कापड धंद्यातील दलाली व विक्री


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


मंगलदास मार्केट, मुळजी जेठा मार्केट, मेहता मार्केट, स्वदेशी मार्केट, हिंदमाता मार्केट इत्यादी या धंद्याच्या घाऊक बाजारपेठा आहेत. काळबादेवी व त्याच्या आसपासचा परिसर, हिंदमाता सिनेमा/नायगाव व त्याच्या आसपासचा परिसर इथे या घाऊक बाजारपेठा आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळात हा धंदा मुख्यत: गुजराती समाजाच्या ताब्यात होता; परंतु स्वातंत्र्योत्तर काळात गुजरात्यांच्या खांद्याला खांदा लावून सिंधी समाजही या धंद्यात उतरला व त्यांनीही आपला जम बसवला. या दोन्ही समाजांचा मराठी माणसांवर मोठा विश्‍वास आहे, कारण मराठी माणूस हा प्रामाणिक व पापभीरू असतो असा त्यांचा (गैर) समज आहे. मराठी माणसाने याचा फायदा घेतला पाहिजे. या धंद्याची सुरुवात करणं तसं सोपं आहे.

आपण, आपलं कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक यांची मोठी खरेदी स्वत: (कोणाला बरोबर न नेता) करायची. त्याकरता शेकडो दुकाने धुंडाळायची, सर्वांचे भाव काढायचे, भाव करायचे, घासाघीस करायची व स्वस्तात खरेदी करायची. त्यानंतर हे सर्व कपडे सुमारे २५ टक्के नफा काढून विकून टाकायचे. हे नाही जमलं तर ज्याचे त्याचे कपडे त्याला पोचते करायचे व माशा मारत बसायचं; परंतु थोडंफार डोकं असेल तर असं होणार नाही.

सर्व सरकारी, निमसरकारी ऑफिसातील मराठी माणसं हे तुमचं खास गिर्‍हाईक. यांना हप्त्याने माल दिला, की ही मंडळी खूश असतात, मग २५ टक्क्यांच्या ठिकाणी तुम्ही ५० टक्के नफा काढलात तरी हरकत नाही. मात्र पगाराच्या दिवशी पठाणाप्रमाणे वसुली करायला विसरू नका.

थोडा धंदा वाढला की, मग प्रत्येक ऑफिसात आपला एक एक एजंट नेमावा. त्याला ५ ते १० टक्के कमिशन देऊन धंद्याचा जम बसवावा. मात्र वसुली हे या धंद्याचं मर्म आहे. ते तुम्हाला जमलं नाही तर लाखाचे बारा हजार होतील. दलाली ही या धंद्याची खासियत आहे.

अनेक गुजराती लोक या धंद्यातील दलालीवर करोडपती झालेले आहेत. दलाली या लोकांच्या रक्तात इतकी भिनली आहे की, त्यांचे साहित्यिकही सुरेश दलाल, गुलाबदास ब्रोकर असे आहेत. तुम्ही दुकाना-दुकानांतून सॅम्पल दाखवीत ऑर्डर्स मिळवून कमिशन एजंट म्हणून लाखो रुपये कमवू शकता.

आणखी एक मार्ग म्हणजे एखादा बर्‍यापैकी टेलर गाठून त्याच्याशी करार करायचा. मग तुमच्या गिर्‍हाईकांना शर्ट व पँटच्या कापडाची सॅम्पल्स दाखवून या तुमच्या मित्राकडून ‘मेक टू ऑर्डर’ कपडे बनवून घ्यायचे. यात चांगला फायदा आहे.

या धंद्यात होलसेल, सेमी होलसेल, किरकोळ असे खरेदी तसेच विक्रीचे सर्व प्रकारच्या कपड्यांचे भाव पाठ असणे व कपड्यांची चांगली पारख असणे आवश्यक आहे. मात्र याला शॉर्टकट नाही. अनुभव आणि मेहनत घेऊन तुम्ही हे कसब आत्मसात करू शकता.

सुरुवातीला हे गुजराती व सिंधी लोक रोकड घेऊनच तुम्हाला माल देतील. काही दिवसांनी ते तुम्हाला क्रेडिट द्यायला लागतील आणि तुमचा जम चांगला बसला, की पैशासंबंधी एक अवाक्षर न काढता तुम्हाला घरपोच माल पोहोचवतील. विश्वास बसत नसेल तर हा धंदा करूनच बघा.

कितीही राखी सावंत आणि मल्लिका शेरावत आल्या आणि गेल्या तरी जोपर्यंत माणसाला लज्जा (तस्लिमा नसरीनची नव्हे) आहे, तोपर्यंत या धंद्याला मरण नाही.

(टीप : सुरुवातीला या धंद्यातील गुजराती व सिंधी समाजातील लोकांशी संपर्क वाढवा. त्यांच्याबरोबर धंदा सुरू करा. ते लोक तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील, कारण यात त्यांचाही फायदा आहे. घरगुती जिव्हाळ्याचे संबंध ठेवा. हळूहळू धंद्यातील सर्व लकबी जाणून घ्या. काही काळ गेल्यानंतर व आत्मविश्वास वाढल्यानंतर तुम्ही स्वतंत्रपणे हा धंदा करण्यात यशस्वी व्हाल.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?