शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन उभं करा स्वतःचं ‘बिझनेस स्वराज्य’

१९ फेब्रुवारी हा दिवस आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव म्हणून साजरा करतो. स्वराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी आणि छत्रपती शिवाजी म्हणजे स्वराज्य. असं हे शाब्दिक नातं आहे. स्वराज्य म्हणजे स्वतःचं शासन किंवा स्वतःचं राज्य असा याचा अर्थ होतो.

सतराव्या शतकात हीच स्वराज्याची संकल्पना जिजाऊ माँसाहेब आणि शहाजीराजे भोसले यांच्या संकल्पनेतून मांडली गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ती सत्यात उतरवली. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी याचा वारसा चालवला.

कदाचित एखाद्या प्रदेशाची वतनदारी मिळवून शिवाजी महाराज आदिलशाहीत, मोगलशाहीत किंवा निजामशाहीत नोकरी करू शकले असते, चांगली वतनदारीदेखील त्यांना मिळाली असती, पण तसे न करता त्यांनी स्वराज्याचा आग्रह धरला आणि तो सत्यात उतरवला.

तोरणा (प्रचंडगड) किल्ल्यापासून सुरू केलेलं स्वराज्याचं स्टार्टअप पुढे हिंदवी स्वराज्याचं साम्राज्य झालं. मुळात हे त्यांनी प्रवाहाच्याविरुध्द दिशेन उचललेलं पाऊल होतं यात किती यश आणि किती अपयश हे माहीत नव्हतं, पण जोखीम मात्र असणार होती.

मनात स्वराज्याची प्रतिमा तयार होती ती पूर्ण करण्याची संकल्पना मनात होती. हाच आदर्श आजच्या तरुण पिढीने घेऊन आता एकविसाव्या शतकात आपल्याला पुन्हा उभं करायचं आहे एक नवं स्वराज्य… हो बिझनेस स्वराज्य.

कोणत्याही व्यवसायाची सुरुवात ही स्टार्टअपपासूनच होत असते. काही व्यवसाय घरातून उभे राहतात, काही गडकिल्ल्यांतून, काही कॉलेजच्या कॅम्पसमधून तर काही शेतातल्या गोठ्यातून. पण पुढे हेच स्टार्टअप कॉर्पोरेट लूक घेऊन पुढे येतात.

कोणत्याही व्यवसायाची सुरुवात छोट्यातून होत असते. पण ती होणे तेवढेच गरजेचे आहे. आता तर स्टार्टअप उद्योग उभे राहण्यासाठी बर्‍याच योजना सरकारने आणल्या आहेत आणि आणतही आहे. यासाठी प्रेरणा देत आहे, सोबतच सबसिडी आणि काही स्कीम.

त्या स्कीमचा उपयोग आपण आपल्या व्यवसायासाठी जरूर केला पाहिजे. पण फक्त स्कीम आहे म्हणून व्यवसाय करून फायदा नाही. स्कीमसाठी सुरू झालेले व्यवसाय चार-दोन वर्षात बंद पडतात. यामुळे उद्योग तर संपतोच पण तुमच्यात जीवंत असलेला उद्योजकदेखील संपतो आणि मग आपणच अयशस्वी उद्योजकतेचे धडे समाजाला देतो.

मुळात आपल्याला व्यवसायच करायचा आहे ही सकारात्मक मानसिकता ठेवा त्यातून स्कीमचा फायदा होत असेल तर चांगलेच. यामुळे तुमच्या उद्योगाला आर्थिक सहाय्य आणि प्रेरणाही मिळेल. एकदा तुमचं स्टार्टअप उभं झालं तर त्याला मोठं बनायला वेळ लागणार नाही पण ती जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे.

सतराव्या शतकात काय झालं तर! आदिलशाही, निजामशाही आणि मोगलशाही म्हणजे आजच्या कॉर्पोरेट भाषेत या एखाद्या एम.एन.सी. कंपनीपेक्षा काही कमी नव्हत्या. भारतभर नाही तर भारताच्या बाहेरही त्यांचं साम्राज्य होतं.

