उद्योजकतेचा परीस लागला तर सोयाबीनचे सोने होईल. देशात दरवर्षी साधारणपणे सवा कोटी टन सोयाबीनचे उत्पादन होते. महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे पीक घेतले जाते. सोया उत्पादक हे पीक तेलगिरण्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी घेतात.
सोयाबीनमध्ये १८ टक्के तेल असते, तर भुईमुगात ४० टक्के तेल असते. खाद्यतेल हे प्रमुख उत्पादन असल्यामुळे सोयाबीनला भाव मिळत नाही. मात्र जर आपण घरोघरी सोयाबीन खायला सुरुवात केली किंवा गृहउद्योग म्हणून, लघुउद्योग म्हणून सोयाबीनवर आधारित उद्योग सुरू केले, तर आपणास याच्या अनेक पट भाव सहज मिळेल.
१९३० च्या काळात महात्मा गांधींनी सोयाबीनला सोन्याचा दाणा म्हटले होते. महात्मा गांधी एक निसर्गोपचारतज्ज्ञ होते. प्रथिनांची कमतरता दूर करण्यासाठी, कुपोषण दूर ठेवण्यासाठी सोयाबीनला पर्याय नाही. सोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने असतात. ही प्रथिने अंडी, मांस, मटण यातील प्रथिनांसारखीच असतात, मात्र त्यांमध्ये कोलेस्ट्रॉल नसते आणि किमतीलाही ती स्वस्त पडतात.
प्रथिनांचे प्रमुख स्रोत म्हणजे अंडी, मांस, मटण, दूध, डाळी. यांना मागणी जास्त आणि पुरवठा कमी, यामुळे सर्व प्रथिने देणारे पदार्थ महाग असतात. त्यांची प्रचंड आयात होते आणि त्यात भेसळही असते. सोयाबीनचा वापर करून आपण त्यास पर्याय देऊ शकतो.
देशात दरवर्षी लाखो टन डाळी आयात होतात. ऑस्ट्रेलिया, कॅनडासारखे प्रगत देश आणि आफ्रिकेतले अप्रगत देश भारताला डाळी पुरवतात. जणू काही या देशांतील डाळींची शेती भारतासाठी चालू आहे. देशात ६० टक्के जनता शेती करते हे पाहता या प्रश्नाचे गंभीर स्वरूप लक्षात येईल. आपण येथे त्यामुळे निर्माण होणार्या उद्योजकीय संधींचा विचार करूयात.
सोयाबीनची डाळ : बाजारात सोयाबीनची डाळ मिळत नाही. आपण शेतातल्या सोयाबीनचे दोन दाणे हातात घ्या. त्यावरचे टरफल कोठल्याही प्रकारे काढून टाका व त्यांची चव घ्या. आपल्या लक्षात येईल की, ही डाळ तुरीला व हरभर्याला पर्याय ठरेल.
‘सोया संघ पुणे’ यांनी सोयाबीनची डाळ बनवण्याचे यंत्र विकसित केले आहे. हे डोमेस्टिक फ्लोअर मिलप्रमाणे एका कोपर्यात ठेवता येते. सिंगल फेज विजेवर चालते. पिठाच्या गिरणीप्रमाणे वरून सोयाबीन टाकल्यावर डाळ व टरफले मिळतात.
टरफले गाई-गुरांना खाद्य म्हणून वापरता येतात. डाळ वजन करून पॅक करावी किंवा डाळीचे पदार्थ बनवून बाजारात आणावेत. यंत्राची किंमत २५ हजार आहे व दरताशी ५० किलोंची डाळ करता येते. सोयाबीन खाण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते. सोया संघ पुणे यांनी सोयाबीनच्या शंभर-एक पाककृतींची पुस्तिका तयार केली आहे.
बाजारात तुरीच्या डाळीचे भाव शंभराच्या आसपास असतात, तर शेतकर्यांना सोयाबीनचा भाव किलोला ३० रु. कसाबसा मिळतो. आपण डाळ करून पुढे त्याचे खाद्यपदार्थ बनवावेत.
सोयाबीनचे दूध : बाजारात सोयाबीनचे दूध सहसा पाहायला मिळत नाही. सोयाबीनचे दूध दुधाच्या भेसळीच्या बातम्यांत अनेक वेळा वाचायला मिळते. मात्र ही भेसळ आपण ‘चांगली’ म्हणूयात.
१ किलो सोयाबीनपासून ८-१० लिटर सोया दूध मिळते. हे दूध कॉफी, चॉकलेट, फ्लेवर्ड दूध म्हणून चालते; पण हे दूध चहाला फारसे चालत नाही. व्यायाम करणार्या व्यक्तींनी सोयाबीनचे दूध अवश्य सेवन करावे. मॉलमध्ये सोयाबीनचे दूध काचेच्या २०० मिलीच्या बाटल्यांतून मिळते व त्याची किंमत साधारण २४ रु. असते.
घरातला प्रेशर कूकर, गॅस, मिक्सर वापरून आपण सोयाबीनचे दूध बनवू शकता. घरातला प्रेशर कूकर १ किलोचा असतो. त्यापासून दर वीस मिनिटांत आपण ८ लिटर पर्याय दूध बनवू शकतो. प्रथम आपण घरात दूध करावे. स्वत:ची, मित्रांची खात्री पटल्यावर उद्योगात उतरावे.
सोयाबीनचे पीठ : बाजारात आता सोयाबीनचे पीठ मिळू लागले आहे. हे पीठ बनवताना सोयाबीन चांगले भाजून घ्यावेत म्हणजे त्यातील अपायकारक पदार्थ नष्ट होतात. बाजारात मिळणार्या बहुतेक गव्हाच्या ब्रँडेड पिठांत सोयाबीन असतेच. सोयाबीनचे पीठ घरोघरी पोळ्या करताना वापरतात. सोया पिठाचा वापर खाकरे करण्यासाठी करतात. तसेच बेकरी उत्पादने करताना केला जातो. बाजारात सोया ब्रेड बिस्किटे, नमकीन सहज उपलब्ध असते.
डाळीचे पदार्थ : सोयाबीन ही डाळ आहे. अर्थातच डाळीचे सर्व पदार्थ आपण सोयाबीनमध्ये बनवू शकतो. उदा. चटणी, पापड, शेव, चकली वगैरे.
नावीन्यपूर्ण सोया उत्पादने : महाराष्ट्रात सोयाबीनचे प्रचंड उत्पादन होत असले तरी सोयाबीनची नावीन्यपूर्ण उत्पादने हिमाचल प्रदेशातून येतात. तसेच हैदराबादमधून येतात. रेडी टू इट प्रकारचे अनेक पदार्थ त्यात समाविष्ट आहेत. उदा. सोया इन्स्टंट उपमा मिक्स, सोया खिचडी मिक्स, सोया हलवा मिक्स, नूडल्स वगैरे.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.