'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची मुलाखत प्रसिद्ध करायची असल्यास, या लिंकवर क्लिक करा 👉 https://wa.link/p11pqe
माझ्या परिचयातील श्रीमती अर्पिता जयवंत ह्या अत्यंत खुबीनं बिझनेस करतात. आमच्या अगदी फॅमिली फ्रेंड. त्यांचं ‘रियल बिर्याणी’ नावाचं पार्सल काउंटर आहे. मला त्यांच्या मेहनतीचं आणि कष्टाचं कौतुक करावंसं वाटलं म्हणून त्यांच्या अन त्यांच्या बिझनेसची गोष्ट लिहिण्याचं ठरवलं आहे.
अर्पिता म्हणजे होममेकर. लग्नानंतर दादरहून थेट कल्याणला. जयवंतांच्या अतिशय सुखवस्तू घरात आल्या. त्यांनी २००-०५ मध्ये IHM Goa येथून हॉटेल मॅनेजमेन्ट केलं होतं. अनेक वर्षे होममेकर म्हणून उत्तम जबाबदारी पार पाडत होत्या. मात्र त्यांना व्यवसाय करण्याची तीव्र इच्छा होती. त्यातच त्यांचे पती लंकेश यांच्या मित्राने हॉटेल टाकण्याची इच्छा दर्शवली आणि त्यांना भागीदारी ऑफर केली.
तेव्हा लंकेश नोकरी करत असल्याने त्यांनी पत्नी अर्पिता यांचेबरोबर भागीदारीत त्यांना काम करायला सांगितले अन त्यांनी काम सुरूही केले. ‘रियल बिर्याणी’ ह्या नावाने व्यवसाय सुरू केला. योगायोगाने म्हणा की कष्टाने म्हणा मात्र भागीदारी यशस्वी झाली. बिझनेसने उत्तम जोर धरला. हॉटेलमध्ये ग्राहकांची रीघ वाढू लागली. दोघा बिझनेस पार्टनरच्या प्रयत्नांना यश आले.
‘रियल बिर्याणी’ चं फार छोट्याशा कालावधीत नाव झालं. ह्या दोघांना ‘रियल बिर्याणीवाले’ म्हणून लोक ओळखू लागले. मात्र उत्तम चाललेल्या व्यवसायात माशी शिंकली. अर्पिता यांना त्यांच्या भागीदाराने कारणं देऊन वेगळे केले.
त्यांना भागीदाराच्या अशा वागण्याने फार वाईट वाटले. आपण लावलेल्या झाडाला नियमित पाणी घालून मोठं करावं, त्याला उत्तम फळं लगडावीत अन एखादयाने आपला त्या झाडावरचा हक्कच छिनावून घ्यावा, असे काहीसे झाले. त्यांचे काही दिवस अतिशय तणावात गेले.
एकदा त्यांच्या इमारतीच्या गेटबाहेरून त्या चाललेल्या असताना एका महिलेने त्यांना “ओ, रियल बिर्याणीवाल्या मॅडम” असा आवाज दिला. म्हणजे लोकं ‘रियल बिर्याणीवाल्या’ मॅडम म्हणून अजूनही ओळखत होते. ती ओळख अजूनही ठळक होती. त्यांना त्या महिलेची साद सुखावून गेली अन त्यांनी आपणही आता एकट्यानेच अन ‘रियल बिर्याणी’ ह्याच नावाने बिझनेस सुरू करायचा असे ठरवले.
तसे त्यांनी घरच्या माणसांना कळवले. त्यांचा मुख्य रस्त्याच्या आतल्या बाजूला असलेला गाळा किचन म्हणून वापरण्याचे ठरले. घरातून आर्थिक मदत न घेण्याचा विचार त्यांनी केला होता. फक्त पंधरा हजार रुपयांच्या भांडवलात ७ जून २०१५ रोजी व्यवसाय सुरू केला.
पाचेक हजारांचा किराणा भरला, तीन हजारांचे पॅम्फ्लेट छापून आजूबाजूच्या वसाहतीत वाटण्याची व्यवस्था केली. उरलेल्या पैशाची भांडी विकत घेतली अन स्पेशल ‘चुलीवरच्या रियल बिर्याणी’चा व्यवसाय सुरू केला. एक ओळखीतला कुक बरोबर घेतला.
अर्पिता मॅडम नशीब घेऊन आल्या होत्या. पहिल्याच दिवशी पॅम्फ्लेटचा परिणाम झाला. एका ठिकाणाहून दहा किलो बिर्याणीची ऑर्डर मिळाली. पहिलीच सहा हजार रुपयांची ऑर्डर. त्यांचा कुक थोडा कच्चा होता. दहा किलो म्हणल्यावर जरा दचकला. म्हणाला, ‘मॅडम, इतना एक साथ नही बना पाऊंगा’.
झालं. पहिल्याच ऑर्डरला धक्का लागला. मॅडमनी मार्ग काढला. त्यांच्या परिचयातील हॉटेलवाल्याकडे पोहोचल्या, तिथल्या शेफला त्या एका दिवसापुरत्या घेऊन आल्या. दहा किलोची स्वादिष्ट बिर्याणी त्याच्याकडून बनवून घेतली. व्यवस्थित पॅक करून ग्राहकाला पोहोचती केली. रोख सहा हजार रुपये ग्राहकाने सुपूर्द केले.
अर्पिता यांच्याकरता तो अतीव आनंदाचा क्षण होता. सुरुवातीलाच इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने काम करायला प्रचंड उभारी येते. तसेच त्यांच्याबाबतीत झाले.
झालं, रोज दुकान उघडत गेल्या, गिऱ्हाईक येत राहिले. नवखा कुकही हुशार झाला. व्यवसायाने छान बाळसं धरलं. रोज भाजी मार्केट, किराणा, बँकेत जाणे, मुलगा अथर्वची काळजी घेणे, घरातही मदत करणे ह्या साऱ्या आघाडीवर यशस्वीपणे वाटचाल सुरू राहिली. यात त्यांच्या सासू-सासऱ्यांची त्यांना विशेष मदत झाली. त्यांनी अर्पिता यांना मनापासून पाठिंबा दिला. त्यांच्या व्यवसायातही जमेल तितकी मदत केली. पती लंकेशही नोकरी सांभाळून जमेल तितका हातभार लावत असत.
२०१५ पासून २०२० पर्यंत व्यवसाय यशस्वीपणे चालू आहे. त्याची कमान अगदीच वाढती आहे. दरम्यान नोटबंदी झाली आणि त्याचा त्यांच्या व्यवसायावर फार वाईट परिणाम झाला. कलेक्शन अगदी अर्धे झाले. मात्र त्यांनी धीर सोडला नाही. त्या ‘रियल बिर्याणी’ स्वतःच मुल समजतात. अन मुलाला जशी आई जीव लावते, प्रेम करते, तसं आपल्या आउटलेटच्या बाबतीत वागतात. दुखलं खुपलं विचारत राहतात.
प्रत्येक उद्योजक असायलाच हवा 'स्मार्ट उद्योजक - प्राईम मेंबर'!
शेफ सोडून जाणे, ही हॉटेल व्यवसायातील सर्वात मोठी अडचण. तसा अनुभव त्यांनाही आला, मात्र त्यातूनही तावून-सुलाखून निघाल्या. आता अगदी मुख्य शेफ नसेल किंवा त्याने सुट्टी मारली तर किचनचा स्वतः ताबा घेतात.
बिझनेसची मार्केटिंग करण्याची जबाबदारी स्वतः पार पाडतात. त्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेतात. २०१६ साली तीन लाख ऐंशी हजार रुपये असलेली उलाढाल आता २८ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यांचे म्हणणे आहे की भरपूर कष्टाने अन व्यवसाय वाढवण्यासाठी केलेल्या विविध कल्पनांतून माझा ‘रियल बिर्याणी’चा ग्राहक वर्ग उत्तरोत्तर वाढत गेला, हेच माझ्या आजपर्यंत मिळालेल्या यशाचं गमक असावे.
कौन कहता है अस्मान में सुराख नही होता,
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो।
– निलेश अभंग
- उद्योजकाचे नाव : अर्पिता लंकेश जयवंत
- व्यवसायाचे नाव : रियल बिर्याणी
- जिल्हा : ठाणे
- जन्मदिनांक : १ जून १९८२
- व्यवसाय स्थापना वर्ष : २०१५
- व्यवसायाचा पत्ता : शॉप नंबर ५, तुलसी पार्क, अमृत पार्क, वायले नगर, कल्याण.
- संपर्क क्रमांक : 9076677342 / 9619920350
ई-मेल : realbiryani1@gmail.com