किती तरी सैन्य, घोडदळ, शस्त्र, नाणी, दागिने, किती तरी खजिना होता आणि याला आव्हान देणारा कुणी जन्माला येईल अशी कल्पना स्वप्नातसुद्धा या हुकमी साम्राज्यापुढे करणे शक्य नव्हते.

पण याच परिस्थितीत १९ फेब्रुवारी १६३० रोजी भोसले घराण्यात शिवरायांचा जन्म झाला आणि उभं राहिलं स्वराज्याचं एक नवीन स्टार्टअप आणि हेच स्टार्टअप एक दिवस एवढ मोठ झालं की दिल्लीच्या तक्तालासुद्धा यापुढे झुकावं लागलं. हा स्वराज्याचा इतिहास आहे.

ज्या मातीने स्वराज्याचा इतिहास रचलेला आहे त्याच मातीत आपणही जन्म घेतला आहे. हो स्वराज्याच्या इतिहासाची सुरुवात महाराष्टातूनच झाली. स्वराज्याचे बाळकडू आपल्याही रक्तात आहेत. मग का नाही करू शकत आपण उभं असच एक नवीन स्टार्टअप. बिझनेस स्वराज्य.

व्यवसायाची सुरुवात करणे हे व्यवसायाच्या दिशेन उचललेल पाहिलं पाऊल असतं. ते कधी बरोबर तर कधी चुकीचे पडणारच! जन्माला आलेलं बाळ काही लगेच धावायला नाही लागत आणि तशी अपेक्षा आपण करणेही चुकीचंच. ते आधी रांगायला, चालायला शिकतं, व्यवसायाचं तसच असतं हळूहळू व्यवसाय उभा राहत असतो.

व्यवसाय नफ्यात की तोट्यात हा निष्कर्ष लावेपर्यंत किमान तीन वर्षे तुम्हाला तो प्रामाणिकपणे चालवावा लागेल, पण आधी ते व्यवसायाचं पाऊल आपण उचललं पाहिजे. हळूहळू सगळे प्रश्न सुटत जातात.

बर्‍याचदा स्टार्टअप उद्योगात सगळेच विभाग आपल्यालाच हाताळावे लागतात. अगदी टेलीकॉलरपासून ते मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंत. ती तयारी आपली असायला हवी. एकदमच अष्टप्रधान मंडळ, ताब्यात असणारे गडकिल्ले, येणारा महसूल, विविध खाती, हत्ती, घोडे, पायदळ, पालख्या उभ्या राहत नाहीत. त्यासाठी हवी असते जिद्द, चिकाटी, आणि भविष्यातील ध्येय.

व्यवसाय म्हणजे असतं तरी काय?

ग्राहकांच्या गरजा आपल्या वस्तू आणि सेवेतून पूर्ण करणे, पण ‘बिझनेस’ या शब्दानेच आपल्यावर एव्हढा मानसिक आघात केला आहे की तो शब्द जरी एकला तरी व्यवसाय नकोच वाटते, पण त्यातील संधी आपण शोधून त्याकडे सकारात्मक बाजूने पहिले पाहिजे.

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं स्टार्टअप उभं केलं तेव्हा सोबतचे काही सवंगडी घेऊन यशाचं पाहिलं तोरण बांधलं. वयाच्या सोळाव्या वर्षी मिळवलेलं हे यश पुढील प्रवासासाठी प्रेरणा देणारं होतं. कॉर्पोरेट बाजूने जेव्हा आपण शिवाजी महाराजांना अभ्यासतो तेव्हा बर्‍याच गोष्टींचा उलघडा आपल्याला होतो.

पहिलं म्हणजे त्यांची नीतीमुल्यं आणि व्यक्तिगत चारित्र्य. व्यवसायातदेखील नीतीमुल्य तेवढीच महत्त्वाची असतात. आपण ती जपली पाहिजे. ज्याला आपण बिझनेस एथिक्स म्हणतो ती आपण जपली पाहिजे. फक्त पैसा मिळवायचा म्हणून व्यवसायाची नीतीमुल्यं विसरून व्यवसाय करीत असाल तर आपण जास्त काळ व्यवसायात टिकणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचा व्यक्तिगत अभ्यास जेव्हा आपण करतो तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या बर्‍याच बाजू आपल्या लक्षात येतात. त्यांची बॉडी लँग्वेज, पेहराव, आवाजातील करारीपणा, नेतृत्व गुण आणि निर्णयक्षमता हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे काही पैलू.

