1007 annual marketing

संगीतमय GIFT तयार करून देणाऱ्या शुभसूरची यशोगाथा

मला लहानपणापासून ‘उद्योग’ या शब्दाचं खूप अप्रूप होतं. उद्योग म्हणजे काही तरी एकदम भारी प्रकार असतो आणि तो करणारी ‘उद्योजक’ म्हणजे जबरदस्त व्यक्ती असते, हे माझ्या मनात पक्कं झालं होतं; पण संगीतात करीअर करायचं ध्येय निश्चित असल्याने कधी स्वतः उद्योग करायचा विचार मनात आला नाही. आपण बरं आणि आपलं कंपोझिंग बरं, असंच वाटत होतं.

मात्र माझ्या पहिल्याच अल्बमच्या निमित्ताने ‘शुभसूर’ अस्तित्वात आणून मी नकळत उद्योगात उतरले. अल्बमची रीतसर प्रक्रिया सुरू झाल्यावर हे लक्षात आलं आणि कुठे तरी फार बरं वाटलं. माझी पॅशन जपण्याचं आणि स्वतःला सिद्ध करण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून शुभसूरकडे बघतानाच मी हा उद्योग म्हणूनही वाढवू शकते याची जाणीव झाली आणि लगेच ‘शुभसूर क्रिएशन्स’ची सोल प्रोप्रायटरी फर्म नोंद केली.

मी मुंबई युनिव्हर्सिटीमधून म्युझिक डायरेक्शन आणि साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स केला. अनेक एकांकिका, नाटकं, शॉर्ट फिल्म्स यांचं म्युझिक केलं. झी मराठी, साम टीव्ही, सह्याद्री या चॅनेल्ससाठी कंपोझिंग केलं आहे. सेंट्रल रेल्वेच्या मोबाइल तिकिटिंग अॅलप्लिकेशनसाठी जिंगल बनवली.

मी २०११ साली त्यांनी स्वत:चा पहिला म्युझिक अल्बम काढायचा ठरवलं. अल्बमचं प्रारंभिक काम पूर्ण करून अल्बमच्या वितरणासाठी ऑडियो कंपनीचा शोध सुरू केला; परंतु ऑडिओ कंपन्यांकडून अतिशय अनपेक्षित रिस्पॉन्स मिळाल्याने शेवटी मी स्वतःच अल्बमची निर्मिती करायचा निर्णय घेतला. वैयक्तिक नावे निर्मिती करणे मला पटत नव्हते. यातून मग जन्म झाला झाला शुभसूर क्रिएशन्सचा.

‘शुभसूर’ हे नाव माझ्या आईबाबांच्या नावांच्या आद्याक्षरांवरून बनलेले आहे. शुभसूरच्या पहिल्या अल्बमचे नाव ‘दुर्वांकुर’. दुर्वांकुरमध्ये माझ्या आजीच्या म्हणजेच सुषमा जोशींच्या शब्दांना सूर दिलाय स्वप्निल बांदोडकर आणि मुग्धा वैशंपायन यांनी. पहिल्या अल्बमच्या कामाच्या निमित्ताने शुभसूर क्रिएशन्सकडून मला रेकॉर्ड लेबल आणि अल्बम रीलीजच्या वेळेस इव्हेन्ट मॅनेज करण्याचा अनुभव मिळाला.

WhatsApp Channel Banner

अल्बम करण्यासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. म्हणून मी दोन वर्षे आधीपासून पैशाची जमवाजमव करत होते. ती पुंजी आणि आईबाबांनी केलेली मदत हे ‘शुभसूर’चं पहिलं भांडवल होतं. अल्बमच्या कामानंतर मात्र ‘शुभसूर क्रिएशन्स’ ही एक म्युझिक प्रॉडक्शन कंपनी म्हणून वाढवायचं ठरवलं. एकीकडे माझी स्वतंत्ररीत्या वैयक्तिक म्युझिकची कामं चालू होतीच.

कंपोझिंग, अरेंजमेंट, म्युझिक प्रोग्रामिंग, कॉन्सर्ट्स इत्यादी. त्यातली शक्य होतील तेवढी सगळी शुभसूरच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न सुरू केला. म्युझिकमधल्या कोणकोणत्या गोष्टी आपण उद्योग म्हणून करू शकतो, याचा विचार सुरू झाला. एक यादी तयार केली. म्युझिक अल्बम्स, सिंगल साँग्ज, जिंगल्स, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी, कॉर्पोरेट फिल्म्स, थीम साँग्ज, नाटकं, एकांकिका यासाठी बॅकग्राऊंड म्युझिक इत्यादी सेवा शुभसूरच्या सुरुवातीच्या यादीत होत्या.

Sukhada Bhave Dabke
सुखदा भावे-दाबके

माझा उद्योग हा सेवा क्षेत्रात मोडत असल्याने आणि मी एकटीच काम करत असल्याने प्रॉडक्शनचा खर्च अजिबातच नाही. कामासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी मी स्वतः म्युझिकमध्येच असल्याने माझ्याकडे होत्याच. त्यामुळे तो खर्चही नव्हता. सुरुवातीला सोशल मीडियाद्वारे हळूहळू शुभसूरबद्दल पोस्ट करायला सुरुवात केली.

लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि अगदी छोटी छोटी, म्हणजे एखाद्या गाण्याचं एडिटिंग, एखादा छोटा ट्रॅक, कुठे एखादी कॉन्सर्ट अशी कामं मिळत होती. माझे प्रयत्न चालूच होते. हळूहळू पहिल्या अल्बममध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे सीडीज विकल्या जाऊन थोडे थोडे परत येत होते.

ते सगळे साठवून आणि वैयक्तिक घेतलेल्या कामांमध्ये मिळालेले काही पैसे बाजूला ठेवून दुसऱ्या अल्बमची तयारी सुरू केली आणि त्या प्रोसेसमध्ये शुभसूरला संगीत क्षेत्रात हळूहळू नाव मिळू लागलं.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

आमच्या सेवा या आम्हाला हव्या त्या ग्राहकांपर्यंत पोहोचत होत्या आणि आम्हाला कामं मिळत होती. दोन टीव्ही सीरियल्ससाठी एपिसोड साँग्ज, दोन टायटल साँग्ज, एक प्रायोगिक रंगभूमीवर खूप यशस्वी असलेलं नाटक, एक कमर्शिअल नाटक, दोन-तीन जिंगल्स अशी दखल घेण्यासारखी कामं मिळाली आणि खऱ्या अर्थाने शुभसूरला दिशा मिळाली. दरम्यानच्या काळात माझं लग्न झालं आणि नंतर माझा नवरा पराग हासुद्धा त्याची नोकरी सांभाळून शुभसूर क्रिएशन्सच्या कामात मला मदत करायला लागला.

पराग कमर्शिअल आर्टिस्ट आहे आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्समध्ये जॉब करतो. त्याच्या हटके आयडियाजनी शुभसूरला एक नवीन उंची दिली. माझ्या आईबाबांनी माझ्यातली कला ओळखली आणि ती जपायला मला पाठिंबा दिला. तसंच लग्नानंतरही माझ्या सासूसासऱ्यांकडून मला खूप छान पाठिंबा आहे. त्यांना माझं खूप कौतुक आहे. माझ्या सगळ्या कार्यक्रमांना ते आवर्जून येतात.

माझ्या कामातील त्यांची रुची आणि त्यांनी मला सर्वार्थाने भक्कम पाठिंबा देणं यासारखी आनंदाची आणि भाग्याची गोष्ट माझ्यासाठी दुसरी कुठलीच नाही. या प्रवासात आता ‘शुभसूर क्रिएशन्स’ला गरज होती वरच्या पायरीवर जाण्याची. मला नुसतंच बक्कळ पैसे मिळवून यशस्वी नव्हतं व्हायचं. ‘शुभसूर’च्या नावावर असं काही तरी काम असावं, की त्या कामामुळे इतरांपेक्षा वेगळं आणि हटके काही तरी केल्याचं समाधान मिळावं अशी माझी नेहमीच इच्छा होती. यातूनच मी नव्या कल्पनांवर काम करायला सुरुवात केली.

अशी वेगळी सर्व्हिस डिझाईन करण्याचा विचार सुरू केला. सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सामावून घेईल असे काय असेल याचा विचार करता करता एक नवीन संकल्पना समोर आली ती म्हणजे ‘गिफ्ट’. गिफ्ट ही एक अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक जण कधी ना कधी, कोणा ना कोणाला देतोच.

कधी ती वस्तू असते, कधी फुलं, तर कधी ग्रीटिंग; पण स्वरूप काहीही असलं तरी एक गोष्ट निश्चित तेवढीच स्पेशल असते ती म्हणजे मनातली भावना. मग म्हटलं, हीच भावना आपण शब्दसुरांमध्ये गुंफली तर?

याच विचाराने म्युझिकल मेसेंजरच्या संकल्पनेची सुरुवात झाली आणि ती पुढे जसजशी फुलत गेली तसतशी एक वेगळीच म्युझिकल सर्व्हिस आकार घेऊ लागली. आपल्या शुभेच्छा आपल्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचवणारी म्हणजेच दूत आणि संगीतमय म्हणून म्युझिकल, असं ‘म्युझिकल मेसेंजर’ हे नाव सुरुवातीपासूनच मनात घर करून गेलं.

म्युझिकल मेसेंजरला कुठल्याही विषयाचं बंधन नाही. वाढदिवस, सणसमारंभ, आनंदसोहळा, अगदी दिलगिरीसुद्धा, प्रत्येक भावनेला सुरांच्या कोंदणात गुंफता येतं. एखाद्या व्यक्तीला जर कोणासाठी म्युझिकल मेसेज करायचा असेल तर त्याने शुभसूरला संपर्क करावा. मग त्या व्यक्तीशी बोलून तिला मेसेजमध्ये काय म्हणायचंय ते जाणून घेऊन आणि त्या भावनांना शब्दांत बांधून, त्यांना चाल लावून एक छानशी जिंगल तयार करून दिली जाते.

