तुम्हाला पुस्तक आवडतात, पुस्तकांमध्ये रमता, पुस्तक तुम्हाला सतत आजूबाजूला असावी, असे वाटते मग तुम्ही पुस्तक आणि लेखन याविषयी व्यवसायात यशस्वी होऊ शकता. अशा काही उद्योगसंधी खाली देत आहे.
१. बुक ब्लॉग चालवणे
आजच्या इंटरनेटच्या युगात ब्लॉग लिहणे ही सध्या सर्वसामान्य गोष्ट झालीय. अनेक लोक अनेक प्रकारचे ब्लॉग चालवतात, पण सारेच व्यावसायीक नजरेने याकडे पाहत नाहीत. काही लोक केवळ आवड म्हणून ब्लॉग सुरू करतात, परंतु पुस्तक ब्लॉगर वाचक आणि लेखक यांच्यात खूप लोकप्रिय आहेत.
त्यामुळे इथे अनेक पुस्तकांची ओळख होते. यात लेखक आणि वाचक दोघांचाही फायदा असतो. लेखकाला त्यांच्या पुस्तकासाठी एक व्यासपीठ मिळते आणि वाचकाला नवीन पुस्तकांची माहिती. दुसरा मुद्दा म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे अनेक ब्लॉगर असे ब्लॉग चालवतात. मग अशा वेळी आपण आपली वेगळी ओळख, नावीन्य शोधायला हवे.
उदाहरण द्यायचे झाले तर कादंबरी अथवा रहस्यमय लेखनाची पुस्तके एवढेच निवडून आपण यावरच ब्लॉग चालवावा. म्हणजे जास्त अघळपघळ न होता नेमका ग्राहक आपल्याला मिळेल. हे केवळ एक उदाहरणादाखल.
आपण कोणताही लेखन प्रकार निवडू शकता. आता ही झाली मांडणी, सुरुवात. आता यातून ब्लॉगर पैसे कसे कमवू शकतो तर त्यासाठी अनेक पर्याय असतात.
१. अमेझॉनसारख्या वेबसाईटच्या affiliate marketing माध्यमाने आपल्या ब्लॉगवरून पुस्तके विकणे.
२. आपल्या ब्लॉगवर गूगल ऍड सेन्सद्वारे जाहिराती घेणे.
३. लेखक, प्रकाशक यांना आपल्या ब्लॉगवर त्यांची जाहिरात करण्यासाठी जागा देणे.
४. पुस्तकाचे परीक्षण करण्यासाठी, ब्लॉगवर पब्लिश करण्यासाठी फी घेऊ शकता.
हा एक जोडधंदा असू शकतो, आपली नोकरी सांभाळून केला जाणार अर्धवेळ व्यवसाय असू शकतो, अथवा पूर्ण वेळ व्यवसायसुद्धा असू शकतो. ते प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि चालवण्यासाठी आपल्याकडे सक्षम इंटरनेट, संगणक किंवा लॅपटॉप असणे आवश्यक आहे. आपले यश हे आपल्या पुस्तक ब्लॉगसाठी उत्साही वाचकांची निर्मिती करण्यात असेल. यासाठी आपल्याला एक विपणन (मार्केटिंग) योजना विकसित करण्याची आवश्यकता असेल ज्यात सोशल मीडिया आणि ईमेल तुम्हाला मदत करू शकेल.
२. लेखक होणे
आपल्या प्रत्येकात एक लेखक दडलेला असतो, पण त्यातील एक टक्केच प्रत्यक्ष पुस्तक लिहू शकतात. म्हणजेच तुम्ही पुस्तक लिहल्यास तुम्ही त्या एक टक्क्यात येता. तुम्ही तुमचे विचार, अभ्यास, कविता, कथा, कादंबरी किंवा अजून काही मार्गाने लोकांपर्यंत पोहचू इच्छिता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे केवळ पुस्तक लिहून ब्रेड-बटरचा प्रश्न सुटत नाही.
