गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि उत्साहपूर्ण सणांपैकी एक आहे. या काळात प्रत्येक घरात, सोसायटीत, सार्वजनिक मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असते. सजावट, पूजा, प्रसाद, कार्यक्रम, पाहुणचार, मिरवणुका अशा अनेक गोष्टींसाठी लोक खर्च करतात. याच काळात अनेक लहान-मोठ्या व्यवसायांना मोठी संधी मिळते.
विशेष म्हणजे काही व्यवसाय असे आहेत की ज्यासाठी फार मोठे भांडवल लागत नाही. फक्त ५ ते १० हजार रुपयांची गुंतवणूक, थोडी मेहनत आणि योग्य मार्केटिंग असेल तर तुम्ही १० दिवसांत चांगली कमाई करू शकता. चला पाहूया असे ११ व्यवसाय जे तुम्ही या गणेशोत्सवात सुरू करू शकता.
फुलांचा आणि हारांचा व्यवसाय
गणपती बसवताना आणि रोजच्या पूजेसाठी फुलं, हार, दुर्वा, तुळस, बेलपत्र, पत्री यांची मोठ्या प्रमाणात गरज असते. उत्सवाच्या दिवसांत या वस्तूंचे दर वाढलेले असतात आणि मागणी खूप जास्त असते. तुमच्या शहरात किंवा जवळपास फुलांचा घाऊक बाजार कुठे आहे हे शोधा. तिथून कमी दरात फुलं आणि पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी करा.
मोबाइलचा वापर करून व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुक किंवा स्थानिक ग्रुप्समध्ये माहिती द्या. ग्राहकांकडून ऑर्डर घ्या आणि घरपोच डिलिव्हरी द्या. फक्त ५-७ दिवसांत २५ ते ५० हजार रुपयांची विक्री होऊ शकते आणि १५ हजारांपेक्षा जास्त नफा मिळू शकतो.
भजन मंडळ सेवा
गणेशोत्सवात अनेक कुटुंबांना घरी किंवा सोसायटीमध्ये भजन, आरती किंवा भक्तीगीतांचा कार्यक्रम ठेवायचा असतो. लोक धार्मिक कार्यक्रमांसाठी खर्च करण्यास तयार असतात. तुम्ही ५ ते ७ जणांची टीम तयार करू शकता. कार्यक्रमासाठी मृदुंग, पखवाज, टाळ, तबला अशी साधी वाद्ये लागतील.
हे कार्यक्रम साधारण रात्री होतात त्यामुळे नोकरी किंवा इतर काम सांभाळूनही हा व्यवसाय करता येतो. एका कार्यक्रमासाठी चांगले मानधन मिळू शकते आणि १० दिवसांत अनेक बुकिंग मिळण्याची शक्यता असते.
मखर आणि सजावट व्यवसाय
आजकाल प्रत्येकाला आकर्षक आणि वेगळी गणपती सजावट हवी असते. जर तुमच्यात कलात्मकता असेल तर ही उत्तम संधी आहे. तुम्ही घरच्या घरी थर्माकोल, कार्डबोर्ड, लाकूड, LED लाईट्स वापरून सुंदर मखर तयार करू शकता. लहान मखरदेखील बाजारात २ हजार ते ५ हजार रुपयांना विकले जातात. काही नमुने तयार करून त्यांचे फोटो व्हॉट्सॲपवर शेअर करा. ग्राहकांकडून लगेच ऑर्डर मिळू शकतात.
दिवे आणि इलेक्ट्रिक तोरणे विक्री
गणेशोत्सवातील सजावटीसाठी LED दिवे, इलेक्ट्रिक तोरणे, सजावटीचे दिवे यांची मोठी मागणी असते. हे साहित्य घाऊक बाजारातून कमी दरात खरेदी करा आणि परिसरात घराघरात विक्री करा. उत्सवकाळात लोक सजावटीवर खर्च करत असल्यामुळे यामध्ये चांगला नफा मिळतो. कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सहज सुरू करता येतो.
घरगुती साफसफाई सेवा
गणपती येण्यापूर्वी घरांची साफसफाई, रंगकाम, वस्तूंची मांडणी अशी बरीच कामे करावी लागतात. पण अनेक लोकांकडे वेळ नसतो. जर तुम्ही मेहनती असाल तर हा व्यवसाय कोणतेही भांडवल न लावता सुरू करू शकता. ग्राहकांना साफसफाई, सामान लावणे, रंगकाम किंवा इतर तयारीमध्ये मदत करा आणि मेहनताना घ्या. लक्षात ठेवा – कोणतेही काम छोटे नसते.
