महाराष्ट्रात कार्यरत असलेले बिझनेस नेटवर्किंग फोरम्स
प्रगतिशील उद्योग

महाराष्ट्रात कार्यरत असलेले बिझनेस नेटवर्किंग फोरम्स

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


बिझनेस नेटवर्किंगला सुरुवात करायचा विचार केलात, तर कुठे जाता येईल? कोणाला भेटता येईल? कोणाला संपर्क करावा? कोणता ग्रुप जॉईन करावा? असे अनेक प्रश्‍न आपल्या मनात येऊ शकतात. म्हणूनच आम्ही आंतरराष्ट्रीय ते स्थानिक अशा काही बिझनेस नेटवर्किंग फोरम्सची आपल्याला इथे ओळख करून देत आहोत.

बी.एन.आय.

‘बी.एन.आय.’ हे जगातील सर्वात मोठे बिझनेस नेटवर्क, संपर्क आणि तोंडी माहितीतून मार्केटिंग करणारे ऑर्गनायझेशन आहे. याचा मूळ सिद्धांत ‘Givers Gain’ म्हणजेच ‘देणार्‍याला लाभ’ हा आहे. इतरांना व्यवसाय दिल्याने तुम्हालासुद्धा व्यवसाय मिळेल. हे कर्माच्या सिद्धांतातून आले आहे. ‘तुम्ही जे देता, तुम्हालाही तेच मिळते’, हाच तो सिद्धांत.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

सदस्यांना रचनात्मक, सकारात्मक आणि व्यावसायिक वाटेने उत्तम व्यवसाय करणार्‍या व्यक्तींशी नाते निर्माण करण्यात मदत करणे हे ‘बी.एन.आय.’चे ध्येय आहे. ‘बी.एन.आय.’चा घटक असणे म्हणजे खर्‍या अर्थाने डझनांवारी विक्रेत्यांसोबत असणे होय. कारण, त्या सर्वांकडे तुमची बिझनेस कार्ड्स असणार.

जेव्हा ते अशा व्यक्तींना भेटतील जे तुमच्याकडून तुमची प्रॉडक्ट्स खरेदी करण्यात कदाचित इच्छुक असतील त्यांना तुमचे बिझनेस कार्ड देऊन तुमचा परिचय करून देतील. इतके सोपे आहे हे! हे सोपे आहे, कारण ‘बी.एन.आय.’चे संस्थापक डॉ. इव्हान मिसनर यांनी ‘गिव्हर्स गेन’मधून हे सिद्ध केले आहे. जर तुम्ही मला नफा मिळवून दिलात तर मीसुद्धा तुम्हाला नफा मिळवून देईन आणि मग आपल्या दोघांचीही प्रगती होईल.

‘बी.एन.आय.’ हे व्यवसायाची देवाणघेवाण करण्यासाठी एक पद्धतशीर मार्ग देते. यासाठी ‘बी.एन.आय.’ तुमच्याभोवती उत्तम विक्रेत्यांचे वातावरण तयार करते. अशा औपचारिक नातेसंबंधांतून तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्याची सुवर्णसंधी मिळते. मुंबईसह महाराष्ट्रभरात ‘बी.एन.आय.’चे बरेच चॅप्टर्स चालतात. प्रवेशाबाबत नियम आणि अटी याबाबत बी.एन.आय. खूप कडक आहे.

टी.आय.इ.

TIE ही एक विनानफा कंपनी आहे जी जगभरातील उद्योजकांना आकर्षित करते. ती नवनवील कल्पनेच्या जोरावर उद्योजकता आणि व्यावसायिक जगाला नवीन रूप देण्याचा प्रयत्न करते. याचा पाया मार्गदर्शन, नेटवर्किंग, शिक्षण, फंडिंग आणि देणार्‍याचा लाभ ही पाय तत्त्वे आहेत.

१९९२ मध्ये TIE ची स्थापना झाली आणि आता ही जगातील मोठ्या नेटवर्किंग कंपन्यांपैकी एक आहे. ढखए TIE Young Entrepreneurs आणि Mentor Match सारख्या उपक्रमांतून नवद्योजकांना मदत करते.

बी.आर.एक्स.

BRX हे बिझनेस नेटवर्क आणि संदर्भ देणे याहून खूप अधिक आहे. ही गेल्या दहा वर्षांपासून इंग्लंडमधील सर्वात मोठी बिझनेस नेटवर्क आणि संदर्भ देणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. BRX आता भारतातही हे सिद्ध करून दाखवते आहे आणि लवकरच इतर देशांमध्येही BRX सुरू होईल.