वास्तविक अनेक पुस्तकांच्या ५ हजार कॉपीसुद्धा खपत नाहीत आणि त्यातही जर आपण स्वतःच प्रकाशक असलो तर अजून कमी विक्री होते.
हे चित्र कधी असते तर जेंव्हा लेखन सकस नसते, त्या लिखाणात दम नसतो, योग्य वाचकांपर्यंत ते पोहचत नाही तेंव्हा. या उलट लेखन सकस असेल, योग्य पद्धतीत त्याची विक्रीचा प्लॅन असेल तर नक्कीच पुस्तक लेखन फायद्यात असते.
पुस्तक विक्रीसाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात. सर्व प्रथम तुम्ही पारंपरिक पद्धतीने पुस्तक विक्रेता शोधून किंवा प्रकाशकासोबत व्यवहार करून विक्री करू शकता. तुम्ही स्वतः ई-बुक प्रकाशित करू शकता. या सेवा देणाऱ्याही अनेक कंपन्या आज मार्केटमध्ये आहेत त्यांची मदत घेऊ शकता.
३. संपादन कौशल्य
अमेझॉनसारख्या मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे प्रकाशन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. आजकाल एजंट्स किंवा प्रकाशकांकडे न जाता अनेक लेखकांची पुस्तके यांच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहचतात. त्यांची पुस्तके वाचनीय आहेत याची खात्री करण्यासाठी या लेखकांना मदतीची आवश्यकता असते.
परिणामी, संपादकांची गरज वाढत आहे. संपादक होण्यासाठी आपल्याकडे भाषा, व्याकरण आणि लेखनशैलीची एक उपजत समज असायला हवी, कारण संपादन हे संपादित करू इच्छित पुस्तकांच्या शैलीनुसार बदलते.
एक संपादक म्हणून व्याकरण, परिच्छेद रचना, लेखनाचा प्रवाह तसेच शब्द निवडसुद्धा तपासावे लागते. कथा प्रवाहित आहे, पात्रे चांगल्या प्रकारे विकसित आहेत का, space नीट आहे का, कुठे ओळी तुटतात का? इत्यादी बारकावे कळावे लागतात.
आपण जे काम करतोय त्यातून ते पुस्तक विकसित होते त्यामुळे त्याचे योग्य मुल्यांकन होणे आवश्यक असते. आपल्याला हे जमायला हवे. आपली संपादन सेवा जितकी सखोल असेल तितके आपण शुल्क आकारू शकतो, पण आपली संपादन कलेसोबत लेखनही चांगले असायला हवे.
१. आपल्याला संपादन सुरू करायचे असल्यास सुरुवातील एक वेबसाइट तयार करा किंवा अगदी कमीतकमी लिंकडइन प्रोफाइल तयार करा. आपल्या सेवांची रूपरेषा तयार करा आणि शक्य असल्यास आपल्या कामाचे संदर्भ आणि नमुने तेथे द्या.
२. मग काम मिळवण्यासाठी लेखकांसह नेटवर्किंग सुरू करा. आपण अगदी नवीन असल्यास, नवीन ग्राहकांना आपणास एखादी विनामूल्य नमुना संपादनाची ऑफर देऊ शकता.
३. आपण संपादन काम मिळवण्यासाठी विविध फ्री-लान्स राईटिंग साइटदेखील तपासू शकता. आपण आपल्या क्षमतेनुसार प्रत्येक पृष्ठानुसार शुल्क आकारू शकता.
४. प्रकाशन सेवा सुरू करा
बर्याच लेखकांना त्यांची पुस्तके जगभरातील उत्सुक वाचकांपर्यंत पोहचवायची असतात. ते लिहू शकतात, पण ती वाचकांपर्यंत पोहचवायचे कसे हे त्यांना माहीत नसते. त्यासाठी त्यांच्याकडे ज्ञान, कौशल्य आणि वेळेचा अभाव असतो.
