Advertisement
उद्योगसंधी

उन्हाळ्यात सुरू करता येतील हे पाच छोटे व्यवसाय

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


उन्हाळ्यामध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी असते. अशा वेळी प्रत्येकजण आपलं रेगुलर रुटीन सोडून काही तरी नवीन करत असतो. अशा वेळी स्वाभाविकच खर्च वाढतो. नवनवीन गोष्टींवर तो खर्च करतो. इथेच उद्योगांच्या नवनवीन संधी निर्माण होत असतात. तुम्ही त्या हंगामी ग्राहकाला नवीन गोष्ट दाखवून तुमच्याकडे आकृष्ट केले तर तुमचा व्यवसाय होईल.

अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यांचा व्यवसाय उन्हाळ्यात सहज करता येईल. कमीत कमी बजेटमध्ये आणि घरच्या घरी करता येईल अशा पाच व्यवसायांची कल्पना या लेखात मांडली आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

१. वाळवणं, पापड, लोणची, मसाले

उन्हाळ्यानंतर चार महिने पावसाळा असतो. या काळात अनेक गोष्टी मिळत नाहीत. आता शहरात अशी स्थिती राहिली नाही, पण गावाकडे अजूनही हीच स्थिती आहे. अशा वेळी घरात असलेली वाळवणं, पापड, कुरडया, मिरगुंड, सांडगे यांचा जेवणात उपयोग होतो. पूर्वी घरोघरी हे सर्व पदार्थ केले जात होते. वैशाख महिन्यात सर्व घरात वाळवणं होत असतं, पण आता विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात वाळवणं, पापड, लोणची, मसाले, सांडगे इत्यादी पदार्थ छोट्या प्रमाणात बनवून त्यांची शंभर ग्रॅम आणि पाव किलोची पाकीट करून विकू शकता. अगदी दहा ते पंधरा हजार रुपयांचा कच्चा माल भरला तरी छोट्या प्रमाणात घरच्या घरी हा व्यवसाय करू शकता.

थोडी गुंतवणूक मोठी केली तर किराणा मालाची दुकानं, खाऊची दुकानं, सुपरमार्केट आणि मॉलमध्ये सुद्धा तुमचा माल विक्रीला ठेवू शकता. दहा ते वीस टक्के कमिशन देऊन बायका किंवा पुरुषांना घरोघरी विकायला पाठवू शकता. ते जितकी विक्री करतील, तितके त्यांचे कमीशन. यामुळे तुमच्यावर पगाराचा बोजाही वाढणार नाही आणि चांगली विक्रीचैनही उभी राहील.

२. उन्हाळी पिकनिक

शाळा-कॉलेजला सुट्टी असल्यामुळे अनेकांसाठी हा फिरण्याचा काळ असतो. अशावेळी लोकांना फिरण्यासाठी नवनवे आणि चांगले पर्याय हवे असतात. तुम्ही तुमच्या कल्पकतेने छोट्या किंवा मोठ्या अशा सहली आयोजित करू शकता.

अगदी एका दिवसाच्या सहलीपासून ते कुलू, मनाली, उटी, दार्जिलिंग अशा थंड हवेच्या ठिकाणी ग्रुप पिकनिक किंवा फॅमिली पिकनिक काढू शकता.

सहलीचा एकूण खर्च काढून त्यात तुमचा नफा धरून प्रती माणशी सहभाग शुल्क ठरवून बुकिंग घेऊ शकता. फिरण्याचा अनुभव तर सगळ्यांनाच असतो, थोडे नियोजन कौशल्य आणि कल्पकता वापरून कोणीही हा व्यवसाय सहज करू शकतो.

३. ताक, लस्सी, पियूष, सरबत, फालुदा

ताक, मठ्ठा, लस्सी, पियूष हे सगळे दुधाचे पदार्थ. आरोग्याला उपयुक्त आणि उन्हाळ्यात हवेहवेसे वाटणारी ही पेय आहेत. याचसोबत वेगवेगळी सरबतंसुद्धा उन्हाळ्यात प्यावीशी वाटतात. थोड्या गर्दीच्या ठिकाणी जसे की बाजारपेठ, बागा, उद्याने, मैदाने अशा ठिकाणी तुम्ही छोट्या प्रमाणात यांचे स्टॉल्स लावू शकता.

काही ठिकाणी दोन लिटर कोल्ड्रिंकच्या बाटल्यांमध्ये ताक भरून छोट्या छोट्या ग्लासमध्ये लोकं विकताना आढळतात. दोन ते पाच हजार रुपयांची गुंतवणूक हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेशी आहे.