नाशिक बाजा किंवा वाजंत्री सेवा
गणपती आणताना आणि विसर्जनाच्या वेळी अनेक कुटुंबांना नाचण्यासाठी वाजंत्री हवी असते. तुम्ही एक ताशा आणि २-३ बाजे घेऊन छोटा ग्रुप तयार करू शकता. स्वतःची साधने नसतील तर दिवसभरासाठी भाड्याने मिळतात. फक्त एका तासाच्या कार्यक्रमासाठीही चांगले पैसे मिळू शकतात. या व्यवसायात कमी वेळेत जास्त कमाईची संधी असते.
मोदक विक्री
गणपती आणि मोदक यांचे अतूट नाते आहे. प्रत्येक घरात मोदक लागतात, पण अनेक महिलांना किंवा कुटुंबांना ते बनवायला वेळ नसतो. उकडीचे मोदक, तळलेले मोदक, चॉकलेट मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ऑर्डर घेता येते. मोदक साधारण २० ते ४० रुपये प्रति नग दराने विकले जातात. महिलांसाठी हा ५-७ दिवसांत चांगला नफा देणारा घरगुती व्यवसाय ठरू शकतो.
कॅटरिंग सेवा
गणपतीच्या दिवसांत अनेक कुटुंबे पाहुणचारासाठी किंवा महाप्रसादासाठी बाहेरून जेवण मागवतात. मोठ्या कॅटरर्सकडे या काळात खूप ऑर्डर्स असल्यामुळे अनेक ग्राहकांना पर्याय शोधावे लागतात. जर तुम्हाला चांगला स्वयंपाक करता येत असेल तर तुम्ही लहान ऑर्डर्सपासून सुरुवात करू शकता. मोठी भांडी आणि शेगडी भाड्याने सहज उपलब्ध होतात.
पूजेचे साहित्य विक्री
गणेशोत्सवात अगरबत्ती, कापूर, नारळ, आरती पुस्तके, घंटा, टाळ, फुलं, हार, प्रसाद यांची मागणी खूप असते. तुम्ही घाऊक बाजारातून हे साहित्य स्वस्तात खरेदी करून तुमच्या परिसरात विकू शकता. रस्त्याच्या कडेला ८-१० दिवसांसाठी छोटे दुकान लावले तरी चांगली विक्री होते. कधी कधी महिनाभराची कमाई या १० दिवसांत होते.
छोटे मनोरंजन कार्यक्रम
जर तुमच्याकडे गाणे, वादन, जादूचे प्रयोग, मेमिक्री, स्टँडअप किंवा इतर कोणतेही कलागुण असतील तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये कार्यक्रम करू शकता.अनेक मंडळे लोकांच्या मनोरंजनासाठी कलाकार शोधत असतात. एक चांगला कार्यक्रम तुमच्यासाठी पुढील अनेक संधी निर्माण करू शकतो.
अधिक वाचा : शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी करता येतील असे १२ व्यवसाय
YouTube चॅनल आणि व्हिडिओ कंटेंट
आजकाल लोकांना वेगवेगळ्या ठिकाणचे गणपती, प्रसिद्ध मंडळे आणि आकर्षक सजावट पाहायला आवडते. तुम्ही YouTube चॅनल सुरू करून गणपती दर्शन, मंडळांचा इतिहास, सजावटीचे व्हिडिओ, मुलाखती, शॉर्ट्स तयार करू शकता. गणेशोत्सवाच्या काळात अशा प्रकारचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात आणि ते लवकर व्हायरल होऊ शकतात. जर चॅनल नवीन असेल तरी या दिवसांत subscriber आणि watch time वेगाने वाढू शकतो.
शेवटी एक महत्त्वाची गोष्ट…
व्यवसाय सुरू करण्यासाठी नेहमी लाखो रुपये लागतात असे नाही. अनेक वेळा योग्य संधी ओळखून छोट्या प्रमाणात सुरुवात केली तरी चांगले उत्पन्न मिळू शकते. गणेशोत्सव हा फक्त आनंदाचा सण नाही, तर छोट्या उद्योजकांसाठी कमाईची मोठी संधीदेखील आहे. यावर्षी फक्त सण साजरा करू नका… या सणातून कमाईची संधीही शोधा!







Very much informative and inspiring guidance, thank you so much.