बायोमास ब्रिकेट्स ही आज आघाडीची व्यवसायसंधी आहे. बायोमास ब्रिकेट म्हणजे काय तर शेतीतल्या कचर्यापासून कोळसा बनवला जातो, जो पर्यावरण पूरक असतो. फूड, फार्मा, ब्रेव्हरेजस या क्षेत्रात बॉयलरच्या माध्यमातून स्टीम उत्पादित करून फूड प्रोसेस केले जाते तिथे हे जैविक इंधन म्हणून वापरले जाते.
अहमदनगरचे अनंता झिरपे यांचा बायोमास ब्रिकेट्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय आहे. ‘व्हर्च्युअल व्हाइट फ्लेम प्रायव्हेट लिमिटेड’ ही अनंता झिरपे यांची कंपनी. आज ३० कोटींची उलाढाल असणार्या या व्यवसायाची सुरुवात २०११ साली अनंता यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील दिवटे या गावी पहिली बायोमास ब्रिकेटची फॅक्टरी सुरू केली.
अनंता यांची कौटुंबिक पार्श्वभूमी व्यवसायाची नाही. त्यांचे वडील शिक्षक. शिक्षणात सर्वसाधारण असलेल्या अनंताला पहिला धक्का लागला तो दहावीत. केवळ एका विषयात एक गुण कमी मिळाल्याने ‘दहावी नापास’ हा शिक्का लागला. हा धक्का तसा मोठा होता, कारण समाजात एका शिक्षकाचा मुलगा नापास होतो ही गोष्ट पटणारी नव्हती.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)त्याचे मानसिक ओझे अनंतावर आले. खरं तर आपण नापास होऊ असे त्यांना कधीच वाटले नव्हते, पण अनंता हा एका शिक्षकाचा मुलगा असल्यानेच शालेय परीक्षेत नापास झाला म्हणून थांबणार्यातला नव्हता.
यानंतर अनंता पुण्याला एका नातेवाईकाकडे गेले. इथे त्यांनी सायकलवर भाजी विकायला सुरुवात केली, पण कुटुंबाला ते पटले नाही. ते पुन्हा त्यांना गावी घेऊन गेले. पण अनंता शांत बसले नाहीत. एक वर्ष स्वत:ची ऊसशेती केली. दरम्यान कापूस खरेदी-विक्री करणार्या एका व्यावसायिकाकडे एका हंगामात काम केले.
शेतकर्यांकडून कापूस घेऊन तो खरेदीदारापर्यंत पोहचवण्यापर्यंत हर तर्हेचे काम केले. अनेक प्रयोग करत हा प्रवास चालू होता. वयाच्या अठराव्या वर्षी मनात व्यवसायाची पाळंमुळं रोवली गेली. अशातच एकदा बायोमास ब्रिकेट्स मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्रीशी त्यांचा संपर्क आला.
अनंता सांगतात, एका नातेवाईकांचा एक ट्रक मी चालवायला घेतला. त्यावर एक ड्रायव्हर ठेऊन वेगवेगळ्या ठिकाणी सामान ने-आण करण्याची कामे घेवू लागलो. कधी ट्रक रेंटने देणे, कधी ट्रान्सपोर्टला देणे असे चालू होते. एकदा असेच ब्रीकेट मॅन्युफॅक्चरींग करणार्या व्यावसायिकाकडे माल पोहचवायला गेलो.
आपल्या भागात या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल आहे हे माझ्या लक्षात आले त्यातून मला हा व्यवसाय जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. या ठिकाणी मला फॅक्टरी दाखवायला नकार मिळाला, पण फलटणला एक फॅक्टरी मला बघायला मिळाली आणि ते काम पाहिल्यावर आपणही हा व्यवसाय करावा, असे मनाशी पक्के झाले.
तो काळ होता २००१-०२ चा, परंतु त्या वेळी आवश्यक ते भांडवल नव्हते. त्यामुळे ही संकल्पना मनातच राहिली. यादरम्यान अनेक व्यवसाय केले. गावी यात्रांमध्ये खेळणी विकली, किराणा सामान दुकान, लोकांना तीर्थक्षेत्र दर्शन असे छोटे-मोठे अनेक व्यवसाय करत होतो. बलराम पायघन या माझ्या मित्राचा पेट्रोल पंप काही कारणास्तव बंद होता. मग मी पेट्रोल पंप चालवायला घेतला.
या दरम्यान सचिन जावळे आणि बलराम पायघन हे माझे मित्रही होते. आम्ही तिघे नेहमी आपण तिघांनी सोबत एक व्यवसाय सुरू करावा यासाठी सतत चर्चा करायचो. नवनव्या संकल्पनांवर काम करू लागलो. त्यातूनच मग बायोमास ब्रिकेट याच क्षेत्रात उतरू असा विचार पक्का झाला आणि दहा वर्षानंतर त्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याची संधी समोर आली. त्या दृष्टीने त्यांनी काम सुरू केले.
जिल्हा उद्योग केंद्रातून माहिती घेऊन तिघांनी भांडवल गुंतवणूक केली आणि उद्योगाचा आरंभ केला. व्यवसाय सुरू झाला पण आव्हाने, समस्या अनेक होत्या. प्रॉडक्शन, त्याची क्वालिटी, विक्री अशा अनेक गोष्टींवर सतत प्रयत्नपूर्वक बेस्ट देण्यावर आम्ही काम करू लागलो. सुरुवातीला आम्ही उत्पादक म्हणून काम करत होतो.
