दुकान से मकान बनता है; मकान से दुकान नही!


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


कोरोनोनंतरच्या काळात अजाणतेपणी खूप गोष्टी बदलल्या आहेत. जितक्या सूक्ष्म स्तरावर विचार करू तितक्या प्रमाणात बरे-वाईट बदल आपणास जाणवतील. मेन स्ट्रीम व्यवसायावर परिणाम झाल्यावर माझ्या एका मित्राने घरी आइस्क्रीम व दुधाचे छोटेखानी व्यवसाय सुरू केला.

घरातील आई किंवा पत्नी वेळ मिळेल तसे व्यापार सांभाळतील आणि यात काहीतरी अल्पशा का होईना अर्थार्जन होईल अशी त्यांची आशा. एक छोटी पूजा करून प्रसादासाठी त्यांनी मला निमंत्रित केलं असताना मी त्या दिवशी पोहोचू शकलो नाही. परत काही दिवसांनी त्यांच्याकडे सहज चक्कर टाकली.

मुळात आम्ही सोलापूरकर फार भावनिक व आदरतिथ्य करणारे आहोत. दादानी फार आदरपूर्वक स्वागत करून गेल्या काही दिवसात या व्यवसायातील झालेल्या सकारात्मक बदल सांगत होते. आता किमान शंभर-दोनशे रुपये तरी व्यवसाय होतो, अमुक ही मागणी असते इत्यादी इत्यादी.

त्यांनी मला त्यांच्या उत्पादनाचं एक लोकप्रिय मसाला दुधाची ऑफर केली. आदरातिथ्य म्हणून त्यांनी वारंवार आग्रह केला. आईस्क्रीम घेणार का? हे घेणार का? किंवा हे आवडेल का? मी मनापासून विनवणी करत त्यांना नकार दिला.

खरं तर की दुधाची बाटली दहा रुपये विकली जाते आणि नामांकित कंपनी असल्याने फार फार तर ५० पैसे इतकाच नफा त्यांना मिळत असेल. मी जर ते दूध पिलं तर साडेनऊ रुपयाचे नुकसान हे मला दिसत होतं. आपण त्यांचं नुकसान का करावं?

असं मला माझं प्रांजळ मन सांगत होतं. मी स्पष्टपणे नकार दिला आणि घरात वहिनींना आवाज दिला त्यानंतर हक्काने त्यांच्याकडून ‘घरातला’ चहा पिऊन निघून आलो.

माझे आणखीन एक फार जवळचे नातेवाईक आहेत. त्यांचाही किराणा दुकान आहे. आम्ही दोघे समवयस्क असल्याने घनिष्ठ मित्रता ही आहे. जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जातो तेव्हा तेव्हा ते नवीन बिसलेरी पाण्याची बाटली फोडून पाणी पिण्यास देतात. मी कितीही समजावलं तरी ते ऐकायचे नाहीत. दहा रुपयाची पाण्याची बाटली किमान सात-आठ रुपयाला पडले असेल.

दुसर्‍यापेक्षा तीन रुपयांनी स्वस्त पडली तरी किमान सात रुपये देऊनच खरेदी करावी लागली असेल आणि मी काही यांचा व्यापारी किंवा ग्राहक नाही जेणेकरून भविष्यात याचा फायदा होईल? असे विचार करून मी यापुढे तिथे जाणे बंद केले आहे. जरी काही करणास्तव जावे लागले तरी बाहेरच पाच मिनिटे थांबून पळून जातो.

व्यापारातील ती खोली आपण समजून घ्यावी. सिंधी, गुजराती, मारवाडी ही मंडळी या बाबतीत फार सतर्क आहेत. व्यापारात सख्ख्या भावालासुद्धा हिशोब मागताना दिसतील. ही मंडळी खूपच प्रॅक्टिकल आहेत म्हणून यशस्वीसुद्धा आहेत. व्यापार आणि भावना यांचा सरमिसळ ते करत नाहीत. अजिबात करत नाहीत.

बर, व्यवसायात सेट झाल्यावर त्यांच्या इतकं दान-धर्म ही कोणी करत नाही हे ही मान्य करावे लागेल. मुळात सांगायचे झाल्यास आपण प्रथम आपला पाया भक्कम करावा आणि व्यापार व्यतिरिक्त इतर ठिकाणी पैशाला पैसा लागून येत असेल तरच खर्च करावे. अन्यथा परिणाम आपल्या सहित आपल्या अवलंबून असणार्‍या कुटुंबावार होईल. ही व्यापारी शिस्त फार महत्त्वाचे आहे.

