चांगल्या काळातच पुढच्या आव्हानांची तयारी करून ठेवा


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


कालसर्प योगाबद्दल अनेक वादविवाद आहेत, हा योग असतो की नाही इथपासून. उद्योग ज्योतिषात पोकळ वादापेक्षा Physical Manifestation (जीवनावर दिसणारा परिणाम) महत्त्वाचा. कुंडलीमध्ये राहू व केतू एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात.

माझ्यासमोर एक मध्यमवयीन कुटुंब बसलं होतं. त्यांचे ओढलेले चेहरे त्यांनी सोसलेल्या कष्टाचे द्योतक होते. ठीकठाक कपडे, सुसंस्कृत, इतर गोष्टी बऱ्यापैकी दिसत होत्या; परंतु असं वाटत होतं की, काही तरी त्यांना आतून कुरतडतंय. शेवटी गृहिणीने बोलायला सुरुवात केली. हे उत्तम इंजिनीयर, परंतु यश म्हणून नाही.

सगळ्या गोष्टी बरोबर केल्या तरी यश नाही. चांगली जागा, चांगले सहकारी, चांगलं शिक्षण, चांगली तयारी; परंतु शेवटी करवंटीच हाती. अठरा वर्षं तंगड्या तोडून झाल्या. आता नोकरी करतात. बरं चाललंय म्हणायचं. हळूहळू कर्जाचा डोंगर संपत आलाय, पण यांना सतत नैराश्य येतंय. असं का? हेच ते सतत विचारत असतात. अजूनही काही तरी धंदा करावा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं मन नोकरीत रमत नाही. गेले दहा वर्षं नोकरी चालू आहे म्हणून घर चालतंय, पण समाधान नाही. यांच्या तोंडावर हसू नाही.

“तुम्ही काय काय केलं, कधी केलं आणि काय झालं हे सविस्तर सांगा, म्हणजे तुमच्या कुंडलीशी त्याचा मेळ घालण्याचा आपण प्रयत्न करू या!” मी कुंडली समोर घेत त्यांना म्हटलं. कुंडलीकडे नजर टाकताना चमकलोच. त्यांना पूर्ण कालसर्प योग होता आणि त्यापेक्षा पलीकडे जाऊन कुंडलीतले सगळे ग्रह अगदी जवळ जवळ होते एकमेकांच्या.

कालसर्प योगाबद्दल अनेक वादविवाद आहेत, हा योग असतो की नाही इथपासून. उद्योग ज्योतिषात पोकळ वादापेक्षा Physical Manifestation  (जीवनावर दिसणारा परिणाम) महत्त्वाचा. कुंडलीमध्ये राहू व केतू एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात, १८० डिग्रीचा कोन करून. याला राहू-केतूची काठी असंदेखील म्हटलं जातं. जर इतर सगळे ग्रह या काठीच्या एकाच बाजूला असले तर त्याला कालसर्प योग असं म्हटलं जातं.

हे ग्रह जरी एकाच बाजूला असले तरी जर हे विखुरलेले असले तर कालसर्प योगाचे परिणाम खूप सौम्य होतात; परंतु हेच ग्रह जर एकमेकांच्या जवळ जवळ असतील किंवा एक किंवा दोन राशींमध्येच असतील तर कालसर्प योगाचे परिणाम तीव्रतेने दिसून येतात.

काय असतात हे परिणाम?

अशा व्यक्तीच्या आयुष्यात होणाऱ्या घटना या cluster formation मध्ये होतात, एकामागोमाग एक किंवा एकत्र, चांगल्या किंवा वाईट. राहू देतो अविचारी धाडस. पुराणातला राहू आठवा. फक्त डोकं आहे, हातपाय नाहीत. विचार जोरात, पण त्याला साहाय्य नाही. नवीन नवीन कल्पना येतात, परंतु त्यासाठी आवश्यक असलेली फ्रेमवर्क तयार होण्याआधीच उडी मारून माणूस मोकळा होतो. Strong concept, weak execution, too many things असं याचं स्वरूप असतं.