यासाठी प्रकाशन सेवा काम करते. एक प्रकाशन संस्था, छपाई, संपादन, प्रिंट मांडणी, कव्हर डिझाइन, ई-बुक प्रकाशन, proof reading, तसेच अमॅझॉनवर थेट विक्री अशा अनेक सेवा देऊ शकते.
यापैकी प्रत्येक सेवा करण्याचे कौशल्य किंवा ज्ञान आपल्याकडे एकाच व्यक्तीकडे नसते. अशावेळी आपण त्या त्या क्षेत्रातील मातबराकडून हे काम करून घेऊ शकतो. त्यासाठी आपण प्रकल्प व्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक करू शकता.
आपण आपल्या सेवांसाठी एक-वेळ शुल्क आकारू शकता किंवा आपण आपल्या लेखकाची रॉयल्टी भरून आपल्या नावाखाली पुस्तके प्रकाशित करीत एक पूर्ण-प्रकाशित कंपनी सुरू करू शकता.
५. मुद्रितशोधन
प्रूफ रीडर म्हणजे मुद्रितशोधक. कोणतेही लेखन व्याकरण आणि मांडणीदृष्ट्या तपासणे त्यातील चुका सुधारून सदोष लेखन समोर आणणे हे त्यांचे काम. या कामात संयम खूप लागतो. काम किचकट असते, परंतु पुस्तकांवर प्रेम असेल तर ते न थकवणारे आणि आनंददायीसुद्धा आहे.
हे काम त्यांच्यासाठी आहे जे लिखित कागदपत्रांमधील सर्वात लहान तपशीलांकडे लक्ष देतात आणि व्याकरणात्मक दोष शोधण्यात आणि सुधारण्यास सक्षम असतात. सुरुवात करताना आपण प्रथम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वतः ला आपल्या कामाला लोकांसमोर ठेऊ शकता.
विविध प्रकाशन संस्था, मासिके, लेखक, लेखनविषयक वेबसाइट्स हे आपले ग्राहक होऊ शकतात. या व्यवसायाच्या ऑनलाइन स्वरूपामुळे आपल्याला हे काम करण्यासाठी सक्षम इंटरनेट, लॅपटॉप, ऑनलाईन कामाचे ज्ञान, विविध डिव्हाइसची आवश्यकता असेल. हे काम असे आहे जे आपण घरातूनसुद्धा करू शकतो.
६. स्टोरी टेलर, कथाकथन
स्टोरी टेलर म्हणजेच गोष्ट, कथा सांगणारा. आपल्याला लहानपणापासूनच रंगवून गोष्ट सांगणारा आवडतो. आपण प्रत्येक जण गोष्ट ऐकत तर मोठे झालो. चांगले कथा सांगणारे कोणाला आवडत नाही? पण आता बदलत्या माध्यमांच्या काळात पारंपरिक पद्धतीने गोष्ट सांगणे आणि ऐकणे दोन्ही मागे पडलंय असे वाटते.
याच गोष्टीला आजच्या काळाशी जोडल्यास आपण आधुनिक पद्धतीने हा एक व्यवसाय म्हणून करू शकतो किंवा जोडधंदा म्हणूनसुद्धा करू शकतो. एखाद्याला व्यावसायिक कथा सांगू इच्छिणाऱ्यासाठी अशा अनेक संधी उपलब्ध आहेत. आपण मुलांच्या शाळा, उन्हाळ्याच्या शिबिराच्या कार्यक्रमांमध्ये किंवा लायब्ररीत स्टोरी टेलिंग करू शकतो.
७. पुस्तकांचे दुकान सुरू करणे
पुस्तकांचे दुकान ही एक अशी जागा असते, जिथे सर्व प्रकारची पुस्तक असतात. विविध लेखक आणि विविध विषयांची. या उद्योगाला खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. जर आपण घरचा अभ्यास पूर्ण केला असेल म्हणजेच आपली या व्यवसायात येण्याची पूर्व तयारी झालेली असेल तर नक्कीच यात यशस्वी होऊ शकतो.
