बिपीन चौधरी हा पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातल्या शिरदाळे या दुष्काळग्रस्त गावातला एक तरुण. गावी फक्त शेती, तीही पावसावर अवलंबून. पाऊसही बेताचाच. त्यामुळे घरात गरिबी. अशा परिस्थितीत काही तरी करायचं ही जिद्द बिपीनच्या मनात होती.
जे करायचं ते स्वतःपुरतं नाही तर आपल्यासोबत आपल्या घराचं आणि गावाचंही भलं व्हायला हवं यासाठी तो प्रयत्नरत होता. बिपीनच्या घरी आई, वडील, आजी, आजोबा आणि दोन बहिणी. गावात पहिली ते चौथी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण.
त्यांनतर दहा किमी अंतरावर धामणी या ठिकाणी बारावीपर्यंत शिक्षण. बारावीनंतर राजगुरु नगर येथे बी.एस्सी.साठी प्रवेश घेतला. कौटंबिक अडचणींमुळे बी.एस्सी. पूर्ण होऊ शकली नाही. घराची आणि गावाची स्थिती अशी असल्यामुळे अर्थार्जनासाठी बाहेर पडणे गरजेचं होतं.
ही गोष्ट लक्षात घेऊन २००४ साली वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ८० किमीवर असलेल्या पुणे शहरात आपलं नशीब काढण्यासाठी बिपीन आला. पुण्यात मामांनी ५०० रुपये पगाराची नोकरी लावली.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
पेस्ट कंट्रोल व्यवसायात ऑपरेटर म्हणून हे काम होतं. तो काळ होता २००४-०५ चा. त्या काळात पेस्ट कंट्रोलमध्ये कीटक मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर केला जायचा. ही गोष्ट बिपीनला खटकत होती. म्हणून त्याने स्वतः काही हर्बल औषधांवर संशोधन सुरू केलं.
२०१२ च्या आसपास त्याने स्वतः काही हर्बल कीटकनाशके निर्माण करून त्यांचा पेस्ट कंट्रोलमध्ये वापर सुरू केला होता. याने मिळणारा परिणाम तर चांगला होताच, शिवाय लोकांचा केमिकलचा होणारा त्रासही कमी झाला.
स्वतः औषधी विकसित केल्यावर बिपीनने स्वतःचा पेस्ट कंट्रोल व्यवसाय सुरू करून लोकांना स्वतः विकसित केलेल्या हर्बल उत्पादनांनी सेवा द्यायला सुरुवात केली. यामध्ये बिपीनला यश येत गेलं.
मग त्याने २०१६-१७ मध्ये स्वत:च्या गावात स्वतः विकसित केलेली हर्बल कीटकनाशकं उत्पादित करण्याचा कारखाना सुरू केला. शिरदाळे गावात स्वतःचा कारखाना सुरू करणारा तसेच स्वतःचे प्रॉडक्ट बाजारात आणणारा बिपीन चौधरी हा पहिला उद्योजक.
स्वतःचं उत्पादन सुरू केल्यावर बिपीनला काही कटू अनुभवही आले. लोकांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. काहींनी प्रॉडक्ट खरेदी केले, पण पैसे दिले नाहीत. अशा काही अनुभवांमुळे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले. तरीही बिपीन थांबला नाही. काम सुरू ठेवले.
स्वतः निर्माण केलेल्या प्रॉडक्टच उत्पादन वाढवण्यासाठी बिपीनला आर्थिक पाठबळाची आवश्यकता होती, पण सरकारी बँकांनी आपली दारं बंद केली. मित्रमंडळी आणि काही गुंतवणूकदारांनीही खिल्ली उडवली. म्हणून सहकारी बँकेत शेतजमीन तारण ठेवून उद्योगासाठी कर्ज घ्यावं लागलं. यासाठीही बँकेने एक वर्ष लावलं.
बिपीन चौधरी यांनी झुरळ मारण्यासाठी तयार केलेल्या हर्बल कीटकनाशकाला भारतात पेटंट मिळाले आहे. इतरही काही प्रॉडक्ट्ससाठी पेटंट फाईल करण्याच्या तयारीत तो आहे. बिपीनने स्थापन केलेली कंपनी ‘हर्बल पेस्ट कंट्रोल इंडिया प्रा. लि.’ला भारत सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’कडून मान्यता प्राप्त झालेली आहे.
आता बिपीनला आपल्या उत्पादनाचं प्रॉडक्शन वाढवून महाराष्ट्राच्या गावागावात पोहोचायचं आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या फंडिंगसाठीही त्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रभरातून अनेक तरुण बिपीनच्या ‘स्टार्टअप इंडिया’ मान्यताप्राप्त कंपनीशी जोडले जाऊ शकतात, त्याची फ्रँचाईजी घेऊ शकतात आणि यशस्वी होऊ शकतात.
कोणत्याही स्टार्टअपच्या यशापयशात मोलाचा वाटा असतो स्टार्टअप फाऊंडर्सच्या कुटुंबाचा. बिपीनलाही या उद्योजकीय प्रवासात आपल्या पत्नी आणि मुलाची मोलाची साथ लाभली आहे. खेडेगावातील एक तरुण देशाच्या पातळीवर दैदिप्यमान असं कार्य करतो आहे, त्याला नक्कीच लोकांची साथ मिळेल आणि तो यशस्वी होईल, याची खात्री आहे.
– संपर्क : बिपीन चौधरी
9850793478
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.