प्रगतिशील उद्योग

उद्योजकाला नुसतं मोटिव्हेशन नको, तर खरं मार्गदर्शन गरजेचं आहे

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


मी २०१३ च्या वर्षअखेर समस्या समाधान सक्षमतेवर सामाजिक कार्य सुरू केले तेव्हापासून आजवर आमच्याकडे येणारा एक मोठा वर्ग म्हणजे उद्योजक. त्याच्या समस्याही बहुअंगी व बहुरंगी असतात. म्हणून मग आजच्या लेखाचा तोच विषय असावा असे वाटले.

उद्योजकांना अनेकविध प्रश्न भेडसावत असतात. जसे, सध्या चालणारी कारकीर्द सोडून पूर्णवेळ उद्योगात पडू का? भांडवल कसे मिळेल? स्वस्त, कुशल, कार्यक्षम व निष्ठावंत कर्मचारी व्यवसायात कसे मिळवावे? उत्पादित मालाला किंवा सेवेला बाजारपेठ कुठे व कशी मिळेल? नवीन व्यवसाय कल्पना कशा मिळवाव्या? कार्यालय कुठे व कसे असावे? इत्यादी.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

हे प्रश्न सोडवताना उद्योजक एकाकी असतो, कारण आपल्याला हे प्रश्न पडलेत असे कळले तर आपल्यापासून आपला ग्राहक दुरावेल, ही भीती. जो उद्योगात गोंधळलेला आहे त्याच्याकडून माल-सेवा कोण घेईल? म्हणजे पोटात खरी भीती व चेहऱ्यावर खोटा आत्मविश्वास असे उद्योजकाचे दुभंगलेले अस्तित्व झालेले. नोकरीत निदान आजूबाजूचे सहकारी, काही सल्ला देणारे मिळतात; पण धंद्यात तुम्हीच सर्वेसर्वा म्हणजे एकटे हे उद्योजकाला जाणवत राहते.

बरे हाताखालच्या लोकांवर विसंबावे तर ते त्यांच्या स्वार्थानुरूप सल्ला देणार म्हणजे तोही पारखून घेणे आलेच. ही बिकट परिस्थिती अधिक किचकट करण्यासाठी आणखी एक वर्ग कार्यरत असतो तो म्हणजे प्रेरणादायी वक्त्यांचा. हे व्याख्याते जोरजोरात घोषणा देत, टाळ्यांच्या गजरात, आकर्षक म्हणी-वाक्प्रचार-उद्धरणे वापरत सांगत राहतात, “हे तुम्हास शक्य आहे. अगदी सहज शक्य आहे.”; पण कसे शक्य करायचे ती पद्धती ते सांगू शकत नाही.

भावनेच्या भरात वारंवार दगडी भिंतीशी टक्कर घेऊन कपाळमोक्षाचीच शक्यता निर्माण होते. उत्कटता, तळमळ व्यवसायासाठी आवश्यक आहे; पण केवळ तीच एक गरजेची बाब आहे म्हणणे; हे व्यवस्थापनाच्या इतर अंगांकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. हे घणाघाती वक्ते जे बोलतात ते व्यवस्थापनाच्या पंचांगातील एका अंगाबाबत, दिग्दर्शनाबाबत (directing) असते. म्हणजे इतर चार अंगे उपेक्षित राहतात.

ती अंगे म्हणजे, नियोजन (planning), संघटन (organising), नियंत्रण (control), समन्वय (co-ordination). ही चारी अंगे बौद्धिक असल्याने भावनिक व्याख्याते त्यावर भर न देणे स्वाभाविक; पण त्याच्या प्रभावाखाली उद्योजकाची कृती म्हणजे संप्रेरके घेऊन शरीरात तात्कालिक शक्ती निर्माण करणे. त्यामुळे रोग बरा होण्याऐवजी वाढण्याची शक्यता जास्त.

या वर्गातील काही वक्ते तर ऐतिहासिक महापुरुषांचे दाखले देऊन त्यांचे भाषण अधिक नशा देणारे बनवतात; पण आजारासाठी दवा लागते, दारू नाही. कविवर्य विंदा करंदीकरांनी आपल्याला केव्हाच बजावले आहे, ‘इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, करा पदस्थळ त्याचे आणिक, चढुनी तयावर भविष्य वाचा’.

