सुगंधित जोडपे चालवत असलेले ‘अनाऊली एन्टरप्रायजेस’


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


मुंबईत लाखो महिला नोकरी करतात. सकाळी घरातले सगळे काम आटोपून ऑफिसचे मस्टर वेळेवर गाठण्यासाठी त्यांची तारेवरची कसरत चालू असते. खरे तर त्यांच्यातल्या अनेक जणींमध्ये विविध प्रकारचे कलागुण, कौशल्ये असतात. त्या कौशल्यांना व्यावसायिकदृष्ट्या विकसित केले तर त्यातील कित्येक जणींना नोकरीची धावपळ करायची गरजही उरणार नाही; पण माणूस स्वत:ला नेमके ओळखत नाही.

आपल्यातले वेगळेपण, वैशिष्ट्य आपण ओळखले तर आपल्या आयुष्याचा सगळा चेहरामोहराच बदलून जातो. पूर्वी न पाहिलेली क्षितिजे आपल्याला खुणवू लागतात. आपल्यातल्याच सुप्‍त क्षमतांचा आपल्याला शोध लागतो व आपण एक नवी उंची गाठू शकतो. वसईच्या अनघा गिरीश मदन यांच्याबाबतीत नेमके हेच घडलेले आहे. अनघा मदन या मुंबईतील एशियन पेंट्स या प्रसिद्ध कंपनीत व्यवस्थित नोकरी करीत होत्या. त्या शिक्षणाने बी.ए. आहेत.

लहानपणापासून त्यांना निरनिराळ्या कलात्मक गोष्टी बनवण्याची उपजतच आवड आहे. त्यांच्याकडे उपजतच एक सौंदर्यदृष्टी आहे. त्यांनी एशियन पेंट्समध्ये 10 वर्षे व इतर छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये अशी एकूण 17 वर्षे नोकरी केली आहे. 2014 साली एकदा अनघा मदन यांनी हौस म्हणून चॉकलेटचे मोदक आणि डिझायनर चॉकलेट्स बनवले आणि त्याचे फोटो सहज मैत्रिणींबरोबर व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर केले.

त्यांच्या चॉकलेट मोदकांचे नुसते फोटो बघून अनेकांनी त्यांना विचारले की, तुम्ही इतके चांगले मोदक आणि डिझायनर चॉकलेट्स बनवता मग त्यांचा व्यवसाय का करीत नाही? तसेच अनेकांनी त्यांच्याकडे या मोदकांसाठी ऑर्डर नोंदवली. त्या वेळेपर्यंत अनघा मदन यांच्या मनात व्यवसाय करावा, हा विचारही आला नव्हता; पण या मोदकांना आलेली मागणी बघून त्यांनी आपल्या छंदाला व्यवसायाचे स्वरूप देण्याचे ठरवले.

त्यानंतर त्या व त्यांचे पती गिरीश मदन यांनी निरनिराळी घरगुती उपयोगाची उत्पादने बनवायला सुरुवात केली. त्यांच्या मालाचा दर्जा अतिशय चांगला, उच्च प्रतीचा असल्याने त्यांना मागणीची कधी चिंताच करावी लागली नाही. पुढे त्या एकामागून एक उत्पादने वाढवीत गेल्या व केवळ मौखिक प्रसिद्धीने त्यांचा व्यवसाय वाढत गेला. इतका वाढला की, एशियन पेंट्समधील नोकरी सोडून त्यांनी व्यवसायालाच वाहून घेतले.

आज त्या ‘अनाऊली एन्टरप्रायजेस’ या नावाने व्यवसाय चालवतात. त्याच्याअंतर्गत त्या 50 प्रकारच्या कंझ्युमर प्रॉडक्ट्स व हाऊसकीपिंग स्वरूपाच्या गोष्टींचे उत्पादन करतात. त्यात निरनिराळ्या सुवासाच्या अगरबत्ती, पंचगव्यापासून बनवलेले सांबराणी धूप, परफ्युम्स्, सुवासिक, फ्लोटिंग आणि जेली मेणबत्ती, हळद-दालचिनी-पपई-काकडी इत्यादी नैसर्गिक गोष्टींचा वापर करून बनवलेले होममेड साबण, कडुलिंबाचा वापर करून बनवलेले फिनाईल तसेच भांडी घासण्याचे लिक्‍विड साबण, लिक्‍विड हॅण्डवॉश तसेच तांब्या-पितळेची भांडी चमकवण्यासाठी विशेष लिक्‍विड सोप यांचा समावेश आहे.