आजच्या ई-बुकच्या जमान्यातसुद्धा छापील पुस्तक आपली जागा टिकवून आहे. छापील पुस्तक, चहा किंवा कॉफीचा कप आणि पुस्तके वाचण्याची जागा हे अनुभवणे फक्त छापील पुस्तकांसोबतच शक्य आहे.
त्यामुळे पुस्तकांना मागणी आहे. आपण दुकानासोबत ऑनलाईन दुकानही सुरू करू शकतो. यामुळे जास्त वाचकांपर्यंत पोहचू शकतो.
आपण विशिष्ट एकाच प्रकारची पुस्तकेसुद्धा विकू शकतो; उदाहरणार्थ धार्मिक किंवा प्रेरणादायी. म्हणजे या विषयात रुची असणाराच आपला ग्राहक असेल किंवा जुनी पुस्तके विकणे हाही एक पर्याय आहे. गुंतवणूक कमी प्रमाणात उपलब्ध असेल तर याचा विचार करू शकतो.
८. भाषांतर
भाषांतर ही स्वतंत्र आणि खूप मोठी उद्योगसंधी आहे. जगभरात अनेक भाषा आहेत आणि त्या भाषेत उपलब्ध असलेले अनेक प्रकारचे ज्ञान आहे. जर तुम्हाला एकाहून अधिक भाषा येत असतील तर त्या तुमच्यासाठी एक उद्योगसंधी आहे. यातून तुम्ही चांगली कमाई करू शकता.
सध्या बाजारात अनेक भाषांतर करणारी सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत, पण जे भाषा कौशल्य व्यक्तीमध्ये त्याच्या प्रत्यक्ष कामात असते ते सोफ्टवेअर मध्ये नसते. भाषांतर म्हणजे शब्दशः त्याचा अर्थ लिहणे हा नसून त्यामागील भावना शब्दांकित करणे असते. भाषा कौशल्याच्या जोरावर आपण याचा नक्कीच विचार करू शकतो. विविध प्रकाशक, लेखक, कंपनीसाठी भाषांतरकाराची गरज असते.
९. मुद्रण (प्रिंटिंग प्रेस)
प्रिंटिंग प्रेस सुरू करण्यासाठी केवळ आवड असून चालणार नाही, तर योग्य नियोजन आणि आराखडा तयार असावा लागेल. मोठी आर्थिक गुंतवणूकसुद्धा हवी. या उद्योगसंधीमध्ये सुरुवातीला जास्त मेहनत घ्यावी लागेल. प्रिंटिंग हे एक असे क्षेत्र आहे जिथे व्हिसीटींग कार्ड आणि ऑफिस स्टेशनरीपासून पुस्तक, मॅगझीन, वर्तमानपत्र प्रिंटिंग किंवा बॅनर प्रिंटिंग अशा अनेक प्रकारच्या प्रिंटिंग उपलब्ध असतात.
सध्या आपण पुस्तक आणि संदर्भातील प्रिंटिंगविषयी बोलत आहोत, तर या क्षेत्रातील प्रकाशक, लेखक, आपले ग्राहक असतील. व्यक्तिगत चालवणारी छोटी वृत्तपत्र, मासिके, साप्ताहिके, दिवाळी अंक, व्यक्तिशः पुस्तक प्रकाशित करू इच्छिणारे लेखक असे आपले सुरुवातील ग्राहक होऊ शकतात.
१०. मुखपृष्ठ डिझायनर
कोणत्याही पुस्तकाचे किंवा मासिकाचे मुखपृष्ठ हा त्या पुस्तकाचा, मासिकाचा आरसा असते. त्यामुळे जर तुमच्याकडे हे कौशल्य असेल तर नक्कीच तुम्ही चांगले मुखपृष्ठकार होऊ शकता.
तुम्ही चांगले ग्राफिक्स डिझायनर असाल तर अजूनच फायद्याचे आहे. खरंतर आपण त्या कलाकृतीत रंग भरता आणि वाचकाला आकर्षीत करता. त्यासाठी नक्कीच चांगला मेहनताना मिळतो.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.