अमृतमयी स्पर्श उपचार विचारांसह

म्हणजे काय म्हणताय, ते कळले नाही? तर सांगण्याचा मुद्दा असा कि, पर्यायी वैद्यकीय उपचारतज्ज्ञ असूनदेखील साहित्य, गाणे ह्याची आवड असणार्‍या आणि बहुउद्देशीय, बहुआयामी असे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. अमृता देशमुख.

अमृता म्हणजे पाहिलेली स्वप्ने खरी करून दाखवणार्‍या असामान्य स्त्री. प्रज्ञाशील अफाट स्त्री शक्ती अंगी बणणार्‍या धडाडीच्या महिला. शेअर मार्केटमध्येही हातखंडा असलेल्या अभ्यासू व्यक्तिमत्त्व. प्रतिभावान, कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व. अनेक असाध्य, गंभीर आणि दुर्धर आजारांवर सेवाभावी रुग्णसेवेचा ध्यास घेतलेल्या खर्‍या हाडाच्या रुग्णसेविका. अमृताजींचा जन्म हा देहू आणि तळेगावमध्ये असलेल्या इंदोरी गावचा. त्यांना बालपणीपासूनच लेखन, वक्तृत्व, क्रीडा या सर्वांमध्ये विलक्षण रुची होतीच.

इयत्ता दुसरीत त्यांनी टिळकांवर भाषण केले व पुढे जाऊन नाटकात जिजाऊंची भूमिकाही केली आणि ती गाजलीही. तळेगावातील रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत माध्यमिक शिक्षण सुरू असताना वाचनाच्या आवडीपायी विविध निबंध स्पर्धेत आणि वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांना बक्षिसेही मिळत गेली.

इयत्ता सातवीत असताना ‘धाडस करा, यशस्वी व्हा’ हे पुस्तक त्यांनी वाचले. त्याचा सखोल सकारात्मक परिणाम त्यांच्यावर झाला, जो की, पुढे त्यांच्या प्रगतीवर दिसला. त्यानंतर मग महाविद्यालयीन शिक्षण त्यांचे पुण्यात झाले तेव्हाही त्यांचे लेखन काही थांबले नव्हते. पुढे त्यांचा विवाह संपन्न झाला.

लहान वयातच अनेक जबाबदार्‍या अंगावर पडल्या. वाचन, लेखन याकडे दुर्लक्ष होऊ लागले. सोबत व्यावहारिक जगात बरेवाईट अनुभव येऊ लागले. यात त्यांची मानसिक कुचंबणा होऊ लागली; पण त्यांनी त्यांच्या भावनांना आपल्या शब्दांवाटे मार्ग मोकळा करून दिला. त्यांच्या शब्दावाटे त्या व्यक्त होऊ लागल्या. त्यामुळे त्यांचे मागे पडलेले लेखन पुन्हा नव्याने सुरू झाले. त्यात भर घातली ती त्यांच्या मातृत्वाने.

त्यांना सुपुत्र झाला आणि त्याच्या कोमलस्प र्शाने त्यांचे भावविश्वच सारे बदलून गेले. दरम्यानच्या काळात त्यांनी आयुष्यातील वेगवेगळे अनुभव शब्दबद्ध केले. निसर्गकिमया, निसर्गावरील प्रेम त्यांनी आपल्या शब्दांतून व्यक्त केले. त्यांच्या ओघवत्या वाणीने ते सारे त्यांच्या मनातून उमाळून बाहेर आले होते. त्यांचे पती तुषार देशमुख हे कायम त्यांच्या व्यवसायात व्यग्र असल्याने मुलाच्या संगोपनाची जबाबदारी ही सर्वस्वी त्यांच्यावरच होती.

