बिझनेस प्लॅनचे मुख्य घटक काय असतात?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


बिझनेस सुरू करण्याची इच्छा बर्‍याच जणांना असते; परंतु त्यासाठी योग्य प्रकारे योजना आखणे म्हणजेच बिझनेस प्लॅनिंग करणे मात्र प्रत्येकाला जमतेच असे नाही. बर्‍याच जणांना तर बिझनेस प्लॅनची गरज आहे हेच माहिती नसते. एक चांगला बिझनेस प्लॅन तुमच्या बिझनेसमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक आणू शकतो तसेच लाखो रुपयांचा होणारा तोटा टाळू शकतो. तेव्हा प्लॅनिंग केल्याशिवाय बिझनेसला हात घालू नका.

बिझनेस प्लॅन म्हणजे काय?

सर्वप्रथम आपण समजून घेऊ या बिझनेस प्लॅन म्हणजे काय? बिझनेस प्लॅन तुमच्या बिझनेसबद्दल काही उत्तरे देतो. काही महत्त्वाचे प्रश्न असतात ज्यांची उत्तरे गुंतवणूकदारांना जाणून घ्यायची असतात. बँक असो किंवा गुंतवणूकदार असो त्यांना तुमच्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवण्याआधी तुमच्या बिझनेसची माहिती जाणून घ्यायची असते.

तुम्ही नक्की काय करणार आहात, कसे करणार आहात, हे बघायचं असतं आणि त्यामुळे बिझनेस प्लॅन हे एक असं डॉक्युमेंट असतं जे तुमच्या गुंतवणूकदारांना किंवा तो प्लॅन वाचणार्‍या कोणालाही पाच प्रश्नांची उत्तरे देतं. Why, What, Who, When, How?

तुम्ही बिझनेस का करताय?
तो कसला बिझनेस आहे?
बिझनेस करणारे लोक कोण आहेत?
त्यांचा अनुभव काय आहे?
तो कधी पैसे कमवायला लागणार आहे?
कधी नफा करणार आहे?
आणि तो बिझनेस कसा करणार आहात.

How हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमचा बिझनेस तुम्ही कसा करणार आहात हे जाणून घेण्यामध्ये गुंतवणूकदारांना रस असतो.

बिझनेस प्लॅनची खरंच गरज आहे का?

बर्‍याच स्टार्टअपच्या मनात हा प्रश्न असतोच. त्यांना वाटतं, खूप सारे एमबीए असलेल्या मोठ्या कंपन्यांसाठी  बिझनेस प्लॅन आहे. माझं तर छोटंसं स्टार्टअप आहे, छोटा बिझनेस आहे. मला काय बिझनेस प्लॅनची गरज?

बिझनेस सुरू करण्याचा उत्साह एवढा असतो, जोश एवढा असतो, की आधी बिझनेस सुरू करतात आणि प्लॅन बनवण्याचं राहून जातं. मला विचाराल, तर बिझनेस प्लॅन बनवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. बिझनेस प्लॅनची गरज आहे, कारण जोपर्यंत बिझनेस प्लॅन बनत नाही, तोपर्यंत तुमच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणीही तयार होणार नाही.

बिझनेस मोठा करण्यासाठी त्यामध्ये पैसा आणावा लागतो आणि पैसा आणण्यासाठी गुंतवणूकदारांना बिझनेस प्लॅन दाखवावा लागतो, पटवून द्यावा लागतो. यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे बिझनेस प्लॅन तुम्हाला एक बिझनेसमन म्हणून दिशादर्शक ठरतो.

मला काय मिळवायचं आहे हे जर तुम्ही आधी ठरवलं नाही तर बिझनेस सुरू केल्यानंतर कामाच्या रगाड्यात बिझनेसची दिशा हरवून बसता. अशा वेळेला तुम्हाला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी बिझनेस प्लॅनच मदत करतो.

बिझनेस प्लॅनमध्ये काय लिहावं याचे मुख्य घटक आता आपण बघू या :

Revenue Streams: बिझनेस प्लॅनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही Revenue Streams बद्दल माहिती द्यायची असते. Revenue Streams म्हणजे तुम्ही कोणकोणत्या मार्गाने पैसे कमावणार आहात.

