Advertisement
उद्योजकता विकास

सगळेच आहेत स्टार परफॉर्मर्स

‘स्मार्ट उद्योजक’ WhatsApp आवृत्ती शुभारंभ ऑफर
WhatsApp द्वारे संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक वर्षभर मिळवा फक्त रु. ६० मध्ये : http://imojo.in/2eucnd

रोसेन्थल आणि जेकब्सन या दोन मानसशास्त्रज्ञांनी 1968 साली एक प्रयोग केला. हा प्रयोग सॅन-फ्रान्सिस्को येथिल ‘ओक एलिमेंटरी स्कूल’मध्ये करण्यात आला. यामध्ये वर्गातल्या सर्व मुलांची एक चाचणी घेण्यात आली. शिक्षकांना असे सांगण्यात आले कि हावर्ड विद्यापीठाने घेतलेल्या या चाचणीमधून मुलांची बुद्धिमत्ता तपासण्यात येणार आहे. भविष्यात कोण किती उज्ज्वल कामगिरी करेल ते यातून कळेल. या परीक्षेत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पहिल्या 20 टक्के मुलांची नावे फक्त शिक्षकांना सांगण्यात आली. उरलेल्या 80 टक्के मुलांबद्दल कोणतीही माहिती शिक्षकांना देण्यात आली नाही. यात गंमत म्हणजे मुळात शास्त्रज्ञांनी घेतलेली ती चाचणी बनावट होती. त्यात काहीएक तथ्य नव्हते. सर्वोत्तम कामगिरी केलेल्या ज्या 20 टक्के मुलांची नावे शिक्षकांना सांगण्यात आली ती नावे देखील अशीच निवडण्यात आली होती. त्याला कुठलाही आधार नव्हता.

या बनावट चाचणीनंतर आठ महिने गेल्यावर शास्त्रज्ञांनी पुन्हा मुलांची चाचणी घेण्याचे ठरवले. यावेळी मात्र त्यांचे खरेखुरे मूल्यमापन करण्यात आले. यात असे दिसून आले कि ज्या 20 टक्के मुलांची नावे शिक्षकांना ‘उज्वल भवितव्य असलेले विद्यार्थी’ म्हणून सांगण्यात आलेली होती त्यांची कामगिरी खरोखरच इतरांपेक्षा फारच चांगली होती. याची कारणमीमांसा पाहता असे लक्षात आले कि शिक्षकांकडून तथाकथित उज्वल भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांकडे नैसर्गिकरीत्या अधिक लक्ष दिले गेले. या विद्यार्थ्यांची क्षमता मुळातच जास्त आहे असे गृहीत धरून शिक्षकांनी त्यांना अधिक आव्हानात्मक काम दिले आणि ते त्यांच्याकडून करून घेतले. त्याचवेळी इतर विद्यार्थ्यांना मात्र त्यांनी तुलनेने सोपे काम दिले. यामुळे 20 टक्के मुलांची कामगिरी आपोआपच सुधारत गेली आणि उर्वरित 80 टक्के मुलांची कामगिरी तितकीशी चांगली झाली नाही.

कामाच्या ठिकाणी देखील साधारणपणे अशाच प्रकारची विभागणी आपल्याला दिसून येते ज्याला ‘80-20 प्रमेय’ म्हटले जाते. यानुसार 20 टक्के लोक हे जवळपास 80 टक्के काम करतात. या 20 टक्के लोकांना आपण स्टार परफोर्मर्स म्हणतो. टिमचे नेतृत्व करताना आपण उद्योजक वरील प्रयोगातील शिक्षकाच्या भूमिकेत असतो. आपण नकळतपणे उत्तम कामगिरी करणार्या. 20 टक्के लोकांवर अवलंबून राहू लागतो. प्रत्येक महत्वाचे काम त्यांच्याकडे जाऊ लागते व त्याप्रमाणात त्यांची कामगिरीसुद्धा सुधारत जाते. याचवेळी मात्र आपण उर्वरित 80 टक्के टिमकडे काहीसे दुर्लक्ष करतो. वास्तविक पाहता या उर्वरित टीम मेम्बर्समध्येदेखील तेवढीच क्षमता असते जी उत्तम कामगिरी करणार्या्कडे असते. फरक असतो तो त्यांना मिळणार्याे संधी आणि प्रोत्साहन यामध्ये.

