व्यापार फलज्योतिष

“लक्षाधीश ज्योतिष्यांची सेवा घेत नाहीत, पण अब्जाधीश घेतात” : जे. पी. मॉर्गन

एक पंजाबी म्हण आहे – ‘तोला अक्ल काम ना आवंदा राऊ रत्ती तकदीर दी करामादी!’ एक तोळा म्हणजे शंभर रत्ती. एक तोळाभर बुद्धी कामी येत नाही, पण एक रत्ती भाग्य चमत्कार घडवू शकते. हे रत्तीभर भाग्य आपल्याकडे वळवून घ्या!

‘हे अर्जुना, असे जाणून घे की, प्रत्येक कृती सफल होण्यासाठी पाच कारणे असतात. अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची कारणे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि पाचवे कारण म्हणजे दैव होय.’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय 18, श्‍लोक 14.

बदलत्या व्यापारी वातावरणात स्थानिकांच्या कुंडल्यांचे विशेष तंत्रउद्योगीय विश्‍लेषण करण्यावर व्यापार फलज्योतिषाचा भर असतो. विद्यमान व्यापारी वातावरणाच्या संबंधात स्थानिकांचा दृष्टिकोन, ग्रहणशक्ती व अंगभूत क्षमतांचे विश्‍लेषण करण्यावर ते लक्ष केंद्रित करते. या बदलत्या घटकांचा योग्य मेळ घातल्यावर लाभदायी व्यापार संस्था तयार होते.

आपली मूलभूत शक्तिस्थाने, नाजूक जागा, कल आणि पूर्वमांडणी या व्यक्त अथवा अव्यक्त गोष्टी आपल्या कुंडलीमधून प्रकट होतात. एखाद्या कार्यासाठी कोणती वेळ अनुकूल वा प्रतिकूल आहे हे आपल्याला फलज्योतिषाच्या माध्यमातून जाणून घेता येते. आपल्यासाठी बाधा सिद्ध होणार्‍या कलांबाबत आणि ज्यायोगे प्रगती घडून येऊ शकते अशा प्रकारच्या उपयोगी कलाचीही माहिती आपल्याला होऊ शकते.

विशिष्ट वेळ आपल्याला साथ देईल अथवा नाही हेसुद्धा आपल्याला माहीत होते. चांगली वेळ आली असता झपाट्याने प्रगती साधणे आणि योग्य वेळ नसताना टिकून राहणे आपल्याला शक्य होते. व्यापार फलज्योतिष वेळ, अवकाश, कंपने आणि विचार यांच्याशी संबंधित आहे. आपल्या धंद्याचा चांगला जम बसविण्यासाठी हे सर्व घटक उपयुक्त ठरू शकतात.

हे आपणास आपले उत्पादन, उद्योग, स्थान, बाह्य भागाची सजावट आणि आपल्या अंगभूत क्षमता आणि व्यक्त बलस्थाने यांचा अंतस्थ वापर कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन करते. हे विश्‍लेषण, संयोग, उपयोग आणि वेळेचा वापर यावर लक्ष ठेवून समृद्धी व अंगभूत क्षमतांशी संबंधित आहे.

आपल्या सभोवती निरखून पाहा. फास्ट फूड साखळी, मॅकडोनल्ड्स, वेंडीज आणि बर्गर किंग यांचा विस्तार होत आहे त्याच वेळी बर्गर शेफ, हॉवर्ड जॉन्सन्स आणि व्हाइट टॉवर यांच्यावर धंदा बंद करण्याची पाळी ओढवली आहे. क्लोजर होम, नोकिया, ब्लॅकबेरी यांच्यासारखे लोकप्रिय ब्रँड्स जीवंत राहण्यासाठी संघर्ष करीत आहेत, तर त्याच वेळी सॅमसंग, मायक्रोमॅक्स त्याच बाजारपेठेत आपला विस्तार घडवून आणत आहेत.

कोणत्याही व्यापारधंद्याचे उदाहरण घ्या, काही जण अगदी शिखरावर पोहोचल्याचे आपल्याला आढळून येते, तर काही जणांनी अगदी तळ गाठलेला आहे असेही दृष्टीस पडते. सफलता आणि समृद्धी ही काही धंद्याच्या स्वरूपावर अवलंबून नसते. ती तर बाजारपेठेची गरज ओळखून ती भागविण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. ‘समर्थ तोच टिकेल’ हाच मंत्र आहे.

