३ हजार रुपयांची नोकरी ते करोडोंच्या कंपनीचे मालक


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


बरेचसे तरुण मनात खूप मोठी स्वप्ने बाळगून जगत असतात. त्यांच्या उरातली स्वप्ने आणि वास्तव यांच्यात खूप मोठे अंतर असते. ते व्यावसायिक पातळीवरही पुष्कळ धडपड करतात; पण त्यांना अपेक्षित यश लाभत नाही, कारण त्यांच्या स्वप्नांना वास्तवाचा आधार नसतो. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, आपल्याला काय बनायचे आहे याचाच ते जास्त विचार करतात.

वास्तविक ज्यांना आयुष्यात यश मिळवायचे आहे त्यांनी आपल्याला काय बनायचे आहे यापेक्षा समाजाला काय पाहिजे आहे, बाजारपेठेत कोणत्या वस्तूंना-सेवांना मागणी आहे याचा जास्त विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपल्या स्वप्नांमध्ये, आपल्या विचारसरणीत, व्यक्‍तिमत्त्वात बदल घडवले पाहिजेत. तसे झाले तर यश नक्‍कीच तुमचेच असते.

हे विचार आहेत पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती ट्रान्स व्होल्ट इंजिनीअरिंग प्रा. लि.चे संचालक अनिरुद्ध चव्हाण यांचे. एके काळी खुद्द अनिरुद्ध चव्हाण हेही त्यांच्या करीअरमध्ये, आयुष्यात चाचपडत होते. त्यांची काही वेगळी स्वप्ने, आकांक्षा होत्या; पण त्यांनी स्वत: काम करत असलेल्या कंपनीच्या उत्पादनाचे सूक्ष्म निरीक्षण केले, त्यातील लूपहोल्स अभ्यासले.

कोणत्या उत्पादनाला बाजारात जास्त मागणी आहे, हे ओळखले आणि त्याचेच उत्पादन सुरू केले. म्हणूनच आज ते एक यशस्वी उद्योजक बनले आहेत.

अनिरुद्ध एकनाथराव चव्हाण यांचा जन्म १७ मार्च १९८१ रोजी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे झाला. त्यांचे वडील एकनाथराव हे परळीच्या थर्मल पॉवर स्टेशनमध्ये नोकरी करीत. त्यांच्या पाच अपत्यांपैकी अनिरुद्ध हे चौथे. वडील एकनाथराव यांचा स्वत:चा ओढा नोकरीपेक्षा व्यवसायाकडे होता.

त्यांनी आयुष्यात काही व्यवसाय केले होते; पण कौटुंबिक जबाबदार्‍यांमुळे त्यांना ते सोडून द्यावे लागले. त्यांच्यातली ही व्यावसायिक वृत्ती अनिरुद्ध यांच्यात मात्र पुरेपूर उतरली. त्यामुळेच त्यांनी पुढे आपल्या वडिलांचे स्वतंत्र व्यवसायाचे स्वप्न वास्तवात उतरवले, साकार केले.

अनिरुद्ध चव्हाण हे शालेय जीवनात यथातथाच होते. शालेय शिक्षणापेक्षा धंद्याकडे त्यांचे मन ओढ घेई. करीअरच्या बाबतीत बरीच धरसोड केल्यानंतर त्यांनी बी.कॉम. व डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉचे शिक्षण पूर्ण केले. नंतर नोकरीच्या शोधात ते पुण्याला आले. पुण्यात त्यांना एका ट्रान्सफॉर्मर बनवणार्‍या कंपनीत दरमहा रुपये ३,००० पगाराची नोकरी केली.

त्यांची सुरुवात जरी अकाऊंटंट म्हणून झाली तरी लवकरच त्यांनी चौकस दृष्टीने कंपनीच्या सर्व डिपार्टमेंट्सची माहिती करून घेतली. कंपनीतील पर्चेस डिपार्टमेंटमध्ये काम करीत असताना त्यांचे लक्ष ट्रान्सफॉर्मर रेडिएटर्स या गोष्टीकडे गेले.

ट्रान्सफॉर्मरद्वारे विजेचा प्रवाह वाहून नेला जातो. ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल असते. त्यातून सतत विद्युतप्रवाह वाहत असल्याने ऑइलचे तापमान वाढते. ते वाढू नये म्हणून त्याला रेडिएटर्स बसवले जातात. रेडिएटर्समुळे ऑइलचे तापमान नियंत्रणात राहते.

त्या कंपनीच्या पर्चेस डिपार्टमेंटमध्ये काम करीत असताना अनिरुद्ध चव्हाण यांच्या एक गोष्ट लक्षात आली, की ट्रान्सफॉर्मर बनवणार्‍या सर्व कंपन्यांना रेडिएटर्स लागतात; पण ते बनवणारे संपूर्ण महाराष्ट्रात फक्‍त तीनच मॅन्युफॅक्चरर्स आहेत. रेडिएटर्स या गोष्टीला मागणी फार आहे, मात्र ते बनवणारे उत्पादक खूप कमी आहेत.

वडिलांपासून त्यांनी व्यावसायिक दृष्टीकोन घेतलेला होताच. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की, आपण स्वत:चा व्यवसाय सुरू करून रेडिएटर्स का बनवू नयेत? तसे केले तर आपल्या उत्पादनांना भरपूर मागणी राहील व या बाजारात फारसे कुणी स्पर्धकही नाहीत.

अनिरुद्ध चव्हाण यांनी सूक्ष्म निरीक्षणाद्वारे रेडिएटर्स बनवण्याची ही व्यावसायिक संधी हेरली आणि चिकाटीने तिचा पाठपुरावा केला. रेडिएटर्स बनवायचे तर सुरुवातीला काही भांडवलाची गरज होती आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे तांत्रिक ज्ञानाची गरज होती. अनिरुद्ध चव्हाण हे कॉमर्स ग्रॅज्युएट असल्याने त्यांच्याकडे रेडिएटर्स बनवण्यासाठी लागणारे टेक्निकल नॉलेज नव्हते.

तेव्हा त्यांनी एका तज्ज्ञ व्यक्तीला आपले टेक्निकल कन्सल्टंट म्हणून सोबत घेतले. तसेच रेडिएटर्स निर्मितीसाठी लागणार्‍या काही पायाभूत मशीन्स घेतल्या. पुण्यातील भोसरी एमआयडीसीत एक १५०० चौ. फुटांचा गाळा भाड्याने घेतला. १ नोव्हेंबर २००९ ला अवघ्या सात कामगारांसह ट्रान्स व्होल्ट इंजिनीअरिंग या कंपनीची स्थापना करून त्यांनी रेडिएटर्सच्या उत्पादनाला सुरुवात केली.

ते पूर्वी ज्या कंपनीत कामाला होते त्या कंपनीकडूनच त्यांना पहिली ऑर्डर मिळाली. अनिरुद्ध चव्हाण यांना ट्रान्सफॉर्मरच्या क्षेत्राची चांगली माहिती होती. पुढे त्यांनी ट्रान्सफॉर्मर उत्पादकांच्या गाठीभेटी घेऊन आपला व्यवसाय चांगलाच वाढवला. बँक प्रपोजल करून एका सरकारी योजनेखाली कर्ज घेतले व लवकरच पुण्यातच पिरंगुट येथे मोठ्या जागेत आपला उद्योग हलवला.

आजमितीला अनिरुद्ध चव्हाण त्यांच्या ट्रान्स व्होल्ट इंजिनीअरिंगमार्फत महाराष्ट्रातील ५० ट्रान्सफॉर्मर उत्पादकांना रेडिएटर्स पुरवतात. काळाच्या ओघात अनिरुद्ध चव्हाण यांच्या कंपनीचे कार्यक्षेत्र वाढत गेले. आता त्यांचे रेडिएटर्स संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे पुणे, मुंबई, वसई, पालघर, रत्नागिरी; मराठवाड्यातील बीड-औरंगाबाद- सोलापूर; पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर-सांगली इत्यादी ठिकाणी जातात.

दहा वर्षांपूर्वीची सोपी परिस्थिती आता राहिलेली नाही. आता बाजारात काही स्पर्धक म्हणजे रेडिएटर्स उत्पादकही उतरले आहेत; पण त्याचबरोबर मागणीही वाढली आहे. त्यांच्या क्षेत्रात उत्पादन क्षमता ही सीआरसीए स्टील या कच्च्या मालाच्या वापरावर ठरते. त्यांच्याकडे दरमहा ४० टन सीआरसीए स्टील लागते. आता त्यांच्याकडे ३५ कामगार काम करतात.

सध्या त्यांची स्वत:ची १० हजार स्क्‍वेअर फुटांची नवी फॅक्टरी बांधली जात आहे. पुढच्या दोनच महिन्यांत त्यांचे उत्पादन आपल्या मालकी हक्‍काच्या जागेत सुरू होईल. सध्या त्यांचा टर्नओव्हर वर्षाला पाच कोटींच्या आसपास आहे. पुढच्या दहा वर्षांत म्हणजे २०३० पर्यंत आपला टर्नओव्हर १०० कोटींपर्यंत नेण्याचे त्यांचे ध्येय आहे.

महाराष्ट्र शासनाने २०१४ सालासाठीचा उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. २६ जानेवारी २०१५ रोजी पुण्याच्या शिवाजी ग्राऊंडवर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते त्यांना हा बहुमान देण्यात आला.

अनिरुद्ध चव्हाण यांना सायकलिंगचा छंद आहे. पुण्यात सायकल प्रेन्युअर्स नावाचा सायकलप्रेमींचा एक ग्रुप आहे, त्याचे ते सभासद आहेत. सायकल चालवण्यामुळे देशाचे इंधन वाचते आणि सायकल चालवणे आरोग्याच्या दृष्टीने शरीराला हितकारक असते. हा ग्रुप समाजात सायकलिंगची आवड रुजावी म्हणून विविध उपक्रम राबवतो.

या ग्रुपतर्फे पुणे परिसरातील किल्‍ले व प्रेक्षणीय स्थळांच्या सहली सायकलवरून काढल्या जातात. या ग्रुपच्या सर्व उपक्रमांत अनिरुद्ध चव्हाण उत्साहाने सहभागी असतात. २०१६ साली या ग्रुपने पुणे ते कन्याकुमारी हा १२ दिवसांचा सायकल प्रवास आयोजित केला होता. त्यातही अनिरुद्ध चव्हाण सहभागी झाले होते.

त्यांच्या सर्व वाटचालीत त्यांच्या पत्नी मुक्‍ता चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. त्या ‘ट्रान्स व्होल्ट इंजिनीअरिंग प्रा. लि.’ कंपनीच्या संचालिकाही आहेत. या दाम्पत्याला प्रणाली नावाची एक कन्या आहे.

मराठी तरुणांना अनिरुद्ध चव्हाण सल्‍ला देतात की, आपल्याजवळ भांडवल नाही असा निगेटिव्ह विचार करत बसू नका. तुमची शारीरिक क्षमता, तुमची बुद्धी हे तुमचे भांडवलच आहे. बुद्धीचा वापर करून व्यवसायाची संधी शोधून काढा. तेच तुमचे खरे भांडवल आहे.

आपण काय बनवू शकतो, याचा विचार करीत बसण्यापेक्षा समाजाला काय पाहिजे आहे, मागणी कोणत्या गोष्टीला आहे, आपण काय पुरवू शकतो, समाजाची कोणती गरज भागवू शकतो याचा विचार करा. व्यवसायाची संधी आपल्या आजूबाजूलाच दडलेली असते. ती चाणाक्षपणे हेरता आली पाहिजे. ज्याला ती अचूकपणे हेरता येईल ते नक्‍कीच यशस्वी उद्योजक बनू शकतो.

मराठी तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे. नोकरीच्या मागे लागू नये. मात्र व्यवसायात पाय रोवण्यासाठी हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क या दोन्ही गोष्टींची तयारी ठेवली पाहिजे. धंद्यात यश मिळण्यासाठी थोडा धीर, संयम ठेवला पाहिजे. कोणताही धंदा ताबडतोब सेटल होत नाही.

धंद्यात जम बसण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा काळ जावा लागतो. तेवढा वेळ आपली थांबायची तयारी असली पाहिजे. जर अचूक संधी हेरली आणि चिकाटी ठेवली तर कोणीही व्यवसायात यशस्वी होऊ शकतो. ‘ट्रान्सव्होल्ट इंजिनीअरिंग’च्या अनिरुद्ध यांची व्यावसायिक वाटचाल हेच याचे एक उत्तम उदाहरण आहे.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?