आमचं सोलापूरात वडिलोपार्जीत सायकल दुकान आहे. आयुष्याचे तीस पैकी किमान वीस वर्षे तरी मी इथेच व्यतीत केली आहेत. जीवनातल्या बऱ्यावाईट प्रसंगांचा अनुभवही येथेच मिळाले आहेत. माझ्या वडिलांचे घनिष्ठ मित्र एका मोठ्या अधिकारी पदावर आहेत. मी शाळेत असतानाचा प्रसंग; काकांच्या मोटरसायकलमध्ये हवा भरली तर बाबांनी त्यांच्याकडून रोख एक रुपये मागून घेतला.

थोड्या वेळानंतर त्या दोघांनी तीन रुपयांचा चहा पिऊन मैत्री सांभाळली. हा आश्चर्यकारक अनुभव पाहून थोडा विचारात पडलो. पुढे खूप वर्षांनी कॉलेजवयात असताना मी त्या दोघांना या प्रसंगाची आठवण करून दिली त्यावेळी माझ्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट कायमची मनात घर करून गेली आणि प्रत्येक उद्योजक-व्यापार्‍यांनी ही गोष्ट कायमची कोरून घ्यावी.

दुकान से मकान बनता है; मकान से दुकान नही!

व्यापारातून घर, गाडी इत्यादी मिळवता येतं, परंतु घर, गाडी असल्याने धंदा होतो, व्यापरवृद्धी होते असे अजिबात नाही. एका दुकानातून तुम्ही आयुष्यभर पुरतील तेवढे संपत्ती मार्ग, घर-गाडी कधीही निर्माण करू शकता. म्हणून मुख्य धंदा सांभाळला पाहिजे. व्यवसायात भावनिक होऊन चालत नाही.

आपल्या हक्काचे पैसे आपण घेतले नाही तर कसे? कारण दुकानाची मालकी जरी आपली असली तरी त्यावर अवलंबून असलेल्या इतर सर्व कामगार, ट्रान्सपोर्ट, व्हेंडर, मॅन्युफॅक्चर यांचाही असतो. व्यापार करणं हे पूर्ण जबाबदारीचे काम आहे. थोडक्यात काय तर धंद्यातील पैसे धंद्यासाठीच वापरावे. त्यातील झालेला नफा मात्र तुम्ही स्वतः पगार म्हणून घेऊ शकता.

मैत्री-नाती आपल्या जागी आणि व्यवसाय आपल्या जागी

‘अरे तू एवढा विचार करू नको. मी बाहेर कुठे गेलो तरी मला तो रुपया द्यावा लागणार होता ना? मग तो रुपया इथे द्यायला काय अडचण आहे?’ असे म्हणून काकांनी पुष्टी केली हा दृष्टिकोन मला फारच आवडला. खरंच आहे की, एखादी वस्तू आपणास घ्यायची असेल आणि ते आपल्या मित्राकडून नातेवाईकांकडून घेतली तर पूर्ण पैसे भरून का घेऊ नये? ही वस्तू किंवा सेवा मोफत थोडीच बनली आहे? त्याची काहीतरी कॉस्टिंग असेलच की? इथे का डिस्काऊंटची आशा बाळगायची?

व्यवसाय सुरू करण्यासाठी किती हिम्मत लागते हे आपण जाणतोच. असे असतानाही एखादा नवा उद्योगाबद्दल, सेल्समध्ये काम करण्याबद्दल, मार्केटिंगबद्दल आपल्या भारतीय मनात खच्चून नकारात्मकता भरली आहे. एखादा उद्योजक काही प्रयत्न करत असेल तर हा कधी बुडणार काय माहीत?

अशा संशयित नजरेने पाहिले जाते बुडायचं म्हटलं तर अंबानीचा भाऊसुद्धा बुडू शकतो. पण या नवीन कळीला, या नव्या आशांना किमान फाटे तरी फुटू द्या? मुळात उद्योगाबद्दल पाहण्याची नजरच शंकेने भरून फुटत असेल तर कसा होणार भारत महासत्ता? आम्हाला बुडवायला अमेरिका-चायना कशाला हवेत? आम्हीच आपल्या लोकांना गाढण्यासाठी पुरेसे आहोत.

या महामारीनंतरही कोणी कुठून उभा राहण्याचा प्रयत्न करत असेल तर खुल्या दिलाने सहकार्य करा. हक्काने सांगा तुला जर व्यापारात पंधरा टक्के मार्जीन असेल तर फक्त पाच टक्के माझ्यासाठी कमी कर, पण यापुढे सर्व वस्तू/सेवा मी तुझ्याकडूनच रोखीने घेणार.