ज्या बाजारपेठेत आपण समर्थ सिद्ध होऊ शकता तेथे आपण चांगले प्रदर्शन करू शकता आणि जास्त काळ टिकाव धरू शकता. व्यापार फलज्योतिष ही आपली अंगभूत क्षमता क्षेत्रे हुडकून काढण्याचा प्रयत्न करते.

आपली कुंडली म्हणजे आपल्या जन्मस्थानाहून आपल्या जन्माच्या वेळेस घेतलेला अवकाशाचा ‘स्नॅपशॉट’ होय. कुंडली म्हणजे काळ आणि स्थळ यांचे चित्रच होय. हाच काळ जर अवकाशाशी जोडला गेला तर तो एक वैशिष्ट्यपूर्ण संयोग ठरतो ज्यावर प्रत्येक व्यक्ती जन्मलेली असते.

आपल्यासारखा येथे कोणीच दुसरा नसतो. आपण आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून काही तरी ग्रहण करीतच आपल्या जीवनात पुढे पुढे वाटचाल करीत असतो. ही गोष्टच आपले अंतर्बाह्य व्यक्तिमत्त्व घडवीत असते. व्यक्तिमत्त्व विकासाच्या विशेष पैलूंकडे व्यापार फलज्योतिष निर्देश करीत असते.

ज्या काळ-अवकाश सातत्यात आपला जन्म झालेला असतो त्याच्याच संदर्भात आपल्या सर्व क्रिया घडत असतात. अवकाश-काळ सातत्याच्या माध्यमातून आपल्या ठायी जी गुणवत्ता लाभलेली आहे तिला तपासून पाहण्याची संधी आपल्याला फलज्योतिषाच्या अभ्यासातून लाभते. एखादा ज्योतिषी आपली बलस्थाने आणि कमकुवत जागा आपल्याला हेरून सांगू शकतो.

आपल्या आवडीची व आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल अशा प्रकारच्या कामधंद्याची माहिती तो आपल्याला करून देऊ शकतो, की ज्याबाबत आपण स्वतः अनभिज्ञ असतो. सतत चालत असणार्‍या काळाचा स्वभाव समजून सांगण्यात तो आपले मार्गदर्शन करू शकतो. आपल्यासाठी योग्य असणार्‍या विविध कामधंद्यांतून तो सध्याच्या काळाला अनुकूल अशा प्रकारच्या कामाकडे तो इंगित करू शकतो. (चलित विश्‍लेषण).

आपला कार्यविस्तार करण्यास अनुकूल वेळ तो सांगू शकतो तसेच सर्व काही एकत्रित करून त्या कामातून बाहेर पडण्याचा योग्य काळदेखील तो सांगू शकतो. त्याचप्रमाणे व्यापार फलज्योतिषी आपणास आपल्या व्यवसायाच्या ठिकाणाच्या संदर्भात उदा. देश, शहर, स्थान त्याचप्रमाणे वास्तू, सज्जा आणि ऊर्जा शक्ती यांच्या संदर्भात आपल्या सध्याच्या व्यवसाय स्थळाबाबतसुद्धा मार्गदर्शन करू शकतो.

आपल्यात कोणत्या गुणांचा अभाव आहे आणि तो दूर करण्यासाठी बाहेर काम सोपविणे, भागीदारी करणे अथवा भाडेतत्त्वावर सेवा घेणे अशा प्रकारचा सल्ला तो आपणास देऊ शकतो. व्यापार फलज्योतिषाची भाकिते ही नेमकी आणि अल्पकालीन असतात. दीर्घकाळाचा विचार करता धंद्यात कोणीही मात खाऊ शकतो. दीर्घकाळ कोणताही व्यवसाय टिकू शकत नाही.

प्रत्येक धंद्यात चढउतार हे होतच असतात. सर्वसाधारण फलज्योतिषात भाकिते ही वर्षांच्या संदर्भात केली जातात, मात्र व्यापार फलज्योतिषात ही भाकिते दिवस, आठवडे आणि जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या अल्पकाळाच्या संदर्भात केली जातात. यामुळे आपण स्वतः आणि आपला व्यापार याबाबत आपल्याला तथ्ये कळतात तसेच आपण चांगले निर्णय घेऊ शकता आणि आपल्याला यश मिळण्याच्या चांगल्या संधीही समोर येतात.

