व्यवसाय हा घडतो आणि टिकतो तो त्याच्यातल्या वेगळेपणामुळे. त्यातही गुंतवणूक कमी असेल तर कुठून आणि कशाने सुरुवात करावी, हाही प्रश्न असतो. एखाद्याकडे दहा हजार गुंतवणुकीसाठी असतील तर एवढ्या अल्प गुंतवणुकीत कोणता व्यवसाय करावा, असा प्रश्न पडतो. मात्र अशाही अनेक संकल्पना आहेत ज्या आपण अल्प भांडवलात नक्कीच सुरू करू शकतो आणि त्याचे मोठ्या व्यवसायात रुपांतरही करू शकतो.
अर्बन गार्डनिंग किट
वाढत्या शहरीकरणामुळे माणूस निसर्गापासून दूर होतोय, पण निसर्गाविषयी असलेली आस्था आणि प्रेम कमी होत नाही. आपल्या घराला अंगण नसेल, पण शहरात अगदी छोट्या घरांच्या गच्चीत, गॅलरीत, अगदी खिडकीतही अनेक लोक आपली स्वतःची बाग फुलवतात.
खरंतर आपली बाग ही घराचे सौंदर्य वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही लाभदायक असते. त्यामुळे कोणती झाडे निवडावी, त्याची योग्य निवड कशी करावी, निगा कशी राखावी यासाठी कोणकोणती साधने लागतात याची माहिती असावी लागते. हीच गरज आणि संधी ओळखून आपण गार्डनिंग किट्स विकू शकतो.
अशा किटमध्ये आपण काय देऊ शकतो? तर बीज, माती, कुंड्या, वेगवेगळी छोटी टुल्स यांचा समावेश करू शकतो. वैयक्तिक किंवा छोट्या हाउसिंग सोसायट्यांना आपली किट्स विकू शकतो. सोबत गार्डनिंग टिप्सचे पॅम्फ्लेट, छोटे बुकलेट देऊ शकतो.
जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी गार्डनिंगवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन सोसायट्यांमध्ये ऑर्गनाईज करू शकतो. अशा किट्ससाठी सध्या खूप मोठे अर्बन मार्केट उपलब्ध आहे. कल्पकता वापरून कमीत कमी गुंतवणुकीत आपण या व्यवसायाची सुरुवात करू शकतो.
पेट्स संबंधीत उत्पादने
पेट्स म्हणजेच पाळीव प्राणी. आजघडीची ही मोठी बाजारपेठ आहे. पेट्स एक्सेसरीज, क्लॉथ, फूड, ग्रुमिंग, पेट्स सिटींग, डॉक्टर, मेडिसिन यापासून ते पेट्स हॉलिडे अशा अनेक सेवा आणि उत्पादने आज केवळ पाळीव प्राण्यांची आहेत. लोकांचा वाढता कल पाहता यात व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत.
हा व्यवसाय अलीकडच्या काळात उदयाला आल्यामुळे आपल्या देशात यात जास्त संधी आहेत. यापैकी पाळीव प्राण्यांचे खाद्य, नैसर्गिक ग्रुमिंग उत्पादनं किंवा प्राण्यांसाठी लागणारे गळ्यातील पट्टे अशा एक्सेसरीज यांचा व्यवसाय सुरू करू शकता. सुरुवातील दहा हजार रुपयांच्या भांडवलात या क्षेत्रात व्यवसाय सुरू करता येईल.
कस्टमाइज्ड युनिक गिफ्ट हॅम्पर्स
गिफ्ट हॅम्पर्सची मागणी वाढतेय. वेगवेगळे सण, समारंभ, कार्यक्रमांसाठी गिफ्ट हॅम्पर्स दिले जातात. सर्वसामान्यत: प्रचलित असलेल्या गिफ्ट हॅम्पर्सना पर्याय म्हणून आपण युनिक गिफ्ट आयटेमचा विचार करू शकतो.
इकोफ्रेंडली हॅम्पर्स, स्वदेशी प्रॉडक्ट्स, ऑरगॅनिक फुड प्रॉडक्ट्स अशा गिफ्ट हॅम्पर्सचा व्यवसाय आपण सुरू करू शकतो किंवा पाळीव प्राण्यांच्या वाढदिवसासाठी हॅम्पर्स, वेलनेस किट्सचे हॅम्पर्स तयार करू शकतो. आकर्षक पॅकेजिंग आणि सोशल मीडियाचा वापर करून आपण दहा हजारात या व्यवसायाची सुरुवात करू शकतो.
मोबाईल कार वॉश सेवा
आज गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे कार वॉश ही एक उद्योगसंधी तयार झाली आहे. त्यातही प्रत्येकजण आज व्यस्त असतो. त्यामुळे कार वॉश सेंटरला जाऊन नेहमी कार धुवायला जास्त वेळ द्यावा लागतो, पण ग्राहकाला जर आपण मोबाईल कार वॉशची सुविधा उपलब्ध करून दिली तर ग्राहकांच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांचे वाहन साफ करू शकता. यासाठी सुरुवात करताना अल्प भांडवलात काम सुरू होऊ शकते.

हॅण्डमेड ज्वेलरी
स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ज्वेलरी. नवे ट्रेंड्स, डिझाईन्स यांना खूप मागणी असते. स्त्रियांच्या संबंधित फॅशन या सतत ट्रेंडिंगमध्ये असतात. हाताने बनवलेले दागिने असेच स्त्रियांना आपल्या कलेक्शनमध्ये हवेच असतात. आर्टिफिशियल ज्वेलरीसोबत मोत्यांचे किंव्हा रंगीबेरंगी दगडांचा सुबक वापर करूनही आज दागिने बनवले जातात. अशा दागिन्यांना मागणीही खूप असते.
याशिवाय हळदीकुंकू, ओटीभरण अशा समारंभांना ताज्या टवटवीत हाताने बनवलेल्या दागिन्यांना मागणीही खूप असते. हा सध्या चांगला उद्योग पर्याय आहे. यासाठी गुंतवणूक कमी लागते. आपल्याला आवड असेल आणि कल्पक डोकं असेल तर या व्यवसायात चांगली गती पकडते.
गुंतवणूक अल्प असेल तर व्यवसायाची सुरुवात छोटेखानी होईल, पण आपल्या या कल्पना दीर्घकालीन यशाची खात्री देणार्या आहेत. अनुभव मिळेल सोबत या सुरुवाती आलेला पैसा पुन्हा यातच गुंतवून व्यवसायाला भक्कम पाठबळ आपण स्वतःच देऊ आणि व्यवसाय वाढवू शकू.