तुम्ही प्रॉडक्ट विकणार आहात की भाडेतत्त्वावर (Rent/Lease) देणार आहात की वर्गणी रूपात (Subscription) देणार आहात.

दर महिन्याला पैसे आकारणार की दर वर्षाला पैसे आकारणार आहात.

तुम्ही विक्रीपश्‍चात सेवेमधून पैसे कमावणार आहात की स्पेअर पार्टमधून.

व्यवसायामध्ये पैसे कमावण्याचे अनेक मार्ग असतात. या मार्गांना Revenue Streams असे म्हणतात. तुम्ही एकापेक्षा अधिक मार्गांचा अवलंब करावा असे अपेक्षित असते. त्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला बिझनेस प्लॅन मध्ये लिहायची असते.

Cost Structure: दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं Cost Structure काय आहे. मशीनचा खर्च, माणसांचा खर्च, प्लांटचा खर्च, जागा, जमीन, ऑफिसचा खर्च, मार्केटिंगचा खर्च असे बिझनेसमध्ये करावे लागणारे अनेक खर्च असतात.

तुमच्या बिझनेसमध्ये अनेक प्रकारचे खर्च असू शकतात. ते कोणकोणते खर्च आहेत आणि किती आहेत याची गुंतवणूकदारांना माहिती घ्यायची असते. तसेच हे खर्च भविष्यात किती वाढणार आहेत किंवा कमी होणार आहेत. जसाजसा तुमचा सेल वाढेल तसे काही खर्च कमी होऊ लागतात आणि काही खर्च वाढू लागतात.

कोणतीही विक्री न करताही जे खर्च करावेच लागतात त्यांना Fixed Cost म्हणतात. उदा. मशीनरीचा खर्च आणि काही खर्च विक्रीच्या संख्येनुसार वाढत जातात त्यांना Variable Cost म्हणतात. उदा. कच्चा माल, पॅकेजिंग इत्यादी.

जेवढी Fixed Cost जास्त असेल तेवढा गुंतवणूकदारांचा रस कमी कमी होत जातो आणि जे गुंतवणूक करायला तयार होतात त्यांना खूप जास्त परताव्याची अपेक्षा असते.

Target Customers: तुम्ही जे उत्पादन किंवा सेवा विकणार आहात ते नक्की कोणाला विकणार आहात. तुमचे नेमके ग्राहक कोण आहेत?

कमी उत्पन्न गटातील लोक, मध्यम उत्पन्न गटातील लोक, श्रीमंत, अतिश्रीमंत लोक किंवा स्त्रिया की पुरुष,  कॉलेजमधील मुले, नुकतेच नोकरी करणारे लोक, नोकरी करणारे थोडे वरिष्ठ लोक की बिझनेसमन, मुंबईतील लोक, पुण्यातील लोक, पूर्ण महाराष्ट्रातील लोक की पूर्ण भारतातील लोक?

तुमचं उत्पादन हे लोकांची गरज (Need) आहे ही इच्छा (Want) आहे? कुठल्या सेगमेंटमधील ग्राहकांना तुमचं प्रॉडक्ट घ्यावंस वाटणार आहे? याच्याबद्दल तुम्हाला आधी बिझनेस प्लॅनमध्ये लिहायचं असतं.

Product / Solution: त्यानंतर आपण लिहायचं असतं तुमचं प्रॉडक्ट किंवा सोल्यूशन नेमकं काय आहे ते. समजा, तुम्ही फूड बिझनेसमध्ये असाल तर वडापावदेखील फूडमध्ये येतो आणि फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये घेतलेलं सेवन कोर्स जेवण हेदेखील फूड बिझनेसमध्येच येतं.

  • तुम्ही तुमच्या दुकानांमधून विकणार आहात की तुमच्या ऑनलाइन वेबसाइटवरून विकणार आहात.
  • मॉलमध्ये तुमचे दुकान थाटणार आहात की एखाद्या गर्दीच्या ठिकाणी चौकामध्ये दुकान सुरू करणार आहात.
  • तुम्ही ऑफिस स्थापन करणार आहात की घरूनच काम करणार आहात.
  • तुम्ही भारतामध्ये विकणार आहात की आंतरराष्ट्रीय बाजारात विकणार आहात.
  • तुमचं प्रॉडक्ट नक्की काय आहे? तुमचं सोल्यूशन नक्की काय आहे?
  • ते ग्राहकांच्या कोणत्या गरजा भागवत आहे किंवा ग्राहकांच्या कोणत्या समस्यांवर तो उपाय आहे?
  • तुमची सेवा किंवा उत्पादन वापरून ग्राहकांना काय फायदा होणार आहे. त्या बाबतीत सविस्तर माहिती तुम्हाला बिझनेस प्लॅनमध्ये लिहायची आहे.

मार्केटिंग स्ट्रॅटेजी : त्यानंतर तुम्हाला बिझनेस प्लॅनमध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजीबद्दल लिहायचं आहे. एकदा तुम्ही ग्राहक ठरवलात, तुमचं प्रॉडक्ट ठरवलं, त्यानंतर जास्तीत जास्त उचित ग्राहकांपर्यंत तुम्ही कसं पोहोचणार हे तुम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटेजीअंतर्गत लिहायचं आहे.

  • ऑनलाइन मार्केटिंग करणार की ऑफलाइन?
  • टीव्ही अ‍ॅडव्हर्टायझिंग करणार, रेडिओ अ‍ॅडव्हर्टायझिंग करणार की पेपरमध्ये जाहिरात देणार?
  • मार्केटिंग बजेट किती असणार?
  • तुमचा USP काय असणार आहे?
  • स्पर्धकांवर मात करण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे?
  • तुमच्यामध्ये आणि स्पर्धकांमध्ये कोणता असा फरक आहे जो ग्राहकांना कळेल?
  • तुम्ही पहिल्या वर्षात किती ग्राहकांपर्यंत पोहोचणार? दुसर्‍या वर्षात किती ग्राहकांपर्यंत पोहोचणार? तिसर्‍या वर्षात किती ग्राहकांपर्यंत पोहोचणार?

या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या बिझनेस प्लॅनमध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजीअंतर्गत तुम्ही लिहायची असतात.

टीम आणि मॅनेजमेंट

हा बिझनेस कोण करणार आहे? तुमची टीम कोण आहे? जे लोक आहेत त्यांचं प्रावीण्य कशामध्ये आहे? त्यांचा अनुभव कशामध्ये आहे? तुम्ही एकटे आहात की तुमच्यासोबत को-फाऊंडर आहेत?

जर तुम्ही एकटेच करणार असाल तर कदाचित तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचे एक्सपर्ट आहात; परंतु मार्केटिंगचे एक्स्पर्ट नसाल, फायनान्स एक्सपर्ट नसाल, अशा वेळेला गुंतवणूकदार सहसा पैसे गुंतवत नाहीत. कारण तुम्हाला बिझनेस नीट सांभाळणं कदाचित जमणार नाही, अशी त्यांना भीती वाटू शकेल.

त्यासाठी तुमच्या टीममध्ये सगळ्या प्रकारचे कौशल्य असणारे लोक तुम्ही समाविष्ट केले पाहिजेत. त्यासोबत तुम्हाला कोण कन्सल्टंट आहेत का? मेंटर आहेत का? जे तुम्हाला वेळोवेळी सल्ला देतील असे लोक तुमच्या मागे आहेत का? हेदेखील गुंतवणूकदार पहातात.

बाजारामध्ये आधीपासूनच नाव कमावलेल्या एखाद्या व्यक्तीने जर तुमच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं असेल तर गुंतवणूकदारांसाठी ती एक मोठी हमी ठरते आणि अशा बिझनेससमध्ये ते पैसे गुंतवतात. एक चांगला बिजनेस प्लॅन तुमच्या बिझनेसमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक आणू शकतो तसेच लाखो रुपयांचा होणारा तोटा टाळू शकतो. तेव्हा प्लॅनिंग केल्याशिवाय बिझनेसला हात घालू नका.

– सलिल चौधरी
संपर्क : 9082205254

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?