दुर्धर आजारावर मात करत फिनिक्स झेप घेणारा आनंद बनसोडे

आनंद एक लाजरा मुलगा. स्वतःचे नाव सांगतानाही त्याला जणू त्याचा सराव करावा लागत असे, अशी परिस्थिती. बोलण्यातही दोष आणि अभ्यासात तर तो जणू भोपळाच होता. नववीपर्यंत हीच त्याची ओळख. नववीत नापास झाल्यानंतर भविष्यातील अंधार डोळ्यासमोर होता.

आईच्या मायेमुळे, प्रेमामुळे शिक्षण पूर्ण करण्याची दुसरी संधी वडिलांनी उपलब्ध करून दिली अन् आयुष्याचा कायापालट झाला. एकेक यशाच्या पायर्‍या मग कधी पायाखाली येऊन जात त्यालाही कळले नाही. दहावी, बारावी, पदवी, पीएचडी असे शिक्षण घेताना डोळ्यात स्वप्नांचा भांडार होता.

जगातील सर्वांत मोठे शिखर एव्हरेस्ट त्याला खुणावत होते. ही उंची गाठायची तर पैशाची शिडी तयार करावी लागणार होती. घरात रोजची पोटे भरावीत इतकीच काय ती लक्ष्मी येत होती. त्यात असा अवाढव्य खर्चाचा डोंगर उभे करणे सोपे नव्हते; पण म्हणतात ना; इच्छा तिथे मार्ग. तसेच झाले.

सर्वस्व पणाला लावून एव्हरेस्ट मोहीम यशस्वी केली अन् कालपर्यंत विनोदाचा विषय झालेला आनंद अनेकांचे प्रेरणास्रोत बनला. जे हिणवत होते, मग तेच गुणगान गाऊ लागले अन् येथूनच एका संघर्षयात्रीचा उंचच उंच भरारीचा प्रवास सुरू झाला.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE

पुढे कधीकाळी नववी नापास झालेल्या तरुणाचा नववीच्या हिंदी पुस्तकातच आता धडा आला. ज्यांना आयुष्यात अपयशाला सामोरे जावे लागते, नापास व्हावे लागते, त्यांच्यासाठी आनंद पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रेरणा ठरतो आहे.

बहुरंगी यश

एखाद्या व्यक्तीने एखादा भीमपराक्रम केला की, आयुष्याचे सार्थक झाले असे समजून आयुष्यभर त्याच पराक्रमाची स्तुतिसुमने तो उधळत बसतो. आनंद याला अपवाद होता. एखादे यश मिळवले की लगेच त्याची ओळख पुसून टाकायची. ज्या फांदीवर विसावू वाटेल त्या फांद्याच तोडा म्हणजे तुम्ही पुनःपुन्हा भरारी घेऊ शकाल, असे आनंद म्हणतो.

एव्हरेस्ट सर केल्याची नशा आनंदच्या डोक्यात जास्त दिवस राहिली नाही. त्याने लगेच पुढच्या मोहिमांची घोषणा केली जी सोलापूरकरांच्या ऐकिवातदेखील नव्हती. ती म्हणजे ‘सेवन समीट’ अर्थात जगातील सात खंडांतील सर्वोच्च सात शिखरांची चढाई करणे. याचा खर्चदेखील सातपट होताच पण खर्चाला घाबरणारा; संकटापुढे झुकणारा तो आनंद कसला.

एकामागोमाग एक चार जगातील सर्वोच्च शिखरांवर त्याने भारताचा तिरंगा फडकावलादेखील. एकीकडे ट्रेकिंगमधील शिखरे पादाक्रांत करताना आनंदने साहित्य क्षेत्रातही पाऊल टाकले. ‘स्वप्नातून सत्याकडे’ या आपल्या जीवनप्रवासाच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. पुढे तेच ‘ध्यास उत्तुंग हिमशिखरांचा’ या नावाने बेस्टसेलर ठरले. आनंदचा प्रेरणादायी प्रवास अनेकांना भावला.

त्याचे विचार वाचायला, ऐकायला लोकांना आवडायला लागले. पुस्तकांची मागणी लक्षात घेऊन त्याने एकापाठोपाठ एक अशी सहा पुस्तके प्रकाशित केली जी आज मोटिव्हेशनल प्रांतात अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत.

एकीकडे पायाचा वापर करत शिखरे सर करणारा आनंद हाताच्या लेखणीने अनेकांना ऊर्जा देऊ लागला. गळ्यातील वक्तृत्व कलेने नसानसांत आत्मविश्वास जागृत करू लागला. शाळा, महाविद्यालय, गाव, शहर येथील विचारपीठांवरून आनंद तरुणांमध्ये आत्मविश्वासाचा झंझावात निर्माण करू लागला.

अत्यंत मानाचा ट्रेड टॉक असो की अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात विचार मांडणे असो, अशा जागतिक कीर्तीच्या मंचाला आनंदची दखल घ्यावी लागली. तेथील मंचावरून आनंदने जिद्दीची, संघर्षाची कहाणी जगाला ऐकवली. हे सारेच एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल असेच होते.

संकटासही सांगितले ठणकावून

सामान्य लोकांच्या जीवनात एखादे संकट आले की, माणूस पूर्ण कोसळून जातो. नियतीला शिव्याशाप देण्यात वेळ घालवतो; पण आनंद सामान्य कालही नव्हता, आजही नाही. लहानपणी छोट्याशा घरात राहत असतानादेखील २० लाख रुपये खर्चाच्या मोहिमेचे स्वप्न पाहू शकत होता.

२० लाखांवर किती शून्य याची कल्पना नसताना हे स्वप्न सत्यात उतरवून स्वप्नांपुढे संकटांची काहीच किंमत नसते हेच त्याने दाखवून दिले. आनंद आणि संकटे हा जणू सापमुंगुसाचा खेळ होता. संकट कितीही जिवावर आले तरी त्यातून मार्ग काढून बाहेर पडण्याची कला आनंदला गवसली आहे.

२०१५ मध्ये अमेरिकेतील अलास्का येथे मोहिमेवर असताना वडिलांच्या निधनाची वार्ता कानावर पडणे, मोहीम अर्धवट सोडून घरी परतणे, कौटुंबिक आधार कोसळल्याने चिंताक्रांत होणे, असे प्रसंग आनंदच्याही जीवनात आले; पण संकटांच्या पुढे एक पाऊल कसे टाकायचे याची आनंदला जणू सवयच झाली होती.

त्यामुळेच वडिलांच्या निधनाचे दुःख तो पचवू शकला. त्यातून सावरतो न सावरतो इतक्यात नव्या संघर्षाने आव्हान दिले. तो म्हणजे पाठीच्या मणक्याचा आजार. हा आजार तर वैयक्तिक आनंदला आव्हान तर देणारा होताच शिवाय त्याच्या स्वप्नांची राखरांगोळी करणारा अवाढव्य होता.

जगातील उंचच उंच शिखरे सर करणारा अवलिया आता अंथरुणात खिळून पडला होता. डॉक्टर म्हणाले, हा आता अधू-अपंग झाल्यासारखा आहे. तो गाडी चालवू शकणार नाही. ट्रेकींग करू शकणार नाही. तो अवलंबिताचे जीवन जगेल. हे शब्द एखाद्या व्यक्तीला, त्याच्या आयुष्याला उद्ध्वस्त करू शकतात.

कित्येक महिने तो अंथरुणावर खिळून होता; पण आनंदच्या महत्त्वाकांक्षा या पराकोटीच्या होत्या. तो थोडे थांबला. त्याने पाहिले. अन् एखाद्या फिनिक्स पक्ष्याला लाजवेल अशी झेप घेत पुन्हा उभारला. डॉक्टर, नातेवाईक सारेच अवाक् चालू न शकणारा आनंद पुन्हा ट्रेकिंगच्या मैदानात सिक्स अन् फोर मारू लागला.

छोटी छोटी पावले टाकत चालण्यापासून सुरुवात करत २०१८ मध्ये पुन्हा एव्हरेस्ट बेसकॅम्प व सह्याद्रीमधील अनेक मोहिमा त्याने केल्या आहेत. आता राहिलेल्या जागतिक मोहिमा करण्यासाठी तयारी आनंद करतो आहे.

उद्योजक ते लाइफ आणि बिझनेस कोच

आनंदाचा प्रवास एका झोपडीतून सुरू झाला आहे पण आता ३६० एक्सप्लोरर ही जागतिक दर्जाची टूर कंपनी व ‘द लिमिटलेस यु’ ही जगभरातील अनेकांना आयुष्यात यशस्वी बनण्यासाठी ट्रेनिंग देणारी कंपनी आनंदने सुरू केली आहे.

खूप कमी कालावधीत आनंद एक तरुण उद्योजक म्हणून सर्वांच्या समोर येतो आहे. ३६० एक्सप्लोररचे ऑफिस फक्त सोलापूर, पुणे, मुंबई येथेच नसून ऑस्ट्रेलिया येथील सिडनी येथेही नुकतेच सुरू करण्यात आले आहे.

सध्या अनेक मोठ्या व्यावसायिकांना आनंद प्रशिक्षण देतो आहे. त्याचे स्टुडंट हे त्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च उंचीवर विराजमान असून हीच आनंदची खरी मिळकत आहे. आनंद वेगवेगळ्या उद्योजकांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी विशेष अशा ट्रेनिंग देत असतो. महाराष्ट्रातील अनेक उद्योजक आनंद बनसोडे यांच्याकडून अगदी १ दिवसापासून ते १ वर्षापर्यंत पर्सनल ट्रेनिंग घेत असतात.

Author

  • यांनी पदव्युत्तर पत्रकारितेत पदविका केली आहे. प्रिंट माध्यमांत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी स्मार्ट उद्योजक हे मासिक सुरू केले.

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?