त्याउपर या व्यक्तींच्या आयुष्यात येणाऱ्या घटना इतक्या लागोपाठ होतात की, त्यांना वर बघायला उसंतच नाही मिळत. त्यामुळे चांगल्या चांगल्या संधीचीदेखील माती होते किंवा उत्तम व्यवहारांमध्येदेखील तोटा होतो. यांच्या ठेचा पाहून इतर शहाणे होतात आणि फायदा करून घेतात, त्यामुळे यांना अधिकच मनस्ताप होतो आणि नैराश्य येतं.

अशा कुंडल्यांच्या बाबतीत गोचर (ग्रहांचे तात्कालिक भ्रमण) अतिशय महत्त्वाचे ठरते. कुंडलीचा व्यवस्थित अभ्यास करणे, घटनाप्रवण व घटनाविहीन कालखंड ठरवणे व त्यानुसार जातकास वेळापत्रक आखून देऊन सपोर्ट सिस्टिम तयार करणे या गोष्टी उद्योग ज्योतिषासाठी महत्त्वाच्या ठरतात.

घटनाप्रवण कालखंडात चलित राहू प्रत्येक ग्रहाचा भोग घेत जातो. त्यामुळे जलद गतीने जातकाच्या बाबतीत घटना घडत जातात. अशा वेळी परिस्थितीचा अभ्यास करून त्यांचा सामना करणे, उगाच जास्त संधींच्या मागे न धावता नेमक्या संधीवर भर देणे व घटनांच्या वेगात स्वत:ला हरवून न जाणे महत्त्वाचे. त्याचप्रमाणे घटनाविहीन कालखंडात केलेल्या गुंतवणुकीचे परिणाम लगेच न मिळता घटनाप्रवण कालखंडात मिळतात. त्याकरिता घटनाविहीन कालखंडात resource consolidation करणे व संयम ठेवणे महत्त्वाचे. वाईट घटनाप्रवण कालखंडात जेवढे जास्त प्रयत्न कराल तेवढे जास्ती फसत जाल.

घटनाविहीन कालखंडात केलेल्या प्रयत्नांना चांगला घटनाप्रवण कालखंड सुरू झाल्यावरच फळे मिळतील. तसेच चांगल्या घटनाप्रवण कालखंडात श्वासाचीही उसंत न घेता काम करणे महत्त्वाचे. काळाचे उत्तम भान ठेवल्यास कालसर्प कालखंडाचा चांगल्यात चांगला वापर करून घेता येतो. वेळेचे भान हे उद्योग ज्योतिषाचे एक अंग आहे.

या कुटुंबाची कथा ही अशी होती….

व्यक्ती इंजिनीयर, प्लास्टिक मोल्डिंगचा कारखाना चालू केला. प्लॅस्टिकच्या विविध वस्तू बनवून घाऊक व्यापाऱ्याला विकणे सुरू केले. नवीन वस्तू बनविल्या. विदेशातील वस्तूंचा अभ्यास करून त्याबरहुकूम वस्तू बनवून दिल्या. पहिली तीन वर्षे धंदा उत्तम चालला. आतापर्यंतचा सगळा पैसा नातेवाईकांकडूनच उभारलेला होता. जागा भाड्याची होती. धंदा वाढवायचं ठरवलं.

बँकेचं कर्ज काढलं. नवीन मशीनरी घेतली. कामगार वाढवले, पण त्याच वेळी पेट्रोलच्या किमती वाढू लागल्या. त्यामुळे प्लास्टिकची म्हणजेच कच्च्या मालाची किंमत वाढली, कर वाढले, चिनी वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारात आल्या, घाऊक व्यापाऱ्यांनी क्रेडिट पिरेड वाढवला. यामुळे आर्थिक ताण वाढला व धंद्यात जबरदस्त तूट सहन करावी लागली.