४. सुट्टीतील वाचनालय

तुमच्याकडे असलेली पुस्तके घेऊन उन्हाळी सुट्टीत हा व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्याकडे पुस्तकं नसतील किंवा कमी असतील तर रद्दीच्या दुकानातून जुनी पुस्तक खरेदी करा. काही प्रकाशक अगदी स्वस्त म्हणजे शंभर रुपयांच्या आत पुस्तकं प्रकाशित करतात. अशी पुस्तकंही खरेदी करून तुमच्या वाचनालयात ठेवू शकता. जुनी मासिके, दिवाळी अंक हेही रद्दीच्या दुकानात स्वस्तात उपलब्ध होतील.

शहरात काही ठिकाणी पायरेटेड पुस्तकेही स्वस्त दरात उपलब्ध होतात. मोठमोठी पुस्तके इथे तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येतील. ‘भारत भारती प्रकाशन’ने छोटी छोटी दीडशेहून अधिक महनीय व्यक्तींची छोटी छोटी चरित्र तयार केली आहेत.

हिंदी, मराठी, इंग्रजीसह विविध भारतीय भाषांमध्ये ही चरित्र उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त आणि ते आवडीने वाचतील असा हा पुस्तकसंच आहे.

साधारण वीस ते पंचवीस हजार रुपयांच्या गुंतवणुकीत तुम्ही छोटे वाचनालय किंवा फिरते वाचनालय किंवा बुक ऑन डिमांड अशी सेवा सुरू करू शकता. लोकांकडून मासिक वर्गणी घेऊन त्यावर तुमचा व्यवसाय चालू राहू शकतो.

उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणत विद्यार्थी वर्गणीदार मिळू शकतात. अशा चांगल्या प्रकल्पासाठी शंभर-दोनशे रुपयांची वर्गणी पालकही आनंदाने भरतील.

५. आंबे विक्री

कोकणचा राजा आपल्याला फक्त उन्हाळ्यातले दोन-तीन महिनेच खायला मिळतो. गरीब असो, श्रीमंत असो की मध्यमवर्गीय प्रत्येक घराच्या वार्षिक बजेटमध्ये या दोन महिन्यांमध्ये आंबा खरेदीची तरतूद करून ठेवलेली असते. हापूस, पायरी, केशर, दशहरी असे हजारो प्रकारचे आंबे आपल्या देशात पिकतात आणि विकलेही जातात. वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या प्रदर्शनामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे आंबे पाहायला मिळतात.

फक्त दोन महिन्यांसाठी असला तरी वर्षभराचा फायदा करून देणारा हा धंदा आहे. तुम्ही हा कितीही छोट्या किंवा मोठ्या प्रमाणात करू शकता. अगदी घरच्या घरीसुद्धा करू शकता. गरज आहे ती फक्त फळ म्हणून आंब्याच्या जपणुकीविषयी थोडी माहिती मिळवण्याची.

तुम्ही दोन प्रकारे आंब्याची घाऊक खरेदी करू शकता. एक म्हणजे थेट शेतकऱ्याकडून किंवा जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच मंडीमधून.

हापूस आंबा हा सगळ्यात जास्त विकला जातो आणि या आंब्याला भावही खूप चांगला मिळतो. कोकण किंवा आसपासच्या परिसरात तुमच्या ओळखीची लोकं असतील तर तुम्ही आंबा शेतकरी म्हणजे ज्यांच्या आंब्याच्या बागा आहेत त्यांच्याकडून थेट खरेदी करू शकता.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे बागायतदार आणि शेतकरी आंबे विक्रीसाठी घेऊन येतात. पण इथे व्यापार करणं वाटत तितकं सोपं नाही. तुम्ही धंद्यात थोडे मुरलेले असाल तरच मंडीतून थेट खरेदी करू शकाल. कोकणातल्या हापूसच्या खालोखाल पायरी, कर्नाटक हापूस, वलसाड हापूस, केशर, लंगडा इत्यादी आंब्यांनाही चांगली मागणी असते.

घरच्या घरी दोन-दोन डझनचे बॉक्स किंवा पाच डझनची लाकडी पेटी तयार करून लोकांना घरपोच डिलिव्हरी देऊ शकता. व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आंब्याचे आकर्षक फोटो टाकून ओळखीतल्या लोकांना तुमच्याकडून आंबे घेण्यासाठी आकृष्ट करू शकता.

– शैलेश राजपूत


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!