उद्योजकाने नेमके करावे तरी काय? याबाबत टाटा समूहातील एक उदाहरण विचारात घेण्यासारखे. टाटा समूहात एकापेक्षा एक उच्च विद्याविभूषित पदस्थ आहेत. तरीही डॉ. नितीन नोहरीया यांना कार्यकारी संचालक म्हणून ‘टाटा सन्स’मध्ये स्थान दिले आहे. डॉ. नोहरीया हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्राध्यापक व अधिष्ठाता म्हणून काम पाहतात. म्हणजे टाटा समूहालाही व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा उच्चतम पातळीवरही आधार घेणे गरजेचे वाटते.

प्रत्येक उद्योजकाने एखाद्या मार्गदर्शकाची दीर्घकालीन वाटचालीसाठी निवड करावी. म्हणजे अनेकविध माहितीच्या लोंढ्यातील कोणती ज्ञानदायी व कोणती काळाचा अपव्यय करणारी यावर तिसऱ्या पक्षाकडून नि:पक्षपाती सल्ला मिळू शकतो.

‘गुगल’सारख्या शोध अभियंत्राच्या काळात हवी ती माहिती मिळू शकते. मग मार्गदर्शक कशाला, असा विचार बळावतो. त्यापूर्वी ‘ग्रंथ हेच गुरू’ हा विचार प्रभावी होता; पण अशा विचारामागे आपला अहंकार तर आपण पोसत नाही ना?

आपण दुसऱ्यासमोर झुकणार नाही, अशा आपल्या वृत्तीचे कठोर आत्मपरीक्षण उद्योजकाने करावे. अहंकार हा उद्योगाला विषासमान. एक उत्तम मार्गदर्शक माहितीच्या धबधब्यातून नेमके दुर्मीळ अमृत थेंब कसे निवडावे हे दाखवू शकतो. म्हणजे नीरक्षीरविवेक शिकवू शकतो. मार्गदर्शकाच्या निवडीत आणखी एक चकवा म्हणजे एखाद्या यशस्वी उद्योजकाला मार्गदर्शक म्हणून निवडणे.

प्रत्येक यशस्वी उद्योजक चांगला मार्गदर्शक असेल असे नाही. एक तर त्यास त्याच्या उद्योगातून वेळ मिळणे कठीण. याशिवाय प्रत्येक यशस्वी उद्योजक त्याच्या स्वतःच्या मार्गाने यशस्वी झालेला असतो. तोच मार्ग इतर उद्योजकांना उपयुक्त होईल असे नाही.

त्यामुळे मार्गदर्शक असा हवा, की जो सतत विविध मार्गांचा अभ्यास करत राहून धडपडणाऱ्या उद्योजकाला भूतकाळात यशस्वी झालेल्या मार्गातील एखादी वाट नव्हे तर भविष्यातले सुयोग्य मार्ग कुठल्या दिशेने जातात हे हुडकायला साहाय्य करेल.

थोडक्यात ‘अज्ञाने होती, कष्ट अनाठायी, ठेवावी श्रद्धा, सद्गुोरू पायी’ हे हरदासाचे वचन ध्यानी राहू द्यावे. वाया जाणारे श्रम मार्गदर्शकामुळे वाचले तरी काही कष्ट उद्योजकाला अपरिहार्य आहेत. हे कष्ट बौद्धिक आहेत आणि म्हणूनच एखादे कोडे सोडवताना होणाऱ्या आनंदासारखे आहेत, त्रासदायक नाहीत; पण हे कष्ट घेतले नाहीत तर मात्र त्रास आहे.

‘उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथै:। न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा:॥’ या संस्कृत सुभाषितात सांगितल्याप्रमाणे केवळ मनोरथ रचल्याने नव्हे; तर उद्यमानेच कार्य सिद्धीस जाते. निद्रिस्त सिंहाच्या मुखात हरीण स्वत:हून प्रवेश करत नाही. आपण वानगीदाखल दोन प्रश्न घेऊन हे श्रम कोठले हे पाहू.

आता पहिला प्रश्न घेऊ. तो म्हणजे मालाला-सेवेला बाजारपेठ कशी मिळवावी? हा प्रश्न पडण्याचे कारण बाजारपेठेचा अभ्यास करण्याआधीच उद्योजक उत्पाद-सेवा कोणती द्यायची याचा निर्णय घेऊन बंदी झालेला. हा प्रश्न पडू नये म्हणून उत्पाद-सेवा ठरवण्याआधी बाजारपेठेचा अभ्यास आवश्यक. ‘अभ्यासोनि प्रगटावे। नाही तर झाकोन असावे। प्रगटोनि नासावे। बरे नव्हे॥’ हे समर्थांचे वचन ध्यानी ठेवून उत्पाद-सेवानिश्चितीची घाई टाळावी.

बाजारपेठ म्हणजे विक्रेते व ग्राहकांचा समुच्चय हे समजून यातील अधिकाधिकांशी संवाद साधून सर्वेक्षण करणे गरजेचे. यातून ग्राहकांच्या सध्याच्या तसेच भविष्यातील गरजा व इच्छा समजतात. विविध उत्पादक-विक्रेते या गरजा व इच्छा पुऱ्या करण्यासाठी सध्या काय करीत आहेत व भविष्यात काय करणार आहेत याचा अंदाज येऊ लागतो.

या संवादाला पूरक कार्य म्हणजे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, सामाजिक माध्यमे यातील बातम्या, लेख, मुलाखती, कार्यक्रम, संदेश आपल्या उद्योगाच्या दृष्टीतून वाचणे-पाहणे-ऐकणे; करमणुकीसाठी वा मनोरंजनासाठी नव्हे. अशा रीतीने ग्राहकांच्या गरजा व इच्छांबाबत शोधदृष्टी कशी ठेवावी याचे तंत्र व मंत्र आपल्या मार्गदर्शकाकडून शिकून घ्यावे. ही दृष्टी मिळवल्यावर रस्त्याने जाताना वाचलेल्या पाट्या-घोषणा फलकसुद्धा आपल्याला अनेक सुते मिळवून देतात व या सुतावरून बाजारपेठेचा स्वर्ग गाठता येतो.

भांडवल कसे मिळवावे?

आता भांडवल कसे मिळवावे याकडे पाहू. याबाबत उद्योजकाने काही प्रश्न स्वत:स विचारावे. गुंतवणूकदार त्याचा निधी गुंतवण्यासाठी जर संधी शोधत आहे तर त्याला आपला उद्योग गुंतवणुकीसाठी का योग्य वाटत नाही? आपण आपली व्यवसाय योजना सविस्तर तयार केली आहे का? त्यातील जोखीम व संधी यांचे तपशील वास्तविक आहेत का?

आपली बलस्थाने अतिशयोक्त व कमजोरी लपवलेली वाटत आहेत का? आपण आपल्या प्रतिपादनार्थ जबरदस्त आकडेवारी देऊ शकलो आहे का? बहुतेक वेळा उद्योजक एक अर्धी-कच्ची व्यवसाय योजना घेऊन फिरत असतात ज्यातून ते फायदा मिळवतील व घेतलेले कर्ज व्याजासकट चुकवतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनाही वाटत नाही. मग कर्ज देणाऱ्या संस्था काय करणार?

उद्योजकता हा नोकरीत सातत्याने वरिष्ठासमोर कराव्या लागणाऱ्या अभ्यासपूर्ण मांडणीतून सुटण्याचा मार्ग नसून आपल्या उद्योगातील दावाधारका समोर (stake-holders) अधिक अभ्यासपूर्ण मांडणी करून त्यांना सतत आपल्या समवेत ठेवण्याचा चढा मार्ग आहे.

येथे दोनच समस्या संक्षेपाने घेतल्या; पण उद्योजक आपल्या अन्य विशिष्ट समस्येला तोंड व मात देण्याचे सामर्थ्य मिळवण्यासाठी स्वाध्याय आपल्या मार्गदर्शकाकडून मागू शकतील. स्वाध्याय म्हणजेच व्यवस्थापनाचे विशिष्ट धडे सरावातून म्हणजे वारंवार निश्चित व सुयोग्य कृती करून शिकणे. या सरावातून अभिनव बुद्धी व सर्जनशीलता जागृत होऊन उद्योजक समस्या सोडवण्यासाठी सबल होऊ शकतात.

थोडक्यात आयते-तयार तोडगे देणारे सल्लागार-प्रशिक्षक टाळा व स्वसामर्थ्याचे मार्गदर्शन निवडा-स्वीकारा.

– प्रा. संदीप नेमळेकर
९९८७२०९७४७


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!