जे व्यापार-व्यवसायात पदार्पण करू इच्छितात आणि जे सध्या व्यापार व्यवसायात आहेत अशा दोन्ही वर्गांना व्यापार ज्योतिषाचा उपयोग होऊ शकतो. व्यापार ज्योतिष सत्रात पुढील गोष्टींचा समावेश होतो : स्वभाव, बलस्थाने आणि कमकुवत स्थाने, कौटुंबिक/सामाजिक/शैक्षणिक पार्श्‍वभूमी,

काळ विश्‍लेषण : कामधंदा चालू करण्यासाठी ही वेळ योग्य आहे का?

कामधंद्याचे स्वरूप : उत्पादन, व्यापार, सेवा, उत्पादन वा सेवा यांचे स्वरूप, नोकरीसारखा धंदा अथवा धंद्यासारखी नोकरी, गृहकार्यालय/भाड्याचे कार्यालय/स्वतःचे कार्यालय, लाभ, समस्या आणि भागीदारीसाठी समयमर्यादा, संभाव्य अडथळे आणि उपाययोजना, सहयोगी कार्य/विक्षेप कार्य, भाग्यशाली दिवस/रंग/संख्या, कार्य समयसारणी, चांगल्या यशासाठी भागीदारीची शक्यता, भागीदारांत कार्यविभाजन, विस्तार व विकास शक्यता आदी.

सारांश : विविध प्रकारच्या कुंडल्यांच्या संदर्भात भौतिक प्रकटीकरणावर आधारित अल्पकालीन भाकिते सांगणारे व्यापार फलज्योतिष हे आपल्या पुरातन फलज्योतिषशास्त्राचे व्यापारजगताला लागू करण्यात आलेले एक विशेष, तपशीलवार आणि थेट स्वरूपाचे शास्त्र आहे. आपल्या अंगभूत क्षमता आणि गुणवत्ता यांच्या आधारावर व्यवसायाची निवड करणे व तो चालविणे यासाठी हे शास्त्र आपल्याला मदत करते. तसेच आपले उपजत कौशल्य परिणामकारकरीत्या वापरण्यास ते आपल्याला मदत करते.

केस स्टडीज

आपण जेव्हा फलज्योतिषाविषयी बोलतो तेव्हा आपण तटस्थ राहू शकत नाही. जेव्हा मी माझी ओळख व्यापार फलज्योतिषी अशी करून देतो तेव्हा तुमचे मन लगेच एखाद्या फलज्योतिषाबद्दल विचार करू लागते ज्याला तुम्ही मागे कधी भेटला असाल अथवा ज्याचा आपणास अनुभव आला असेल; पण ते चित्र माझ्याशी मिळतेजुळते असू शकत नाही. यामुळे या परिस्थितीत ज्ञानापेक्षा अज्ञानच अधिक परवडले, असे म्हणता येईल.

व्यापार फलज्योतिष हे आपल्यासमोर काही विचित्र कल्पना अथवा दंभ म्हणून सादर करण्यात आलेले नाही. यात अनेक निव्वळ तांत्रिक स्वरूपाच्या बाबी वगळल्या आहेत. या परिभाषेपेक्षा हा विषय जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या व्यापार फलज्योतिषावरील मालिकेत आपण एकूण 12 केस स्टडीजचे विवेचन करणार आहोत. आपणास काही शंका आणि प्रश्‍न असल्यास आपण ते सोबतच्या इ-मेलवर पाठवावेत.

केस स्टडी 1

पैसा रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात तयार होत नाही!

व्यापार फलज्योतिषावर आधारित सल्ला घेण्यासाठी माझ्याकडे एक तरुण जोडपे आले होते. त्या तरुणाने रसायनशास्त्रात बी.एस्सी. केल्यानंतर व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते, तर त्याच्या पत्नीकडे कॅटरिंगची पदवी होती.

या जोडप्याने कार्पोरेट सेक्टरमध्ये पाच वर्षे नोकरी केली होती. त्यानंतर व्यवसाय करण्याचे ठरवून त्यांनी जिल्ह्याच्या मध्यभागात एक छोटे रेस्टॉरंट उघडले होते. व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते तसेच जवळची पुंजी भांडवल म्हणून वापरली होती.

त्यांचा व्यवसाय मात्र मनाजोगता चालत नव्हता. त्यांनी जसा विचार केला होता त्या प्रमाणात त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहक येत नव्हते. त्यांनी मेन्यू विचारपूर्वक ठरवला होता; पण तो ग्राहकांना पसंत पडत नव्हता. बहुतेक दिवसांत बरेचसे अन्नपदार्थ वाया जात होते, तर काही दिवसांत अन्नपदार्थ ग्राहकांना देण्यात तोकडे पडत होते. त्यामुळे ग्राहकांचा संतोष अपेक्षेपेक्षा घटलेला दिसत होता; पण कर्जाचा बोजा मात्र वाढतच चालला होता. त्यांनी आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी त्यांना शक्य होते तितके प्रयत्न करून पाहिले.

जाहिरात करणे, मेन्यूमध्ये बदल करणे, स्पेशल ऑफर्स, किंमत कमी करणे, सजावटीत बदल करणे इत्यादी. आता काय करावे हे त्यांना सुचेना. दोघेही त्या व्यवसायात पूर्णवेळ लक्ष घालत होते. पती ग्राहकांची टेबले व काऊंटर सांभाळत असे आणि बाहेरची आवश्यक कामे करीत असे, तर पत्नी स्वयंपाकघराकडे तसेच कर्मचार्‍यांकडे लक्ष देत असे. त्यांना माझ्या आधीच्या क्लाएंटने माझ्याकडे येण्यास सुचविले होते.

त्यांचे पदार्थ चांगले असत, ग्राहक मेनूची तारीफही करीत असत, रेस्टॉरंटचे ठिकाणही अगदी मोक्याचे होते. ती तरुणी अगदी चांगली पाककलानिपुण होती. ती स्वयंपाकघराकडे अगदी उत्तम प्रकारे लक्ष देत असे आणि कर्मचारी तिच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असत. तिचा नवरा काऊंटर सांभाळत असे व बाहेरच्या कामाकडे लक्ष देत असे.

मात्र महिन्याच्या शेवटी त्यांना आपल्या बचतीतून पैसे काढावे लागत अथवा व्यवसाय चालविण्यासाठी आणखी कर्ज काढावे लागत असे. या क्षेत्रात तीन वर्षे घालविल्यानंतर त्यांच्या बचतीला ओहोटी लागली. कर्जाचा बोजा वाढला आणि यातून बाहेर निघण्याचा त्यांना काहीच मार्ग गवसेना.

व्यापार ज्योतिषाची मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने मी त्या दोघांच्या कुंडल्यांचा काळजीपूर्वक अभ्यास केला. भौतिक प्रकटीकरणावर भर देत ग्रहयोगाच्या माध्यमातून व्यवहार्य निर्णय घेण्यावर व्यापार फलजोतिषाचा विशेष भर असतो. उदा. जर एखाद्याला मंगळ असेल तर तो भिडस्तपणामुळे सेल्स जॉब करू शकणार नाही. हा सल्ला तितकासा उपयुक्त ठरू शकत नाही.

मंगळाचे स्थान काय आहे हे आपल्याला पाहावे लागते. त्याचा विकास कसा होतो आहे आणि त्याच्या विकासाचा सध्याच्या परिस्थितीवर नेमका कसा प्रभाव पडतो आहे. उदा. मंगळ असलेल्या मनुष्याचा मंगळ समजा दुसर्‍या घरात असेल (जर आपल्या कुंडलीतील पहिल्या, दुसर्‍या, चौथ्या, सातव्या अथवा आठव्या घरात जर मंगळ असेल तर त्या व्यक्तीला मंगळ आहे असे म्हणतात.) तेव्हा अशा व्यक्तीला संयम नसतो, तो पटकन बोलतो आणि बोलताना भडक, एवढेच नव्हे तर शिवराळ भाषाही वापरू शकतो.

त्याला धूम्रपानाची आवड असू शकते अथवा तो पान-तंबाखू चघळणारा असू शकतो. मात्र त्याचे हे गुणधर्म कशा पद्धतीने वृद्धिंगत होतात हे त्याच्या अवतीभवतीच्या वातावरणावर अवलंबून असते. या गोष्टी वृद्धिंगत होताना आपल्याला आढळल्या तर एखाद्या साडीच्या दुकानातील सेल्समन म्हणून ही व्यक्ती योग्य ठरणार नाही, कारण येथे जास्त करून महिला ग्राहकच येतात आणि त्या आवडनिवड व पसंतीसाठी भरपूर वेळ घेतात.

मात्र हीच व्यक्ती दादरसारख्या गर्दीच्या ठिकाणी कानातील आभूषणे, फॅशन ज्वेलरी आणि जेडेड बांगड्या यांसारख्या स्वस्त वस्तूंचा विक्रेता म्हणून यशस्वी होऊ शकतो. मात्र येथेही बहुतांश ग्राहक वर्ग हा महिलांचाच असतो. बघितला ना फरक!

व्यापार फलज्योतिषी याला फलज्योतिषाचे अगदी सूक्ष्म ज्ञान असणे आवश्यक असते व त्याचबरोबर प्रत्येक व्यवसायात यशस्वी होण्यासाठी जे गुण व कौशल्ये आवश्यक असतात त्याचीही उत्तम समज आवश्यक असते. आपल्या क्लाएंटचा व्यवसाय व्यवस्थित समजून घेण्यासाठी त्याला अगदी खोलवर जाऊन योग्य ते प्रश्‍न विचारावे लागतात. तसेच क्लाएंटच्या कामकाजाबाबतही पुरेशी माहिती घेऊन सल्ला द्यावा लागतो.

हॉटेल व्यवसाय हा मुख्यत्वे मोक्याच्या ठिकाणावर अवलंबून असतो. वेगवेगळ्या ग्राहकांच्या वेगवेगळ्या चवींचे समाधान त्यांना द्यावे लागते. हॉटेलच्या परिसराला अनुसरून मेन्यू असायला पाहिजे. या मूलभूत आवश्यकता म्हणाव्या लागतील. उदा. सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट या ठिकाणी दुपारच्या वेळेस मोठा ग्राहकवर्ग असतो आणि तो बिझनेस क्लासचाच असतो.

त्यांना अगदी झटपट व प्रोफेशनल सेवा हवी असते. यामुळे त्यांना वेळ घेऊन तयार होणार्‍या बिर्याणीपेक्षा झटपट मिळणारी गरमागरम इडली हवी असते; पण हाच ग्राहकवर्ग जर कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर आला असेल तर वेळ घेऊन तयार होणारी डिशही त्यांना चालू शकते. तेव्हा हॉटेल व्यवस्थापनात ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ ही गोष्ट लक्षात घेऊन भिन्न रुचीच्या ग्राहकवर्गाला सेवा पुरवावी लागते.

फलज्योतिषाच्या भाषेत सांगायचे तर ही गोष्ट सातव्या घराकडे निर्देश करीत असते. (जनसंपर्क, सेवा, हॉस्पिटॅलिटी, समजूतदार वृत्ती, भागीदारी), जेथे चंद्र आणि व्हिनस असते. जेव्हा साथ देणारी दशा सुरू असते तेव्हा त्याची चांगल्या हॉटेल व्यावसायिकाला मदतच होते.

मी या दोघांच्याही कुंडल्यांचा व्यवस्थित अभ्यास केला आणि वर उल्लेख केलेले कोणतेही घटक त्यांच्या कुंडल्यांत पुरेसे बलशाली नाहीत हे माझ्या लक्षात आले. त्यांच्या गुणकौशल्यांना हॉटेल व्यवसाय हा उचित ठरत नव्हता.

“पण आम्ही तर आमची आयुष्यभराची बचत या व्यवसायात ओतली आहे!” ते दोघे म्हणाले.

“चिंता करू नका. तुम्ही कशात चांगले आहात हे आपण पाहू या!” मी त्यांना आश्‍वासक सुरात सांगितले.

मी कुंडल्या पाहिल्या तर पतीच्या सहाव्या घरात बुध अगदी शक्तिशाली होता, तर बायकोच्या सहाव्या घरात गुरूसुद्धा उत्तम स्थितीत दिसत होता. सहावे घर म्हणजे कंबर कसून अनेक दिवस परिश्रम करण्याची तयारी दर्शवते. हे तर लंबी रेसचे घोडे दिसत होते. जर पदार्थात सगळे घटक योग्य प्रमाणात असतील तर तो चांगला चविष्ट बनतो, त्याचप्रमाणे ग्राहकांची संख्या लक्षात घेता त्यांना किती पदार्थ पुरेसा ठरेल ते जाणता यायला हवे.

मी ही गोष्ट त्यांना सांगितली व त्यांना ही गोष्ट मान्य झाली. पती हा खरोखरच चांगला आचारी होता; पण त्याच्याकडे औपचारिक पदवी नव्हती. तो रेसिपी बनविण्यात निष्णात होता. मी ही गोष्ट ध्यानात घेऊन त्यांना सुचविले की, त्यांचे योग्य क्षेत्र हे कॅटरिंग आहे, हॉटेल व्यवसाय नव्हे!

त्यांच्या लक्षात येईना, कारण रेस्टॉरंट चालविणे आणि कॅटरिंग सेवा देणे हे काम त्यांना एकसारखे वाटत होते. व्यापार फलज्योतिषात अशा प्रकारच्या गैरसमजुती काढून टाकणे आवश्यक होत असते.

कॅटरिंग व हॉटेल व्यवसायात समान घटक म्हणजे पदार्थ तयार करणे, मात्र येथेच हे साम्य संपते. कॅटरिंगमध्ये एकाच ग्राहकाला संपूर्ण मेनूची सेवा द्यावी लागते. मग ती ऑर्डर पन्नास प्लेट्सची असेल किंवा पाचशे प्लेट्सची. आपल्याला ही सेवा ग्राहकाच्या दारात नेऊन द्यावी लागते अथवा एखाद्या हॉलच्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी लागते.

एकच स्थळ, एकच मेनू, एकदाच सेवा, एकच ग्राहक. त्याचप्रमाणे मेनू, चव, मालमसाला गरजेनुसार बदलता राहतो. ग्राहकांची इच्छा आणि बजेट पाहावे लागते. एकाच ग्राहकाकडून मोठी ऑर्डर मिळत असते आणि स्थळे वेगवेगळी असतात.

बुध या ग्रहाचा कॅटरिंगमध्ये मुख्य प्रभाव जाणवतो. काही हंगामांत कॅटर्रसना चोवीस तास अविश्रांत मेहनत करावी लागते, तर काही हंगामांत नुसते बसून राहावे लागते. या व्यवसायाची प्रसिद्धी आणि वाढ ही मुख्यत्वे कॅटर्रसच्या पाककौशल्यावर अवलंबून असते आणि ‘माऊथ टू माऊथ पब्लिसिटी’ घडून येते. हीसुद्धा संतुष्ट अशा थोडक्या ग्राहकांवर अवलंबून असते.

जर आपण मुंबईतील पाच उत्कृष्ट रेस्टॉरंट्सची नावे विचारली तर तुम्हाला वीस रेस्टॉरंट्सची यादी मिळू शकेल; पण जर आपण उत्कृष्ट पाच कॅटर्रसची नावे विचारली, तर कदाचित तुम्हाला असे उत्तर मिळू शकेल की, मागे मी अमुक अमुकच्या घरी जेवणासाठी गेलो होतो तेव्हा तेथे अतिशय सुंदर जेवण होते किंवा असे उत्तर मिळू शकते की, मागे मी अमुक अमुकच्या लग्नात गेलो होतो तेव्हा तेथे अतिशय सुंदर मेनू होता. मुद्दा समजला ना!

म्हणून या जोडप्यासाठीही कॅटरिंगचा व्यवसाय अधिक उचित होता. तिचा पती स्वयंपाकघराकडे लक्ष पुरवू शकत होता आणि पत्नी व्यवस्थापन सांभाळू शकत होती, तसेच कामाच्या ठिकाणच्या व डिलिव्हरीच्या ठिकाणच्या सजावटीचा विचार करू शकत होती. आपण त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी शुभेच्छा देऊ या.

–  आनंद घुर्ये
(लेखक प्राचीन भारतीय ज्ञान या विषयातले अभ्यासक आहेत)
संपर्क : 9820489416

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?