त्या जिंगलमध्ये एखादी जरी गोष्ट त्या व्यक्तीने स्वतः केलेली असेल, उदा. शब्द, चाल किंवा ते म्हणणं, तर या म्युझिकल मेसेंजरला एक वेगळाच आणि खूप स्पेशल असा पर्सनल टच येतो. आतापर्यंत केलेल्या म्युझिकल मेसेजेसनी इमोशनली खूपच धमाल उडवून दिलीय आणि हा आनंद वाटून मिळणारं समाधान खूप छान आहे. शुभसूरसाठीही हा खूप मस्त अनुभव आहे.

सध्या म्युझिकल मेसेंजरवर स्वत: मी आणि पराग म्हणजे माझा आयुष्याचा जोडीदार आम्ही दोघे मिळून काम करताहोत. लोकांपर्यंत ही कॉन्सेप्ट पोहोचवणं, हेच सगळ्यात कठीण काम आहे, कारण ही संकल्पना एकदम नवीन असल्याने ती रुजायला थोडा वेळ लागेल; पण तो वेळ द्यायची, त्यासाठीची मेहनत घ्यायची तयारी शुभसूरने कधीच केलेली आहे. कोणत्याही उद्योगासाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे भांडवल.

पहिले दोन अल्बम्स वगळता; पण ती दोन्ही इनहाऊस प्रोजेक्ट्स होती आणि त्याचे पैशाव्यतिरिक्तही बरेच फायदे शुभसूरला मिळाले आहेत. शुभसूर हा उद्योग सेवा क्षेत्रात मोडत असल्याने आणि बरंचसं काम ऑनलाइन होत असल्याने उत्पादन खर्च तसा नगण्यच. त्यामुळे क्रिएटिव्हिटी आणि वेळ हीच आमची सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट. ज्या ज्या कामांमध्ये बाहेरची एखादी सर्व्हिस भाड्याने घ्यावी लागते. उदा. रेकॉर्डिंग स्टुडियो, म्युझिशियन्स इत्यादी.

तिथे त्यानुसार ग्राहकाशी बोलून अॅडव्हान्स घेतला जातो. म्युझिकचं बरंच काम ऑनलाइन होत असल्याने, रेकॉर्डिंगसाठी स्टुडियो, रिहर्सलसाठी रिहर्सल हॉल, मीटिंग्जसाठी कॅफेज किंवा क्लायंटचं ऑफिस असे पर्याय उपलब्ध असल्याने, शुभसूरला अजूनपर्यंत तशी स्वत:च्या ऑफिसची गरज भासली नाहीये. पोर्टेबल सेटअप, स्ट्राँग इंटरनेट कनेक्शन, व्हिडीयो कॉलिंग फॅसिलिटी, व्हॉट्सअप इत्यादीसारख्या टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही करतो. यामध्ये वेळ आणि पैसे या दोन्ही गोष्टींची बऱ्याच प्रमाणात बचत होते.

ते पैसे दुसरीकडे वापरता येतात. वेळ, उद्योगाची वाढ, स्वतःची प्रगती यासाठी सत्कारणी लावता येतो. अर्थात जेव्हा पसारा खूप वाढेल त्या वेळेस ऑफिसचा विचार निश्चितच करावा लागेलच. आवर्जून नमूद करावी अशी एक गोष्ट म्हणजे उद्योगाला तो एक भागीदारच आहे असं गृहीत धरून नफ्यामधला त्याचा भाग त्या त्या वेळेस राखीव ठेवून दिला तर तो पैसा उद्योगवाढीसाठी आपल्याला वापरायला मिळतो. वेळोवेळी हा शेअर राखून योग्य वेळी तो योग्य तिथे गुंतवल्यास फायदाच होतो.

या गुंतवणुकीमधली एक महत्त्वाची गोष्ट जी उद्योगासाठी खूप गरजेची असते, ती म्हणजे जाहिरात. आपल्या नफ्यामधला थोडा हिस्सा आपल्याच उद्योगांच्या जाहिरातीसाठी खर्च केला तर त्याच्या मोबदल्यात आपल्याला जास्त नाव, जास्त क्लायंट्स आणि पर्यायाने जास्त उद्योग मिळू शकतो.

भविष्यात शुभसूर क्रिएशन्सचा सुप्रसिद्ध म्युझिक कंपनी म्हणून वाढवण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही चालू आहेत. टीम वाढवणं, स्वतःचं ऑफिस सुरू करणं, मार्केटिंग, शुभसूरच्या वेबसाइटवरून काही अजून ‘आकर्षक सेवा’ सुरू करणं इत्यादी भविष्यातील उद्दिष्ट आहेत. कठोर मेहनत आणि योग्यरीत्या कामाचे नियोजन या जोरावर ही वाटचाल यशस्वी करण्याचा मानस आहे.

– सुखदा भावे-दाबके
९८१९२०४२३२

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा