नोकरी की व्यवसाय? निवड एक चक्रव्यूह

सोशल मीडियावर लोक विचारात असतात, माझ्याकडे अमुक भांडवल आहे, कुठला व्यवसाय सुरू करू किंवा मला व्यवसायच करायचा आहे, तर कुठला व्यवसाय करू?

  • विद्यार्थी आणि पालकांनासुद्धा प्रश्न पडलेला असतो. दहावीनंतर कल चाचणी झाली, ज्यात फक्त शाखा (कला/वाणिज्य/शास्त्र) कुठली निवडायची हेच फक्त कळते.
  • नोकरी करायची की व्यवसाय ह्याचे मार्गदर्शन होत नाही.
  • नोकरी करायची तर नोकर्‍या मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही आहेत.
  • नोकर्‍या जर उपलब्ध असतील तर त्याप्रमाणे शिक्षण उपलब्ध नाही आहे?
  • ९० टक्के व्यावसायिकांना सुरुवातीच्या काळात अपयशाला सामोरे जावे लागत आहे?
  • एकविसाव्या शतकात हे गोंधळाचे वातावरण तयार झालेले आहे का?

माहिती आणि तंत्रज्ञानाचा उदय

जगातील प्राणिमात्रांचा (मानवासकट) जर विचार केला, तर हे लक्षात येईल की प्रत्येकाची जगण्यासाठी चाललेली धडपड आहे. ह्या पृथ्वीवर मानव हा एकमात्र प्राणी आहे, ज्यांच्या मेंदूचा विकास होत गेला. जसा जसा मानवाच्या मेंदूचा विकास होत गेला, तसे तसे जगण्यासाठी मानवाकडे वेगवेगळ्या प्रकारची साधने निर्माण होत गेली.

आदिमानवाच्या काळामध्ये माणूस जगण्यासाठी शिकार करायचा. त्यासाठी शिकारीची साधने तयार करायचा. नंतर मेंदूच्या विकासाबरोबर हरित क्रांती झाली, जगण्यासाठी मानव शेती करू लागला, नंतर परत मेंदूच्या विकासाबरोबर औद्योगिक क्रांती झाली, जगण्यासाठी मानव कारखान्यात नोकरी करू लागला. नंतर माहिती आणि तंत्रज्ञानाची क्रांती झाली.

इथेच खरी गडबड सुरू झाली. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे नोकरी आणि व्यवसायात हजारो प्रकारचे करीअर निर्माण झालेत. त्यामुळे प्रत्येकाला असा प्रश्न पडला आहे, नेमके काय करायचे?

यशाची प्रणाली

१९७० नंतर जगात अब्जाधीशांचीही संख्या वाढत आहे. ते यशस्वी का होत आहेत? उलटपक्षी उद्योगजगत मोठ्या प्रमाणात अपयशाला सामोरे जात आहे. ह्या अपयशाचे कारण काय? ह्या यश आणि अपयशांवर बरेच संशोधन आणि चर्चासत्रे चालू आहेत. बरेच व्यावसायिक एका अविवेकी विश्वासाचे बळी पडतात की, आमचे नशीब चांगले नव्हते, आमच्याकडे भांडवल नव्हते, माझे खानदान श्रीमंत नव्हते वगैरे.

मग ज्यांना यश/अपयश (कमी/अधिक) मिळाले ते का मिळाले?

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मेंदूमध्ये दडलेली आहेत. मेंदूचे चार लोब आहेत. प्रत्येक लोबचा संबंध एका बुद्धिमत्तेशी असतो. इथे बुद्धिमत्तेचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट जगण्यासाठी (करीअरच्या संदर्भात) तुम्ही सहजपणे करू शकता.

पहिला लोब : ज्याला आपण क्रिएटिव्ह मेंदू म्हणतो. जो जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू/सेवांच्या उत्पादननिर्मितीची कामे करतो किंवा ज्या वस्तू/सेवा निर्माण झालेल्या आहेत, त्याचा विकास करतो.

दुसरा लोब : हा पहिल्या लोबच्या विरोधामध्ये असतो. जर पहिला लोब विकसित झाला असेल तर हा लोब विकसित झालेला नसतो. तसेच पहिला लोब विकसित झालेला नसेल तर हा लोब विकसित होतो. ज्याचा दुसरा लोब विकसित झालेला आहे, त्याला उत्पादननिर्मिती करता येत नाही, मग जगण्यासाठी ह्यांच्याकडे उपलब्ध असलेला मार्ग म्हणजे, ज्या वस्तू/सेवा निर्माण झालेल्या आहेत, त्यांचा व्यापार करणे. ह्या लोबचे वैशिष्ट्य म्हणजे योग्य वेळी निर्णय घ्यायचा ह्याचे तारतम्य असते. ही वृत्ती व्यापार करण्यासाठी आवश्यक असते.

सारांश : तुम्ही उत्पादन (किंवा वस्तू/सेवांमध्ये नाव निर्मिती) करू शकता किंवा व्यापार करू शकता.

तिसरा लोब : ज्यांचा तिसरा लोब विकसित झालेला असतो त्यांना लोकांची ऊब हवी असते. तो लोकांशी सहजपणे मिसळतो.

चौथा लोब : तसेच ज्यांचा तिसरा लोब विकसित होत नाही, त्यांचा चौथा लोब विकसित होतो, म्हणजेच ह्या व्यक्तींना लोकांमध्ये सहजपणे मिसळता येत नाही. अशा व्यक्ती जगण्यासाठी प्रणाली (सिस्टम) विकसित करायचे काम उत्तम प्रकारे करू शकतात.

सारांश : तुम्ही लोकांच्या गरजांच्या निगडित व्यवसाय करू शकता किंवा जिथे लोकांचा संबंध येणार नाही, अशासाठी प्रणाली बनवू शकता.

बुद्धिमत्ता आणि शैक्षणिक साधनांचा/कौशल्याचा ताळमेळ आणि व्यवसाय निवड

प्रामुख्याने दोन गोष्टींचा ताळमेळ जमवावा लागेल.

प्रथमत: लोब : माझ्या बुद्धिमत्तेचा कुठला लोब विकसित झालेला आहे हे ओळखावे लागेल. ह्यात गोम अशी असते की, परिस्थिती (निसर्ग/संगोपन) प्रमाणे, कधी कधी एक किंवा दोन किंवा तीन लोब विकसित झालेले असतात. ह्या बुद्धिमत्तेचा नंतर निवडलेल्या शैक्षणिक साधने किंवा कौशल्यानुसार विकास करावा लागतो.

नंतर उपलब्ध शैक्षणिक साधने : आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये गुणांप्रमाणे कला/वाणिज्य/शास्त्र ह्या शाखा निवडाव्या लागतात. जर विद्यार्थ्याला त्याची वरील बुद्धिमत्ता कळली आणि गुणांप्रमाणे कला/वाणिज्य/शास्त्र ह्या शाखा निवडून, त्या बुद्धिमत्तेप्रमाणे पुढील करीअर ठरवता येईल.

लोब – बुद्धिमत्ता – वैशिष्ट्य

पहिला : करीअर

निर्माण, नवनिर्माण संशोधन, वस्तू/सेवांची उत्पादन/निर्मिती, कला क्षेत्र, वकील, लेखक, दिग्दर्शक

दुसरा : वेळेचे तारतम्य

व्यापार करणे, वस्तू/सेवांची विक्री, आयात/निर्यात

तिसरा : समूहात सहजपणे मिसळणे

मानवी संसाधन, लीडर, व्यवस्थापन, ट्रेनर, समुपदेशक

चौथा : प्रणाली तयार करणे

इंजिनीअर, चार्टर अकौंटंट, लायब्ररियन, ई-कॉमर्स व्यवसाय

काही उदाहरणे बघू या.

सचिन तेंडुलकरचे साधन क्रिकेट होते, अमिताभचे साधन अभिनय आहे, लताचे साधन गाणे आहे, मग त्यांची बुद्धिमत्ता काय होती, ती त्यांनी कशी विकसित केली? ह्या दोघांचा वापर करून नेमका व्यवसाय कसा केला?

व्यवसाय जगातील काही उदाहरणे पाहू या –

संजीव कपूरचे साधन पाककला आहे, त्याची बुद्धिमत्ता काय आहे, त्याचा वापर करून त्याने व्यवसाय कसा विकसित केला? वॉरेन बफेटचे साधन शेअर मार्केट आहे, त्याची बुद्धिमत्ता काय आहे आणि त्याने व्यवसाय कसा विकसित केला?

अंबानीचे साधन वेगवेगळे व्यवसाय सुरू करणे, त्याची बुद्धिमत्ता काय आहे? रे क्रोक (McDonald) फ्रँचाइस हे साधन झाले, मग त्याची बुद्धिमत्ता काय आहे? टाटा लोकांमध्ये सहजपणे मिसळत, मनुष्यबळ जमवणे ही त्यांची बुद्धिमत्ता होती, जी त्यांनी, टाटाचा व्यवसाय विकसित करण्यासाठी वापरली.

उद्योजकांसाठी सत्त्वपरीक्षा

खरी परीक्षा नवउद्योजक किंवा ज्यांनी आताच उद्योग सुरू केलेला आहे किंवा ज्यांनी उद्योग सुरू करून काही वर्षे झालेली आहेत, त्यांनी वरील सूत्राचा वापर कसा करावा की करू नये? कारण वरील गोष्टींचा जर आज विचार केला तर सर्व गणिते बदलतील.

सध्याच्या उद्योगात कदाचित आमूलाग्र बदल करावा लागेल, ज्यात आर्थिक धोका असू शकतो; परंतु हे जर बदल नाही केलेत तर मग कुठला धोका आहे? वरील बुद्धिमत्तेप्रमाणे व्यवसायात बदल केलेत तर नवीन कुठल्या प्रकारच्या धोक्यांना सामोरे जावे लागेल? ह्याचा ताळमेळ घातला तर बुद्धिमत्तेप्रमाणे व्यवसायात बदल करणे नक्कीच फायदेशीर ठरते.

जगाला सर्वोत्तम द्या, जगातील सर्वोत्तम तुमच्याकडे परत येईल.

– नितीन साळकर
९३२१८९७९४१

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?