सॅटर्डे क्‍लब ग्लोबल ट्रस्ट

महाराष्ट्रात उद्योजकतेला चालना देण्यासाठी कार्यरत असणार्‍यांपैकी उल्लेखनीय काम करणारे माधवराव भिडे यांनी यांची स्थापना केली. एकमेकांना मदत करता यावी यासाठी उद्योजकांचे जाळे ‘सॅटर्डे क्‍लब’द्वारे विणले गेले. ‘सॅटर्डे क्‍लब’ हे या संस्थेचे नाव आहे, कारण विविध व्यावसायिक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी प्रत्येक शनिवारी भेटले जाते.

महाराष्ट्रात उद्योगाचे बीज रोवले जावे आणि होतकरू उद्योजकांना चालना मिळावी यासाठी ‘सॅटर्डे क्‍लब ग्लोबल ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली आहे.

उद्योगवाढीतून सामाजिक, वैयक्तिक आणि देशाची संपत्ती याची वृद्धी करत देशाचा जीडीपी वाढवणं हे या संघटनेचं उद्दिष्ट आहे. ‘सॅटर्डे क्‍लब’सोबत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, नागपूर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, अमरावती, नवी मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर इ. विविध भागातील उद्योजक जोडले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही दुबई, यूएसए, सिडनी, हाँगकाँग, लंडन आदी ठिकाणीही विस्तार करण्याचा ‘सॅटर्डे क्‍लब’ प्रयत्न करत आहे.

आम्ही उद्योगिनी

महिला दिन, ८ मार्च १९९७ या दिवशी ‘आम्ही उद्योगिनी’च्या कामाला सुरुवात झाली. त्या वेळी रजनीताई दांडेकर (कॅमलिन) व ‘लोकसत्ताचे’ माजी संपादक माधव गडकरी यांचे या कामाला आशीर्वाद लाभले. तेव्हापासून आजही मार्च महिन्यात पहिल्या शनिवारी ‘आम्ही उद्योगिनी’च्या मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्र तसेच भारतातून हजारो यशस्वी उद्योगिनी सहभागी होतात आणि या कार्याचा वसा आणखी समविचारी मैत्रिणींना देतात.

महिला दिनानिमित्त पुरस्कार देऊन उद्योगिनींना प्रोत्साहित केले जाते. त्यात तरुण महिला उद्योजिकांपासून अगदी आजीबाईदेखील सहभागी असतात. यात सर्वच क्षेत्रांतील काम करणार्‍या महिला असतात, जात-पात भेदाभेद न मानता महिला उद्योजिकांना प्रेरणा देणारी चळवळ म्हणजे ‘आम्ही उद्योगिनी’. यातून आज अक्षरश: हजारो महिला सक्षमीकरणाच्या मार्गाने गेल्या आणि आज एखाद्या उद्योजक पुरुषाइतक्याच समर्थपणाने कर्तृत्वाच्या शिखरांना साद घालत आहेत.

एसएमई बिझनेस क्‍लब

भारत सरकारच्या सूक्ष्म आणि लघू उद्योग विकास संस्थेने पुढाकार घेऊन सुरू केलेले एसएमई बिझनेस क्‍लब हे नेटवर्किंग व्यासपीठ आहे. India International Trade Centre (IITC-INDIA), SME Export Promotion Council and Maharashtra Industrial and Economic Development Association द्वारे सूक्ष्म आणि लघू उद्योजकांना विविध क्षेत्रातील ओळखी वाढवणं, उद्योजकीय संधींची देवाणघेवाण करणे, नवनवीन संकल्पना मांडणी, उत्पादन, पुरवठादार, विक्रेते, निर्यातदार, सेवा क्षेत्र, गुंतवणूकदार अशा विविध क्षेत्रांची ओळख करून घेणे यासाठी मदत करते.

याची स्थापना SME Chamber of India and Chairman and Managing Director, Macro Group of Companies चंद्रकांत साळुंखे यांनी केली आहे. याच्या सदस्यांना विविध उद्योजकीय मीटिंग ज्या मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, राजकोट, इंदोर, पुणे, बडोदा, भोपाळ, गोवा, चेन्नई आणि कलकत्ता या ठिकाणी घेतल्या जातात त्यात सहभागी होता येते. त्याचबरोबर भारताबाहेर दुबई, लंडन, हाँगकाँग, टोकियो, सिडनी, कोलालंपूर, सिंगापूर, न्यूयॉर्क, टोरांटो आदी अनेक ठिकाणीही होणार्‍या मीटिंगमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.