ही तूट भरून काढण्यासाठी नवनवीन उत्पादने करून पाहिली, परंतु प्रत्येक प्रयत्न फसला. शेवटी कारखाना बंद केला, जागा विकली आणि राहिलेल्या कर्जाचे हप्ते बांधून घेऊन नोकरी चालू केली. आता परिस्थिती बऱ्यापैकी स्थिरावलेली आहे.

पण असं का? हा प्रश्न मनास भेडसावत होता. प्रथमदर्शनी काहीही चूक नसताना नशिबाचे फासे असे कसे पडू लागले हे जाणून घ्यायचे होते.

या गृहस्थाच्या जीवनात ऐन उमेदीच्या कालखंडात राहूची दशा, राहूचे गोचर व कालसर्पाची घटनाप्रवणता या जवळपास एकत्र आल्यामुळे त्यांची प्रवृत्ती ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ अशी होती. त्यांचे विचार काळाच्या बरेच पुढे होते. कल्पनाशक्ती अफाट वाढलेली होती. धोक्याचा अंदाज न घेता त्यांनी उड्या मारल्या, त्या काही प्रमाणात चुकल्या. सपोर्ट सिस्टिमच्या सुरक्षा जाळीच्या आधार नसल्यामुळे त्यांना सगळे आघात आपल्याच खांद्यावर घ्यावे लागले आणि धंदा बसतच गेला. अशा प्रकारचा कालसर्प योग असताना जर यशस्वी व्हायचं असेल तर इतर ग्रहांची मदत घ्यावी लागते.

उदा. १) शनी- Sleeping Partner, Financier, बरीच जमीन असलेला शेतकरी, भंगार मालाचा व्यापारी यापैकी कोणी तरी भागीदार असावा. 2) गुरू – घरातला वकील किंवा शिक्षण संस्थेशी संबंधित वजनदार व्यक्ती, राजकीय नेता यांची साथ घ्यावी. धंदा वाढविण्याची घाई करू नये. धंद्यातील फायदा स्थावर मालमत्ता वाढविण्यासाठी करावा. अर्थात  sense of timing अतिशय महत्त्वाचे.

या प्रकारच्या व्यक्तींना Share Market, Advertising, TV, Cinema, Media, Internet या प्रकारचे उद्योग अतिशय भावतात. यासोबत किराणा दुकान, पुस्तकांची लायब्ररी, भाड्याने दिलेल्या जागा, शितगृह, ऑटो वर्कशॉप अशा प्रकारचा जोडधंदा असेल तर सोन्याहून पिवळे.

या गृहस्थांना मी दिलेला सल्ला अशा प्रकारचा होता. नोकरी चालू ठेवा. शनीप्रधान आणि गुरूप्रधान असे तरुण भागीदार किंवा साथीदार (associates) घेऊन Internet संबंधित धंदा चालू करा. या माध्यमातून वस्तूची विक्री चालू करा. Foreign Franchiseeचा शोध करा. वर्षभर यश मिळण्याची दाट शक्यता आहे. त्या वेळी गुंतवणूक करण्याच्या वेळी परत सल्ला घ्या.

त्यांच्या डोळ्यांत मला प्रथमच चमक दिसली. ते काहीच बोलले नाहीत, पण त्यांचे हस्तांदोलन बरेच काही बोलून गेले. येताना खाली मानेने आलेले दोघेही जाताना मात्र ताठ चालत गेले यातच सगळं काही आलं.

– आनंद घुर्ये
संपर्क : ९८२०४८९४१६

Author

  • आनंद घुर्ये

    आनंद घुर्ये हे लौकिकदृष्ट्या अभियंता व एमबीए असून अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ पातळीवर नोकरी केली आहे. थायलंड येथे नोकरीनिमित्ताने असताना अनेकांनी त्यांना भारतीय प्राचीन संस्कृतीबद्दल प्रश्न विचारले. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानाचा अभ्यास सुरू केला. तसेच ते ज्योतिषी म्हणूनही कार्यरत आहेत. उद्योग ज्योतिष हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?