याउलट उद्योजकांनीसुद्धा भावनेच्या भरात अथवा स्थिर होण्याच्या नादात आपली किमान विक्री किंमत सोडून व्यवसाय करू नका. जवळचे नातेवाईक असो अथवा मोठा क्लाइंट स्पष्टपणे नकार देत सांगा की, किमान एवढी किंमत माझ्या सेवेची-वस्तूचे आहे यापुढे मी कमी देऊ शकत नाही.

शत्रुकडूनही शिकावं असं कौटिल्य म्हणतात. तर मग आपण शेजारच्या शत्रू राष्ट्राकडून काहीतरी शिकायला हवं. त्यांच्याकडे विक्री व उत्पादन करण्याची एवढी क्षमता कुठून आली? एका दिवसात घडले नसेल हे? आणि त्यांच्या देशात लोकसंख्या, भाषावाद, दडपशाही इत्यादी इत्यादी अडचणी आहेतच की मग कुठे कमी पडतो आपण? तर फक्त आणि फक्त दृष्टीकोन!

नव्याने व्यापार करणार्‍या, सेल्स-मार्केटिंग करणार्‍या व्यक्तींना मानाचं स्थान द्या. कारण शेतकरी आणि सैनिकांनंतर सर्वात मोठा समाजसेवक म्हणजे उद्योजक होय. उद्योजकाला पीएफ नसतो, पेन्शन नसते. नाही सरकारी इन्शुरन्स, वीज-कर्ज माफी तर अजिबात नाही.

८० वर्षाच्या उद्योजकालासुद्धा काम करावं लागतं आणि सरकारला महसूल भरावा लागतो. उद्योजकाला रिटायरमेंट नसते. कोरोना असो व अन्य तो नेहमीच समाजहितासाठी काम करत असतो. कोकोकोला कंपनीने सुरुवातीच्या दोन वर्षात फक्त एक बाटली पेय विकले होतं.

अमॅझॉन, अ‍ॅपल, गुगलसारख्या कंपन्या गॅरेजमध्ये सुरू झाल्या. अशा पोस्ट आपण हिरिरीने शेअर करतो. तर मग तुमच्या एखाद्या जवळच्या माणसाने उद्योग सुरू केला तर त्यास नकारात्मकतेने का पाहतो आपण? त्या व्यक्तीला सपोर्ट नको करायला? हक्काने सपोर्ट करा. एकमेकांना आधार द्या. अपयश आले तरी प्रेरणा द्या. बघा पाहता पाहता हा आपला भारत उद्योगांचा उद्योगी होणारच.

फुकटचे हुरडा (ज्वारी) खाण्यासाठी आपण मित्राच्या नातेवाईकांचा किंवा ओळख काढून मित्राचे नातेवाईकांच्या शेतात जाऊन पोहोचतो. अरे तो हुरडा म्हणजे शेतकर्‍याने वर्षभर उन्हातानात कष्ट करत, रक्ताचे पाणी करून पिकवलेलं पीक. मग त्याची किंमत नको करायला? सधन शेतकरी असला तर ठीक; पण शेतकरी गरीब असला तर त्याला बाजारभावाप्रमाणे आपण मोबदला द्यायला नको का?

आजही आंब्याचं पहिलं पीक आलं तर सर्वप्रथम गावामध्ये नातेवाईकांना भेट म्हणून वाटले जाते. लोकं आनंदाने खातात, पण प्रथम पीक घ्यायला किमान आंब्याला तीन वर्षे लागतात तरीसुद्धा शेतकरी मोठ्या मनाने आपला अप्रतिम आंबा भेट म्हणून देतात. किती हा मोठा दिलदारपणा.

हेच आपल्या भारताचे वैशिष्ट्य आहे. पण मित्रहो आपण प्रत्येक शेतकर्‍याला, व्यापाराला नवीन काही करू इच्छिणार्‍या उद्योगाला पूर्ण सकारात्मकतेने पाहून एकमेकांना आधार दिला पाहिजे. अशी व्यापक दृष्टी विकसित केली पाहिजे. असे वर्षानुवर्षे करत गेलो तरच आणि तरच एक दिवस भारत खरोखरचा व्यापारी महासत्ता बनेल.

– नागेश बुद्धे
(लेखक उद्योजक असून ‘विक्रम अ‍ॅनल्याटीक्स’ या कंपनीचे संस्थापक आहेत.)
9960377005

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow