Advertisement
व्यक्तिमत्त्व विकास

वार्षिक उद्दिष्ट ते दैनंदिन कामांची यादी

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आपले मन दिवसाला ५०-६०,००० विचार करते, म्हणून मनात जास्तीत जास्त विचार आपल्या ध्येयाचेच कसे राहतील, त्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींत, चर्चेत, वादात, भांडणात न अडकता स्वत:च्या चुकीची लगेच माफी मागण्याचे व दुसर्‍याच्या चुकीला लगेच माफ करण्याचे महत्त्वही आपण समजून घेतले.

उद्देश हाच की आपण आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नये. सर्व यशस्वी उद्योजक आपल्या मनाचा नियंत्रित वापर करतात व ते आपल्याभोवती इच्छित परिस्थिती निर्माण करतात. कोणतेही ध्येय आपण आधी मनातच ठरवतो व तयार करतो. ते प्रत्यक्षात यायला मात्र दररोज काही ना काही करावे लागते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

विविध कंपन्या, उद्योजक १ एप्रिलपासून आर्थिक वर्ष चालू होत असल्याने, पूर्ण वर्षाचे विक्रीचे किंवा नफ्याचे ध्येय ठेवून काम सुरू करतात. बर्‍याचदा त्यांना हा प्रश्न पडतो की, आता त्यासाठी दररोज कोणते काम किती करावे? आज त्याच विषयाचा अभ्यास Daily To-Do-List च्या अर्थाने करूया. तुम्ही एक मोठे उद्दिष्ट ठेवलेले असते व त्यामुळे तुम्ही भांबावून, गोंधळून जाऊ शकता, कारण त्यातील कोणते काम, कोणी कधी करावे, ह्याबाबत काही ठरवलेले नसते. परिणामी काही दिवस, आठवडे निष्क्रियतेत जाऊ शकतात व आवश्यक विक्री, नफा ठरावीक कालावधीत न दिसल्यास निराशा येऊ शकते.

जसे की ५० षटकांच्या सामन्यात…

तो जिंकायला ५० षटकांत समजा ३५० धावा करायच्या आहेत. तर, ह्या अवाढव्य संख्येचे दडपण निश्चित येते; पण प्रतिषटकाचा धावांचा दर (Required Run Rate) ठरवून ही समस्या सोडवतात. म्हणजे प्रत्येक षटकात ७.० च्या गतीने धावा करायच्या आहेत, असे ठरवतात. आता हा आकडा सोपा वाटतो व फलंदाज मनावरील दडपण दूर करून, तेवढ्याच धावा करायचा प्रयत्न करतो. जर त्याने एका वेळी एका षटकाची काळजी केली, तर ५० षटकांत तो संघ सामना जिंकतो.

व्यवसायाच्या दृष्टीने विक्री व उत्पादन ही महत्त्वाची खाती असतात, ज्यांची एकमेकांवर आधारित वार्षिक उद्दिष्टेही ठरतात, ती मोजता येतात. खरं म्हणजे, ह्या खात्यांच्या कामावरच संपूर्ण कंपनीचा कारभार व जीवन चालतं. ह्या खात्यात काम करणारी माणसं प्रत्यक्ष सीमारेषेवर युद्धात लढल्यासारखी लढतात. म्हणून त्यांना Line functions ही म्हणतात.

इतर खरेदी, कर्मचारी हजेरी व पगार, कार्यालय सुविधा, सुरक्षा, साफसफाई, गोदामे, अकाऊंट्स, लेखा परीक्षण वगैरे पूरक कामे करणार्‍या खात्यांना Staff functions म्हणतात. आज विक्री व उत्पादन खात्यांमध्ये उद्दिष्टांपासून दैनंदिन कामापर्यंत विभागणी कशी होते, ते पाहू.

विक्री

तुम्ही विक्रीचे वार्षिक उद्दिष्ट ठेवले असेल, तर तुमच्या उत्पादनाचा प्रकार, महिन्यानुसार बदलणारी विक्री, स्पर्धक, ग्राहकांचे प्रकार व ठिकाण यानुसार प्रत्येक महिन्याचं किंवा तिमाहीचं उद्दिष्टही ठरवायला हवं. समजा, तुम्ही एखाद्या उत्पादनाचं वार्षिक विक्रीचं उद्दिष्ट १००० ठरवलं असेल, तर पहिल्या तिमाहीचं ३०० असं ठरवलेलं असेल.

आता ते विभाग, शहर, राज्य, सेल्समन यानुसार वाटून द्यायला हवं. तसंच, तुमचा conversion rate किती आहे, त्याप्रमाणे तेवढ्या संख्येने संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचायला हवं. जाहिरात, प्रचार, प्रसार, प्रदर्शन, प्रशिक्षण या मार्गांनी त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच हवं.

दिवसात, आठवड्यात मिळणारा प्रतिसाद, ऑर्डर्स पाहून ह्या प्रचाराचा आवाका कमी-जास्त करायला हवा. त्यासाठी आवश्यक खर्चाची तरतूद वार्षिक अंदाजपत्रकात केलेली असायला हवी. या सर्व अभ्यासातून दररोज आपण काय करायला हवं व हाताखालच्या लोकांकडून काय करून घ्यायला हवं, ते ठरवता येईल.

विक्रीमधील तुमचा Run Rate ठरवण्यासाठी विभाग, शहर, जिल्हा, राज्य यानुसार व तुमच्या उत्पादनाच्या मासिक, त्रैमासिक विक्री उद्दिष्टानुसार तयार केलेला अहवाल अभ्यासावा लागेल. त्यातून कुठे अतिरिक्त माल पडला आहे व कुठे कमतरता जाणवत आहे, त्यानुसार मालाची वाहतूक करून हा प्रश्न सोडवता येतो का ते अभ्यासावे लागेल. मालाची गुणवत्ता व दर, ने-आण करताना होणारे नुकसान, तुमच्या सेल्समनची क्षमता व ज्ञान, स्पर्धकांची उत्पादने, ग्राहकांना तुमच्या उत्पादनाची ओळख व माहिती, ह्या व अशा घटकांचा अभ्यास व विश्लेषण करून त्यावर उपाय योजना करावी लागेल.

उत्पादन

एकदा वार्षिक विक्रीचा आकडा ठरवला की, मासिक किंवा त्रैमासिक उत्पादनाविषयी नियोजन करता येते. यंत्रे, माणसे, कच्चा माल, इंधन, पॅकिंगचा माल, इतर सामग्री यांचा अंदाज बांधून कमी खर्चात वेळेत ह्या सर्व गोष्टी कशा उपलब्ध होतील त्याचे नियोजन करता येते. कामगारांच्या किती पाळ्या ठेवाव्यात, कंत्राटी तात्पुरते कामगार घ्यावे का, पूर्ण किंवा आंशिक उत्पादन बाहेरून बनवून घ्यावे का, लागणार्‍या भांडवलाची आवश्यकता व तरतूद, असे सर्व निर्णय वेळेवर घेता येतात. काळ-काम-वेगाचे गणित मांडून, उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून, निदान दर आठवड्याला त्याची पडताळणी करून, आपला Run Rate योग्य आहे ना, याची खात्री करून घ्यावी.

एकदा वार्षिक उद्दिष्ट ठेवले व त्याचा महिन्याचा किंवा आठवड्याचा भाग किती हेही ठरवले, की जोमाने तो भाग पूर्ण करण्याच्या मागे लागले पाहिजे. Mind Programming मध्ये आम्ही म्हणतो की आपल्याबाबत काय घडेल हे सांगता येत नाही व त्यावर आपले नियंत्रणही नाही, तर त्यावर आपला प्रतिसाद काय असेल, त्यावरच आपले नियंत्रण असू शकते.

जसे की ५० षटकांत ३५० धावा करताना १० षटकांत धावसंख्या ७० असायला हवी होती; पण समजा ती आहे ४० धावात ४ बाद! तर, असं कसं झालं यावर फार विचार, खेद, दु:ख, राग, चिंता, काळजी वगैरे करण्यापेक्षा आता Run Rate वाढवण्याचा प्रयत्नच करायला हवा. तसेच, आपला विक्री किंवा उत्पादनाचा वेग कमी पडत आहे, असे समजल्यास तो वाढविण्याचे प्रयत्न करून त्यावर लक्ष ठेवणे, हा प्रतिसादच आपण देऊ शकतो.

ध्येयपूर्ती झाल्यावर आनंद साजरा करावा. प्रत्येक पायरीवर आपल्या कामकाजाचा आढावा घेऊन त्यात आपण उद्दिष्ट गाठल्याचे लक्षात आल्यावर संबंधितांचे कौतुक करावे व आभार मानावेत, विशेष बक्षीसही द्यावे व आपण मागे पडल्याचे कळल्यास, कोणत्या कारणाने मागे पडलो ते तपासून, संबंधित कर्मचारी वा पुरवठादारास समजावून देऊन वेळेवर काम संपवण्यास प्रोत्साहन द्यावे.

आवश्यकता वाटेल तिथे क्षमता, कच्चा माल, वेळ, पैसा, पुरवठा, कल्पना, कृती, अंमलबजावणी वाढवावी. कृती हीच भीतीवर मात करायचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, त्यामुळे सुरुवातीच्या अपयशाने खचून न जाता, आहे त्या परिस्थितीत आपण जे करू शकतो, ते करत राहणे गरजेचे असते.

एका मुंगीच्या उदाहरणाने हे स्पष्ट होते. एखाद्या चालत-धावत असलेल्या मुंगीला तुम्ही छोट्या कागदाच्या तुकड्याने अडवा व ती काय करते, ते तुम्ही करा. एका मुंगीच्या मनाला जर ते कळते, तर आपण तर प्रगत मन असलेले मानव आहोत. कोणत्याही परिस्थितीत उद्योजकाचे स्वत:च्या मनावरील नियंत्रण सुटून चालणार नाही.

ध्येय साध्य होईपर्यंत, ते साध्य होणारच ह्या विश्वासाने, त्याने त्या दिशेने काम करत लढत राहिले पाहिजे. जर, उद्योजकाचा ठाम विश्वास असेल, तर सर्व साधने त्याच्याकडे आकर्षित होतात व तो सर्व समस्यांवर मातही करतो, असे पाहायला मिळते. क्रिकेटप्रमाणेच, त्याने इथेही बाद न होता खेळपट्टीवर टिकून राहिले पाहिजे, थोड्या संयमाने राहून, संधी निर्माण केल्या पाहिजेत व Run Rate गरजेनुसार वाढवला पाहिजे. तुमचा सध्याचा Required Run Rate किती आहे?

– सतीश रानडे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!