उद्योगाच्या वाढीच्या दृष्टीने आवश्यक सर्व प्रकारची मदत, जसे की मार्केटिंग, पॅकेजिंग, प्रमोशन, निर्यात, ब्रँडिंग, लॉजिस्टिक, कायदेविषक, उद्योग व्यवस्थापन, टॅक्सेशन, आर्थिक व्यवस्थापन, बँकिंग, क्रेडिट रेटिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, आयटी सोल्यूशन, HRD training and education आदी उद्योगासाठी आवश्यक असण्यार्‍या गोष्टींची मदत येथून मिळते. या सदस्यांना उद्योग करताना येणार्‍या समस्या, त्या क्षेत्रविषयक समस्या, त्यात करावयाचे बदल, धोरणांची निर्मिती आणि आवश्यक असल्यास त्यातील बदल याविषयी आपले मत मांडण्याची संधी दिली जाते.

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री

‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री’ म्हणजेच डिक्की मुख्यत: दलित उद्योजकांसाठी काम करणारी ही संस्था आहे. तिचं काम २००५ साली पुण्यातून सुरू झाले. डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे हे स्वत: व्यावसायिक आहेत. डिक्कीचे देशभरात विविध राज्यांत १८ चॅप्टर, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ७ चॅप्टर चालतात. डिक्कीचे काम हे दलित वर्गातील विविध व्यावसायिकांना उद्योगजगतात घडणार्‍या विविध घडामोडींची सतत माहिती करून देणं हे आहे. या माहितीसाठी कोणीही त्यांचे सदस्यत्व घेऊ शकतो.

डिक्कीचे सदस्य हे मुख्यत्वे विविध उत्पादन क्षेत्रांतील आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर रसायने, शेतमाल, शेती, प्लास्टिक, टेक्सटाइल्स, पेस्ट कंट्रोल, मरिन इंजिनीअरिंग, सोलार, बांधकाम इत्यादी. याशिवाय शैक्षणिक, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, परकीय निर्यात आदी क्षेत्रांतीलही आहेत. डिक्कीची टॅगलाइन आहे, “नोकरदार होऊ नका, नोकरी देणारे व्हा.”

नेटवर्किंग स्क्‍वेअर

नेटवर्किंग स्क्‍वेअर प्रायव्हेट लिमिटेड देशभरातील विविध मोठ्या शहरांत आणि छोट्या शहरांत कार्यरत आहे, ज्यामुळे देशभरातील ग्रामीण भागातील लोकांनाही याचा फायदा मिळतो. छोट्या शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अनेक उद्योजक असतात, परंतु नेटवर्किंग स्क्‍वेअरसारखे खूप कमी नेटवर्किंग ग्रुप या ठिकाणी कार्यरत असतात. यांना प्रमुख मोठ्या शहरांना जोडण्यासाठी नेटवर्किंग स्क्‍वेअर कार्यरत आहे. नेटवर्किंग स्वकेअर प्रायव्हेट लिमिटेड यांचे उद्दिष्ट आहे की, ७ डिसेंबर २०३० पर्यंत कमीत कमी ३१,२०,००० नवीन कॉर्पोरेट्स तयार करणे.

MEN :: मराठी आंत्रप्रेन्युअर्स नेटवर्क

प्रत्येक उद्योजकाची इच्छा असते, आपला व्यवसाय वाढावा, तो सर्वदूर पोहोचावा, आर्थिक स्थैर्य लाभावे. त्यासाठी महत्त्वाचे ठरते नेटवर्किंग. म्हणूनच ‘मराठी आंत्रप्रेन्युअर्स नेटवर्क’ हा व्यवसायवृद्धीकरिता मराठी उद्योजकांनी सुरू केलेला ग्रुप आहे. ‘मराठी आंत्रप्रेन्युअर्स नेटवर्क’चा उद्देश फक्त आणि फक्त व्यवसायवृद्धी.

बिझनेसमॅन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र

बिझनेसमॅन असोसिएशन ऑफ महाराष्ट्राची स्थापना सन २०१० साली बीएएम म्हणजेच बिझनेसमॅन असोसिएशन ऑफ महाराष्ट्राची स्थापना झाली. २०११ साली ट्रस्ट म्हणून तिची नोंदणी करण्यात आली. बीएएमच्या स्थापनेचा मुख्य उद्देश हा होतकरू महिला व पुरुष उद्योजकांना त्यांचे उत्पादन, सेवा या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे हा होता.

मुख्यत: आपल्या संस्थेतील उद्योजकांना मदत करत एकमेकांचे संपर्क आणि माहितीतील इतर उद्योजकांना जोडत इतरांच्या उद्योगाला वाढवणे व त्यांच्या उत्पादनाला विकण्याला मदत करणे हा याचा पाया होता.

