उद्योगाच्या नावात काय आहे?

जशी समस्या तसा उपाय ही उद्योग ज्योतिषाची परिभाषा आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहेच. त्यामुळे आपण प्रथम समस्या शोधन आणि समस्या विधान केल्यावर उपायाकडे वळतो. समस्या वेळेशी किंवा स्वभाववैशिष्ट्यांशी संबंधित असेल तर ज्योतिष उत्तम परिणाम देते. समस्या जर जागेशी संबंधित असेल तर वास्तुनुसार उपाय करावे लागतात.

समस्या जर विचारांशी संबंधित असेल तर हस्तसामुद्रिक आणि जर स्पंदनांशी संबंधित असेल तर अर्थात संख्याशास्त्र. ज्याप्रकारचे समस्या त्याचप्रकारचा उपाय जरूरी असतो नाहीतर आग रामेश्वरी अन बंब सोमेश्वरी अशी स्थिती होऊ शकते किंवा उपाय करूनही हाती काहीच लागत नाही.

उद्योगाचे नाव, कृती, गती अन् परिस्थिती, जितकी उद्योगाला अनुरूप असेल तितकी त्या उद्योगाची प्रगती लवकर व वाढ सुरळीत होते. याकरता तर अनेक मोठमोठे उद्योग आपले नाव वारंवार बदलतात, उद्योगात झालेला बदल नावात प्रतित व्हावा अन् ते नाव उद्योगास अनुरूप राहावे यासाठी.

जसे कि इंडियन टोबॅको कंपनी ITC झाली, TELCO ची टाटा मोटर्स झाली, BackRub ची झाली Google, Apple Computers चे नामकरण झाले Apple Inc, Tokyo Tsushin Kogyo ची झाली सोनी, Brads Drink ची झाली पेप्सी कोला, आणि Confinity ची झाली paypal. नामांतरानंतरची या उद्योगांची प्रगती सर्वश्रुत आहे. त्यामुळे उद्योगाचे नाव विचारात घेताना आपण काय काय करू शकतो याची चांगली कल्पना आपल्याला असणे अतिशय महत्वाचे.

फक्त नावामुळे रसातळाला गेलेलेदेखील अनेक उद्योग आहेत. पूर्वी आपल्याकडे एक लिपस्टिक निघाली होती किस अँड टेल नावाची. मोठमोठ्या जाहिराती झाल्या, प्रायोजित कार्यक्रम झाले, परंतु लिपस्टिकचा खप काही वाढेना. नंतर केलेल्या सर्वेक्षणात लक्षात आले कि या प्रसाधनांचा मुख्य ग्राहक ज्या होत्या स्त्रिया या दुकानदाराला जाऊन कश्या म्हणणार Give me kiss and tell?

‘इसिस’ नावाची एक chocolate कंपनी होती. बेल्जियममध्ये. जवळ जवळ शंभर वर्षे जुनी. तिला २०१३ मध्ये आपले नाव बदलायला भाग पडले. सांगायला हवे का याचे कारण? तसेच १९७० मध्ये एक उत्तम वजन कमी करणारे उत्पादन बाजारात आले. AYDS त्याचे नाव.

दहा वर्षे उत्तम खप, परंतु १९८० मध्ये AIDS चा उदय झाल्यावरती याची झाली गच्छंती. तसेच New Zealand मध्ये दशकानुदशके Gaytimes Ice cream अगदी प्रसिद्ध होते परंतु १९६० नंतर त्याला उतरती कळा लागली. यात त्या उत्पादकांचा काहीच दोष नव्हता. ईश्वरेच्छा बलियसी म्हणतात ते हेच.

याचा दुसरा भाग असा आहे कि जर नावाने किंवा घोषवाक्याने दिलेली खात्री किंवा हमी जर उद्योगाने पूर्ण होत नसेल तर त्या उद्योगाची हानीदेखील तेवढ्याच जोरात होते. उदाहरणार्थ मेडिकलच्या दुकानदाराने जर रात्रंदिवसचा बोर्ड लावला अन् त्याप्रमाणे त्यास दुकान उघडे ठेवता नाही आले तर त्याचा त्याच्या दैनंदिन उलाढालींवरती देखील नकारात्मक परिणाम होतो.

यालाच म्हणतात नाव सोनुबाई आणि हाती कथिलाचा वाळा. जर नाव धोंडूबाई किंवा दगडूबाई असते तर कथिलाचा वाल्याचा फारसा उहापोह केला गेला नसता. बंगळुरूमध्ये एक यमराज नावाचा टॅक्सिवाला अशाच कारणाने गाजतो आहे तुम्हाला माहित असेलच.

उद्योगाच्या नावात उद्योगाची मुख्य ताकद आणि उद्योगाचा उद्देश परिवर्तित व्हावा हे उत्तम. यामध्ये शब्दांचा वापर याप्रमाणे केला जाऊ शकतो. प्रत्येक उद्योगात रवी (अधिकार, अधिष्ठान) असणे हे अध्याहृत असते म्हणजेच प्रत्येक उद्योगात रवी कुठल्याना कुठल्या प्रकारे असायलाच हवा. अ आ ए ई इत्यादी सर्व स्वरांवर रवीचा अंमल असतो.