ही सर्व उत्पादने त्या नैसर्गिक वस्तूंपासून बनवतात. त्यामुळे त्यांची सर्व प्रॉडक्ट्स ऑर्गनिक स्वरूपाची आहेत. त्यामुळे वापरणार्‍याच्या हातांवर काही वाईट परिणाम होत नाही. त्यांची सर्व प्रॉडक्ट्स प्लांटबेस्ड फॉर्म्युला म्हणजे केमिकलविरहित पद्धतीने बनवलेली असतात. नुसत्या अगरबत्तींच्या बाबतीत त्यांच्याकडे 30 प्रकारच्या सुवासिक अगरबत्त्या आहेत.

त्यात टेन-इन-वन नावाच्या एकाच पाव किलोच्या पाकिटात 10 निरनिराळ्या सुवासाच्या अगरबत्ती देणे, ही त्यांची खासियत आहे. त्यामुळे ग्राहक एकाच पाकिटातून दहा वेगळे सुगंध अनुभवू शकतो. दुसर्‍या फाइव्ह-इन-वन प्रकारच्या पाकिटात त्या पाच सुगंधाच्या अगरबत्ती देतात. यांच्याकडची उत्पादने सतत वाढतच आहेत. कारण त्या निरंतर नवनवे प्रयोग करून विविध प्रकारची नवी प्रॉडक्ट्स निर्माण करीत असतात.

त्यांची सर्व उत्पादने ही ऑर्गनिक, हाताने बनवलेली व होममेड स्वरूपाची आहेत. त्यामुळे त्यांचे संतुष्ट ग्राहक त्यांच्या उत्पादनांची इतरांना कौतुकाने माहिती सांगतात व त्यातून कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता त्यांचा व्यवसाय वाढत गेलेला आहे. वसई येथील त्यांच्या घरातूनच त्या अनाऊली एन्टरप्रायजेसच्या नावाने हा सर्व व्यवसाय सांभाळतात.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


त्यांचे पती गिरीश मदन हे एमबीए व एका वेअर हाऊसिंग कंपनीत मॅनेजर आहेत. ते या सर्व व्यवसायाच्या संचालनात मोलाची मदत करतात. अनघा मदन आपल्या घरातील अर्धी जागा या वस्तूंच्या उत्पादनासाठी वापरतात. त्यांच्याकडे 12 गरजू महिला कामगार आहेत. त्या गरजू महिलांना त्यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार पुरवला आहे.

अनघा मदन म्हणतात की, महिलांनी पारंपरिकरीत्या फक्‍त नोकरीच्या मागे न लागता आपल्यातले सुप्‍त कलागुण ओळखावेत. त्यांचा व्यावसायिक उपयोग करावा. महिलांमध्ये खूप सुप्‍त क्षमता असते. ती ओळखली-जागवली तर घर सांभाळूनही महिलांना बरेच काही करता येईल.

प्रख्यात व्यंगचित्रकार विकास सबनीस यांनी ‘अनाऊली एन्टरप्रायजेस’ची उत्पादने एका प्रदर्शनात पाहिली. तेव्हा अनघा यांचे पती गिरीश मदनही सोबत होते. व्यंगचित्रकार सबनीस यांनी या जोडप्याला ‘सुगंधित जोडपे’ असे संबोधले व नंतर त्यांची उत्पादने वापरून त्यांना स्वहस्ताक्षरात एक प्रशस्तिपत्रही लिहून दिले आहे. तसेच प्रख्यात गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी यांनीही त्यांच्या उत्पादनांचे कौतुक केले आहे.

अनघा मदन यांच्या ‘अनाऊली एन्टरप्रायजेस’ची उत्पादने सर्व मुंबईभर जातात. जवळच्या ठिकाणी त्या हॅण्ड डिलिव्हरीने, तर दूरच्या ठिकाणी कुरिअरने उत्पादने पाठवली जातात.

भविष्यात त्यांना आपली उत्पादने निर्यात करायची आहेत व राज्यभरात जागोजागी डिस्ट्रिब्युटर्स नेमायचे आहेत. त्यासाठी ठिकठिकाणच्या उत्साही गृहिणींनी-व्यावसायिकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्या करतात. ज्यांना घरातून या उत्पादनांची विक्री करायची असेल त्यांना माल पुरवला जाईल.

संपर्क : अनघा गिरीश मदन
8806928045, 9823210074


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?