दिव्यानं दिवे उजळीत जाताना एखादा दिवा पेटला नाही तर जरा थांबून त्याला पुन्हा एकदा प्रकाशाचा हात द्या, प्रेमाची साथ द्या, उद्यमतेची वात द्या… ऊर्जेची ज्योत द्या… कारण त्याला तसंच विझलेलं सोडून खर्या अर्थानं आपली दिवाळी साजरी होऊच शकत नाही.
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव… ऊर्जेचा महोत्सव… अंधार दूर करून दिव्यांचा झगमगाट जीवन उजळवतो, पण केवळ घरातील दिवेच नव्हे, तर प्रत्येक उद्योजक स्वत:च्या मनातही एक दिवा पेटवतो; तो म्हणजे स्वप्नांचा, संघर्षांचा आणि जिद्दीचा.
उद्योजकतेचा प्रवास हा कधीच साधा-सोपा किंवा सुरळीत नसतो.
सुरुवातीला अपयशाची भीती, पैशांची अडचण, बाजारातील स्पर्धा आणि घरचे, नातेवाईक, शेजारी व समाजाकडून न मिळणारी साथ आणि नकारात्मक टोमणे, त्यानंतर प्रत्येक पावलावर येणार्या असंख्य अडचणी…
असं सर्व प्रचंड भयंकर अंधाराने वेढलेलं वातावरण. पण हाच तो क्षण असतो, जेव्हा तुमच्यासारखा एखादा स्मार्ट उद्योजक ठरवतो की, कितीही अंधार असला तरी मी माझा उद्योजकतेचा दिवा पेटवणारच.
हा दिवा ध्येयाचा, ध्यासाचा आणि धैर्याचा. हा दिवा जेव्हा पेटतो, तेव्हा हळूहळू आशेचा प्रकाश पसरू लागतो. हाच प्रकाश त्याला नवे विचार सुचवतो, नवे मार्ग दाखवतो. हाच प्रकाश त्याच्या टीममध्ये ऊर्जा निर्माण करतो आणि हाच प्रकाश ग्राहकांच्या विश्वासाला उजाळा देतो.
सुरुवातीला छोट्याशा ज्योतीसारखा दिसणारा हा मिणमिणता दिवा कालांतरानं धगधगत्या मशालीचे स्वरूप घेतो. दिवाळीच्या दिव्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कधीच एकटे उजळत नाहीत. एक दिवा दुसर्या दिव्याला उजळवतो आणि मग एकत्रित उजेडात सगळं विश्व सुंदर दिसतं.
उद्योजकतेतही हेच घडतं. एक उद्योजक जेव्हा यशस्वी होतो, तेव्हा तो फक्त स्वत:साठीच नव्हे; तर आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कर्मचार्यांसाठी, समाजासाठी आणि देशासाठीही एक नवा प्रकाश निर्माण करतो.
आजच्या काळात स्मार्ट उद्योजक म्हणजे फक्त नफा कमावणारा व्यापारी नाही, तर मूल्य निर्माण करणारं नेतृत्व आहे. जो काळाच्या पुढे विचार करतो, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करतो, ग्राहकांच्या भावना ओळखतो आणि समाजाशी नाते जपतो. हा उद्योजक म्हणजे समाजाच्या अंधार्या कोपर्यात दिवा लावणारा एक दीपस्तंभच आहे.
उद्योजकाची नैतिक व सामाजिक बांधिलकी हाच खरा त्याचा खजिना आहे. फक्त पैसा कमावणे ही उद्योजकतेची मर्यादा नाही, तर रोजगारनिर्मिती, ग्राहकांशी प्रामाणिक व्यवहार, पर्यावरणपूरक कार्यभार, महिला व तरुणांना रोजगाराची संधी देणे, आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी हातभार लावणे हीदेखील त्याची जबाबदारी आहे. दिवाळीप्रमाणेच उद्योजकतेनेही ‘सर्वांसाठी प्रकाश’ हा विचार अंगीकारला, तरच खरी प्रगती साध्य होते.
दिवाळी आपल्याला शिकवते अंधार कितीही गडद असला तरी एका लहानशा ज्योतीसमोर त्याला मागे हटावंच लागतं. तसंच उद्योजकतेचा प्रवास कितीही कठीण असो, जिद्दीपुढे आणि सकारात्मक विचारांसमोर अडचणींना मागे सरावंच लागतं. म्हणूनच प्रत्येक उद्योजकाने आपल्या मनात ठाम विश्वास ठेवायला हवा की, माझा दिवा माझं जग बदलणारच!
आज अनेक तरुण उद्योजक स्वप्नं बाळगून उभे आहेत. काही अपयशामुळे मागे सरकतात, तर काही भीतीमुळे पुढे पाऊलच टाकत नाहीत, पण लक्षात ठेवा जर दिवा पेटवायचा धीर नसेल, तर अंधार कायम राहणारच. म्हणून दिवाळीचा हा संदेश प्रत्येक उद्योजकासाठी आहे. आपला दिवा पेटवा. कितीही छोटा असला तरी त्याचा प्रकाश नक्कीच पसरतो.
या दिवाळीत फटाके, मिठाई आणि आनंदासोबत आपण आपल्या उद्योजकतेचाही उत्सव साजरा करूया. आपल्या यशाचा दिवा इतरांच्या जीवनात उजेड पसरवतो आहे का, हे स्वत:ला विचारूया. कारण खरी दिवाळी तीच, जी फक्त आपल्या घराला नव्हे, तर समाजालाही प्रकाशमान करते.
स्मार्ट उद्योजकांसाठी दिवाळीचा संदेश
- १. स्वत:चा दिवा पेटवा : स्वप्न कितीही छोटं असो, पहिलं पाऊल उचललं तरच अंधार दूर होतो.
- २. प्रामाणिकतेचा प्रकाश पसरवा : ग्राहक, कर्मचारी व समाजाशी प्रामाणिक राहिल्यास विश्वासाचा दिवा कायम उजळतो.
- ३. टीमसोबत उजळा : एकटा दिवा कमी प्रकाश देतो; पण टीमसोबतची ऊर्जा मोठं जग उजळवते.
- ४. नवीनतेचा दिवा जपा : काळाबरोबर तंत्रज्ञान, डिझाईन व बाजारपेठेतील बदल स्वीकारा.
- ५. सामाजिक बांधिलकीचा दिवा विसरू नका : रोजगार, पर्यावरण, महिला व तरुणांना संधी देणे ही खरी दिवाळी आहे.
- ६. अपयशाला अंधार मानू नका : ते फक्त तुमच्या पुढील प्रकाशयात्रेची पायरी आहे.
- ७. दीर्घकालीन विचार करा : नफा आजचा असतो; पण मूल्यनिर्मिती ही भविष्यातील पिढ्यांसाठी असते.
– ब्रँडबाँड निलेश बी+
(लेखक डिझायनर, कोच आणि ब्रँड सल्लागार असून त्यांनी ‘उद्योगऊर्जा’ या फोरमचे संस्थापक आहेत. त्यांनी ब्रँडिंग या विषयावर ‘सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा’ हे पुस्तक लिहिलं आहे.)
संपर्क : 8879230443