छत्रपती शिवाजी महाराज अनावधानाने राजे झाले नव्हते किंवा तो काही अपघात नव्हता तर छत्रपती शिवाजी महाराज जाणीवपूर्वक ठरवून माँ जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले याच्या स्वराज्य संकल्पनेसाठी छत्रपती होणार ही गडकिल्याच्या काळ्या दगडावरची रेष होती.

असेच नाही जिजाऊ माँसाहेब त्यांना बालपणापासून बाळराजे म्हणायच्या. तसं ठरवून आपल्याला उद्योजक होता आल पाहिजे बिझनेस स्वराज्यासाठी. स्वराज्यासाठी लागणारी गुणकौशल्ये ते बालपणापासून आत्मसात करीत होते. शिकत होते मुळात हेच तर धडे त्यांना दिले जात होते.

घोडेस्वारी, तलवारबाजी, गडकिल्यांचा अभ्यास, स्व-रक्षण, नेतृत्व हे पालकत्वाचे धडे त्यांना कधीच मिळाले होते आणि हेच धडे आज जर आपल्याला आपल्या पालकांकडून मिळत गेले तर बिझनेस स्वराज्यासाठी आपली ही यशाची पावले असतील. नेतृत्वगुण, बोलण्याची कला, व्यावसायिक वातावरण, व्यवहार, यशस्वी उद्योजकांच्या कथा या गोष्टी आपण रुजवल्या पाहिजे.

‘हर हर महादेव’ हे आत्मिक प्रेरणा देणारं वाक्य तेव्हा स्वराज्याची टॅगलाइन बनली आणि भगवा झेंडा स्वराज्याचा लोगो बनला. ज्या गडकिल्ल्यांवर भगवा झेंडा तो भाग स्वराज्याचा आणि जे गडकिल्ले मिळवायचे होते त्याची सुरुवात म्हणजे ‘हर हर महादेवची’ गर्जना.

पुढे स्वराज्य विस्तारत चाललं होत अनेक गडकिल्ले स्वराज्यात सामील होत होती. गडकिल्ले मिळवणे म्हणजे फक्त गडावर किंवा किल्ल्यावर मिळवलेला तो अधिकार नव्हता तर त्या प्रदेशातील महसूल, तिथे जमा होत होता.

स्वराज्यात गावा-गावात गढ्या होत्या, त्याची वतनदारी देशमुख, कुलकर्णी, वतनदार या कुणा एकाकडे असायची, तो महसूल तिथून मिळत असायचा. फक्त महसूलच नाही तर गावाला मदत ही या माध्यमातून व्हायची. ते एक नेटवर्क होतं. गावागावात घराघरात पोहचण्याचं.

व्यवसायातदेखील असचं असतं. आपल्या व्यवसायाच्या शाखा म्हणजेच आजचे गडकिल्ले; ज्यातून आपल्याला पैसा येत असतो. ते गडकिल्ले आताच्या एकविसाव्या शतकात आपल्याला उभे करता आले पाहिजे.

ते बिझनेस नेटवर्क गावागातून, शहराशहरातून, जिल्ह्यांतून, राज्यांतून उभं करून आपल्या वस्तू किंवा सेवा पोहचून त्यातून व्यावसायासाठी पैसा उभा राहिला पाहिजे. स्वराज्य चालवण्यासाठी वित्त म्हणजे पैसा लागतो. पैसा उभा राहिला की स्वराज्याचा विस्तार होतो.

चला तर एक नवा संकल्प करूया नवीन स्वराज्यनिर्मितीचा आणि उभं करूया आपलं नवीन बिझनेस स्वराज्य.

– डॉ. निलेश देशमुख
संपर्क : 9689395123

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?