क, ख, ग, घ, ङ – यांना ‘कंठव्य’ म्हणतात. कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो यांवर मंगळाचे अधिष्ठान मानले जाते. च, छ, ज, झ,ञ- यांना ‘तालव्य’ म्हणतात. कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळूला लागते. यांचा स्वामी शुक्र. ट, ठ, ड, ढ , ण- यांना ‘मूर्धन्य’ म्हणतात. कारण यांचा उच्चार जीभ मूर्धा ला लागल्याने होतो. यांच्यावर मालकी आहे ती बुध ग्रहाची.

बुध हा ग्रह नेहमी सूर्याबरोबर असतो किंवा ज्याच्याबरोबर असेल त्या ग्रहाचे गुणधर्म घेतो. एकटा कधीच नसतो. म्हणूनच तुम्ही बघाल तर जवळजवळ कुठल्याही उद्योगाचे नाव या अक्षरांपासून सुरू होत नाही. त, थ, द, ध, न- यांना ‘दंतव्य’ म्हणतात.

यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते. यावर गुरू ग्रहाची सत्ता असते तर प, फ, ब, भ, म,- यांना ‘ओष्ठ्य’ म्हणतात. कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने होतो. यांच्यावर शनी ग्रहाची मालकी आणि शेवटी राहिला चंद्र, त्याची मालमत्ता य, र, ल अन व.

तुमचा कारक ग्रह ज्या उद्योगाला अनुरूप असेल त्या उद्योगामध्ये तुम्हाला त्याचा नैसर्गिकरित्या फायदा होईल.जसे शुक्राद्वारे निर्देशित उद्योग आहेत : फॅशन डिझायनर, मनोरंजन, अभिनय, अभिनेता, अभिनेत्री, कला, संगीत, चैनी, फुले, फुलवाला, मेकअप, सुगंध, मद्य , फॅशन, कपडे, हॉटेल व्यवस्थापन आणि आतील रचना, इत्यादी, परंतु या उद्योगांमधील तुमची भूमिकादेखील तुमच्या सहायक ग्रहांशी अनुकूल हवी तरच.

चित्रपट उद्योग हा पूर्णपणे शुक्राचा उद्योग आहे परंतु या उद्योगाशी संबंधित सगळेच लोक शुक्राचे काम करीत नाहीत. लेखक बुधाचे, डायरेक्टर्स गुरुचे, नेपथ्यकार शनीचे, तर प्रसादनकार नेपच्युन चे काम करतात. जर तुम्ही तुमच्या कारक ग्रहास व कृतीस अनुरूप नाव घेतले तर तुम्हाला अतिरिक्त जाहिरात नाही करावी लागत आणि तुमचे काम सुकर होते.

यासाठीच तुम्ही उद्योग कोणता करावा याबरोबरच तो कसा करावा, केव्हा करावा आणि कोणाबरोबर कधीपर्यंत करावा या सगळ्याच गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात.

तुमचा कारक ग्रह, तुमच्या उद्योगाचे नाव आणि तुमच्या कृती यांचा संगम जितका उत्तम तितका तुमचा उद्योगवृक्ष उत्तम बहरणार. जसे उद्योगाची वाढ होते तसतशा त्याच्या गरज आणि त्यापासूनच्या ग्राहकाच्या अपेक्षा बदलात जातात आणि त्या प्रमाणे नावात बदल करण्याची जरूरी निर्माण होते.

जसे आपण छोटे रोपटे लावले तर त्याला प्रथम संरक्षणाची, पाणी आणि खत यांची गरज असते, जसे ते रोपटे वाढून त्याचा वृक्ष होतो तेव्हा छाटणीची गरज असते म्हणजे गरजा अगदी उलट टोकाच्या होतात. त्याचप्रमाणे उद्योगातदेखील होते. बदल सतत होत असतो आणि कालची ताकद आपली आजची कमजोरी होऊ शकते.

जो काळाची पावले ओळखून त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करत राहतो तोच या उद्योगविश्वात टिकून राहतो आणि स्वतःचा ठसा निर्माण करू शकतो.

– आनंद घुर्ये
(लेखक प्राचीन भारतीय ज्ञान या विषयातले अभ्यासक आहेत)
संपर्क : ९८२०४८९४१६

Author

  • आनंद घुर्ये

    आनंद घुर्ये हे लौकिकदृष्ट्या अभियंता व एमबीए असून अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ पातळीवर नोकरी केली आहे. थायलंड येथे नोकरीनिमित्ताने असताना अनेकांनी त्यांना भारतीय प्राचीन संस्कृतीबद्दल प्रश्न विचारले. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानाचा अभ्यास सुरू केला. तसेच ते ज्योतिषी म्हणूनही कार्यरत आहेत. उद्योग ज्योतिष हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?