उद्योजकात कोणते नेतृत्वगुण असायला हवेत?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


कॉर्पोरेट जगतात प्रत्येक विभागाचे एक व्यक्ती नेतृत्त्व करत असते, ज्याचे काम त्या विभागाचे काम सुरळीत चालण्यासाठी प्रणाली तयार करणे हे असते. ह्या सर्व नेत्यांचे नेतृत्व अलौकिक बुद्धिमत्ता असलेला एकच नेता करतो ज्याच्याकडे दूरदृष्टी असते, निर्णय घ्यायचे धाडस असते आणि दुसर्‍या फळीतल्या नेत्यांमध्ये समन्वय साधणे आणि नेत्यांकडून काम करून घ्यायची क्षमता असते.

हे गुण ज्या व्यक्तीकडे असतात अशीच व्यक्ती कंपनी समर्थपणे चालवू शकते, कंपनी टिकवू शकते आणि कंपनीसाठी नफा कमवू शकते.

नेतृत्व – प्रणाली की अहंकार?

एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे की, मेंदूचे प्राथमिक कार्य हे जगण्यासाठी चाललेली धडपड आहे. ह्या जगण्यासाठी चाललेल्या धडपडीमधून एखाद्या कामाची प्रणाली तयार करणार्‍या व्यक्तीला नेतृत्व दिले गेले; पण आजच्या ह्या स्पर्धात्मक जगात ह्या नेतृत्वगुणाला अहंकाराचा वारा लागला आणि सगळी गडबड सुरू झाली.

नेतृत्व संकल्पनेचे मूळ

आदिमानव काळामध्ये मानव जगण्यासाठी एकटा शिकार करायचा. जसे त्याला कळले, एकट्याने शिकार करणे कठीण जाते, तसे त्याने, दुसर्‍या मानवाला शिकारीसाठी मदतीला घेतले. जसे दोघांना कळले, शिकार करणे कठीण जाते, तसा त्यांनी मानवांचा समूह तयार केला.

आता समूहामध्येही गोंधळ निर्माण होऊ लागला. मग त्यांनी ह्या गोंधळावर विचार करून गट तयार केले. प्रत्येक गटाला वेगवेगळ्या प्रकारची कामे नेमून देण्यात आली. उदा. एक गट शिकार शोधेल, एक गट शिकार करेल, एक गट समूहासाठी जेवण करेल, एक गट समूहासाठी आसरा शोधेल, एक गट समूहांचे रक्षण करेल वगैरे.

जगण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामे तयार झाली. तरीही इथेही गोंधळ सुरू झाला. ह्यावर विचार होऊन प्रत्येक गटाला एक नेतृत्व देण्यात आले. ह्या नेतृत्व करणार्‍या व्यक्तीकडे एकच काम होते, तो ज्या गटामध्ये आहे, त्या गटासाठी त्या गटाच्या कामाची प्रणाली तयार करणे.

कॉर्पोरेट जगत आणि अलौकिक बुद्धिमान नेतृत्व

वरील गोष्टीमुळे एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, सर्व मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या वरील तत्त्वावरच काम करत आहेत. ह्या सर्व कंपन्यांमध्ये वेगवेगळे विभाग असतात. उदा. वस्तू/सेवा संशोधन, वस्तू/सेवा श्रेणी सुधारणा, ग्राहकाचे वर्गीकरण आणि त्याची वस्तू/सेवा विकत घ्यायची मानसिकता, मार्केटिंग, विक्री, मानव संसाधन, माहिती आणि तंत्रज्ञान, वित्त वगैरे.

ह्या प्रत्येक विभागाचे एक व्यक्ती नेतृत्व करत असते, ज्याचे काम त्या विभागाचे काम सुरळीत चालण्यासाठी प्रणाली तयार करणे हे असते. ह्या सर्व नेत्यांचे नेतृत्व अलौकिक बुद्धिमत्ता असलेला एकच नेता करतो ज्याच्याकडे दूरदृष्टी असते, निर्णय घ्यायचे धाडस असते आणि दुसर्‍या फळीतल्या नेत्यांमध्ये समन्वय साधणे आणि नेत्यांकडून काम करून घ्यायची क्षमता असते.

हे गुण ज्या व्यक्तीकडे असतात अशीच व्यक्ती कंपनी समर्थपणे चालवू शकते, कंपनी टिकवू शकते आणि कंपनीसाठी नफा कमवू शकते.

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजक आणि मृगजळीय नेतृत्व

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा वर्ग, खरेच उद्योग करत आहे की, स्वत:च्याच उद्योगात कर्मचारी म्हणून काम करत आहे, हा चक्रव्यूह समजून घेणे जरुरीचे आहे. बहुतांश उद्योजक एखादे तंत्र शिकतात, त्याचे प्रमाणपत्र/पदविका घेतात. उदा. फोटोग्राफर, शेफ, इंटीरिअर डिझायनर, वेबसाइट तयार करणे, डिजिटल मीडिया, मार्केटिंग सल्लागार वगैरे.

कुठलीही संस्था हे तंत्र घेऊन व्यवसाय सुरू कसा करायचा, व्यवसाय कसा चालवायचा, व्यवसाय कसा टिकवायचा, व्यवसायात नफा कसा मिळवायचा इत्यादी गोष्टी शिकवत नाहीत. जेव्हा त्यांच्या व्यवसायात प्रश्न निर्माण होतात, तेव्हा ह्या प्रश्नांची उत्तरे तो मोटिव्हेशनल ट्रेनर, पुस्तक, गूगल ह्या माध्यमांतून शोधत असतो आणि बहुतांश वेळा त्याला उत्तरे मिळत नाही आणि मग तो निराश होतो.

मग त्याची ‘निदान चिकित्सा’ सुरू होते. त्यापैकी एक म्हणजे नेतृत्व करण्याची क्षमता नसणे. मग तो नेतृत्व क्षमता विकसित करण्याच्या कार्यशाळेत प्रशिक्षण घेतो, जिथे साहजिक त्याला उत्तर मिळत नाही.

बर्‍याच जणांना प्रश्न काय आहे हेच माहिती नसते. त्यामुळे आजच्या सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योजकाची परिस्थिती अशी आहे की, तो कॉर्पोरेट कंपन्यांसारखे काम करायचे स्वप्न बघतो, पण त्याच्याकडे दूरदृष्टीचे नेतृत्व नसते आणि त्यामुळे हा उद्योजक कॉर्पोरेट स्वप्नांच्या मृगजळामध्ये अडकलेला असतो.

अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीकडे असलेले गुण

सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घेऊ या, हे गुण येतात कुठून? ह्याचे उत्तर आहे, ‘निसर्ग आणि संगोपन’. हे गुण नैसर्गिकरीत्या जनुकांद्वारे त्याच्याकडे आलेले असतात किंवा लहानपणापासून त्यांचे जे संगोपन झालेले असते, त्यांना जे वातावरण मिळते, त्यामुळे हे गुण विकसित होतात.

वर आपण साधारणतः दूरदृष्टी, निर्णय घ्यायचे धाडस आणि दुसर्‍या फळीतल्या नेत्यांमध्ये समन्वय साधणे आणि नेत्यांकडून काम करून घ्यायची क्षमता असे तीन गुण बघितले. आता आपण तपशीलवार ह्यांच्याकडे कुठले गुण असतात हे बघू या.

दूरदृष्टी – दूरदृष्टी म्हणजे पुढील पंचवीस वर्षांमध्ये राजकीय निर्णय, अर्थशास्त्रीय निर्णय, सामाजिक घडामोडी, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल, वातावरणातील बदल इत्यादी गोष्टींमुळे जगात आणि देशामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये काय बदल होऊ शकतात ह्याचे ठोकताळे अशा व्यक्तींना बांधता येतात आणि त्याप्रमाणे स्वतःच्या व्यवसायामध्ये सतत परिवर्तन करत असतात.

मेंदूची क्षमता – यांना आपल्या मेंदूच्या क्षमतेची पूर्ण जाणीव असते. ते आपल्या मेंदूच्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर करतात आणि जो मेंदूकडे कमकुवतपणा आहे, तो विकसित न करता, ते काम ते दुसर्‍यांकडून करून घेतात.

व्यावसायिक ओळख – आपल्या मेंदूच्या सामर्थ्याप्रमाणे औद्योगिक जगतात ते स्वतःची व्यावसायिक ओळख निर्माण करतात. आपल्या व्यावसायिक कामामुळे ग्राहकांमध्ये काय बदल होणार आहे ह्याची ह्यांना जाणीव असते.