माल बनवत होतो, पण आमचा एकच प्लांट होता त्यामुळे थेट मोठ्या कंपनीपर्यंत पोहचता येत नव्हते. सुरुवातीला आम्ही खूप अडचणींचा सामना केला. यातूनच मग मार्ग निघत गेला. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात मोठमोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागले.
या व्यवसायात उतरण्यापूर्वी अर्थार्जन म्हणून पेट्रोल पंप व्यवसायातून जीवन चरितार्थ चालू होता. एक वेळ तर अशी आली की अचानक पेट्रोल पंपचा व्यवसाय आणि भावाचे मेडिकल दोन्हीकडचे उत्पन्न काही कारणास्तव घटले. बायोमास ब्रिकेटचा व्यवसाय नुकताच सुरू झाला होता. ते पार्टनरशिप फर्म होते.
यातून अजून उत्पन्न सुरू झाले नव्हते. त्यामुळे घर चालवणे कठीण झाले होते, पण या कठीण काळात कुटुंब खंबीर राहिले. थोडे प्लॅन काही वर्षांसाठी पुढे ढकलावे लागले. सचिन जावळे, सोमनाथ नाचन यांनी खूप साथ दिली. या आर्थिक संकटातून बाहेर यायला माझे भागीदार मित्र बलराम आणि त्यांच्या भावाने मदत केली म्हणूनच मी पुन्हा माझा पेट्रोल पंप व्यवसाय आणि भावाचे मेडिकल पूर्वपदावर आणू शकलो.
आर्थिक बाजू कोलमडायला लागली, पण आम्ही त्यातूनही मार्ग काढला व मॅन्युफॅक्चरिंगसोबत ट्रेडिंग सुरू केले व स्वत: मल्टिनॅशनल कंपन्यांसोबत डील करू लागलो. मग आम्ही डायरेक्ट टाटा, पार्ले, थरमॅक्स, पेप्सी, सनफार्मा, सिप्ला, रिलायन्स अशा कंपन्यांशी डील करू लागलो. आता आम्ही तिथे डायरेक्ट वेंडर आहोत.
जिथे कच्चा माल मिळतो. त्यावर काम करण्यासाठी माणूस तयार असेल त्यांनाच आम्ही त्याच्या शेतात फॅक्टरी टाकून देतो. त्याला संपूर्ण ट्रेनिंग देऊन त्याच्यासोबत व्यवसाय करतो. असे आठ ते दहा उद्योजक आम्ही आतापर्यंत तयार केले आहेत. यामुळे त्यांनाही चांगले अर्थार्जन होते. आज तेही करोडोंची उलाढाल करत आहेत. अहमदनगर, औरंगाबाद, जालना, शिक्रापूर, बीड, पुणे अशा ठिकाणी आपल्या फॅक्टर्या आहेत.
भविष्यात सिंगल प्लांट असलेल्या बायोमास ब्रिकेट्स म्यॅन्युफॅक्चरला डायरेक्ट मोठ्या कंपन्यांशी जोडता यावे यासाठी काम करण्याचा मानस आहे. अशा छोट्या प्लांट असणार्या उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होते ते बदलले पाहिजे असे अनंता यांना वाटते.

आज अनंता स्वत: अनेक व्यवसाय प्रशिक्षण घेतात आणि आपल्या कर्मचार्यांनाही देतात जेणेकरून आपल्या कामात जास्तीत जास्त चांगले रिझल्ट देता येतील. आज त्यांच्यासोबत वीस लोकांची टीम काम करतेय. हे क्षेत्र खूप मोठ्या संधीनी भरलेले आहे तेवढेच हे चॅलेंजिंग आहे.
येत्या काळात अनेक प्लांट उभे राहतील त्यावेळी त्यांना कशी मदत करता येईल यासाठी यंत्रणा उभारण्याचा अनंता यांचा प्रयत्न आहे. याचे पहिले पाऊल त्यांनी सात वर्षांपूर्वी उचलले आहे. यासाठी त्यांनी ‘असोसिएशन ऑफ ब्रिकेट मॅन्युफॅक्चरर्स’ची स्थापना केली आहे.
या क्षेत्रात आव्हानं मोठी आहेत, कारण हे काम पूर्णत: ग्रामीण क्षेत्रात येते. जिथे यांत्रिक आणि तांत्रिक मदत कमी मिळते. मागील तेरा वर्षांच्या अनुभवावरून नक्कीच आपण भविष्यात या क्षेत्रात येऊ पाहणार्यांना मदतीचा हात देऊ असे अनंता म्हणतात. निस्वार्थ बुद्धीने जो काम करतो त्याला परमेश्वर कृपाप्रसाद देतोच, हा अनंता यांचा विश्वास आहे. माणसे जोडणे हा त्यांचा छंद आहे. अनंताच्या अंगी माणसे जोडण्याची उत्तम कला आहे.
येत्या पाच वर्षात भारतभर पंधराशे फॅक्टरीजचे जाळे उभारून भारतात नंबर वन ब्रिकेट मनुफॅक्चरर व्हायचे स्वप्न अनंता यांचे आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनत याच्या जोरावर अनंता आपले भविष्यातील हे स्वप्न नक्कीच पूर्ण करतील.
संपर्क : अनंता झिरपे – 94233 90308
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.