रबरी शिक्के म्हणजेच रबर स्टॅम्प ही प्रत्येक व्यवसायात लागणारी आवश्यक बाब आहे. छोट्या-मोठ्या दुकानांपासून ते कार्यालयांत त्याचा वापर होतो. सरकारी कार्यालये, खासगी उद्योगसमूह, बँका, डाकघरे यांसारख्या अनेक ठिकाणी रबरी शिक्क्यांचा वापर केला जातो.
व्यवसाय-उद्योग वाढत जात आहेत, त्या प्रमाणात दिवसेंदिवस या रबरी शिक्क्यांना मागणीसुद्धा वाढत आहे. कागदपत्रे/दस्तऐवज कोणाचे आहे हे लगेच ओळखू यावे यासाठी रबर स्टॅम्प्सचा मुख्य:त्वे उपयोग होतो.
रबर स्टॅम्पनिर्मिती व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे कमी गुंतवणूकीत सुरू करता येतो, शिवाय नफाही चांगला आहे. सर्व प्रकारच्या आस्थापनांना रबर स्टॅम्प हे कायम लागतच असतात त्यामुळे सतत मागणी असलेला व्यवसाय आहे. छोट्याशा जागेत अगदी घरात एका खोलीतूनसुद्धा करू शकता.
एक प्रकारचा स्वयंरोजगार आहे, जो तुम्हाला स्वावलंबी बनवेल. ग्रामीण भागात सरकारी खाती, लघुउद्योग, वकील, डॉक्टर्स, व्यक्तिगत उपयोग करणारे या सर्वांकडून रबरी शिक्क्यांना मागणी भरपूर प्रमाणात आहे.
रबरी शिक्के बनवण्यासाठी छापखान्यात वापरतात त्या अक्षरांच्या खिळ्यांचा वापर करून प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये साचे बनवले जातात. या साच्यावर रबराचे शीट ठेवून ते हॅण्ड प्लाय प्रेसखाली, खालच्या बाजूने उष्णता देऊन दाबले जाते. रबर वितळते आणि त्याला साच्याचा आकार येतो. हे रबर साच्यातून काढून, योग्य तर्हेने कापून लाकडाच्या ठोकळ्यावर पक्के बसवले जाते.
शिक्का मारताना बरोबर बाजू कळावी म्हणून ठोकळ्यावर पितळेची रिंग बसवली जाते. साधारण एकटा माणूसही हे काम करू शकतो. या व्यवसायात एकूण खर्चाच्या साधारण दुप्पट नफा मिळतो.

रबर स्टॅम्प व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया
१. व्यवसायाची रूपरेषा ठरवा : तुम्ही कोणत्या प्रकारचे रबरी स्टॅम्प बनवणार ते ठरवा. उदाहरणार्थ तारखेचे स्टॅम्प, कंपनी सील, नोंदणी स्टॅम्प इत्यादी. त्याच्याशिवाय व्यवसायाचे स्वरूप काय असणार म्हणजे सोल प्रोप्रायटरशीप, भागीदारी, इ.
२. नाव नोंदणी आणि परवाने : स्थानिक स्वराज्यसंस्थेत म्हणजे महानगरपालिका, ग्रामपंचायती इत्यादींकडून व्यवसायाचा गुमास्ता काढून घ्या. १० पेक्षा कमी कर्मचारी काम करत असतील तर फक्त इन्टिमेशन देणे पुरेसे असते.
जर तुमचा वार्षिक टर्नओव्हर २० लाखांच्या वर असेल तर जीएसटी नोंदणी आवश्यक आहे. एक लघुउद्योजक म्हणून उद्यम रजिस्ट्रेशन करा. हे ऑनलाइन होते व पूर्णपणे मोफत आहे.
३. साहित्य आणि उपकरणे खरेदी करा :
- रबर स्टॅम्प मेकिंग मशीन (लायट एक्स्पोजर मशीन)
- स्टॅम्प मोल्ड्स, रबर शीट्स
- शाई आणि स्टॅम्प पॅड
- संगणक व प्रिंटर (डिझाइनसाठी)
४. डिझाइन तयार करणे : डिझायनिंगसाठी कोरल ड्रॉ किंवा तत्सम ग्राफिक्स सॉफ्टवेअरची आवश्यकता असेल. व्यावसायिक कामासाठी कोणतेही सॉफ्टवेअर खरेदी करूनच वापरा. piorated कॉपी वापरू नका.
५. उत्पादन प्रक्रिया : डिझाइन तयार केल्यानंतर मशीनच्या साहाय्याने रबर स्टॅम्प तयार करा. तयार स्टॅम्प कापून, हँडल बसवून ग्राहकाला द्या.
६. बाजारपेठ आणि विपणन : स्थानिक कार्यालये, वकील, शाळा, लायब्ररी, कंपन्या यांना भेट देऊन ऑर्डर मिळवा. सोशल मीडियावर जाहिरात करा (Facebook, WhatsApp, Instagram). जास्तीत जास्त उद्योजकांची भेट व्हावी यासाठी बिझनेस नेटवर्किंग क्लबशीही जोडले जाऊ शकता.
७. आवश्यक भांडवल : सुरुवातीला २० ते ५० हजार रुपयांत हा व्यवसाय सुरू करता येतो. उपकरणे, साहित्य आणि दुकान भाडे यासाठी खर्च होतो.