Smart Udyojak | e-Magazines | All Issues

या प्रयोगातून धडा घेऊन आपण आपल्या टीमची काम करण्याची क्षमता बर्याेच प्रमाणात वाढवू शकतो. त्यासाठी उद्योजकाने नेतृत्व करताना आपल्या टीममधल्या प्रत्येक सदस्याकडे विचारपूर्वक लक्ष दिले पाहिजे. काही सदस्यांभोवती त्यांच्या मागच्या कामगिरीमुळे किंवा त्यांनी उत्तम संस्थेतून शिक्षण घेतल्यामुळे एक वलय आपोआप निर्माण झालेले असते. त्यांच्याकडून उत्तम कामगिरी जरूर करून घ्यावी, परंतु त्याचबरोबर उरलेल्या प्रत्येक सदस्याकडे सर्वोत्तम काम करण्याची क्षमता आहे हेसुद्धा लक्षात घ्यावे. प्रत्येकाला आव्हानात्मक काम तसेच योग्य प्रोत्साहन दिल्यास ते कर्मचारी अधिक चांगले काम करतात व उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत जाते. हे उद्योगाला अतिशय उपकारक असते. प्रत्येक उद्योग हा तेथे काम करणार्यात लोकांबरोबर मोठा होत जातो.

नेतृत्व करणार्याचे अजून एक प्रमुख काम असते ते म्हणजे आपली जागा घेण्यासाठी नवीन नेतृत्व तयार करणे. जेव्हा आपल्या टीमला एक समर्थ नेतृत्व मिळते तेव्हाच आपण तिथून पुढे जाणे योग्य असते. अन्यथा व्यवसायाचा एकंदरीतच पाया कच्चा राहू शकतो. असे म्हणतात की सर्वोत्तम लीडर्स हे सर्वात अनपेक्षित ठिकाणी सापडतात. एखादा चांगले शैक्षणिक रेकॉर्ड नसलेला विद्यार्थी, वरवर पाहता नकारात्मक वर्तन असलेला एखादा कर्मचारीदेखील योग्य वातावरणनिर्मिती करून प्रोत्साहन दिल्यास उत्तम लीडर बनू शकतो. त्यामुळे नवीन नेतृत्व तयार करताना केवळ काही स्टार परफॉर्मर्सकडे न पाहता प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे असे गृहीत धरून शोध घेतल्यास अनेक उत्तम लीडर्स मिळू शकतात.

यशाची शिडी ही खालून आधार मिळाला तरच चढता येते. वरून आपल्याला कोणीही हात देऊन खेचू शकत नाही. त्यामुळे उद्योजकाने या प्रयोगातील शिक्षकांप्रमाणे कोणत्याही एका समूहाकडे आकर्षित होण्याचे टाळून आपल्या सोबत काम करणार्याो प्रत्येकाची प्रगती होईल याची विशेष काळजी घेतली पाहिजे. आजकाल इंटरनेटवर अनेक कोर्सेस मोफतमध्ये उपलब्ध आहेत. कामाच्या आठवड्याच्या वेळापत्रकात काही वेळ शिकण्यासाठी राखून ठेवावा. कामाचे जसे टार्गेट्स असतात तसे शिकण्याचे टार्गेट ठेऊन प्रत्येकाला शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्याचा उद्योगाला निश्चितपणे फायदा होऊ शकतो.

– प्रतिक कुलकर्णी
8149390145
pratik.kulkarni001@gmail.com
लेखक इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत आहेत.


स्मार्ट उद्योजक व्हॉट्सअ‍ॅप न्युजलेटर

उद्योजकता व व्यवसायविषयक बातम्या व उपयुक्त लेख रोज आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये जतन करा व ‘स्मार्ट उद्योजक न्युजलेटर’ असे टाइप करून आपल्या नाव, जिल्हा व तालुक्यासह या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप करा.


Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: