आपल्या दुसर्‍या इनिंगमध्ये समाजात आनंद वाटणारे अनिल काळे

एकदा निवृत्त झालो, का पेन्शनवर दिवस काढायचे आणि मृत्यूची वाट पाहायची असे करणारे आपण बरेच पाहिले असतील. मात्र निवृत्तीनंतर दुसरी इनिंग सुरू करणारे आणि पहिल्या इनिंगपेक्षा चांगली कामगिरी दुसर्‍या इनिंगमध्ये करून दाखवणारे असे तुरळकच. अनिल काळे हे अशा दुर्मीळ असामींपैकी एक. वयाच्या अडुसष्टाव्या वर्षीही देशात सामाजिक पर्यटन रुजवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

अनिल काळे २००६ साली ‘इंडियन एअरलाइन्स’मधून निवृत्त झाले. २००८ मध्ये बाबा आमटेंच्या आनंदवनात एक पर्यटक म्हणून त्यांनी भेट दिली. या भेटीने निवृत्तीनंतरचे त्यांचे आयुष्यच बदलून टाकले. वर ज्या दुसर्‍या इनिंगचा उल्लेख केला, त्या इनिंगची सुरुवात ही या भेटीमुळेच झाली.

आमटे कुटुंबीयांनी समाजाबद्दलची तळमळ आणि सीताकांत प्रभूंसारखे आयुष्यभर प्रकल्पाला जोडले गेलेले सेवाव्रती यांचे काम पाहून अनिल काळेंना आपल्यातील खुजेपणाची जाणीव झाली. जो प्रत्येकामध्ये असतो तो वृथा अहंकार हा गळून पडला आणि आपल्याला इथे यायला खूप उशीर झाला या गोष्टीचे मात्र त्यांना दु:ख आहे. अनिल काळेंना हा आनंदवन पाहून एका गोष्टीची जाणीव झाली की, लोकांनी हा प्रकल्प पाहिला पाहिजे.

जर लोकांनी हा प्रकल्प पाहायला हवा असेल, तर त्यांना तो कोण दाखवणार? आपल्यालाच इथे यायला साठ वर्षे उशीर झाला आहे. काळेंनी विकास आमटेंसमोर आपलं मनोदय व्यक्त केलं की, हा प्रकल्प अधिकाधिक लोकांनी पाहावा, असं आपल्याला वाटतं. विकास आमटेंनी सकारात्मक प्रतिसाद देताच त्यांना एक हजार लोकांना हा प्रकल्प दाखवण्यासाठी घेऊन येईन, असा शब्द दिला.

मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर कॉम्पोमीटर या त्या काळातील गणनेसाठी वापरल्या जाणार्‍या यंत्राचे अनिल काळेंनी प्रशिक्षण घेतलेले असल्यामुळे त्यांना ‘इंडियन एअरलाइन्स’मध्ये नोकरी लागली. अनिल काळेंचे बालपण हे गिरगावातले. त्यांनी शिवसेनेच्या सुरुवातीच्या दिवसांत शिवसेना कार्यकर्ता म्हणूनही काम केलं आहे.

संपूर्ण आयुष्यभर नोकरी करणार्‍या अनिल काळेंचे कधीच उद्योजक होण्याचे स्वप्न नव्हते; पण आनंदवनातून घरी परतल्यावर त्यांनी विचार केला की, आपण लोकांना आनंदवनला घेऊन जाणं सुरू करायचं आणि तेही व्यावसायिक पातळीवरच. यातून जन्म झाला अनिल काळे यांच्या ‘अमृतयात्रा’चा. बाबांचा प्रकल्प हा काळेंच्या उद्योजक होण्याचे निमित्त झाला.

‘अमृतयात्रा’ ही सामाजिक पर्यटन या संकल्पनेवरच काम करील हे अनिल काळेंनी सुरुवातीलाच ठरवले. जानेवारी २०००९ मध्ये ‘अमृतयात्रा’ची पहिली चौदा पर्यटकांसोबत टूर गेली ती आनंदवन आणि हेमलकसालाच. अशा प्रकारच्या सामाजिक प्रकल्पांना भेटी देण्यासाठी पर्यटकांचा प्रतिसाद हा कमीच असायचा. निव्वळ तीन आणि सात पर्यटकांच्याही टूर त्यांनी तेथे नेल्या आहेत.