व्यावसायिक कौशल्ये – आपल्या व्यावसायिक ओळखीप्रमाणे ते सतत व्यावसायिक कौशल्ये विकसित करत असतात.

शिकण्याची प्रवृत्ती – आपल्या मेंदूचे सामर्थ्य, व्यावसायिक ओळख आणि त्यासाठी लागणारे व्यावसायिक कौशल्ये ह्याचसाठी ते पुस्तके आणि कार्यशाळेमार्फत सतत शिकत असतात.

ध्येयासाठी प्रेरित राहण्याची प्रवृत्ती – स्वतःच्या ध्येयासाठी त्यांना 24/7 प्रेरित राहता येते, ह्यासाठी ते कोणावर अवलंबून नसतात. ध्येय आणि प्रेरणा ह्यातील फरक यांना समजतो.

विवेकी विचार (की सकारात्मक विचार) – बर्‍याच वेळा विवेकी विचार आणि सकारात्मक विचार समजण्यात गोंधळ होतो. उदा. सकारात्मक विचार म्हणजे मला दहावीच्या परीक्षेत 90% गुण हवेत आणि विवेकी विचार म्हणजे हे गुण मिळवण्यासाठी मला सतत अभ्यास केला पाहिजे, हा विचार करणे.

त्यामुळे साहजिकच 90% गुण मिळतात. ध्येय साध्य करण्यासाठी लागणारे विवेकी विचार कुठले करायचे ह्याची यांना जाणीव असते.

वेळेचे नियोजन – मला आज काय करायचे आहे, उद्या कुठली कामे करायची आहेत ह्याचा त्यांच्याकडे पूर्ण तपशील असतो. त्याप्रमाणे वेळेचे नियोजन होते.

मानसिक संतुलन – त्यांच्या पाचही इंद्रियांना भविष्यकाळात ज्या योजना/धोरणे आखायची आहेत त्याची संवेदना असते.

भावनिक संतुलन – चिंता, राग, नैराश्य इत्यादी विविध भावनांवर त्यांना नियंत्रण ठेवता येते.

संवाद कौशल्य – कुठे वाद (भूतकाळातील गोष्टी) टाळायच्या, कुठे संवाद (वर्तमानकाळातील काम) साधायचं आणि कुठे सुसंवाद (भविष्यकाळातील योजना/धोरणे) करायच्या ह्यात ते तरबेज असतात.

धोरणे/योजना – त्यांच्याकडे असलेल्या दूरदृष्टीचा वापर करून व्यवसायातील विविध विभागांसाठी आणि व्यवसायासाठी धोरणे/योजना तयार करून, त्या दुसर्‍या फळीतील नेतृत्वाकडून अंमलबजावणी योग्य वेळेत करून घेतात.

मूल्यप्रणाली – मूल्य म्हणजे कठीण समयात मला जो निर्णय घ्यायचा आहे तो कुठल्या निकषांवर घ्यायचा आहे त्या निकषांची क्रमवारी बनवणे. ह्यांच्याकडे पुढील घटकांची मूल्यप्रणाली तयार असते. 1. स्वतः, 2. संस्था, 3. वस्तू/सेवा, 4. ग्राहक, 5. कर्मचारी, 6. कुटुंब, 7. समाज.

व्यावसायिक तज्ज्ञांची मदत – त्यांना किंवा त्यांच्या कर्मचार्‍यांना पडलेल्या कुठल्याही प्रश्नांचे उत्तर ते मेंटॉर, सल्लागार, ट्रेनर आणि मानसोपचारतज्ज्ञांकडून घेत असतात.

निर्णय घेण्याची क्षमता – आपल्या निर्णयाने आजूबाजूच्या पर्यावरण, वातावरण, समाजावर काय नकारात्मक/सकारात्मक परिणाम होईल हाच विचार करून निर्णय घेतले जातात.

वारसा – त्यांना जाणीव असते की, मागील पिढीने जे काम केलेले आहे त्याची फळे आज आपण खात आहोत, त्यामुळे आज आपल्याला, आपल्यापश्चात पुढच्या पिढीसाठी वारसाहक्काने काही तरी सोडावे लागणार आहे, ह्या जाणिवेतून हे काम करत असतात.

अलौकिक बुद्धिमत्तेची व्याख्या

वाचून दम लागला असेल किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये एवढे सर्व गुण असतील का, अशी मनात शंका निर्माण होऊ शकेल. जर आपण अलौकिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे समजून घेतले तर तुम्हाला पटू शकेल की, एखादी व्यक्ती खरंच ह्या सर्व गोष्टी करू शकते. आजूबाजूला तुम्हाला अशी बरीच उदाहरणे दिसतील.

अशा व्यक्ती सर्वसामान्य माणूस जो विचार करतो त्याच्या पलीकडचा विचार हे लोक करतात. व्यापक दूरदृष्टी असल्यामुळे, त्यासाठी जे काम करावे लागते, त्यामुळे नेहमी  गुंतागुंतीचे प्रसंग उभे राहतात.  अशा वेळी ते मोठे चित्र साध्य करण्यासाठी सहज आणि शांतपणे काम करत असतात.

कुठल्याही प्रकारच्या तपशिलांमध्ये जास्त न अडकता, प्रत्येक कामाची छोट्या प्रमाणात विभागणी करून ही कामे संपावीत असतात. अशी छोटी कामे करत असताना, ती आपण एका मोठ्या, व्यापक गोष्टीसाठी करत आहोत ह्याची ह्यांना सतत जाणीव असते.  वेगवेगळ्या कल्पनांचे वेगवेगळे दृष्टिकोन ह्यांच्याकडे असतात, जे ह्यांना ध्यासपूर्वक साधता येतात.

ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे वेगवेगळ्या वरील विभागांत हे सर्वश्रेष्ठ बनत जातात आणि मोठे चित्र साध्य करण्यासाठी वेगवेगळे विभाग ह्यांना सांधता येतात आणि तेव्हाच तुम्ही सर्वश्रेष्ठ अलौकिक बुद्धिमान नेतृत्व असणारी व्यक्ती म्हणून ओळखले जाल.

सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योजकांनी ह्यातून काय बोध घ्यायचा

आपण वर विचार केला होता की, तुम्ही एक तंत्र शिकता आणि त्यात सर्वश्रेष्ठ होतात. त्यामुळे तुमचा उद्योग उभा राहत नाही आणि त्या उद्योगामध्ये तुम्ही कर्मचारी म्हणून काम करता आणि तुम्हाला प्रश्न पडतात की, माझा व्यवसाय टिकत का नाही? ग्राहक मिळत का नाहीत? मला व्यवसायात नफा मिळत का नाही? ह्या चक्रव्यूहामधून तुम्हाला बाहेर पडता येत नाही. मग चुकते काय? आपण काही उदाहरणे बघू या.

कॉर्पोरेट रुग्णालये – रुग्णाला (ग्राहक) बरे वाटावे म्हणून पॅथॉलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट वगैरे सगळे एका छत्राखाली आलेत.

सिनेमा – प्रेक्षकाला (ग्राहक) उत्तम सिनेमा देण्यासाठी दिग्दर्शक, लेखक, संगीतकार, नृत्य दिग्दर्शक, एडिटर वगैरे सगळे एका दृष्टीसाठी काम करतात.

बिल्डिंग व्यवसाय – आर्किटेक्ट, इंटीरिअर डिझायनर, सुतार, कायदा सल्लागार, होम लोन सल्लागार वगैरे एकत्र येऊन ग्राहकाच्या समाधानासाठी काम करत असतात.

ह्याचप्रमाणे तुमचा ग्राहक कोण आहे हे ओळखून त्याला लागणारे संलग्न सल्लागार कोण आहेत हे ओळखून हे सर्व सल्लागार जर एकत्र आलेत तरच तुम्हाला तुमचा व्यवसाय टिकवता येईल आणि नफा कमावता येईल. सर्व कॉर्पोरेट कंपन्या ह्याच तत्त्वावर काम करत आहेत. काम कठीण आहे म्हणूनच करायचे आहे. साधारण कार्य तर कोणीही करते.

– नितीन साळकर
(लेखक करिअर इंटलेक्ट सल्लागार आहेत.)
९३२१८९७९४१

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.