कोणताही व्यवसाय यशस्वी व्हायचा असेल तर केवळ पैसा, मशीन किंवा संसाधने पुरेशी नसतात. त्या व्यवसायाला योग्य दिशा देणारे आणि यशाच्या उंचीवर नेणारे खरे सामर्थ्य म्हणजे मनुष्यबळ. व्यवसाय व्यवस्थापनात मशीन, मनी, मटेरियल आणि मेन हे चार ‘एम’ महत्त्वाचे मानले जातात. यामध्ये सर्वांत संवेदनशील आणि प्रभावी घटक म्हणजे ‘मेन’ अर्थात माणूस.
यंत्रणा ठरलेल्या पद्धतीने काम करते; परंतु माणूस विचार करतो, भावना व्यक्त करतो, चुका करतो आणि अनुभवातून शिकतो. त्यामुळेच यशस्वी व्यवस्थापनासाठी योग्य मनुष्यबळ विकास, नेतृत्व कौशल्य आणि टीम व्यवस्थापन अत्यंत आवश्यक ठरते.
व्यवसाय व्यवस्थापनात मनुष्यबळाचे महत्त्व
कोणत्याही उद्योगाचे यश हे त्या उद्योगातील कर्मचार्यांवर अवलंबून असते. मशीन, पैसा आणि कच्चा माल हे अनेक कंपन्यांकडे समान प्रमाणात असू शकतात; परंतु मनुष्यबळाची गुणवत्ता प्रत्येक कंपनीला वेगळी ओळख देत असते.
योग्य कर्मचारी निवड, त्यांचे प्रशिक्षण, त्यांना प्रेरित ठेवणे आणि संस्थेच्या ध्येयाशी जोडून ठेवणे हेच यशस्वी व्यवस्थापनाचे खरे गमक आहे. कर्मचारी सहकार्य करणारे असतील तरच संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकते.
आज अनेक कंपन्या उभ्या राहतात, परंतु फार थोड्या कंपन्या जागतिक स्तरावर पोहोचतात. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचे नेतृत्व आणि कर्मचारी व्यवस्थापन.

इन्फोसिसचे उदाहरण : टीमवर्कमुळे मिळाले जागतिक यश
भारतातील आयटी क्षेत्रात अनेक कंपन्या स्थापन झाल्या; परंतु इन्फोसिसने जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली. यामागे केवळ भांडवल नव्हते, तर कर्मचार्यांची निष्ठा, प्रामाणिकता आणि टीमवर्क होते.
नंदन निलकेणी आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांसारख्या दिग्गजांनी कर्मचार्यांना कंपनीचा भागीदार बनविण्याचा दृष्टिकोन स्वीकारला. ‘एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम’मुळे कर्मचारी स्वतःला कंपनीचा मालक समजू लागले.
यामुळे कर्मचार्यांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली. प्रत्येक कर्मचारी कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आणि कंपनीची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी प्रयत्न करू लागला. हेच प्रभावी नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्याचे उत्तम उदाहरण मानले जाते.
यशस्वी व्यवस्थापन कौशल्य म्हणजे काय?
व्यवस्थापन कौशल्य हे केवळ पुस्तकातील सिद्धांत नसून अंमलबजावणीचे शास्त्र आहे. प्रत्येक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता म्हणजेच खरे व्यवस्थापन.
तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
🚀 अधिक माहितीयशस्वी व्यवस्थापक होण्यासाठी खालील गुण आवश्यक असतात :
- वेळेचे योग्य व्यवस्थापन
- निर्णयक्षमता
- भावनांवर नियंत्रण
- सकारात्मक दृष्टिकोन
- टीमला प्रेरित ठेवण्याची क्षमता
- संवाद कौशल्य
- पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा
व्यवस्थापकाने इतरांना वेळेचे महत्त्व सांगण्यापूर्वी स्वतः वेळेचे पालन केले पाहिजे. नेतृत्व हे शब्दांपेक्षा कृतीतून दिसले पाहिजे.

कर्मचारी व्यवस्थापन आणि भावनिक संतुलन
व्यवसायात प्रत्येक निर्णय भावनिकतेच्या आधारावर घेता येत नाही. अनेकदा संस्थेच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे भावनात्मक संतुलन राखणे हे व्यवस्थापन कौशल्यातील महत्त्वाचे अंग आहे.
कर्मचारी बहुधा स्वतःच्या अधिकारांबाबत जागरूक असतात; मात्र कर्तव्यांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती दिसून येते. यामुळे संस्था आणि कर्मचारी यांच्यात दरी निर्माण होते.
ही दरी कमी करण्यासाठी व्यवस्थापकाने कर्मचार्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांच्यात विश्वास निर्माण केला पाहिजे. संस्थेतील विश्वासाचे वातावरणच दीर्घकालीन यशाचे आधारस्थान ठरते.
टीम मॅनेजमेंटमध्ये सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व
प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमजोरी असते. कोणतीही व्यक्ती सर्वच बाबतीत परिपूर्ण असू शकत नाही. परंतु प्रत्येकामध्ये काही विशेष गुणही असतात.
यशस्वी व्यवस्थापक तोच, जो कर्मचार्यांच्या कमतरता शोधण्यात वेळ घालवत नाही; उलट त्यांच्या शक्तिस्थानांचा योग्य वापर करून संस्थेचे उत्पादन आणि कार्यक्षमता वाढवतो.
टीम मॅनेजमेंटमध्ये खालील बाबी महत्त्वाच्या ठरतात :
- कर्मचार्यांचे कौतुक करणे
- त्यांच्या गुणांना प्रोत्साहन देणे
- योग्य जबाबदाऱ्या देणे
- टीममध्ये समन्वय निर्माण करणे
- सकारात्मक वातावरण राखणे
सकारात्मक नेतृत्वामुळे कर्मचारी संस्थेशी भावनिकरित्या जोडले जातात आणि अधिक निष्ठेने काम करतात.
आणखी वाचा : उद्योजकात असायला हवेत हे दहा गुण
सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्याकडून मिळणारा व्यवस्थापनाचा धडा
सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी हे दोघेही महान क्रिकेटपटू आहेत; परंतु त्यांच्या नेतृत्वशैली वेगळ्या होत्या. सचिन तेंडुलकर हा विक्रमांचा बादशाह होता; परंतु नेतृत्वाच्या भूमिकेत तो फारसा यशस्वी झाला नाही. दुसरीकडे, महेंद्रसिंग धोनीने शांत स्वभाव, संयम आणि सकारात्मक नेतृत्वाच्या जोरावर भारतीय संघाला अनेक यश मिळवून दिले.
या उदाहरणातून एक महत्त्वाचा व्यवस्थापन धडा मिळतो — प्रत्येक व्यक्तीची ताकद वेगळी असते. स्वतःची क्षमता ओळखून योग्य क्षेत्रात काम करणे हेच खरे नेतृत्व आहे.

व्यवस्थापनातील कर्णधार कसा असावा?
यशस्वी व्यवस्थापक किंवा कर्णधार हा केवळ आदेश देणारा नसतो. तो टीमला सोबत घेऊन चालणारा नेता असतो.
एक प्रभावी व्यवस्थापक खालील गुणांनी परिपूर्ण असतो :
- संयमी
- मितभाषी
- सकारात्मक
- निर्णयक्षम
- प्रामाणिक
- टीमला प्रेरित करणारा
- संस्थेच्या हिताला प्राधान्य देणारा
व्यवस्थापनातील खरा कर्णधार तोच असतो, जो स्वतःच्या कृतीतून आदर्श निर्माण करतो आणि टीममधील प्रत्येक सदस्याला पुढे घेऊन जातो.
आजच्या स्पर्धात्मक युगात व्यवसाय व्यवस्थापनात मनुष्यबळाचे महत्त्व अधिक वाढले आहे. यशस्वी व्यवस्थापनासाठी केवळ आर्थिक संसाधने पुरेशी नसतात; तर योग्य नेतृत्व, सकारात्मक टीम मॅनेजमेंट आणि कर्मचार्यांशी विश्वासाचे नाते आवश्यक असते.
व्यवस्थापन कौशल्य म्हणजे परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्याची कला. जो व्यवस्थापक टीममधील सकारात्मकता वाढवतो, कर्मचार्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देतो आणि संस्थेच्या हिताला सर्वोच्च स्थान देतो, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी कर्णधार ठरतो.
– विश्वास पाठक
आणखी वाचा : यशस्वी उद्योजकांसाठी वेळ व्यवस्थापनाचे १० नियम
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