याचे कारण अनिल काळे यांनी ‘अमृतयात्रा’ची पायाभरणी ही जरी व्यावसायिक तत्त्वावर केली असली तरी त्यांचा उद्देश हा लोकांना अशा सामाजिक कामांशी जोडणं हाच होता. त्यामुळेच विकास आमटेंना दिलेला शब्द सार्थ ठरवत अनिल काळेंच्या ‘अमृतयात्रा’ने आतापर्यंत दोन हजारहून अधिक पर्यटकांना आनंदवनाची वारी घडवून आणली आहे.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


सामाजिक पर्यटन म्हणून लोकांना निव्वळ आनंदवन आणि हेमलकसापर्यंतच मर्यादित न ठेवता, जिथे जिथे सामाजिक काम आहे आणि जिथे लोकांना नेता येऊ शकते, ती ठिकाणं आपल्या कार्यक्षेत्रात जोडण्याचा ‘अमृतयात्रा’चा प्रयत्न असतो.

त्यातून अण्णा हजारेंचे राळेगणसिद्धी, पोपटराव पवारांचे हिवरेबाजार, ‘मेळघाटदर्शन’ यात डॉ. रवी आणि स्मिता कोल्हे यांचा प्रकल्प, सुनील देशपांडे यांचे ‘संपूर्ण बांबू केंद्र’, ‘स्नेहालय’, ‘सेवालय’, ‘विज्ञानग्राम’, भटक्या-विमुक्तांचे प्रथमवसन करणारा अनसरवाड्याचा प्रकल्प, ‘लोकसाधना ट्रस्ट’, ‘स्नेहज्योती अंधशाळा’, जळगावचे ‘गांधीतीर्थ’, नानाजी देशमुखांचे ‘चित्रकुट’ अशा विविध प्रकल्पांना भेटी या आता ‘अमृतयात्रा’च्या कॅलेंडरवर आल्या आहेत. मुख्य म्हणजे हे प्रकल्प ठरवताना कोणत्याही वैचारिक चष्म्यातून पाहिलं जात नाही.

म्हणजे सावरकरांनी म्हटले आहे ना की, ‘जे जे उत्तम, उदात्त, उन्नत; महन्मधुर ते ते’ हे माधुर्य प्रत्येक पर्यटकाला देण्याचा प्रयत्न अनिल काळेंच्या ‘अमृतयात्रे’चा आहे. मुळात ‘अमृतयात्रे’चे पर्यटक हे निव्वळ पर्यटनासाठी या प्रकल्पांना भेटी द्यायला जात नाहीत, तर त्यांच्यामध्ये एक सामाजिक जाणीव असते.

टीम अमृतयात्रा

पुढे काहीच वर्षांत आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांचा मुलगा नवीन हाही त्यांच्यासोबत या व्यवसायात आला. आज संपूर्ण काळे कुटुंब मिळून ‘अमृतयात्रा’च्या माध्यमातून हजारो कुटुंबांना अमृताची अनुभूती देत आहेत.

प्रकाश आमटे यांच्यावर चित्रपट निघाला, त्यामुळे त्यांचे काम लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकले. मात्र प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यावर असा चित्रपट निघू शकत नाही, त्यामुळे अनिल काळे हे ‘स्वयं’ नावाचा मुंबईमध्ये एक उपक्रम भरवतात, ज्यात अशी सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी आपल्या कामाबद्दल येऊन मांडणी करतात.

सामाजिक पर्यटन या क्षेत्राबद्दल अनिल काळेंचे मत आहे की, यामध्ये अनेकांनी यावे. यात येणार्‍या नवोदितांना मार्गदर्शन करण्याचाही त्यांचा मानस आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक पर्यटन रुजावं हे अनिल काळे यांचे ध्येय आहे.

हे रुजायला वेळ लागेल याची त्यांना जाणीव आहे, पण त्यासाठी ते आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब ‘अमृतयात्रा’च्या माध्यमातून हे काम करण्यासाठी प्रयत्नरत आहे. सामाजिक पर्यटनासाठी ‘अमृतयात्रा’ला महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाची मान्यता आहे.

आज वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी कार्यरत असलेल्या या उद्योजकाला गेल्याच वर्षी हृदयविकाराचा एक झटका येऊन गेला आहे. तरीही कुठेही न डगमगता त्यांची ही दुसरी इनिंग यशस्वीरीत्या सुरू आहे. संकटं आलेली पाहून हताश होणार्‍या प्रत्येक नवोदित उद्योजकासाठी अनिल काळे हे मूर्तिमंत आदर्श आहेत.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?