पावसाळ्यात सुरू करा ‘हे’ पाच व्यवसाय


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


पावसाची पहिली सर उकाड्याने हैराण जीवाला गार करते. पाऊस असतोच असा हो प्रत्येकाला सुखावत असतो. प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा असू शकतो. जसे कुणाला गरमागरम चहा आणि पाऊस खूप आवडतो तर कुणाला गरमागरम भजी, वडे, समोसे अशा चमचमीत पदार्थांची भुरळ पडते. काही जणांना पावसात छत्री अथवा रेनकोट घालून फिरण्यात रस असतो.

मित्र मंडळींसह छोट्या सहलींचा आनंद घेणारे अनेक असतात. एकूण काय तर पावसाळा हा अनेक संधींचा खजिना आहे. या सगळ्याचा जेव्हा आपण आस्वाद घेतो तेव्हा पावसाचे चार महिने अनेकांसाठी खरंच पैसा घेऊन येतात. हल्ली प्रत्येक गोष्ट सीझनल होत असताना पावसाळ्यातील सीझनल फूडपासून ते पर्यटनापर्यंत आणि छोट्या रोजगार संधीपासून ते विविध सेवा देण्यापर्यंतच्या अर्थार्जनाच्या वाटाही मिळतात. आपण याच व्यवसायसंधी कशा असू शकतात ते पाहू.

१. वाफाळता चहा

पाऊस आणि चहा हे समीकरण भल्याभल्यांना सुटत नाही. फक्त मनात पाऊस हा शब्द जरी आला तरी हातात चहाचा कप आणि खिडकीतून पावसाचे निरीक्षण असे चित्र डोळ्यासमोर येते. पावसाळ्यात चहाची मागणी वाढते. मित्रमैत्रिणी सोबत चहा, ऑफिसमध्ये सतत लागणार चहा हे पावसात कैक पटीत वाढते. त्यामुळे हा एक चांगला कमाई करून देणारा सीझनल व्यवसाय सुरू करता येईल.

कॉलेज विद्यार्थ्यांपासून, आबालवृद्ध सारेच चहाचे चाहते असतात. आता विक्री वाढते म्हणजे कमाई वाढते. त्यातही साधा, स्पेशल, बासुंदी एक ना अनेक प्रकारचे चहा अशा चवींचे वैविध्य असल्यामुळे चहासाठी पावसात खूप तेजी येते. पावसाळ्यात स्पेशल चहा जास्त खपत असल्यामुळेही दुप्पट पैसे मिळतात. तसेच कॉफीच्याही ऑर्डरमध्ये वाढ होते.

मागणी तेवढा पुरवठा हे गणित जुळले तर आपण चांगली कमाई करतो. त्यामुळे आपली आवश्यक सामग्री म्हणजेच दूध, साखर, चहापूड, सिलेंडर याचा पुरेसा साठा असायला हवा. भर पावसातही चहाविक्री सुरू ठेवावी लागत असल्यामुळे चहागाडीला पाण्यापासून सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी लागते. या गोष्टींची काळजी घेत या व्यवसाय संधीचा नक्की विचार करावा.

२. गरमागरम भजी, वडे, समोसे आणि बरेच काही

वाफाळता चहा आणि गरमागरम भजी; तीही कांदा भजी हे पावसाळ्याची खरी खासियत. खवय्यांसाठी खरी मेजवानीच. आपल्याकडे वर्षभर हे खाद्यपदार्थ बाजारात असतात, पण पावसाळ्यात त्याची मागणी वाढते. त्यामुळे हा अर्थार्जन वाढवणारा व्यवसाय आहे.

यासोबत वडे, समोसेशिवाय मक्याचे कणीस मस्त लिंबू पिळून आणि मीठ लावून…. तोंडाला पाणी आले. पण खरंच पावसाळ्यात याची मागणी वाढते. त्यामुळे ही व्यवसायसंधी म्हणून पाहता येईल. पावसात खवय्येगिरी वाढत असल्याने चटपटीत खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू करता येतात.

३. पावसाळी साहित्य विक्री

पाऊस आला की वर्षभर जपून ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट याची शोधाशोध सुरू होते. सुस्थितीत असेल तर ठीक अथवा नव्याने खरेदीसाठी झुंबड होते. पावसाळ्यात ही प्रत्येकाची गरज असते. शाळा महाविद्यालये याच दरम्यान सुरू होत असल्याने स्कूल बॅगनाही मोठी मागणी असते.

याशिवाय मच्छरदाणी, रबरी शूज, पावसापासून संरक्षण करण्यासाठी प्लास्टिक किंवा ताडपत्री अशा साहित्याचीही मोठी मागणी असते. पावसाळ्यात प्लास्टिक कव्हरला मागणी जास्त वाढते. दुचाकी, चारचाकी गाड्यांसाठी प्लास्टिक कव्हर गरजेचे असते. हा एकत्रित एक व्यवसाय अथवा या प्रत्येक साहित्याचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकतो.

४. कार रेंट किंवा पॅकेज टूर

पावसाचे टपोरे थेंब अंगावर झेलत, नयनरम्य हिरवाईने नटलेला निसर्ग चहाच्या चुस्कीसह खोलवर मनात साठवत पर्यटनाचा आनंद घेणारे अनेक लोक असतात. असा आनंद उपभोगण्यासाठी लोक खर्च करायला तयार आहेत. त्यामुळे पॅकेज टूरला खूप मागणी असते. ही उद्योगसंधी आहे. याशिवाय रेंट कारलासुद्धा खूप मागणी असते.

Photo source: gautamkhetwal.files.wordpress.com

स्वतःची गाडी असली तरी ती न घेता रेंट ने कार घेऊन प्रवास करण्याला प्राधान्य दिले जाते. यामुळे दगदग कमी होते. सुरक्षेच्या दृष्टीने सोईचे असते. शिवाय कार स्वतःची नसली तरी भाड्याने घेऊन ग्रुपने, कुटुंबासोबत प्रवासाला जाणारेही खूप असतात. एकूणच यामुळे कार भाड्याने देणे-घेणे हा चांगला उद्योग पर्याय आहे. किलोमीटरनुसार हे दर ठरलेले असतात. शिवाय निष्णात कारचालकही मिळत असल्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटता येतो.

पर्यटनासाठी लोक खास वेळ काढतात. पावसाळी पर्यटनाचा ट्रेंडही वाढत आहे. अगदी दोन तासाच्या अंतरावरील पर्यटनस्थळावर जाण्यासाठीही अनेकांकडून कार भाड्याने घेण्यासाठी विचारणा होते. किती लोक पर्यटनाला एकत्र जाणार आहेत त्यावर गाडीची निवड केली जाते आणि त्यानुसार दर ठरतात. डिझेल आणि पेट्रोल कारचे दर वेगवेगळे असतात. या व्यवसायातून चांगली कमाई होते.

५. नर्सरीतली रोपे

पावसाळा आला की अनेकांतील बागकामाची आवड फुलू लागते. अगदी गच्चीत कुंड्या ठेवून छान फुलझाड लावून आवड जोपासली जाते. शेतीतही प्रयोग करण्याकडे कल असतो. अशावेळी रोप घेण्यासाठी, शेतीसाठी बियाणे घेण्यासाठी नर्सरीतील खरेदीला उत्साह येतो. पावसाळ्यात त्यामुळे रोपविक्रीसह शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याला मागणी वाढते.

नर्सरीत पावसाळ्यातील मागणी लक्षात घेऊन रोपे तयार केली जातात. पावसाच्या चार महिन्यात रोपविक्रीतून कमाई चांगली होत असल्यामुळे कामही जास्त असते. त्यातही फुलझाडे, शोभेची झाडे, यासोबत वड, पिंपळ, विविध मसाले आदी रोप लावण्याचा फायदा जास्त होतो. तर शेतीसाठी लागणारी बियाणे, शेतीची साधने यांचीही लाखो रुपयांची उलाढाल होते. यामुळे हीसुद्धा एक उद्योगसंधी आहे.

– प्रतिभा राजपूत

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?