मी उद्योजक

मी उद्योजक हे सूक्ष्म आणि लघू उद्योजकांसाठी असलेले व्यासपीठ आहे. एकाच वेळी अनेक उद्योजकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी उभे करण्यात आलेले हे व्यासपीठ आहे. इथला सदस्य असे मानतो की, “Giver is Achiever” म्हणजे दिल्याने वाढते. यातूनच सर्व सदस्यांची जवळीक निर्माण होते, यातून उद्योगवाढीस मदतच होते.

इथले सदस्य एकमेकांशी विविध प्रकारच्या कल्पनांवर चर्चा करतात. आपले संपर्क एकमेकांशी शेअर करून एकमेकाला व्यवसायवाढीसाठी मदत करतात. यांचे एकूण सात चॅप्टर्स आहेत. इतर देशांतही ते आपला विस्तार करत आहेत.

बीओबी क्‍लब : बिझनेस ओव्हर ब्रेकफास्ट

ओळखीतून चांगला उद्योग होतो, त्यामुळे बीओबी क्‍लब हा त्याच्या सदस्यांसाठी याच पद्धतीने कार्यरत आहे. तुमच्या उद्योगातील स्पर्धकांपेक्षा लवकर आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ग्राहक मिळवू शकता. ओळखीतून तुमच्या उद्योगाला तुम्ही जास्तीत जास्त वाढवू शकता. बीओबी क्‍लबमधील प्रत्येक सदस्य सतत एकमेकांना आपले व्यावसायिक संदर्भ शेअर करून सतत उद्योग वाढवत असतात. त्यामुळे एकाच वेळी जास्तीत जास्त लोक आपल्या उद्योगाची जाहिरात करत असतात.

बीओबीमधील प्रोफेशनल उद्योजकांशी जोडले जाऊन तुम्ही तुमच्यातील कमतरतांना सुधारू शकता. तुमचा आत्मविश्‍वास वाढण्यास मदत होते. सादरीकरण सुधारते. यासाठी सतत तुम्हाला इतर सदस्य मदत करतात. बीओबी सदस्य नेहमी ठोस आणि चांगले उद्योजक यांच्याशी आपल्याला जोडत असतात, त्यामुळे आपला उद्योगवाढीलाही चालना मिळते.

जानेवारी २००४ मध्ये पहिला बीओबी क्‍लब स्थापन झाला. महिन्यातील दोन आठवड्यातून एकदा बीओबीची मीटिंग होते. प्रत्येक सदस्याला ६० ते ९० सेकंदांचा कालावधी दिला जातो ज्या दरम्यान त्याने आपल्या उद्योगाची ओळख इतरांसमोर करून द्यावयाची असते.

प्रत्येक आठवड्यात एका उद्योजकाला त्याच्या उद्योगाचे दहा मिनिटांचे विस्तृत सादरीकरण करता येते. प्रत्येक मीटिंगमध्ये येणार्‍या सदस्यांना किंवा व्हिजिटर्सना आपले रेफरन्स इतरांशी शेअर करण्याचे कोणतेही बंधन नसते, कारण आमच्या सदस्यांना क्वांटिटीपेक्षा क्वालिटीमध्ये जास्त रस असतो.

जीबीएस : ग्रुप बेनिफिट सर्व्हिस

जीबीएसची स्थापना केली आहे ती नीलेश दोशी यांनी. या ग्रुपचे जे सदस्य असतील त्यांच्यातच केवळ विविध कार्यक्रम आणि संपर्काची देवाणघेवाण केली जाऊ शकते. हा एक देशभरातील विविध भागांतून कार्यरत असलेला उद्योजकांचा ग्रुप आहे. या ग्रुपमधील सदस्य एकमेकांशी कॉर्पोरेट जगतातील अनुभव शेअर करतात, ज्यामुळे इतरांना त्यांचा फायदा होतो.

ब्राह्मण बिझनेस नेटवर्क

बीबीएन म्हणजेच ब्राह्मण बिझनेस नेटवर्क. नावाप्रमाणेच ब्राह्मण समाजातील उद्योजकांना जोडणारे हे व्यासपीठ आहे. ब्राह्मण समाजासाठी सर्व काही म्हणजेच ब्राह्मण उद्योजकांच्या विकासासाठी झटणारे हे व्यासपीठ.

(या व्यतिरिक्त जर काही बिझनेस नेटवर्किंग फोरम्स कार्यरत असतील तर वरील लेखात आपल्याही फोरमला जोडण्यासाठी कृपया ९७७३३०१२९२ या क्रमांकावर संपर्क साधा.)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!