पुढे ‘सतीश निर्मल’ यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. त्यांच्याकडून तुमच्या कविता मला नवप्रेरणा देतात, असे अमृताजींना सांगण्यात आले. त्यांना ते वेगवेगळे विषयदेखील लिहिण्यासाठी देत. त्यामुळे त्यांना लेखनासाठी प्रोत्साहनच मिळत गेले. त्यांचा ‘अमृत मोहिनी’ नावाचा त्यांनी काव्यसंग्रहसुद्धा नुकताच प्रसिद्ध केला आहे

अमृताजींना रुग्णसेवेचीही आवड होतीच. त्यांचे पर्यायी वैद्यकीय उपचार क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. एन. डी. निसर्गोपचार, सुजोक, अ‍ॅक्युप्रेशर, अ‍ॅक्युपंक्चर, हिजमा, कपिंग, मोक्ष, चुंबकीय प्रक्रिया, हीलिंग असे शिक्षण झालंय. अर्धांगवायूच्या रोग्यांसाठी त्यांनी विशेष कामगिरी केली आहे. त्याशिवाय अनेक विविध असाध्य रोगांच्या रोग्यांवर आजवर तीनशेहून अधिक उपचार यशस्वीपणे पार पाडले आहेत. भविष्यात त्यांना अर्धांगवायुचा रोग्यांसाठी इस्पितळ उघडायचे आहे.

त्यांनी मणक्याच्या उपचारांसाठी पंचकर्मदेखील केले आहे. नाडीपरीक्षा करण्यानिमित्त त्यांची डॉक्टर संजय छाजेड याच्याशी ओळख झाली. योगायोगाने त्या डॉक्टरांनाही लेखन आणि वाचनाची आवड होती, तेही साहित्यिक होते. लेखन आणि सूत्रसंचालन कसे करावे याबद्दल त्यांना त्यांच्याकडूनच मार्गदर्शन लाभले. त्याआधी त्यांनी शेअर मार्केटसाठी एन.एस.सी. च्या तब्बल 7 परीक्षा दिल्या आहेत.

आपल्या फावल्या वेळात त्या शेअर मार्केटमध्येदेखील कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या साहित्य आणि कवितेतील दमदार कामगिरीबद्दल, योगदानाबद्दल असंख्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.

नवयुग साहित्य मंडळ निगडी यांच्याकडून प्रथम काव्य पुरस्कार (2015) शिवांजली साहित्य मंडळ नारायणगावतर्फे युवा साहित्यिका पुरस्कार (2016), नक्षत्रांचे देणे काव्यमंचतर्फे कवितेचे द्वितीय पारितोषिक (2017) असे पुरस्कार त्यांना देऊन पुरस्कृत केले गेले आहे, तर वैद्यकीय सेवेच्या योगदानाबद्दल शान ए हिंदुस्तान आणि 2019 सालचा प्रबोधनकार ठाकरे समाजसुधारक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला आहे.

इतकेच नव्हे तर साहित्य कला आणि संस्कृती मंडळ ट्रस्टच्या त्या नवनिर्वाचित सहकार्यवाह आहेत. त्यांची आवड एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर त्यांना गाण्याचीदेखील आवड आहे. श्री. जितेंद्र हिंगे ह्यांच्याकडे त्यांनी गाण्याचे धडे गिरवले आहेत.

त्यांच्या आजवरच्या अशा यशस्वी वाटचालीमागे त्यांचे आईवडील, भाऊ आणि आता पती मुलगा यांचाच मोठा वाट असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. त्यांनी फार वेगळी आणि जनसेवार्थ अशी दृष्टी पहिली आहे, जी की त्यांना सत्यात तशी सृष्टी निर्माण करायची आहे.

त्यांना सर्वोत्तम असे हीलिंग केअर केंद्र रोग्यांच्या अर्धांगवायू, वात, आर्थिटिस आणि व्हर्टिगो अशा विविध असाध्य रोगांवर मात करून विजय मिळवण्यासाठी काढायचे आहे. त्यांचे लक्ष्य आहे की, आपला समाज रोगविकारमुक्त, विकारमुक्त, वेेदनामुक्त होऊन एक निरोगी आणि पोषक असे जीवन जगावा. 2021 सालापर्यंत 100 अर्धांगवायूचे रोगी वेदनामुुक्त असे पूर्णतः बरे करण्याकडे त्यांचा कल झुकलेला आहे. तर अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे गुण खरेच वाखाणण्याजोगे आहेत.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?