Advertisement
उद्योगसंधी

प्लॅस्टिकबंदी : ही एक संधी

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

महाराष्ट्र शासनाने प्लॅस्टिकबंदीचे सक्त आदेश दिले आहेत. या आदेशानुसार रोजच्या व्यापारातून बर्‍यापैकी प्लास्टिक हद्दपार झाले. उद्योगजगताच्या म्हणण्यानुसार या प्लॅस्टिकबंदीमुळे सुमारे ३ लाख लोकांच्या रोजगारावर गदा आली आहे व १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या सक्तीच्या प्लॅस्टिकबंदीमुळे हाल होत असल्यामुळे सामान्य लोकांमध्येही या प्लॅस्टिकबंदीबद्दल रोष आहे.

नाण्याची दुसरी बाजू पाहता प्लॅस्टिक वापराच्या अतिरेकामुळे प्रदूषणाची मर्यादा कमालीची वाढत आहे. पर्यावरणतज्ज्ञांच्या एका अहवालानुसार २०५० पर्यंत समुद्रातील प्लॅस्टिकचे प्रमाण हे समुद्रातील माशांच्या प्रमाणापेक्षा जास्त होईल. वैज्ञानिकांना प्लॅस्टिक विघटनासाठी अद्याप ठोस पद्धत सापडलेली नाही. या सर्व कारणांचा विचार करता सक्तीने किंवा स्वेच्छेने आज ना उद्या महाराष्ट्र राज्यालाच काय तर संपूर्ण जगाला प्लॅस्टिकमुक्तीच्या दृष्टीने पावले ही उचलावीच लागतील.

व्यावसायिकदृष्ट्या विचार करता अशी अनेक स्थित्यंतरे ही याआधीसुद्धा झाली आहेत व यापुढेही होतच राहणार. कॉम्प्युटर फ्लॉपी, टाइपरायटर, रोल कॅमेरा, ऑडिओ-व्हिडीओ कॅसेट्स, पेजर इत्यादी किती तरी उत्पादनांची जागा नव्या उत्पादनांनी घेतली, त्यामुळे जुनी उत्पादने तयार करणारे देशोधडीला लागले आणि त्याच वेळी नवीन उत्पादनांचे निर्माते समृद्ध झाले. एक प्रकारे हे परिवर्तनाचे चक्र आहे. ऑर्कुटची जागा फेसबुकने घेतली, याहूसारख्या मेसेंजर्सची जागा व्हॉट्सअ‍ॅपने घेतली. तंत्रज्ञानाच्या या युगात प्रत्येक दिवसाला अशी अगणित स्थित्यंतरे ही होत राहणार.


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त २० रुपयांत.


प्लॅस्टिकबंदीच्या प्रक्रियेकडेही उद्योजकाने याच दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे आणि भविष्याची पावले ओळखून आतापासून उद्याच्या व्यवसायाची तयारी सुरू केली पाहिजे. आज प्लॅस्टिकबंदीमध्ये अंशत: सूट मिळाली असली तरी समाजातील पर्यावरणाप्रति वाढती सजगता पाहता एकूणच प्लॅस्टिक किंवा पर्यावरणास हानीकारक अशा प्रत्येक उद्योगाचे भवितव्य धोक्यात आहे. त्यामुळे वेळीच उद्योजकाने पर्यावरणास पूरक उत्पादन क्षेत्रात आपले पाय रोवायला सुरुवात केली पाहिजे.

‘स्मार्ट उद्योजक’च्या वाचकांना आम्ही पर्यावरणपूरक व प्लॅस्टिकबंदीच्या या संधीमुळे फायदा होऊ शकेल अशा काही व्यवसायांची ओळख करून देत आहोत.

कापडी पिशव्या : प्लॅस्टिकबंदी घोषित होताच बरेच लोक कापडी पिशव्यांच्या व्यवसायाविषयी चौकशी करू लागले, इंटरनेटवर शोधू लागले. कापडी पिशव्या तयार करणे यात काहीही रॉकेट सायन्स नाही. कोणीही शिंपी अगदी सहज या पिशव्या तयार करू शकतो. बाजारात वीस रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत या पिशव्या विक्रीसाठी उपलब्ध असतात. मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की या पिशव्यांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कापड, धागे, मजुरी व इतर खर्च या सगळ्याचे गणित करता प्रति पिशवी मिळणारा नफा हा खूप कमी आहे. त्यामुळे अशा साध्या कापडी पिशव्या तयार करून विकण्याचा विचार करत असाल तर मोठ्या प्रमाणात विक्री होणे गरजेचे आहे किंवा विविध दुकानदार व घाऊक विक्रेते यांना जोडणे आवश्यक आहे.

