवात करता येऊ शकते. या व्यवसायात तुमच्या उत्पादनाच्या दर्जानुसार त्याची मौखिक प्रसिद्धी होते आणि आपोआप ग्राहक जोडला जातो.

हळूहळू व्यवसाय वाढवता येतो. भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर १२ ते १५ कोटींच्या आसपास उदबत्त्यांचा व्यवसाय होतो. याव्यतिरिक्त भारतीय अगरबत्ती अनेक देशांत निर्यात केली जाते.

अगरबत्ती बनवण्याच्या (प्रत्यक्ष तयार करण्याच्या) विविध पद्धती आहेत. वेळूच्या काड्यांना सुगंधी बुक्का लावून अगरबत्ती बनवता येते, तर सुगंधित अगरबत्ती बनवण्यासाठी बाजारात कच्चा माल तयारही मिळतो. त्याचा वापर करूनही अगरबत्ती बनवता येते. अगरबत्तीचा मसाला कांडीला व्यवस्थित लावल्यावर ती कांडी सुगंधी द्रव्यात बुडवून वाळवली जाते. अगरबत्ती सावलीतच वाळवावी लागते.

अगरबत्ती ही गुलाब, चंदन, केवडा, मोगरा, वाळा, रोगनाशक, वातावरणशुद्धीसाठी अशा विविध स्वरूपांत बनवल्या जातात. आपल्या ज्या लांबीच्या अगरबत्ती बनवायच्या असतात त्यापेक्षा दीड ते दोन इंच लांब कांडी घ्यावी. अगरबत्तीवर लावण्यात येणार्‍या मसाल्याच्या प्रमाणानुसार अगरबत्तीची संख्या ठरते. एका किलोमध्ये सरासरी १३५० ते १४०० च्या आसपास अगरबत्तीच्या कांड्या बनतात.

कांड्या बनवून झाल्यानंतर त्याचे व्यवस्थित पॅकिंग करणे मात्र गरजेचे असते. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्या उत्पादनाला ‘ब्रॅन्ड नेम’ द्यावे. त्याच्या आकर्षक पॅकेजिंगवर लक्ष द्यावे. हे केले की बाजारात आपला माल स्पर्धेत टिकण्यास मदतच होते. अगरबत्ती व्यवसायात रिपॅकिंग हाही एक प्रकार आहे.

अनेक लोक अगरबत्तीच्या कांड्या विकत घेतात आणि आपल्या ‘ब्रॅड नेम’खाली व्यवस्थित रिपॅकिंग करून विकतात. यालाही चांगला बाजारभाव उपलब्ध आहे. अगरबत्तीत वापरलेल्या सेंटनुसारही त्याला नाव दिले जाते. गृहोद्योग म्हणून आणि जोडव्यवसाय म्हणूनही याचा विचार करावयास चांगला पर्याय आहे.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!