छोट्या प्रमाणात किंवा घरगुती पातळीवर तुम्ही कापडी पिशव्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर साध्या पिशव्यांपेक्षा प्रीमियम पिशव्या तयार करता येतील का, असा विचार करा. त्वचा व आरोग्यास चांगला असा उच्च प्रतीचा कपडा, आकर्षक रचना, टिकाऊ असे विविध गुणधर्म वाढवून तुम्हाला स्वत:चे वेगळेपण दिसेल असे उत्पादन तयार करण्याचा विचार करा. अशा पिशव्यांना तुम्ही आर्थिकदृष्ट्या उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत लोकांना ग्राहक म्हणून जोडू शकता. अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या मार्केटप्लेसेसवर तुम्ही या प्रीमियम पिशव्या विकू शकता. अशा काही प्रीमियम प्रकारात मोडणार्‍या पिशव्यांची ओळख करून देत आहोत.

बेंटो बॅग : आपल्याकडे ‘जेवणाचा डबा’ ही जी संकल्पना आहे, त्याचप्रमाणे जपानमध्ये बेंटो ही संकल्पना आहे. हा जेवणाचा डबा घेऊन जाण्यासाठी किंवा अन्य छोटे साहित्य नेण्यासाठी कापडाची त्रिकोणी घडी आणि एका बाजूने शिवलेली अशी ही बेंटो बॅग असते. तुम्ही अशा बेंटो बॅग तयार केल्यात तर भारतीय बाजारपेठेत हे नवीन उत्पादन असल्यामुळे चांगली विक्री होऊ शकते, शिवाय तुम्ही अ‍ॅमेझॉनसारख्या मार्केटप्लेसच्या जोडीने जगभरात तुमच्या बेंटो बॅग विकू शकता. नुसते रुपयांमध्ये कमावण्यापेक्षा येन, डॉलर, पाऊंड, युरोमध्ये कमवून चांगली प्रगती साधू शकता. चांगली गुणवत्ता आणि आकर्षक रचना या दोन गोष्टींना मात्र पर्याय नाही.

कॅनव्हास बॅग : कॅनव्हास हे कपड्यातील एक संयुग आहे. हे कापड जाड व टिकाऊ असते. कॅनव्हासच्या आकर्षक व नक्षीदार पिशव्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मॉल किंवा सुपरमार्केट इत्यादींमध्ये खरेदी करताना या हातात शोभून दिसतात व मजबूतही असतात. त्यामुळे खरेदीसाठी मोठ्या कॅनव्हास बॅगना लोक प्राधान्य देतात. या बॅगवर तुम्ही विविध ब्रॅण्ड्सच्या जाहिरातीही करू शकता, जेणेकरून तुम्हाला जाहिरातीतूनही उत्पन्न मिळू शकते. विविध सामाजिक संदेश असलेल्या बॅगही खूप विकल्या जाऊ शकतील, जसे की बेटी बचाव, स्त्री भ्रूणहत्या, साक्षरता, स्वच्छ भारत इ.

‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचे आजच वर्गणीदार व्हा!

डफल बॅग : डफल म्हणजे जाडेभरडे लोकरीचे कापड. विविध प्रकारच्या स्पोर्ट्स बॅग, प्रवासाच्या सामानाच्या मोठ्या बॅग या कापडापासून तयार केल्या जातात. फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनवर डफल बॅगना मोठी मागणी आहे. यावरसुद्धा तुम्ही इतरांची ब्रॅण्डिंग करू शकता.

वाइन बॅग : दारू ही देशातच नाही तर जगभरात अतिमहत्त्व दिली जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे दारूसाठी केला जाणारा खर्च हाही कोणते प्रमाण पाळणारा नसतो. कॅनव्हॉसपासून तयार केल्या जाणार्‍या वाइन बॅगला चांगली किंमत मिळते. विविध मार्केटप्लेसेसवरही याला मागणी मोठ्या प्रमाणात आहे.

ज्यूट बॅग : ज्यूट म्हणजेच तागापासून तयार केलेल्या विविध प्रकारच्या पिशव्यांनाही कापडाप्रमाणेच खूप चांगली मागणी आहे. ज्यूटपासूनही विविध प्रकारच्या पिशव्या तयार करता येतात.

कापडी पिशव्यांप्रमाणेच कागद, काच, लाकूड यांच्याही अनेक वस्तू बनू शकतात. त्यामुळे स्वत:च्या बुद्धिमत्तेला प्लॅस्टिकला पर्यायी उत्पादने म्हणून फक्त द्रोण, पत्रावळी, कागदी-कापडी पिशव्या इतकेच मर्यादित करू नका. प्लॅस्टिकने गेल्या वीस वर्षांत आपल्या दैनंदिन जीवनातल्या बर्‍याच गोष्टी व्यापल्या आहेत. त्या त्या शोधून कल्पकतेने नवनवीन पर्यायांचा विचार करा.

प्लॅस्टिकबंदीने सर्वात मोठी संधी उपलब्ध केली आहे ती म्हणजे संशोधनात. तुम्ही पॅडमॅन पाहिला असेल. त्या पॅडमॅनमधल्या अक्षयकुमारप्रमाणे तुम्हाला विविध पर्याय शोधावे लागणार आहेत, नवे प्रयोग करावे लागणार आहेत, नवनवीन उत्पादने तयार करावी लागणार आहेत. आम्ही वर दिलेले पर्याय हे केवळ वानगीदाखल आहेत.

– शैलेश राजपूत

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: